सीरिया हल्ला : रशिया, इराण आणि 'अॅनिमल असद'ला मोठी किंमत चुकवावी लागेल - ट्रंप

सीरियातील डोमा शहरात आज झालेल्या रासायनिक हल्ल्यात 70 जणांचा मृत्यू झाल्याचं सांगितलं जात आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी सीरियातील रासायनिक हल्ल्यावरून सीरियाचे राष्ट्राध्यक्ष, इराण आणि रशिया यांच्यावर हल्ला चढवला आहे.

"सीरियातील रासायनिक हल्ल्यासाठी बशर अल असद, इराण आणि रशीया यांना मोठी किंमत चुकवावी लागेल," असं ट्वीट डोनाल्ड ट्रंप यांनी केलं आहे.

शनिवारी सीरियातील डोमा शहरावर झालेल्या कथित रासायनिक हल्ल्यात अनेक लोक मारले गेले आहेत.

ट्रंप यांनी राष्ट्राध्यक्ष बशर अल असद यांना 'जनावर' असं संबोधत ते सीरियाला समर्थन देत असल्याची टीका केली. ट्रंप यानी रशिया आणि इराणवरही कठोर शब्दांत टीका केली आहे.

आंतरराष्ट्रीय प्रतिक्रिया

ब्रिटनने या घटनेची तत्काळ चौकशी करण्याची मागणी केली आहे. पोप फ्रान्सिस यांनी रासायनिक हल्ल्यांना कोणत्याही परिस्थितीत न्याय्य ठरवता येणार नसल्याचं म्हटलं आहे.

दरम्यान सीरिया आणि रशिया यांनी मात्र रासायनिक हल्ल्याशी आपला संबध नसल्याचं म्हटलं आहे.

ट्रंप यांनी या घटनेवर काही ट्वीट केली आहेत.

ते म्हणतात, "सीरियामध्ये कुठलाही विचार न करता रासायिक हल्ला करण्यात आला. यात अनेक लोक मारले गेलेत. मृतांमध्ये महिला आणि लहान मुलांचा समावेश आहे. ते अशांत क्षेत्र सीरियाच्या सैन्यदलाच्या ताब्यात आहे आणि तिथं बाहेरच्या जगताला पोहोचता येणं कठीण आहे. जनावर असद यांना पाठिंबा देण्यात रशियाचे अध्यक्ष पुतिन, रशिया आणि इराण हे जबाबदार आहेत. त्यांना याची फार मोठी किंमत चुकवावी लागणार आहे."

बंडखोरांशी चर्चा

बंडखोर संघटना जैश अल-इस्लाम बरोबरची रशियाची चर्चा गेल्या आठवड्यात खंडित झाली होती. त्यानंतर पुन्हा युद्ध सुरू झालं आणि आता डोमा शहरात हा हल्ला झाला आहे.

असं असलं तरी सीरियाच्या सरकारी मीडियाच्या वृत्तानुसार, रविवारी जैश अल-इस्लामबरोबर झालेल्या चर्चेप्रमाणं कैद्यांच्या सुटकेच्या बदल्यात त्यांना डोमा शहरातून सुरक्षित बाहेर पडण्यासाठी अवधी दिला जाणार होता.

आतापर्यंत बंडखोर संघटना जैश अल-इस्लामच्या बाजून कुठलीच प्रतिक्रिया समोर आलेली नाही.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)