You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
'देव मूर्ख आहे' : वाट्टेल ते बोलणाऱ्या फिलिपिन्सच्या राष्ट्राध्यक्षांची 8 वादग्रस्त विधानं
देव मूर्ख आहे, असं फिलिपिन्सचे राष्ट्राध्यक्ष रॉड्रिगो डुटर्टे यांनी म्हटलं आहे. त्यामुळे कॅथलिक समुदायात प्रचंड संताप उफाळून आला आहे.
अॅडम आणि इव्ह स्वर्गातून आले आहेत, या बायबलमधल्या दंतकथेचा, तसंच ख्रिश्चन धर्मात असलेल्या पापाच्या संकल्पनेचा त्यांनी फोनवर दिलेल्या एका भाषणातून चांगलाच समाचार घेतला.
राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रं हाती घेण्याआधी ज्या दवाओ शहराचे ते महापौर होते, त्याच शहरात त्यांनी हे वक्तव्य केलं.
चर्चने आणि अनेक नागरिकांनी त्यांच्या या वक्तव्याचा निषेध केला आहे. स्थानिक धर्मगुरू आर्ट्युरो बेस्टिस यांनी राष्ट्राध्यक्षांना मॅडमॅन म्हटलं आहे. डुटर्टे यांच्या ईश्वरनिंदा आणि हुकुमशाहीच्या विरोधात प्रार्थना करावी, असं आवाहन त्यांनी केलं आहे.
डुटर्टे चर्चवर कायम टीका करतात. फिलिपिन्सची 90 टक्के जनता ख्रिश्चन आहे आणि त्यातले बहुतांश कॅथलिक आहेत.
दरम्यान डुटर्टे त्यांची वैयक्तिक मतं मांडत होते, असं निवेदन त्यांच्या कार्यालयातर्फे देण्यात आलं.
पण अशी वादग्रस्त वक्तव्य करण्याची डुटर्टे यांची ही काही पहिलीच वेळ नाही. उलट, ते त्यांच्या अशा वक्तव्यांसाठीच आणि विरोधकांवर बेछूट टीकेसाठीच जगभर जास्त ओळखले जातात. त्यांच्या अशाच काही वक्तव्यांवर नजर टाकूया.
1. हिटलरची प्रशंसा
राजकीय नेत्यांनी हिटलरची प्रशंसा करणं तसं गैरसोयीचं आहे. मात्र डुटर्टे त्याला घाबरत नाहीत. फिलिपिन्समध्ये त्यांनी ड्रग विक्रेते आणि ड्रग्स घेणाऱ्यांविरुद्ध एक मोहीम उघडली होती. या मोहिमेची तुलना त्यांनी नाझी जर्मनीमधल्या छळछावण्यांशी केली.
"हिटलरने जसं ज्यूंना मारलं तसंच नशा करणाऱ्या लोकांना मारू," असं वक्तव्य त्यांनी केलं होतं.
या वक्तव्यामुळे त्यांच्यावर जगभरातून टीका झाली. त्यांनी वार्ताहरांना सांगितलं की त्यांच्या या वक्तव्यामुळे टीकाकार त्यांना जणू ते काही हिटलरचे नातेवाईकच आहेत, असं भासवत आहेत.
"हिटलरने 30 लाख ज्यूंचा जीव घेतला. आता इथे 30 लाख व्यसनाधीन आहेत. मला त्यांची कत्तल करायला आवडेल," असं ते म्हणाले.
"जर्मनीकडे किमान हिटलर होता, फिलिपिन्सकडे तेही नाही," असंही ते पुढे म्हणाले.
2. ओबामांचा अपमान
चीन आणि फिलिपिन्समध्ये जेव्हा दक्षिण चिनी समुद्रावरून वाद सुरू होता, तेव्हा फिलिपिन्सने जवळचा मित्रराष्ट्र असलेल्या अमेरिकेशी चांगले संबंध ठेवणं साहजिक होतं. पण असं न करता लाओस येथे झालेल्या एका बैठकीत त्यांनी तत्कालीन राष्ट्राध्यक्ष ओबामा यांना वेश्येचा मुलगा म्हटलं होतं.
फिलिपिन्समध्ये मानवी हक्कांची पायमल्ली केल्यावरून अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष आपल्याला आव्हान देतील, अशी शंका त्यांच्या मनात होती.
3. EUला 'मिडल फिंगर' दाखवणं
2016 साली युरोपियन महासंघाने फिलिपिन्समध्ये मानवी हक्कांच्या उल्लंघनाविरुद्ध तिथल्या सरकारला चौकशी करण्याची विनंती केली होती. तेव्हा "मी EUने केलेला निषेध वाचला आहे," असं म्हणत डुटर्टे यांनी त्यांना प्रचंड शिव्याशाप दिले. यावेळी अनेकदा वापरलेलं 'मिडल फिंगर' ही दाखवायला ते विसरले नाहीत.
