अनुष्कावर 4 वर्षांपूर्वीच्या टीकेला विराटचं प्रत्युत्तर, इंग्लडमध्ये ठोकलं पहिलं टेस्ट शतक

    • Author, पराग फाटक
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

चार वर्षांपूर्वी गर्लफ्रेंड अनुष्का शर्मा सोबत असल्याने विराट कोहलीच्या कामगिरीवर परिणाम झाला अशी टीका होत होती. मात्र गुरुवारी अनुष्काच्या साक्षीने इंग्लंडविरुद्धच्या बर्मिगहॅम कसोटीत शतकी खेळी साकारत विराटने टीकाकारांना चोख प्रत्युत्तर दिलं.

चार वर्षांपूर्वी इंग्लंड दौऱ्यात सपशेल अपयशी ठरलेल्या कोहलीवर चांगली कामगिरी करण्याचं दडपण होतं. इंग्लंडच्या 287 धावांसमोर खेळताना कोहलीचे सहकारी नियमित अंतरात बाद झाले. मात्र इंग्लंडमध्ये चांगली कामगिरी करून दाखवण्याच्या निर्धाराने खेळणाऱ्या कोहलीने शतकासह इंग्लंडला बॅकफुटवर ढकललं.

टेस्ट क्रिकेटमधलं कोहलीचं हे 22वं तर इंग्लंडमधलं पहिलंच शतक आहे. चार वर्षांपूर्वीच्या इंग्लंड दौऱ्यात गर्लफ्रेंड अनुष्का शर्मा कोहलीसोबत होती. खराब प्रदर्शनामुळे या सेलिब्रेटी कपलवर प्रचंड टीका झाली होती. म्हणूनच गुरुवारी शतक पूर्ण होताच कोहलीने पत्नी अनुष्काला अभिवादन केलं. गळ्यातली चेन आणि हातातली रिंग यांच्या साक्षीने कोहलीने अनुष्काची साथ मोलाची असल्याचं दाखवून दिलं.

विराटच्या टेस्ट क्रिकेटमधल्या शतकी खेळी

काय झालं होतं चार वर्षांपूर्वी

1, 8, 25, 0, 39, 28, 0, 7, 6, 20

ही आहे विराटची चार वर्षांआधी झालेल्या इंग्लंड दौऱ्यातली पाच टेस्ट मिळून असलेली कामगिरी.

एखाद्या टेलएंडर अर्थात तळाच्या बॅट्समनला साजेसे हे आकडे. आताच्या घडीला विराट रनमशीन म्हणून ओळखला जातो. वनडे, टेस्ट आणि ट्वेन्टी-20 मध्ये मिळून त्याच्या नावावर 17,435 रन्स आहेत. शतकांची संख्या आहे 56. अॅव्हरेज आहे पन्नासच्या पल्याड. हे आकडे खेळाडू महान असल्याची साक्ष देतात.

IPL स्पर्धेत तर विराटची धावांची टांकसाळ अव्याहतपणे सुरू आहे. विराटची प्रत्येक धाव त्याला रेकॉर्डबुकमध्ये घेऊन जाणारी आहे. विक्रम आणि प्रतिष्ठेचे सगळे पुरस्कार त्याच्या पोतडीत आहेत. मात्र एक सल आहे. इंग्लंडमध्ये ढगाळ वातावरणात, चेंडू प्रमाणाबाहेर स्विंग होत असताना रन्स करणं.

सगळ्या संघांविरुद्ध त्यांच्या मायदेशात जाऊन विराटने धावा अक्षरक्ष: कुटल्या आहेत. पण चार वर्षांपूर्वीचा इंग्लंड दौरा विराटसाठी आणि भारतीय संघासाठी नामुष्कीचा होता. या दौऱ्यानंतर विराटच्या तंत्रकौशल्यावर, संयमाने न खेळण्यावर प्रचंड टीका झाली होती.

इंग्लंड दौऱ्यातल्या कटू आठवणी बाजूला सारून विराटने अथक मेहनत घेतली. क्रिकेट कौशल्यांच्या बरोबरीने शाब्दिक चकमकींनी परीक्षा पाहणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यात खोऱ्याने धावा करत विराटने टीकाकारांना प्रत्युत्तर दिलं.

