You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
अफगाणिस्तान 'इस्लामिक स्टेट'च्या रडारवर : आत्मघाती हल्ल्यातील 57 ठार
अफगाणिस्तानची राजधानी असलेल्या काबुल शहरातल्या मतदार नोंदणी केंद्रावर आत्मघातकी हल्ला झाला. या हल्ल्यातील मृतांची संख्या 57 इतकी झाली आहे.
या केंद्राबाहेर जमलेल्या लोकांपैकी 119 पेक्षा जास्त जण या हल्ल्यात जखमी झाले आहेत. कथित इस्लामिस स्टेट (IS) या हल्ल्याची जबाबदारी घेतल्याचं अमाक न्यूज एजन्सीमार्फत जाहीर केलं आहे.
मृतांत 21 महिला आणि 5 मुलांचा समावेश आहे.
अफगाणिस्तानमध्ये ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या प्रांतिक निवडणुकांच्या तयारीसाठी मतदार नोंदणीचं काम एप्रिलमध्ये सुरू झालं आहे.
अमाक न्यूज एजन्सीने दिलेल्या वृत्तानुसार आत्मघातकी हल्लेखोराने स्फोटकं असलेला पट्टा बांधून काबुलमधल्या दाश्ते बरची भागातल्या मतदार नोंदणी केंद्रावर हल्ला केला.
हल्ल्यानंतरचा विध्वंस
हा हल्ला झाल्यानंतर हल्ल्याच्या ठिकाणी रक्ताच्या थारोळ्यात पडलेली कागदपत्रं आणि छायाचित्र विखुरली होती.
बेवारस पादत्राणं, फुटलेल्या काचा यांचा या परिसरात खच पडला होता. जवळ उभ्या असलेल्या वाहनांचीही प्रचंड हानी झाली.
या मतदार नोंदणी केंद्रावर आपापली ओळखपत्रं बनवण्यासाठी आलेल्या बहुतांश महिला आणि त्यांच्या लहान मुलांचा बळी या हल्ल्यात गेल्याचं प्रत्यक्षदर्शी बशीर अहमद यांनी सांगितलं.
गेल्या आठवड्यात मतदार नोंदणी मोहीम सुरू झाल्यापासून अशा केंद्रांवर हल्ले झाल्याच्या किमान चार घटना समोर आल्या आहेत.
जानेवारी महिन्यात काही सरकारी इमारती आणि विविध देशांच्या दुतावासांजवळ झालेल्या हल्ल्यात किमान शंभर जणांचा बळी गेला होता. त्यानंतरचा काबुलमधला हा सर्वांत मोठा हल्ला आहे.
अफगाण जनता लक्ष्यावर
देशात गोंधळाचं वातावरण तयार करण्यासाठी आणि स्थानिकांमध्ये सरकारविरोधी वातावरण तयार करण्यासाठी तालिबान आणि कथित इस्लामिक स्टेटने सर्वसामान्य अफगाण जनतेला लक्ष्य करण्याचा डाव आखला आहे, असं या वर्षाच्या सुरुवातीलाच अफगाणिस्तानच्या अंतर्गत व्यवहार मंत्र्यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं होतं.
या वर्षी ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या प्रांतिक निवडणुकांनंतर 2019मध्ये अफगाणिस्तानमध्ये अध्यक्षीय निवडणुका होणार आहेत.
अफगाणिस्तानच्या एकूण भूभागापैकी फक्त 30 टक्के भागावर अफगाण सरकारचं नियंत्रण आहे, असं बीबीसी रिसर्चला या वर्षाच्या सुरुवातीला आढळलं होतं. तर देशाचा इतर बहुतांश भाग तालिबानच्या प्रभावाखाली आहे. अगदी थोड्या भागावर कथित इस्लामिक स्टेटचं वर्चस्व आहे.
आता कथित इस्लामिक स्टेटचा अफगाणची सेना आणि तालिबान या दोघांशीही संघर्ष सुरू आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)