You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
डोनाल्ड ट्रंप यांच्या इंग्लंड वारीदरम्यान हा 'ट्रंप बेबी' लंडनच्या आकाशात दिसणार
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप पुढील आठवड्यात लंडनच्या भेटीला येणार आहेत, तेव्हा अख्ख्या जगाचं लक्ष वेधण्यासाठी लंडनमध्ये आणखी एक ट्रंप सज्ज होणार आहेत - 'ट्रंप बेबी'.
तुम्ही म्हणाल हे काय?
13 जुलैला ट्रंप UKच्या पंतप्रधान थेरेसा मे यांना त्यांचं निवासस्थान 10 डाऊनिंग स्ट्रीट इथे भेटणार आहेत. तेव्हा त्यांच्या व्यंगात्मक लहान बाळाच्या रूपातला एक खूप मोठा फुगा लंडनच्या आकाशात दिसणार आहे. त्यासाठी परवानगीही देण्यात आली आहे.
ट्रंप बेबी हा हिलियम वायूनं भरलेला, 6 मीटर उंच फुगा आहे. काही आंदोलनकर्त्यांनी एकत्र येऊन तयार केलेल्या या फुग्यासाठी 18,000 पाउंड, म्हणजे जवळपास 16 लाख रुपये खर्च आला आहे.
हा फुगा ट्रंप यांची सध्याची प्रतिमा दर्शवत असल्याचं आंदोलकांचं म्हणणं आहे. लहान बाळाप्रमाणे रागावणारे आणि वायफळ अहंकार बाळगणारे ट्रंप अशा स्वरूपात हा फुगा तयार करण्यात आला आहे.
लंडनचे महापौर सादिक खान यांनी हा फुगा उडवण्यासाठी परवानगी दिली. यासाठी व्हाईट हाऊसची प्रतिक्रिया जाणून घेण्याचाही प्रयत्न करण्यात आला.
ट्विटरवर UK इंडिपेन्डन्स पार्टीचे नेते नायजेल फराज म्हणाले की, "अमेरिकेच्या विद्यमान राष्ट्राध्यक्षांचा हा आजवर केलेला सर्वांत वाईट अपमान असेल."
हा मोठा फुगा 13 जुलैला सकाळी केवळ दोन तासांसाठी हवेत उडणार आहे. लोक वर्गणीतून तयार करण्यात आलेल्या या फुग्याच्या संकल्पनेमागे लिओ मर्रे हे आहेत. मर्रे सांगतात, "लोकांनी ट्रंप यांची चेष्टा केली की ते लगेच चिडतात. जेव्हा शुक्रवारी ते लंडनमध्ये येतील, तेव्हा त्यांना याची जाणीव असली पाहिजे की संपूर्ण लंडन त्यांच्यावर हसत आहे. त्यामुळे आम्ही काही जणांनी एकत्र येत वर्गणी करून हा फुगा तयार करून घेतला. शुक्रवारी पार्लमेंट स्क्वेअरवरच्या आकाशात हा फुगा उडेल."
मुर्रे यांना सुरुवातीला महापौर खान यांच्या कार्यालयाकडून चांगला प्रतिसाद मिळाला नव्हता. 'ट्रंप बेबी' तयार करणं म्हणजे कायदेशीररीत्या आंदोलन नसल्याचं मत महापौर कार्यालयाकडून व्यक्त करण्यात आलं होतं. मात्र त्यानंतर त्यांनी ट्रंप बेबी आकाशात उडवण्यासाठी परवानगी दिली.
याचे वेगवेगळे परिणाम होऊ शकतात, पण आम्ही शांततापूर्ण आंदोलनाचा त्यांचा अधिकारही मान्य करतो, असं खान यांच्या कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.
खान यांच्या कार्यालयातील शहर नियोजनाच्या अधिकाऱ्यांनी आंदोलनकर्ते मुर्रे आणि त्यांच्या सहकाऱ्यांची भेट घेतली आणि पार्लमेंट स्क्वेअर गार्डन इथून हा फुगा उडवण्याची परवानगी दिली.
या आंदोलनकर्त्यांनी सांगितलं की, हा फुगा उडवण्याची परवागनी मिळावी यासाठी 10,000 जणांनी ऑनलाईन स्वाक्षरी अभियानात सहभाग नोंदवला होता.
लंडन ब्रिजवर झालेल्या हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रंप आणि लंडनचे महापौर सादिक खान यांच्यात ट्वीटयुद्धा झालं होतं.
पण या आंदोलनकर्त्यांना आता नॅशनल एअर ट्राफिक सर्व्हिसकडूनही (NATS) परवानगी घ्यावी लागणार आहे. "नियंत्रित हवाई क्षेत्रात एक हवाई वस्तू उडणार आहे. त्यामुळे ही परवानगी घ्यावी लागेल," असं त्यांच्या प्रवक्त्यानं सांगितलं. कारण, पार्लमेंट स्क्वेअर गार्डनवरील हवाई वाहतूक निषिद्ध आहे. त्यामुळे शहर पोलिसांचीही याला परवानगी घ्यावी लागणार आहे.
पण या सगळ्या परवानगी आम्ही मिळवू, असं या आंदोलनात सहभागी असलेल्या मॅक्स वेकफिल्ड यांनी सांगितलं. "सुरुवातीला आम्ही 1000 पाउंडच जमवणार होतो. मात्र 24 तासांतच एवढे पैसे जमले. त्यामुळे उरलेले पैसे ट्रंप ज्या देशात जातील त्या देशात हा मोठा फुगा पाठवण्यावर खर्च केले जातील," अशी माहिती वेकफिल्ड यांनी दिली.
दरम्यान, या 'ट्रंप बेबी' फुग्याला उडवण्याची परवानगी दिल्यानंतर अमेरिका आणि इंग्लंडमधली सोशल मीडिया मंडळी सक्रीय झाली आहे. अनेकांनी या आंदोलनाला पाठिंबा देणारे तर काहींनी या आंदोलनाची टीका करणारे ट्वीट्स केले आहेत. अनेकांनी लंडनचे महापौर सादिक खान यांच्यावरही टीका केली आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)