लक्ष्य सेनची आशियाई बॅडमिंटन स्पर्धेत सुवर्ण कामगिरी

    • Author, पराग फाटक
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

जाकार्तामध्ये सुरू असलेल्या आशियाई ज्युनियर बॅडमिंटन स्पर्धेत लक्ष्य सेननं बॅडमिंटन स्पर्धेत रविवारी सुवर्णपदक पटकावलं आहे.

लक्ष्य सेननं अंतिम लढतीत जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या थायलंडच्या कुनलावूत वितीडिसकरनला 21-19, 21-18 असं नमवत जेतेपदाला गवसणी घातली.

आशियाई बॅडमिंटन ज्युनियर स्पर्धेचं जेतेपद पटकावणारा लक्ष्य केवळ तिसरा भारतीय बॅडमिंटनपटू आहे. याआधी गौतम ठक्कर (1965), पी.व्ही. सिंधू (2012) यांनी या स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली होती.

लक्ष्यनं दोन वर्षांपूर्वी याच स्पर्धेत कांस्यपदक मिळवलं होतं.

बेंगळुरूस्थित प्रकाश पदुकोण अकादमीचा विद्यार्थी असणाऱ्या लक्ष्यनं गेल्या वर्षी ज्युनियर जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी झेप घेतली होती. लक्ष्य मूळचा उत्तराखंडमधील अल्मोराचा आहे.

2016मध्ये लक्ष्यनं इटानगर येथे झालेल्या वरिष्ठ राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेच्या जेतेपदावर नाव कोरलं होतं. त्याच वर्षी लक्ष्यनं ऑल इंडिया सीनियर रँकिंग स्पर्धेच्या जेतेपदावरही कब्जा केला होता. हे दुहेरी यश साकारणारा लक्ष्य देशातला सगळ्यात लहान वयाचा बॅडमिंटनपटू ठरला होता. लक्ष्यचा भाऊ चिराग हाही बॅडमिंटनपटू आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)