You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
'आम्ही काय पाकिस्तानातून साथीचा रोग घेऊन आलो'
- Author, अनंत प्रकाश
- Role, बीबीसी प्रतिनिधी
पाकिस्तानचे प्रसिद्ध शायर फैज अहमद फैज यांची कन्या मोनिजा हाश्मी यांना भारतातल्या एका कार्यक्रमात भाग घेण्यापासून रोखण्यात आल्याची बातमी आहे.
नवी दिल्लीत 10 ते 12 मे दरम्यान आशियाई मीडिया शिखर परिषदेचं पंधरावं अधिवेशन झालं. त्यात सहभागी होण्याचं निमंत्रण असल्यानं मोनिजा पाकिस्तानातून भारतात आल्या.
पण, आयोजकांनी त्यांना अधिवेशनात भाग घेऊ दिला नाही. एशिया-पॅसिफिक इन्स्टिट्यूट ऑफ ब्रॉडकास्टिंग डेव्हलपमेंट ही संस्था दरवर्षी हे अधिवेशन भरवते.
यावर्षी पहिल्यांदाच भारतात आयोजन करण्यात आलं. सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांनी झाल्या प्रकारावर रोष व्यक्त केला आहे.
मोनिजा हाश्मी यांचा मुलगा अली हाश्मी यांनीही ट्विटरवर नाराजी व्यक्त केली आहे. आपल्या आईला अधिवेशनासाठी निमंत्रण दिलं, पण भाग घेऊ दिला नाही, असं त्याचं ट्विट आहे.
भारतात हे अधिवेशन पहिल्यांदा झालं. ज्या देशात अधिवेशन होतं तिथलं सरकार यजमानाची भूमिका निभावतं.
पण भारत सरकारनं झाल्या प्रकाराबद्दल स्पष्टीकरण दिलेलं नाही. आयोजक म्हणून एशिया-पॅसिफिक इन्स्टिट्यूट ऑफ ब्रॉडकास्टिंग डेव्हलपमेंट संस्थेनंही आपली बाजू मांडलेली नाही.
'माझ्याबरोबर असं का झालं माहीत नाही'
अधिवेशनाच्या वेळी आलेल्या अनुभवानंतर बीबीसीनं मोनिजा हाश्मी यांच्याशी संपर्क साधला. 'मागची 10-12 वर्षं मी अधिवेशनात भाग घेत आहे. चीन, व्हिएतनाम, हाँग काँग अशा ठिकाणी आतापर्यंत अधिवेशन झालं आहे. भारतात पहिल्यांदाच हे अधिवेशन झालं.'
'मलाही अधिवेशनाचं आमंत्रण मिळालं. माझ्याकडे व्हिसा आहे का इतकंच मला विचारण्यात आलं. फैज फाऊंडेशनच्या कामामुळे माझ्याकडे सहा महिने मुदतीचा वैध व्हिसा होताच. त्यामुळे त्यांनी आमंत्रण पक्कं केलं. मला एक विषयही भाषणासाठी कळवण्यात आला. त्यानंतर जेव्हा 9 मे रोजी मी दिल्लीत ताज पॅलेस हॉटेलमध्ये पोहोचले तेव्हा मला कळलं माझ्या नावावर खोलीच आरक्षित नव्हती.'
'अधिवेशनात भाग घेऊ दिला नाही'
72 वर्षीय मोनिजा हाश्मी फैज फाऊंडेशनच्या कामानिमित्त नेहमी भारतात येतात. पण यावेळी पहिल्यांदा भारतात त्यांना असा विचित्र अनुभव आला.
आपला अनुभव सांगताना हाश्मी म्हणाल्या, 'मला एका मुलीनं येऊन सांगितलं की अधिवेशनात मी बोलू शकत नाही. अधिवेशनासाठी तुमची नोंदणीही होणार नाही, या हॉटेलमध्येही तुम्ही राहू शकत नाही, असंही तिनं मला सांगितलं. यावर मी तिला एशिया-पॅसिफिक इन्स्टिट्यूट ऑफ ब्रॉडकास्टिंग डेव्हलपमेंट संस्थेच्या संचालकांना बोलवायला सांगितलं.'
'AIBDच्या संचालकांनी माझी माफी मागितली आणि त्यांना आताच कळल्याचं सांगितलं. 'त्यांनी' आम्हाला कळवलं आहे की, तुम्ही अधिवेशनात भाग घेऊ शकत नाही.' संचालकांनी हाश्मी यांना सांगितलं.
आता 'त्यांनी' म्हणजे कोणी हे हाश्मी यांना अजून कळलेलं नाही.
'आम्ही काय पाकिस्तानातून साथीचा रोग घेऊन आलो'
मोनिजा या अधिवेशनात महिला सक्षमीकरण या विषयावर बोलणार होत्या. पण ती संधी त्यांना मिळाली नाही.
त्यांनी बोलायला देऊ नका पण निदान अधिवेशनाच्या ठिकाणी जाऊ द्या अशी विनंती केली. आयोजकांनी ती ही परवानगी नाकारली.
आपल्याला मिळालेल्या वागणुकीमुळे हाश्मी यांना काही प्रश्न पडले आहेत. 'एवढं घाबरण्याची गरज काय होती? आम्ही पाकिस्तातून साथीचे आजार घेऊन आलो होतो का? जे झालं ते चांगलं झालं नाही.' बीबीसीशी बोलताना हाश्मी यांनी आपल्या भावना बोलून दाखवल्या.
"शांतीप्रिय लोकांच्या वतीने मी सांगू इच्छिते की, असं वागणं चुकीचं आहे. कवाडं उघडा. सगळ्यांशी संवाद वाढवा आणि सगळ्यांचं ऐका. आपलं मत जरुर मांडा. पण ते करताना इतरांकडे दुर्लक्ष करू नका."
"पाकिस्तान चांगला असेल किंवा वाईट. पण, यजमान असताना पाहुण्यांशी असं नक्कीच वागत नाही."
हाश्मी यांनी आपलं दु:ख आणि वेदना बोलून दाखवली.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)