You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
बिहारच्या दंगलीत 20 मुस्लीम मुलांना वाचवणारे हिंदू डॉक्टर
- Author, रजनीश कुमार
- Role, बीबीसी प्रतिनिधी
बिहारच्या समस्तीपूर जिल्ह्यातल्या रोसडामध्ये गेल्या आठवड्यात दोन समाजांमध्ये दंगल झाली. दंगलखोर मशीद आणि मदरशावर हल्ले करत होते तेव्हा शहरातील डॉक्टर अशोक मिश्रा मदरशांमधल्या मुलांना स्वत:च्या घरात आश्रय देत होते.
मिश्रा शहरातले प्रसिद्ध डॉक्टर आहेत. त्यांचं घर आणि दवाखाना मदरशाजवळ आहे. 27 मार्च रोजी दुपारी 12 वाजता दंगलखोरांनी मदरशावर हल्ला केला होता.
अशोक मिश्रा यांनी त्यांच्या घरात मदरशामधल्या 20 मुलांना आणि 2 शिक्षकांना आश्रय दिला. यामध्ये मदरशाचे संचालक मौलाना नजीर अहमद नदवी हेसुद्धा होते.
दंगलखोर जमावानं मदरशावर हल्ला केला त्यावेळी डॉ. मिश्रा रुग्णांना तपासत होते. तेव्हा एका महिलेनं त्यांना सांगितलं की, दंगेखोरांनी मदरशावर हल्ला केला आहे आणि मुलं घाबरून घरामागे उभी आहेत. अशोक मिश्रा यांनी क्षणाचाही विलंब न करता मुलांना घरात लपवून ठेवलं.
"मी त्या मुलांना म्हणालो की, तुम्ही अजिबात घाबरू नका, आम्ही सर्व तुमच्या पाठीशी आहोत. त्यांच्यासोबत 2 शिक्षकसुद्धा होते. सर्वांना रिलॅक्स व्हा, असं सांगितलं. त्यांनीही माझं ऐकलं. सर्व जण घाबरलेले होते. तुम्हाला कुणी काही करणार नाही, असा विश्वास त्या मुलांना दिला...." त्या दिवशीच्या घटनेबद्दल डॉ. मिश्रा सांगतात.
"वातावरण शांत झाल्यानंतर मी मुलांना सांगितलं की, पोलीस जे काही विचारतील त्याची खरी उत्तरं द्या. कुणाला घाबरायची गरज नाही. तुम्ही सगळं खरं सागितलं तरच सर्व काही पोलिसांना समजेल. त्यांना असं आश्वस्त करणं माझं कर्तव्य होतं. कोणत्याही परिस्थितीत मी त्या मुलांची सुरक्षा केलीच असती. ते नाही म्हणाले असते तरी मी त्यांना घरी घेऊन आलोच असतो," मिश्रा पुढे सांगतात.
भीती कशाची ?
अशोक मिश्रांना दंगलखोर जमावाची भीती वाटली नाही का? यावर ते सांगतात, "भीती कशाची वाटणार? या प्रकरणात मला काही भीती वाटली नाही. माणुसकीच्या नात्यानं त्यांना घरात आश्रय देणं माझं कर्तव्य होतं आणि मी ते बजावलं."
रोसडामध्ये पहिल्यांदाच असा तणाव निर्माण झाला, असं मिश्रा यांचं म्हणणं आहे. "कालपर्यंत तर रोसडा शहरात लोक एकमेकांना चाचा-भैया म्हणून हाक मारत होते. असं वातावरण होतं जिथं धार्मिक सहिष्णुता कधी पणाला लागली नव्हती," मिश्रा सांगतात.
अशोक मिश्रांच्या दवाखान्यातलं एक कॅलेंडर माझं लक्ष वेधून घेत होतं. त्यावर लिहिलं होतं, 'अयोध्या करती है आव्हान, ठाठ से हो रहा मंदिर का निर्माण.'
हे कॅलेंडर सरस्वती शिशु विद्या मंदिराचं होतं. ते बघून मी त्यांना विचारलं, "कॅलेंडर तुमच्याकडे कसं काय आलं? राम मंदिर बांधलं जावं असं तुम्हाला वाटतं का?"
"सरस्वती विद्या मंदिराचे प्रचारक आले होते आणि तेच हे कॅलेंडर लावून गेले. जशी इतर कॅलेंडरं इथे लागलेली आहेत, त्याप्रमाणेच हे एक आहे," असं ते म्हणाले.
"अयोध्येत मंदिर बांधायचा मुद्दा विचाराल तर अशी मागणी एखादी मूर्ख व्यक्तीच करू शकते. त्यांचाच बा प्रचार आहे. धर्माचं विकृतीकरण कसं करण्यात आलं हे ज्ञानी माणसाला चांगलंच समजतं. मरणासन्न अवस्थेतल्या एखाद्या रुग्णाला जेव्हा रक्त दिलं जातं तेव्हा हे रक्त हिंदूचं आहे की मुस्लिमाचं असं कुणी विचारतो का?" मिश्रा स्पष्टपणे सांगतात.
'शहराला मिश्रा यांच्यासारख्या लोकांची जास्त गरज'
अशोक मिश्रा गेल्या 19 वर्षांपासून रोसडा इथे रुग्णांवर उपचार करत आहेत. 'तिरस्काराच्या आजाराचा इलाज मानवतेच्या गुणानंच होऊ शकतो', असं त्यांचं म्हणणं आहे. मिश्रा यांनी भागलपूर इथून 1974मध्ये जीएमएस केलं होतं.
मदरशाचे संचालक मौलाना नजीर अहमद नदवी यांच्या मते, शहराला अशोक मिश्रा यांच्यासारख्या लोकांची जास्त गरज आहे. म्हणजे आग लागल्यानंतर पाणी घेऊन समोर येण्याची हिंमत कुणीतरी दाखवू शकेल.
नदवी यांना मी अशोक मिश्रा यांच्या घराचा रस्ता विचारला, तेव्हा तो सांगताना त्यांना भीती वाटत होती. त्यांना वाटत होतं की, त्यामुळे मिश्रांना त्रास होईल. मुस्लीम मुलांना आश्रय दिला हे दंगलखोरांना कळेल की काय असं त्यांना वाटत होतं. याबद्दल मिश्रांच्या मनात मात्र भीतीचा लवलेशही नव्हता, असं दिसलं.
दवाखान्याबाहेर बसलेले रुग्ण डॉ. मिश्रा यांची वाट पाहत होते. मी बाहेर पडलो आणि डॉक्टरांनी रुग्णांच्या तब्येतीच्या तक्रारी ऐकायला सुरुवात केली.
हे पाहिलंत का?
- पुरातन मंदिरांचा जीर्णोद्धार करणारा मुस्लीम आर्किटेक्ट
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)