तेव्हापासून विराट अखंडितपणे रन्स करतोच आहे. चार वर्षांत गुणवान खेळाडू ते महान खेळाडू अशी प्रचंड भरारी त्याने घेतली आहे. आता वेळ आली आहे इंग्लंड परीक्षेची. विराटला स्वत:ला नव्याने सिद्ध करायचं आहे.

बाकी देशांमधले विराटचे आकडे आणि इंग्लंडमधलं प्रदर्शन यात प्रचंड तफावत आहे. आशियाई उपखंडात चेंडू हातभर वळत असताना तसंच दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिजमधल्या चेंडूला प्रचंड उसळी मिळणाऱ्या पिचवर विराटच्या रन्स होतात.

तेजतर्रार फास्ट बॉलरपासून अनुभवी स्पिनरपर्यंत सगळ्यांना त्याच्या बॅटचा तडाखारुपी प्रसाद मिळतो. इंग्लंडमध्ये चेंडू टप्पा पडल्यानंतर स्विंग होऊन पटकन स्टंपच्या दिशेने येतो.

साहजिक बोल्ड किंवा LBW होण्याची शक्यता जास्त असते. आऊटस्विंग म्हणजे टप्पा पडून चेंडू बाहेर निघतो. अशावेळी कीपर, स्लिप किंवा गलीमध्ये कॅच उडण्याची शक्यता जास्त असते.

इंग्लंडमधल्या पिचेसशी जुळवून घेण्यासाठी विराटने IPLनंतर इंग्लंडमध्ये काऊंटी क्रिकेट खेळण्याची शक्कल लढवली. त्यासाठी अफगाणिस्तानविरुद्धची टेस्ट मॅचवर पाणी सोडण्याची तयारी केली. पण दुखापतीने घात केला. अफगाणिस्तानविरुद्धची टेस्ट नाहीच पण इंग्लंडमध्ये सरे संघासाठी खेळताही आलं नाही.

अँडरसन-ब्रॉड जोडगोळी ठरणार डोकेदुखी?

कोहलीला मामा बनवण्याचं काम केलं होतं जेम्स अँडरसन आणि स्टुअर्ट ब्रॉड या दुकलीनं. ही जोडगोळी चार वर्षानंतरही कायम आहे. टीम जिंकत असेल तर मी किती रन्स करतो महत्वाचं नाही असं कोहली म्हणाला. त्यावर अँडरसनने कडी करत टोला लगावला. माझ्या रन्स महत्वाच्या नाहीत असं कोहली म्हणत असेल तर तो खोटं बोलतोय असं वाक्युद्ध अँडरसनने छेडलं आहे.

दुसरीकडे तज्ज्ञांनी अँडरसनला सबुरीने घेण्याचा सल्ला दिलाय कारण चार वर्षांपूर्वीचा कोहली आणि आताचा कोहली यात फरक पडला आहे. अँडरसन-ब्रॉड जोडीला सॅम करन आणि जेमी पोर्टर या युवा उमद्या खेळाडूंना इंग्लंडने संघात घेतलंय. जेमतेम विशीत असलेल्या या दोघांची खासियत म्हणजे चेंडू स्विंग करणं.

कर्णधार कोहलीसमोरचं आव्हान

चार वर्षांपूर्वी कोहली भारतीय संघाचा प्रमुख फलंदाज होता. कर्णधारपद महेंद्रसिंग धोनीकडे होतं. चार वर्षांनंतर कोहलीकडेच भारतीय संघाचं नेतृत्व आहे. अनुभवी फलंदाज आणि कर्णधार अशा दोन्ही आघाड्या कोहलीला स्वत:ला पेलायच्या आहेत.

घरच्या मैदानावर दादागिरी करणाऱ्या भारतीय संघाची इंग्लंडमधली कामगिरी फारशी आश्वासक नाही. खालच्या तक्त्याकडे नजर टाकली तर विराटसमोरचं आव्हान किती कठीण आहे याचा अंदाज येतो.