4. ड्रग्स विरोधात कारवाई
डुटर्टे यांच्या कार्यकाळात नशा करणारे आणि ड्रग विक्रेत्यांचे वाढते मृत्यू मोठ्या प्रमाणात गाजले आहेत. त्यात काही आश्चर्य नव्हतं. निवडणूक प्रचारावेळी त्यांनी असं करण्याचं आश्वासन दिलं होतं.
अगदी माझ्या मुलांनी ड्रग घेतले तर त्यांनाही सोडणार नाही, असं त्यांनी एकदा म्हटलं होतं. या कारवाईत हजारो लोकांचा मृत्यू झाल्यावरही त्यांनी विरोध पत्करून ही कारवाई सुरूच ठेवली.
5. 1 लाख गुन्हेगारांना ठार मारण्याची प्रतिज्ञा
महापौर असताना डुटर्टे यांनी दवाओमध्ये गुन्हेगारीचं प्रमाण खूप कमी केलं होतं. या कामगिरीच्या आधारावर ते राष्ट्राध्यक्षपदापर्यंत मजल मारू शकले.
दवाओमध्ये त्यांनी शस्त्रधारी नागरिकांचा एक गट तयार करून सरकारविरोधात बोलणारा, किंवा सरकारी कामांमध्ये अडथळा निर्माण करणाऱ्या कुणालाही शांत करण्याचा प्रयत्न केला. हेच तंत्र आपण राष्ट्राध्यक्ष झाल्यावर अवलंबणार, अशी त्यांनी सांगितलं होतं.
"ते मानवी हक्क वगैरे सगळं विसरा. मी जर राष्ट्राध्यक्ष झालो तर मी महापौर असताना जे केलं तेच करेन. ड्रग्स विकणाऱ्यांनो, तुम्ही लोकांचं अपहरण करता. मी तुम्हा सगळ्यांना मारून टाकणार आहे. तुम्हाला मनिला उपसागरात बुडवणार आहे आणि माशांना खाद्य पुरवणार आहे."
6. बलात्कार आणि खुनावर विनोद
1989 साली दवाओच्या एका तुरुंगात दंगल उसळली होती. त्याच दरम्यान एका ऑस्ट्रेलियन महिला धर्मगुरूचा कैद्यांनी बलात्कार करून खून केला होता.
तेव्हा तत्कालीन महापौर डुटर्टे एका प्रचारसभेत म्हणाले होते, "मी तिचा चेहरा पाहिला आणि मला तिची दया आली. मला वाटलं, 'किती वाईट झालं हे! त्यांनी तिच्यावर एकापाठोपाठ एक बलात्कार केला. मला राग आला की तिचा असा बलात्कार झाला. पण ती होती पण किती सुंदर ना. मला वाटलं की त्यात महापौरांचा पहिला क्रमांक लागायला हवा होता."
त्यानंतर त्यांच्या कार्यालयाच्या वतीने जाहीर माफी मागण्यात आली होती.
7. डोनाल्ड ट्रंपबरोबरची तुलना
डुटर्टे आणि ट्रंप यांची तुलना खरंतर होतंच असते, पण अशी तुलना डुटर्टे यांच्या पचनी पडत नाही. "ते धर्मांध आहेत आणि मी नाही," असं फिलिपिन्सचे अध्यक्ष म्हणतात.
नोव्हेंबर 2017 मध्ये व्हिएतनामच्या दे नान शहरात एशिया पॅसिफिक इकॉनॉमिक कॉ-ऑपरेशनच्या परिषदेसाठी डुटर्टे गेले होते. तेव्हा ते म्हणाले, "मी 16 वर्षांचा असताना कोणाचातरी खून केला होता."
"फक्त त्याला एकदा पाहून मी त्या माणसाला मारलं," असं ते म्हणाले होते.
नंतर हे वक्तव्य त्यांनी गंमतीत केल्याचं त्यांच्या प्रवक्त्यानं सांगितलं होतं.
8. पोपवर देखील शरसंधान
"ट्रॅफिकमुळे आम्हाला उशीर झाला, पाच तास लागले. मी कारण विचारलं तर ते म्हणाले की रस्ता बंद होता. मी विचारलं की कोण येतंय, ते म्हणाले पोप. मला त्यांना फोन करायचा होता. "पोप, वेश्येच्या मुला, घरी जा. इथे पुन्हा येऊ नको."
फिलिपिन्स मध्ये कॅथलिक समाजाचा प्रभाव असूनसुद्धा त्यांच्या निवडणुकीच्या प्रचारावर त्यांच्या अशा शिवीगाळीचा काही परिणाम झाला नाही. मी रोमला पोपची माफी मागायला जाईन, अशी त्यांनी घोषणा केली, पण प्रत्यक्षात त्यांनी एक पत्र लिहून या प्रकरणावर पडदा टाकला.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)