थायलंडच्या गुहेत अडकलेल्या 12 मुलांना बाहेर काढण्यासाठी लागू शकतात अनेक महिने

थायलंडमध्ये गुहेत अडकलेल्या 12 मुलांना तसंच त्यांच्या प्रशिक्षकांना बाहेर पडण्यासाठी डायव्हिंग शिकावं लागेल किंवा पूरस्थिती कमी होईपर्यंत वाट पाहावी लागेल असं लष्करानं स्पष्ट केलं आहे.

त्यांना बाहेर काढण्यासाठी महिने लागू शकतात, लष्कराचं म्हणण आहे.

प्रचंड पावसामुळे गुहेतली पाण्याची वाढलेली पातळी मदतपथकासमोरचं मोठं आव्हान आहे. तूर्तास अडकलेल्या माणसांना खाण्यापिण्याच्या वस्तू आणि औषधं देण्याचा मदतपथकाचा प्रयत्न आहे.

चार महिने पुरेल एवढा अन्नसाठा मुलांना देण्यात येणार असल्याचं लष्करानं सांगितलं.

12 मुलं आणि त्यांचे फुटबॉल प्रशिक्षक गेल्या नऊ दिवसांपासून गायब होते. सोमवारी डायव्हिंग पथकाला या सगळ्यांचा शोध लागला.

ही मुलं आणि प्रशिक्षक सापडत नसल्यानं थायलंड देशात चिंतेचं वातावरण होतं. ते सर्वजण जिवंत आहेत का? हे समजत नसल्यानं गोंधळात भर पडली होती. मात्र सोमवारी हे सगळेजण जिवंत आणि सुरक्षित असल्याचं स्पष्ट झाल्यानं थायलंडवासीयांना सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.

उत्तर थायलंडमध्ये चियांग राय भागात थाम लुआंग गुहांमध्ये 23 जूनला 12 मुलं आणि त्यांचे 25 वर्षांचे प्रशिक्षक फुटबॉलच्या सरावानंतर शिरले. पण तेव्हापासून त्यांचा आवाज कुणीच ऐकला नव्हता.

थायलंडमधली ही चौथ्या क्रमांकाची मोठी गुहा आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून त्यांची सुटका होण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू होते. पण गुहेत पाणी शिरल्यामुळे थाई नौदल आणि थाई हवाई दलाकडून केल्या जाणाऱ्या बचाव कार्यात अडथळे निर्माण होत होते.

11 ते 16 वयोगटातली ही मुलं आणि त्यांचे प्रशिक्षक या थाम लुआंग नांग नॉन गुहेत अजूनही सुखरूप असतील असं शोधकर्त्यांना वाटत होतं. पुराच्या पाण्यात वेढल्यानंतर त्यांनी गुहेत एका सुरक्षित ठिकाणी आसरा शोधला असण्याची शक्यता व्यक्त केली जात होती.

अखेर त्यांचा पत्ता लागल्याचे गव्हर्नरनी सांगितल्यानं अख्ख्या देशाने सुटकेचा निःश्वास सोडला.

चियांग राय राज्याचे गव्हर्नर नारोंगसाक ओसट्टानाकॉर्न म्हणाले, "ते सुरक्षित आहेत, पण मिशन अजून संपलेलं नाही. आता आम्ही त्यांना फक्त शोधलंय, त्यांची सुखरूप सुटका करून जोवर त्यांना घरी पाठवलं जात नाही, तोवर हे मिशन संपणार नाही."

"आम्ही गुहेतून पाणी काढतच राहू आणि बचाव टीमला गुहेत पाठवणंही सुरू राहील. डॉक्टरांची एक टीम आत पाठवली जाईल आणि मुलांची आधी तपासणी केली जाईल. जेव्हा डॉक्टर म्हणतील की मुलांना तिथून हलवणं सुरक्षित आहे, तेव्हाच त्यांना बाहेर काढता येईल."

या मुलांच्या सायकली गुहेच्या मुखाशी सापडल्याच्या काही काळातच तिथे जोरदार पाऊस सुरू झाला. यामुळे मोठ्या प्रमाणात आणि वेगात पाणी या गुहेत शिरलं.

थाई नौदलाचे पाणबुडे, गुहेत पोहू शकणारे ब्रिटिश पाणबुडे आणि अमेरिकी लष्कराचे अधिकाऱ्यांनी या गुहेच्या शेवटच्या टोकापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला.

सोमवारी शोधकर्ते या मुलांपासून 1 किलोमीटर लांब होते. मात्र त्यांना आतील एका छोट्या गुहेचं मुख बंद असल्यानं काम थांबवावं लागलं.

माध्यमांचे प्रतिनिधी या गुहेच्या मुखाशी अनेक दिवसांपासून कॅमेरे रोखून उभे होते.

दरम्यान, ही मुलं सुखरूप परत यावीत यासाठी थायलंडमध्ये अनेकांनी प्रार्थनाही केली.

शनिवारी आखा शामन या पारंपरिक वेषातील महिलेनं मुलांसाठी विशेष प्रार्थनाही केली.

आणि अखेर ही मुलं सापडली.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)