गर्लफ्रेंडची सोबत

तो दिवस होता 19 ऑगस्ट 2014. भारतीय क्रिकेट संघ इंग्लंडच्या दौऱ्यावर होता. यादरम्यान एका इंग्रजी वृत्तपत्राने बातमी छापली. बीसीसीआयच्या तेव्हाच्या नियमानुसार खेळाडूंना विदेशी दौऱ्यादरम्यान आपली पत्नी, बहीण, आईवडील यांना बरोबर घेऊन जाण्यास परवानगी होती. बहुतांश खेळाडूंच्या पत्नी त्यांच्याबरोबर होत्या. विराट कोहलीने बीसीसीआयकडे गर्लफ्रेंड अनुष्का शर्माला बरोबर असण्याची परवानगी मागितली होती.

नियमानुसार गर्लफ्रेंडला खेळाडूबरोबर असण्याची परवानगी नव्हती. मात्र बीसीसीआयने विराटला तशी परवानगी दिली होती. म्हणून अनुष्का शर्मा त्याच्याबरोबर होती. ही बातमी प्रसिद्ध होताच सगळीकडे विराट-अनुष्का जोडीची चर्चा होती.

इंग्लंड दौऱ्यात लौकिकाला साजेशी कामगिरी करता न आल्याने विराटवर जोरदार टीका झाली. कसोटी संघातून त्याला काढून टाका अशा चर्चांना उधाण आलं होतं. गर्लफ्रेंड बरोबर असल्याने खेळावर लक्ष केंद्रित करू शकला नसल्याची आवई उठली होती.

चार वर्षांनंतर विराट आणि अनुष्काचं लग्न झालं आहे. लग्नाची बायको म्हणून अनुष्का विराटसह इंग्लंडमध्ये असेल. 'विरुष्का' या नावाने हे सेलिब्रेटी कपल प्रसिद्ध आहे. कारकीर्दीत अवघड प्रसंगावेळा अनुष्काची साथ मोलाची असल्याचं विराटने वारंवार सांगितलं आहे. कारकीर्दीत शिखरावर असताना विराटची नव्यानं सत्वपरीक्षा आहे.

जडेजा-अँडरसन वाद

मागचा इंग्लंड दौरा जेम्स अँडरसन आणि रवींद्र जडेजा यांच्यातील वादाने गाजला होता. ट्रेंटब्रिज येथे पहिली कसोटी झाली होती. या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी अँडरसनच्या गोलंदाजीवर जडेजाविरुद्ध अपील झालं. मात्र अंपायर्सनी त्याला नाबाद ठरवलं.

लंचवेळी दोन्ही संघातील खेळाडू पॅव्हिलियनमध्ये परतत असताना अँडरसनने जडेजाला धक्काबुक्की करत आक्षेपार्ह शेरेबाजी केल्याचा आरोप भारतीय संघाने केला. जडेजा अँडरसनच्या दिशेने धावून गेला असा आरोप इंग्लंड संघाने केला.

आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी आयसीसीने दोन्ही खेळाडूंवर आरोप निश्चित केले होते. आयसीसीने जडेजाला दोषी ठरवत त्याच्या मानधनातून 50 टक्के रक्कम कापून घेण्याचा निर्णय आयसीसीने घेतला होता. भारतीय संघाने या निर्णयाविरोधात दाद मागितली होती.

अखेर न्यायमूर्ती गॉर्डन लुईस यांच्यासमोर याप्रकरणाची सुनावणी झाली. व्हीडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सहा तास चाललेल्या सुनावणीनंतर अँडरसन आणि जडेजा हे दोघेही निर्दोष असल्याचा निर्वाळा दिला.

यावेळी झालेल्या वादात दोन्ही खेळाडूंकडून आयसीसीच्या आचारसंहितेचे कोणत्याही प्रकारे उल्लंघन झालेले नाही असेही गॉर्डन यांनी स्पष्ट केलं. जडेजाला याआधी देण्यात आलेली शिक्षाही रद्द करण्यात आली. या निर्णयामुळे दोन आठवडे चाललेल्या वादावर पडदा पडला.

चार वर्षांपूर्वीच्या मालिकेतली भारताची कामगिरी

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)