...आणि सहा वर्षांचा इशान झाला एक दिवसाचा पोलीस आयुक्त!

हा आहे सहा वर्षांचा इशान. मोठं झाल्यावर त्याला पोलीस आयुक्त व्हायचंय. पण त्याच्या या स्वप्नाच्या आड येतोय एक दुर्धर आजार - कॅन्सर!

म्हणून बुधवारी त्याचं हे स्वप्न प्रत्यक्षात उतरलं. त्याला हा क्षण लाभला तो हैद्राबाद शहरातल्या राचकोंडा पोलीस आणि 'मेक अ विश फाऊंडेशन'च्या प्रयत्नांमुळे.

मेदक जिल्ह्यातल्या कुंचनपल्लीचा रहिवासी असलेला इशान कॅन्सरसारख्या असाध्य रोगाने ग्रासलेला आहे. त्याच्याबद्दल आणि त्याच्या या स्वप्नाबद्दल कळल्यावर ते प्रत्यक्षात उतरवण्यासाठी पोलिसांनी खास तयारी केली, आणि खरंच इशान पूर्ण एक दिवसासाठी पोलीस आयुक्त झाला.

पोलीस आयुक्त महेश भागवत यांनी स्वतः त्याचं स्वागत केलं. त्यांनी स्वतः त्याला त्यांच्या खुर्चीवर बसवलं आणि मग तो संपूर्ण दिवस त्याचा एकट्याचा होता.

इशान हा डी. चांदपाशा आणि डी. हसीना यांचा दोन नंबरचा मुलगा आहे. त्याच्यावर सध्या हैद्राबादच्या MNJ Cancer Institute मध्ये उपचार सुरू आहेत.

'Make a Wish Foundation'ला त्याच्या इच्छेविषयी कळलं. त्याची ही इच्छा पूर्णत्वास आणण्यासाठी नंतर या संस्थेनं राचकोंडा पोलिसांशी संपर्क साधला.

पोलीस आयुक्ताचा पदभार घेताच इशानने त्याच्या प्राधान्याचे विषय तत्काळ जाहीर केले. "असमाजिक तत्त्वांविरोधात कडक कारवाई केली जावी. सगळ्याच चोरांना आणि गुडांना कोठडीत बंद केलं जावं," अशी इच्छा त्यानं व्यक्त केल्याची माहिती आयुक्त भागवत यांनी दिली.

भागवत यांच्यासह अवघ्या पोलीस दलानं त्याचं जोरदार स्वागत केलं, आणि "चिमुकला आयुक्त" इशानच्या चेहऱ्यावर हास्य उमललं.

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)