गडचिरोली पोलिसांच्या कारवाईत 16 'नक्षलवादी' ठार

    • Author, संकेत सबनीस
    • Role, बीबीसी मराठी

गडचिरोली पोलिसांनी भामरागड तालुक्यातील ताडगाव जंगलात रविवारी सकाळी केलेल्या कारवाईत 16 संशयित नक्षलवादी ठार झाले आहेत. या कारवाईत मोठ्या प्रमाणात बंदुका आणि प्रचार साहित्य जप्त करण्यात आलं आहे.

गडचिरोली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी दिली बीबीसी मराठीशी बोलताना ही माहिती दिली.

भामरागड तालुक्यातील नक्षलग्रस्त भागात गडचिरोली पोलिसांनी ही कारवाई केली, असं त्यांनी सांगितलं.

याबाबत अधिक माहिती देताना पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख म्हणाले की, "गडचिरोलीमधल्या ताडगाव हद्दीतील विजापूर-गडचिरोलीच्या सीमेवर ही कारवाई झाली. या कारवाईत 16 नक्षलवादी ठार झाले आहेत. सध्या आमची शोधमोहीम सुरू आहे. या नक्षलवाद्यांकडे ए.के. 47, एस.एल.आर. बंदुका यांसारखी शस्त्र आणि प्रचार साहित्य आढळून आलं आहे."

महाराष्ट्र व छत्तीसगडच्या सीमेवरील भामरागड अंतर्गत येणाऱ्या कसनूर जंगल परिसरात ही कारवाई झाली. गडचिरोली पोलीस दलातील सी - 60 पथकाचे जवान आणि सीआरपीएफ 9 बटालियनचे जवानांनी ही कारवाई केली.

गोळीबार थांबल्यानंतर शोधमोहीम राबवल्यावर 16 नक्षलवाद्यांचे मृतदेह जवानांना आढळले, अशी माहिती गडचिरोली पोलिसांनी प्रसिद्ध केलेल्या प्रसिद्धी पत्रकात देण्यात आली आहे.

प्रमुख नक्षली नेत्यांचा मृत्यू?

या कारवाईत प्रमुख नक्षलवादी नेत्यांचा मृत्यू झाला आहे का, या प्रश्नावर बोलताना पोलीस अधीक्षक डॉ. देशमुख म्हणाले की, "जवळपास 82 गुन्हे दाखल असलेला 51 वर्षे वयाचा श्रिनु उर्फ श्रीकांत उर्फ विजेंदर नरसिम्हारामलू राऊथू आणि 75 गुन्ह्यांची नोंद असलेला 36 वर्षांचा साईनाथ यांचा मृत्यू झाला असण्याची शक्यता आहे. त्यांची ओळख पटवण्याचं काम अंतिम टप्प्यात आहे."

नव्या वर्षांत या भागात नक्षलवाद्यांविरोधात किती कारवाया झाल्या याबाबत बोलताना देशमुख म्हणाले की, "या वर्षभरातली ही सहावी कारवाई आहे. यापूर्वीच्या कारवाईत 8 आणि त्या आधीच्या कारवाईत 3 नक्षलवादी ठार झाले होते."

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)