You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
अमेरिकी निर्बंध उठले तर उत्तर कोरियातल्या सर्वसामान्यांच्या जीवनात काय बदल होतील?
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप आणि उत्तर कोरियाचे सर्वेसर्वा किम जाँग-उन यांच्या ऐतिहासिक भेटीनंतर अमेरिका उत्तर कोरियावरील निर्बंध उठवण्याचा विचार करत आहे. उत्तर कोरियानं संपूर्ण आण्विक नि:शस्त्रीकरण करण्याच्या दृष्टीनं पावलं उचलल्यावर हे निर्बंध उठवले जातील.
पण इतर जगापासून संपूर्णपणे तुटलेल्या या देशात अशा आर्थिक बदलांमुळे नक्की काय परिणाम होतील? उत्तर कोरियातील एका सामान्य कुटुंबावर त्याचा काय परिणाम होईल?
काही तज्ज्ञांची मदत घेऊन बीबीसीनं अशाच एखाद्या काल्पनिक कुटुंबावर होणाऱ्या परिणामांचा आढावा घेतला. कुटुंबीयांचं आडनाव ली आहे असं समजूया. आता त्यांची कहाणी ऐका.
वडिलांच्या दोन-दोन नोकऱ्या
ज्यांना कोरियाबदद्ल काहीच माहिती नाही त्यांच्यासाठी एक माहिती आधीच सांगायला हवी की तिथलं एक सामान्य कुटुंब कसं असतं हे बाहेरच्या जगाला कळणं तसं अवघड आहे.
तिथं सामाजिक आणि धार्मिक पातळीवर बरेच फरक आहेत आणि त्या देशातलं आयुष्य कसं आहे हे आपल्याला काहीच माहिती नाही.
ली या कुटुंबाचे कुटुंबप्रमुख हे इतर लोकांसारखे खाणकामावर अवलंबून आहेत. खाणकाम हा उत्तर कोरियाच्या निर्यातीचा सगळ्यांत मोठा भाग आहे.
अनेक दशकांपासून परकीय चलनाचा एक मोठा स्रोत आहे. कोळशाबरोबर उत्तर कोरियाकडे खनिजं आणि रेअर अर्थचे साठे आहेत असं कोरियाचं म्हणणं आहे.
तज्ज्ञांकडून जी माहिती मिळाली आहे त्यानुसार उत्तर कोरियाच्या लोकांच्या उत्पन्नात दोन-तीन गोष्टींचा समावेश असतो. त्यात पगार, बोनस, तसंच सरकारकडून मिळणारं स्वस्त धान्य, घरं यांचा समावेश असतो. पण या लोकांचा मूळ पगार इतका कमी असतो की त्यातून अगदी काही दिवसांचं अन्नधान्य मिळू शकतं.
2017 साली कोळसा, खनिजं, आणि रेअर अर्थ यांच्या निर्यातीवर निर्बंध घालण्यात आले होते त्यामुळे अनेक खाणींना त्यांच्या उत्पादनात कपात करावी लागली होती.
सरकार नियंत्रित अर्थव्यवस्थेत म्हणजेच कमांड इकॉनॉमीमध्ये बेरोजगारीवर बंदी असते. त्यामुळे ली यांची नोकरी जाणार नाही यांची त्यांना शाश्वती आहे. पण ली यांचं उत्पन्न आधीच क्षुल्लक आहे त्यात हे निर्बंध म्हणजे त्यांची परिस्थिती बिकट होईल यात शंका नाही.
त्यामुळे उत्तर कोरियाच्या इतर लोकांसारखीच ली यांना सुद्धा धोकादायक वाट चोखाळावी लागणार यात शंका नाही.
ही धोकादायक वाट म्हणजे मासेमारीची. ली यांना त्यांच्या वरिष्ठांना लाच द्यावी लागेल. तसंच सैन्याला एक बोट घेण्यासाठी लाच द्यावी लागेल. म्हणजे ते आणि त्यांचे मित्र मासेमारी करतील आणि स्थानिक बाजारात मासे विकण्याचं काम करतील.
हा अतिशय धोकादायक व्यापार आहे. चांगले मासे पकडण्यासाठी समुद्रात खोलवर जाण्यासाठी दबाव असतो. त्यामुळे बोटीतलं इंधन संपण्याची किंवा समुद्रात हरवून जाण्याची भीती असते.
अनेकदा पश्चिम जपानच्या किनाऱ्यावर हाडाचा सांगाडा असलेल्या बोटी येऊन थडकतात. ज्या लोकांना किनाऱ्यापर्यँत जाता येत नाही त्याच लोकांचे हे मृतदेह असावेत असं समजण्यात येतं. ली आता नेमका हाच धोका पत्करतील.
मासेमारीमुळे ली यांना उत्पन्नाचा चांगला पर्याय उपलब्ध झाला आहे. मात्र या क्षेत्रावरसुद्धा अनेक निर्बंध आले आहेत.
2017 च्या उन्हाळ्यापासून इंधनाचे भाव दुप्पट झाले आहेत. त्यामुळे समुद्राचा प्रवाससुद्धा महाग झाला आहे. चीनमध्ये निर्यात होणाऱ्या सी फूडवर बंदी घालण्यात आली आहे.
