You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
सीरियावर लष्करी हल्ला कराल तर खबरदार : रशियाचा अमेरिकेला इशारा
सीरियात झालेल्या कथित रासायनिक हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर रशियानं अमेरिकेला लष्करी आक्रमण न करण्याचा इशारा दिला आहे.
"तुम्ही सीरियात जे घडवू पाहत आहात तसं करू नका असं आवाहन मी तुम्हाला करतो," अशा शब्दांत रशियाचे संयुक्त राष्ट्रांमधले राजदूत व्हॅस्ली नेब्नेझिया यांनी अमेरिकेसमोर आपल्या देशाची भूमिका मांडली.
कोणत्याही स्वरुपाचा बेकायदेशीर हल्ला केल्यास त्याचे परिणाम भोगावे लागतील आणि त्याची संपूर्ण जबाबदारी तुमच्यावर राहील असंही रशियानं अमेरिकेला बजावलं आहे.
सीरियाबाबात अमेरिका येत्या 48 तासांमध्ये मोठा निर्णय घेईल, असं वक्तव्य अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी केलं आहे.
दरम्यान सीरियाच्या डौमामध्ये झालेल्या रासायनिक हल्ल्यासाठी जबाबदार असणाऱ्यांवर एकत्रित लक्ष्य करण्याचा इरादा पाश्चिमात्य देशांच्या नेत्यांनी व्यक्त केला होता.
सीरियातील रासायनिक अस्त्रांचं तळ कोणत्याही हल्ल्याचं प्रमुख लक्ष्य असेल असं फ्रान्सचे अध्यक्ष इम्यॅनुअल मॅक्रॉन यांनी सांगितलं.
संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत सीरियाच्या मुद्यावरून फूट पाहायला मिळाली. सीरियात झालेल्या रासायनिक हल्ल्याची नव्यानं चौकशी करण्याच्या मुद्यावर बैठकीत एकमत होऊ शकलं नाही.
अमेरिकेनं तयार केलेल्या मसुद्याला रशियानं विरोध केला, तर चीननं तटस्थ राहणं पसंत केलं. रशियानं सुचवलेल्या प्रस्तावाला अमेरिकेनं सहमती दर्शवली नाही.
बंडखोरांच्या ताब्यात असणाऱ्या घूटा प्रांतातल्या डौमा इथं असाद सरकारनंच रासायनिक हल्ले घडवून आणल्याच्या आरोपांची स्वतंत्र चौकशी व्हावी असा अमेरिकेचा प्रस्ताव होता. रशियाकडून लष्करी कुमक मिळणाऱ्या सीरियाच्या सरकारनं मात्र या आरोपांचं खंडन केलं आहे.
डौमा इथं झालेल्या हल्ल्यात प्रतिबंधित रसायनं वापरण्यात आली की नाही हे ठरवण्यासाठी ऑर्गनायझेशन फॉर द प्रोहिबिशन ऑफ केमिकल वेपन्स अर्थात ओपीसीडब्ल्यू संस्थेचे प्रतिनिधी लवकरच सीरियात दाखल होणार आहेत.
मात्र हा हल्ला कोणी केला यासंदर्भात ओपीसीडब्ल्यूची काहीही भूमिका असणार नाही.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)