कॉमनवेल्थ गेम्स : 15 किलो ते 317 किलो - सतीशचा सोनेरी प्रवास!

भारतीय वेटलिफ्टर सतीश कुमार शिवलिंगम राष्ट्रकुल स्पर्धेत पदक पटकावणारा पाचवा खेळाडू ठरला आहे. 77 किलोच्या गटात 317 किलो वजन उचलत त्यांनी इंग्लंडच्या जॅक ऑलिव्हरला नमवून सुवर्णपदक मिळवलं.

भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सतीश कुमार याचं अभिनंदन केलं आहे.

"माझा फॉर्म चांगला चालू नव्हता, त्यामुळे मी थोडा चिंताग्रस्त होतो," असं शिवलिंगमने बीबीसीला सांगितलं. फॉर्म चांगला नसताना देखील इतका उत्तम कमबॅक करणं ही शिवलिंगमसाठी एक चांगली बातमी आहे, असं बीबीसीचे प्रतिनिधी रेहान फजल यांनी सांगितलं. सुरुवातीला स्नॅचमध्ये सतीश कुमार 1 किलोने मागे होता. पण क्लिन अॅंड जर्कमध्ये सतीशने यश मिळवलं. फक्त 2 प्रयत्नांमध्येच सतीशने प्रतिस्पर्धी खेळाडूंना मागे टाकले.

12 व्या वर्षीपासून वेटलिफ्टिंगमध्ये

तामिळनाडूतील वेल्लोर जिल्ह्यात जन्मलेल्या सतीश कुमारला लहानपणापासूनच वेटलिफ्टिंगची आवड होती. 12व्या वर्षीपासून ते प्रक्षिक्षण घेऊ लागला. त्या वेळी तो 15 किलो वजन उचलत होता.

सतीश कुमार हे सामान्य कुटुंबातील आहेत. त्यांचं शिक्षण सतुवाचारी सरकारी शाळेमध्ये झालं आहे. सतीश यांचे वडील माजी सैनिक आणि वेटलिफ्टर होते. त्यांनी राष्ट्रीय स्तरावर आयोजित झालेल्या स्पर्धांमध्ये सहभाग घेतला होता. परिस्थितीमुळं त्याला आपली क्रीडा क्षेत्रातील कारकीर्द मध्येच सोडून द्यावी लागली.

लहानपणापासूनच या खेळासाठी सतीश कुमारने खेळासाठी विशेष परिश्रम घेतले. 2006 साली झालेल्या जिल्हास्तरीय स्पर्धेत सतीशने 50 किलोच्या गटात सुवर्णपदक मिळवलं. त्यानंतर त्यांनी अनेक स्पर्धांमध्ये सहभाग घेतला. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये अनेक पदकं जिंकली. बल्गेरिया आणि दक्षिण कोरियामध्ये झालेल्या स्पर्धांमध्ये देखील त्याने भाग घेतला होता.

सध्या ते दक्षिण रेल्वेमध्ये क्लर्क या पदावर कार्यरत आहेत.

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)