You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
इराणशी व्यापार कराल तर अमेरिकेशी व्यापाराला मुकाल - ट्रंप यांचा इशारा
इराणशी व्यापारी संबंध ठेवणाऱ्या कुठल्याही देशाला अमेरिकेशी व्यवहार करता येणार नाहीत, असा थेट इशारा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी एका ट्वीटमधून जगाला दिली आहे.
अणू करारामधून माघार घेतल्यानंतर आता अमेरिकेतर्फे इराणवर कडक निर्बंध लादले जातील, असं राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी सांगितलं. आजपासून हे नवे निर्बंध लादले जाणार आहेत.
आर्थिक दबावामुळे इराण नव्या अणू करारासाठी तयार होईल आणि 'द्वेषकारक' कारवाया थांबवेल, असा विश्वास ट्रंप यांना आहे.
आज रात्रीपासून अमेरिकेचे इराणवर निर्बंध लागू होत आहेत. मात्र याचे परिणाम भारतावर जाणवणार आहेत. इराक आणि सौदी अरेबिया यांच्यानंतर भारताला तेल पुरवणारा इराण सगळ्यात मोठा निर्यातदार देश आहे.
दरम्यान इराणचे अध्यक्ष हसन रुहानी यांनी अमेरिकेची कारवाई म्हणजे 'मानसिक युद्धच' असल्याचं सांगितलं.
निर्बंधांचं उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती तसंच संस्थांना परिणामांना सामोरं जावं लागेल असा इशारा ट्रंप यांनी दिला आहे.
युके, फ्रान्स, जर्मनी यांच्यासह रशिया आणि चीन हे देशही 2015 अणू कराराचा भाग होते. अमेरिकेच्या इराणवर आणखी निर्बंध लादण्याच्या निर्णयावर या या देशांनी खेद व्यक्त केला आहे.
या करारात कबुल केलेल्या तरतुदींनुसार वागावं, असं आवाहन या देशांनी इराणलाही केलं आहे. आपल्याला आर्थिक फायदा मिळणार असेल तरच आपण अटींचं पालन करू, असं इराणचं त्यावरचं म्हणणं आहे.
शेवटच्या क्षणी अमेरिकेशी चर्चा करण्याचा विचार रुहानी यांनी धुडकावून दिला. चर्चा तसंच मुत्सद्देगिरीच्या माध्यमातून हा प्रश्न सोडवला जाऊ शकतो मात्र त्यामागची भूमिका प्रामाणिक हवी, असंही रुहानी यांनी इराण सरकारतर्फे नियंत्रित चॅनेलवर बोलताना सांगितलं.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)