आईला नोकरी करावी लागणार
तज्ज्ञांच्या मते ली कुटुंब जगमदंग पिढीचे प्रतिनिधी आहेत. जगमदंग म्हणजे बाजार. या पिढीनं 1990च्या दशकात दुष्काळाचा सामना केला आहे.
त्या वेळेपर्यंत देशात कमांड इकॉनॉमीचं वर्चस्व होते. त्या काळी सगळी कामं आणि वस्तू शासनातर्फे वाटली जात. या दुष्काळानंतर हे सगळं चित्र बदललं. या दुष्काळानंतर लाखो लोकांचा उपासमारीमुळे मृत्यू झाला.
नागरिकांना आपली सोय बघण्यास सांगितलं गेलं. त्यामुळे भांडवलवादाची वाढ झाली.
हा काळ कसाबसा तरी गेला पण त्यामुळे देशाची सगळी मनोवृत्तीच बदलली. अनेक स्त्रिया उद्योजिका झाल्या. घरातल्या कर्त्या झाल्या.
खाणकामगार ते मासेमारी करायला लागलेल्या ली यांची पत्नी नेमका हाच विचार करतेय.
त्या सध्या कापडाच्या फॅक्टरीत काम करतात. चीनला होणाऱ्या निर्यातीमुळे हे क्षेत्र तग धरून होतं. पण निर्बंध लादल्यामुळे हे क्षेत्र देखील बंद झालं. सध्याच्या नोकरीवर अवलंबून राहता येणार नाही हे आता त्यांना पुरतं कळून चुकलं होतं, त्यामुळे त्या इतर पर्यायांचा विचार करत आहेत. आजुबाजुंच्या बायकांना गोळा करून घरी टोफू (सोयाबिनपासून बनलेलं पनीर) तयार करावं आणि बाजारात विकावं हा त्यातला मुख्य पर्याय आहे.
स्वप्नवत नोकरी धोक्यात
ली कुटुंबात उत्पन्नाचा आणखी पर्याय आहे. त्यांचा एक नातेवाईक परदेशात काम करतो. ली यांचा भाऊ रशियात एका बांधकाम साईटवर काम करतो आणि घरी पैसे पाठवतो.
त्यांच्या मित्रांसाठी स्वप्नवत असलेल्या या नोकरीसाठी ली यांच्या भावानं लाच देण्याचाच मार्ग स्वीकारला.
उत्तर कोरियातले जवळजवळ 1 लाख नागरिक परदेशात काम करतात असा अंदाज बांधला जातो. त्यात सरकार आपला वाटा घेतंच. पण उत्तर कोरियापेक्षा या देशात जास्त पैसा मिळतो.
संयुक्त राष्ट्रांनी डिसेंबरमध्ये उत्तर कोरियावर काही निर्बंध लादले होते. त्यानुसार परदेशात राहणाऱ्या उत्तर कोरियाच्या नागरिकांना 24 महिन्यांच्या आत परत यावं लागणार आहे. तसंच कोणालाही बाहेर पाठवता येणार नाही.
शाळेतून बेदखल
जर आर्थिक परिस्थिती आणखी बिकट झाली तर ली यांना त्यांच्या मुलीला शाळेतून काढावं लागेल. मग ही मुलगी तिच्या आईला मदत करू शकेल.
उत्तर कोरियातील मुलांना 12 वर्षं शाळेत जाणं अनिवार्य आहे. पण गरीब लोकांना त्यांच्या पाल्यांना शाळेत पाठवणं कधीकधी शक्य होत नाही. अशा वेळेला ते कामाला हातभार लावतात.
शिक्षकांना सुद्धा पैसै कमावण्यासाठी अतिरिक्त काम करावं लागतं तेव्हा शाळेत शिक्षक नसतात.
निर्बंध कमी झाले तर ली कुटुंबीयांना आणि सरकारला सुद्धा उत्पन्नाचे आणखी पर्याय उपलब्ध होतील. त्यांच्या मुलीला अभ्यास करायला आणि खेळायला आणखी वेळ मिळेल. तिच्या पालकांना मदत करण्याची वेळ येणार नाही.
तिच्या शाळेत शिकवतात की अमेरिका आणि दक्षिण कोरिया हे देश उत्तर कोरियाचे शत्रू आहेत. कदाचित हेसुद्धा बदलेल.
दक्षिण कोरियातून येणारे बेकायदा टीव्ही शोज असोत किंवा परदेशात काम करून येणाऱ्या लोकांमुळे कळणारं बाहेरचं जग हे उत्तर कोरियापेक्षा नक्कीच चांगलं आहे याची कल्पना इथल्या नागरिकांना असेलच.
अमेरिका आणि दक्षिण कोरियाच्या फौजांपेक्षा आपल्याच देशातून विरोध होईल अशी भीती उत्तर कोरियाला आहे. म्हणूनच कदाचित उत्तर कोरियाला हे निर्बंध नकोयेत.
ली कुटुंबीयांचं चित्र उभं करण्यासाठी बीबीसीनं कुकिम विदयापीठातील अँड्रेई लांकोव, NK न्यूजमधील फ्योदोर टर्टिस्की आणि पीटर वार्ड, ग्रिफिथ युनिव्हर्सिटीचे अंड्रे अब्रामनहिन आणि दैनिक NK ची मदत घेतली.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)