You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
जरा जपून! 9 कोटी लोकांची माहिती दलालांना पुरवल्याची फेसबुकची कबुली
सोशल नेटवर्किंग साइट फेसबुकनं जवळपास 9 कोटी युझर्सचा डेटा राजकीय सल्ला देणाऱ्या 'केंब्रिज अॅनालिटिका' कंपनीला पुरवल्याची कबुली दिली आहे. 'व्हिसल ब्लोअर' ख्रिस्तोफर वायली यांनी हा आकडा पाच कोटी असल्याचं म्हटलं होतं.
यापैकी 11 लाख युझर्स UKमधले असल्याची माहिती बीबीसीला मिळाली आहे. ही सगळी माहिती फेसबुकचे मुख्य तांत्रिक अधिकारी माइक श्रोफर यांच्या ब्लॉगद्वारे समोर आली आहे.
फेसबुकचे संस्थापक मार्क झुकरबर्ग यांनी याबाबातची त्यांची भूमिका 11 एप्रिलपूर्वी मांडावी असे आदेश अमेरिकेच्या हाऊस कॉमर्स कमिटीनं दिले होते. या घोषणेनंतर काही तासातच हा ब्लॉग प्रसिद्ध झाला.
डेटा लीक प्रकरणावरुन फेसबुकवर जगभरातून टीका झाली होती. अनेक वर्षं केंब्रिज अॅनालिटिका कंपनीनं कोट्यवधी युझर्सचा डेटा मिळवला होता. मात्र लंडनस्थित या कंपनीनं सगळी माहिती डिलीट केल्याचा दावा केला होता.
आश्वासन
चॅनेल फोरच्या दाव्यानुसार युझर्झनी फेसबुकला पुरवलेल्या माहितीचा आजही वापर होत आहे. मात्र केंब्रिज अॅनालिटिकानं या बातमीचा इन्कार केला आहे.
केंब्रिज अॅनालिटिका डेटा लीक प्रकरण उघड झाल्यानंतर फेसबुकचे संस्थापक मार्क झुकरबर्ग यांनी चूक मान्य केली होती. थर्ड पार्टी अॅप्सना युझर्झची माहिती मिळवता येणार नाही याची काळजी घेऊ असं झुकरबर्ग यांनी सांगितलं.
"अॅपची निर्मिती करणारे अॅलेक्झांडर कोगन, केंब्रिज अॅनालिटिका आणि फेसबुक यांच्यात जे घडलं तो विश्वासघात आहे. युझर्स विश्वासानं आपली माहिती आमच्याकडे शेअर करतात. त्या सगळ्या माणसांचाही हा विश्वासघात आहे," असं झुकरबर्ग म्हणाले.
'दिस इज युअर डिजिटल लाइफ क्विझ' या अॅपच्या माध्यमातून डेटा घेऊन त्याचा वापर करण्यात आल्याचं स्पष्ट झालं होतं. हे अॅप वापरणारे 97 टक्के अमेरिकेचे नागरिक असल्याची माहिती समोर आली आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)