You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
शुभवर्तमान : मुंबईत आता धावणार सेमी एसी लोकल!
- Author, रोहन टिल्लू
- Role, बीबीसी मराठी
मुंबईच्या उपनगरीय रेल्वेवर धावणाऱ्या सर्व लोकल टप्प्याटप्प्याने एसी करण्याच्या प्रयत्नांना आता पर्याय शोधला जात आहे. त्यासाठी नेहमीच्या 12 डब्यांच्या नॉन एसी लोकलपैकी तीन डबे एसी करण्याचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाच्या विचाराधीन आहे.
रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष डॉ. अश्विनी लोहानी या प्रस्तावावर चर्चा करण्यासाठी आणि व्यवहार्यता तपासण्यासाठी लवकरच मुंबईत जाणार आहेत.
गेल्या वर्षी 25 डिसेंबरला चर्चगेट ते बोरीवली अशी पहिली एसी लोकल चालवण्यात आली. तेव्हापासून पश्चिम रेल्वेवर दर दिवशी या लोकलच्या एकूण 12 फेऱ्या चालवल्या जात आहेत.
सकाळी विरारवरून 10.22 वाजता एक आणि संध्याकाळी चर्चगेटवरून बोरीवलीसाठी 5.49 वाजता एक आणि विरारसाठी 7.49 वाजता एक, अशा तीन फेऱ्या गर्दीच्या वेळी चालवल्या जातात. त्यामुळे ही लोकल उशिराने धावत असल्यास किंवा रद्द झाल्यास या लोकलचा मासिक पास काढणाऱ्यांना फटका बसतो.
जास्तीत जास्त प्रवाशांना एसी लोकलचा लाभ घेता यावा आणि त्यांना पर्यायही उपलब्ध असावा, यासाठी एसी लोकलची संख्या वाढवण्याची गरज आहे. पण सध्या फक्त एकच एसी लोकल ताफ्यात असल्याने फेऱ्या वाढवणं शक्य नाही.
यासाठीच रेल्वे बोर्डाकडे आणि रेल्वेमंत्र्यांकडे सेमी एसी लोकलचा प्रस्ताव मांडल्याची माहिती खासदार किरीट सोमय्या यांनी दिली. रेल्वेमंत्री पीयूष गोयल आणि रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष अश्विनी लोहानी यांनी या प्रस्तावाबाबत सकारात्मक प्रतिसाद दिल्याचंही सोमय्या यांनी सांगितलं.
काय आहे प्रस्ताव
या प्रस्तावानुसार 12 डब्यांची एक वातानुकूलित लोकल चालवण्याऐवजी या लोकलचे तीन-तीन डब्यांचे चार भाग करण्यात येतील. त्यानंतर 12 डब्यांच्या साध्या लोकलला हे तीन डबे जोडले जातील.
रेल्वे बोर्डाने पुढील दोन वर्षांमध्ये मुंबईत 70 नव्या एसी लोकल आणण्याचा निर्णय घेतला आहे. या लोकल अर्थातच टप्प्याटप्प्याने येणार आहेत. त्यामुळे मध्य आणि पश्चिम रेल्वेवरील उपनगरीय रेल्वेचा ताफा पूर्ण एसी होण्यासाठी बराच काळ वाट बघावी लागणार आहे.
मुंबईच्या प्रवाशांचा दिवस घड्याळाशी बांधलेला असतो. त्यांची एक लोकल चुकली किंवा उशिरा येत असेल, तर त्यांना लगेच पुढील लोकल यावी, अशी अपेक्षा असते. नव्या एसी लोकल टप्प्याटप्प्याने येणार असल्याने त्यांच्या फेऱ्यांची संख्याही मर्यादित असेल.
त्याऐवजी 12 डब्यांच्या साध्या लोकलला तीन डबे जोडले तर एसी लोकलचा पास काढून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना जास्तीत जास्त लोकलचा पर्याय उपलब्ध होईल, असं किरीट सोमय्या यांनी सांगितलं. पहिली एसी लोकल धावली, त्या वेळीही आपण रेल्वेला हा सल्ला दिल्याचं सोमय्या म्हणाले.
देर आए दुरुस्त आए
त्यावेळी हा सल्ला रेल यात्री परिषद, उपनगरीय रेल्वे प्रवासी एकता संघटना या प्रवासी संघटनांनीही दिला होता. "ही लोकल एका साध्या लोकलच्या फेऱ्या खाणार आहे, हे लक्षात आल्यावर आम्ही रेल्वेमंत्र्यांना 12 डब्यांच्या एक लोकलऐवजी तीन-तीन डबे साध्या लोकलला जोडण्याचा सल्ला दिला होता. पण रेल्वेला नेहमीच उशिरा शहाणपण सुचतं," असं रेल यात्री परिषदेचे अध्यक्ष सुभाष गुप्ता यांनी सांगितलं.
"दिल्लीतील लोकांना मुंबईचा वेग कधीच कळत नाही. नॅशनल रेल्वे युझर कन्सल्टेशन कमिटीचा सदस्य असताना मी दिल्लीतील अधिकाऱ्यांना ही जाणीव करून द्यायचा प्रयत्न करायचो. पण दिल्लीत बसून त्यांना तो अंदाज येत नाही," अशी थेट टीका गुप्ता यांनी केली.
आता रेल्वे 12 डब्यांच्या साध्या गाडीचेच तीन डबे एसी करायचा विचार करत असेल, तर त्याचं स्वागत असल्याचंही गुप्ता यांनी स्पष्ट केलं.
या प्रस्तावाचं स्वागत करताना उपनगरीय रेल्वे प्रवासी एकता संघटनेचे नंदकुमार देशमुख यांनीही रेल्वेला कानपिचक्या दिल्या.
"ही लोकल सध्या पश्चिम रेल्वेवरच चालवली जात आहे. वास्तविक ही गाडी मध्य रेल्वेच्या ताफ्यात येईल, अशी घोषणा तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी केली होती. आता तीन-तीन डबे जोडण्याच्या प्रस्तावाला मान्यता देण्याबरोबरच अशा तीन एसी डबे असलेल्या लोकल मध्य रेल्वेवरही चालवाव्यात," देशमुख यांनी आपली मागणी पुढे ठेवली.
हा विचार थोडासा उशिराने का होईना, पण रेल्वे करत आहे, यातच आपल्याला समाधान आहे, असं दोन्ही प्रवासी संघटनांच्या प्रतिनिधींनी सांगितलं.
प्रवाशांचा प्रतिसाद उत्तम
पश्चिम रेल्वेवर 25 डिसेंबरपासून सुरू झालेल्या या लोकलला प्रवाशांचा उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचं पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी रवींद्र भाकर यांनी सांगितलं. मुंबईत एसी लोकलचा प्रयोग नक्कीच यशस्वी होईल, याबाबत रेल्वे प्रशासनाला खात्री असल्याचंही ते म्हणाले.
याबाबत पश्चिम रेल्वेच्या मुंबई विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक मुकूल जैन यांनीही समाधान व्यक्त केलं. "सुरुवातीपासूनच या लोकलबद्दल उत्सुकता होती. दर महिन्याला या लोकलच्या मासिक पासधारकांच्या संख्येत वाढ होत आहे. दर दिवशी 12 फेऱ्यांची सेवा देणाऱ्या या लोकलमधून 12 हजारांपेक्षा जास्त प्रवासी प्रवास करत आहेत," असं जैन यांनी सांगितलं.
तुम्ही हे वाचलं का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)