You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
थायलंडच्या गुहेत अडकलेल्या फुटबॉल टीमसाठी देशभरातून प्रार्थना
एक फुटबॉलची टीम थायलंडच्या एका गुहेत जवळपास आठवडाभरापासून अडकून पडली आहे. गेल्या चार-पाच दिवसांपासून त्यांचा शोध घेण्याचे, त्यांची सुटका करण्याचे अविरत प्रयत्न सुरू आहेत.
थायलंडच्या चियांग राय भागातील थाम लुआंग नांग नोव ही गुहा एक प्रसिद्ध पर्यटनस्थळ आहे. म्यानमारच्या सीमेला लागून असलेली ही गुहा अनेक किमी खोल आहे.
गेल्या शनिवारी 11 ते 16 या वयोगटातील या मुलांनी आपल्या 25 वर्षांच्या प्रशिक्षकाबरोबर या गुहेत प्रवेश केला. त्यांच्या सायकली गुहेच्या प्रवेशाजवळ सापडल्या, मात्र तेव्हापासून त्यांचा ठावठिकाणा लागलेला नाही. संपूर्ण टीम बेपत्ता झाल्याचं लक्षात आल्यावर शनिवारी रात्री शोधमोहीम सुरू झाली.
पुरामळे पाण्याच्या पातळीत वाढ झाल्यामुळे शोधकार्यात अडथळे येत आहेत. मात्र गुहेच्या एका भागात काही पावलांचे ठसे पाहिल्याचं सांगण्यात येतंय, त्यामुळे ही टीम बचावल्याचा आशा पल्लवित झाल्या आहेत.
बचावासाठी नौदलाचे डायव्हर्सना पाचारण करण्यात आलं आहे. सैन्य, पोलीस आणि शेकडो कार्यकर्त्यांसह ही शोधमोहीम सुरू आहे.
"आम्ही अजूनही आशा करतो की ते जिवंत आहेत," असं उपपंतप्रधान प्रावित वोंगसुवोन यांनी मंगळवारी सांगितलं. "त्यांच्याकडे काही खायला नसलं तरी पाणी नक्कीच असेल," असं ते म्हणाले.
बचावकार्य सुरू
शोध कार्यासाठी सैनिकांच्या अनेक तुकड्या या ठिकाणी आल्या आहेत. गुहेच्या वरच्या भागात टेकडीतून तिथे जायला मिळतंय का, याची ते चाचपणी करत आहेत.
जून ते ऑक्टोबर या काळात थायलंडमध्ये पाऊस पडतो. अशा वातावरणात या गुहेत 16 फुटापर्यंत पाणी साठतं. हे पाणी आणि अंधारामुळे शोधकार्यात अडथळा येत आहे.
मातीचे ढिगारे आणि चिखलामुळे डायव्हर्सना या पाण्यात काही सेंटीमीटर पुढेपर्यंतच दिसू शकतं. कोल्ड कॉफीत पोहण्यासारखा हा प्रकार आहे, असं याचं वर्णन केलं जात आहे.
दरम्यान, बेपत्ता मुलांचे काळजीने काळवंडलेले नातेवाईक गुहेच्या जवळ ठाण मांडून बसले आहेत. त्यांनी सुरक्षितपणे परतावं म्हणून प्रार्थना केल्या जात आहेत.
"मी तुला घरी न्यायला आले आहे," असं एक पालक रडत म्हणाल्याचं AFP या वृत्तसंस्थेनं सांगितलं.
गुहेतील पाण्याची पातळी कमी करण्यासाठी औद्योगिक वॉटर पंपचा वापर करण्यात येत आहे. पण गुरुवारी आलेल्या पुरामुळे शोधपथकाला पंपिंगचं काम थांबवावं लागलं.
गुहेतलं पाणी काढण्यासाठी भिंतीवर ड्रिल करण्याचा पर्याय बचावपथकाकडे आहे. याद्वारे ते पुन्हा शोध सुरू करू शकतात. असं असलं तरी गुहेच्या भिंतीची जाडी बघता हे सोपं काम नाही.
अथवा गुहेत ड्रिल करून मुलांपर्यंत पोहोचण्यासाठी नवीन मार्ग शोधणं, हाही पर्याय असू शकतो. पण उपलब्ध सामग्री आणि गुहेतील पाणी, चिखल आदी बाबींचा विचार करता हे कठीण काम आहे.
मुलं नेमकी कुठे आहेत त्या जागेचा शोध घेण्यासाठी ड्रोन कॅमेरा वापरण्यात येत आहे. पाण्याची पातळी आणि गुहेतील वातावरण समजण्यासाठी अंडरवाटर रोबोट तैनात केले होते.
खोल जमिनीखाली असलेल्या लोकांना स्कॅन करण्यासाठी कोणतंही तंत्रज्ञान उपलब्ध नाहीये.
हरवलेल्या मुलांच्या कपड्यांचा वास घेऊन त्यांच्यापर्यंत पोहोचता यावं म्हणून घटनास्थळी श्वानपथक तैनात करण्यात आलं आहे, असं AFP या वृत्तसंस्थेनं म्हटलं आहे.
सर्व्हायव्हल बॉक्स
पोलिसांच्या टीमनं गुहेच्या पृष्ठभागावर एक मोठं भगडाद शोधलं आहे. यामुळे त्यांना गुहेतल्या कठीण जागेपर्यंत पोहोचता येऊ शकतो.
शिवाय, अन्न, नकाशे आणि मोबाईल फोनचा समावेश असणारे डझनभर बॉक्स शुक्रवारी गुहेत पाठवण्यात आले आहेत, असं पोलिसांना सांगितलं आहे.
गुहेवरच्या पर्वतांमधल्या रिकाम्या भागांत हे बॉक्स टाकण्याची पोलिसांची योजना आहे. हरवलेल्या मुलांना बॉक्स सापडले नाही तर ते नदीत वाहत वाहत जाऊन मुलांपर्यंत पोहोचतील, अशी पोलिसांना आशा आहे.
या बॉक्ससोबत एक संदेश पाठवण्यात आला आहे. "तुम्हाला हा बॉक्स मिळाला असेल तर तो प्रतिसाद द्या. बॉक्समधल्या नकाशावर तुम्ही कुठे आहात, याचं मार्किंग करा. आम्ही तुमच्यापर्यंत लगेच पोहोचू," असा तो संदेश आहे.
सोशल मीडियावर प्रार्थनेचा ओघ
दरम्यान, या फुटबॉल टीमसाठी संपूर्ण देशातून प्रार्थनांचा ओघ सुरू आहे. अनेक नागरिकांनी ट्विटरवरून या खेळाडूंनी प्रार्थना केली.
"या अनोळखी लोकांना आम्हाला नक्की भेटायचंय" अशा आशयाचा हॅशटॅग ट्रेंड होत आहे.
Vthan या ट्विटर अकाउंटवरून "हिंमत सोडू नका", असं ट्वीट करण्यात आलं आहे.
"मी तुमच्यासाठी प्रार्थना करत आहे," असं जेसी इस्बाद यांनी ट्वीट केलं आहे.
दरम्यान मुलं सापडल्यानंतर त्यांना गुहेतून सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी काही आठवड्यांचा काळ लागू शकतो, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)