You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
सीरियाविरोधात कारवाई करण्याला ब्रिटन मंत्रिमंडळाची मंजुरी
सीरियामधल्या रासायनिक हल्ल्यामागे असाद राजवटीचा हात असण्याची शक्यता आहे, अशी चर्चा ब्रिटनच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज झाली.
सीरियाविरुद्ध कारवाई करण्यात यावी यावर या बैठकीत शिक्कामोर्तब झालं. "अशा हल्ल्यांना प्रत्युत्तर देणं अत्यावश्यक आहे असं या बैठकीत ठरलं, पण नेमकी कोणत्या प्रकारची कारवाई करण्यात येईल हे अद्याप ठरलं नाही," अशी माहिती वाहतूक मंत्री जो जॉन्सन यांनी बीबीसीला दिली.
पंतप्रधान थेरेसा मे यांच्या अध्यक्षतेखाली ही मंत्रिमंडळाची बैठक झाली.
तर युद्धाची स्थिती निर्माण होईल - रशिया
"जर अमेरिकेनं सीरियावर हल्ला केला तर त्यांच्याविरोधात युद्धाची स्थिती निर्माण होऊ शकते," असा इशारा संयुक्त राष्ट्रातले रशियाचे राजदूत वसिली नेबेजिंया यांनी दिला आहे.
"आपल्या आक्रमक धोरणामुळे अमेरिका आणि मित्र राष्ट्रांनी आंतरराष्ट्रीय शांतता धोक्यात आणली आहे. त्यामुळे सध्याचं वातावरण धोकादायक बनलं आहे," असं नेबेजिंया यांनी म्हटलं.
थोड्याच वेळात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप, फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन आणि ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांच्यात चर्चा होऊ शकते. सीरियामध्ये बंडखोरांनी जो रासायनिक हल्ला केला आहे त्याला प्रत्युत्तर कसं द्यावं यावर ही चर्चा होऊ शकते.
रणनीतीमध्ये काय बदल केला जाणार याबाबत व्हाइट हाऊसनं अद्याप निर्णय घेतला नाही अशी माहिती आहे.
'माझ्याकडं पुरावे आहेत'
शनिवारी सीरियातल्या डोमू या शहारात रासायनिक हल्ला झाला होता. या पार्श्वभूमीवर, "हा हल्ला रासायनिक होता असा माझ्याजवळ पुरावा आहे," असं फ्रान्सचे राष्ट्रपती मॅक्रॉन यांनी म्हटलं आहे. या हल्ल्याला प्रत्युत्तर कसं दिलं जाईल यावर वेळ आल्यावर निर्णय घेतला जाईल असंही ते म्हणालेत.
ट्रंप यांचा इशारा
रासायनिक हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर प्रत्युत्तर म्हणून रशियाचं मित्रराष्ट्र असलेल्या सीरियावर मिसाइल सोडू असं ट्वीट अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी केलं होतं.
'रशिया तयार रहा. मिसाइल येत आहे. छान, स्मार्ट अशी मिसाइल्स येत आहेत', अशा शब्दांत ट्रंप यांनी त्यांचा इशारा ट्वीटद्वारे दिला होता.
अमेरिकेच्या मिसाइलला योग्य प्रत्युत्तर देण्यात येईल अशी धमकी रशियाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
बंडखोरांच्या ताब्यातल्या डूमा शहरात रासायनिक हल्ला घडवून आणल्याचा आरोप बशर अल असादप्रणित सरकारवर आहे. मात्र सरकारनं या आरोपांचं खंडन केलं आहे.
काय घडलं होतं डूमामध्ये?
राजधानी दमास्कसजवळच्या डूमा हा बंडखोरांच्या ताब्यातला भाग आहे. विषारी रसायनांनी भरलेले बॉम्ब सरकारच्या विमानांनी डूमावर डागले असा आरोप विरोधकांनी केला होता.
जीवघेण्या अशा या रसायनांमुळे 500 बाधित व्यक्तींवर उपचार करण्यात आल्याची माहिती द सीरिया-अमेरिकन मेडिकल सोसायटी अर्थात (SAMA) दिली आहे.
या हल्ल्यात 70हून अधिक जणांनी जीव गमावला आहे. संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक आरोग्य संघटनेनं या हल्ल्यानं बाधित परिसरात जाऊन जखमींवर उपचार करण्यासाठी प्रवेश मिळावा यासाठी अनुमती मागितली आहे.
या हल्ल्यात प्रतिबंधित रसायनांचा वापर करण्यात आला का, हे समजून घेण्याकरता 'द प्रोहिबिशन ऑफ केमिकल वेपन्स'चा (OPCW) एक गट लवकरच सीरियात दाखल होणार आहे.
हे वाचलं का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)