उन्नाव आणि कठुआ प्रकरणी राहुल-प्रियांका गांधीचं मध्यरात्री नवी दिल्लीत आंदोलन

उन्नाव आणि कठुआमध्ये झालेल्या बलात्काराच्या निषेधार्थ काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पक्ष कार्यकर्ते आणि समर्थकांबरोबर नवी दिल्लीत इंडिया गेट परिसरात गुरुवारी मध्यरात्री आंदोलन केलं.

इंडिया गेट परिसारत उपस्थित असलेल्या आंदोलनकर्त्यांनी मेणबत्त्या लावून निषेध व्यक्त केला. त्यांच्या या कॅंडल मार्चला राहुल गांधी यांची बहिण प्रियांका गांधी आणि रॉबर्ट वाड्रा देखिल उपस्थित होते.

दिल्लीच्या मानसिंह रोडवर सुरू झालेल्या या कॅंडल मार्चची सांगता इंडिया गेटवर झाली.

या मार्चमध्ये महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. या कॅंडल मार्चवेळी राहुल गांधी यांनी सर्वांना संबोधित केलं.

"देशात एका पाठोपाठ एक महिलाविरोधी घटना घडत आहेत. हत्या, बलात्कार, हिंसा या विरोधात आम्ही उभे आहोत. सरकारनं दोषींवर कठोर कारवाई करायला हवी," असं राहुल गांधी म्हणाले.

"आज भारतातल्या महिला घराबाहेर पडायला घाबरत आहेत. मला वाटतं की सरकारनं यावर लवकरात लवकर तोडगा काढावा जेणेकरून भारतातल्या महिला शांततापूर्ण आयुष्य जगू शकू शकतील."

जम्मूमध्ये अल्पवयीन मुलीवर झालेल्या बलात्काराविरोधात आणि उत्तर प्रदेशातल्या उन्नावमध्ये भाजप आमदारानं केलेल्या कथित बलात्काराविरोधात ही निदर्शनं झाली.

"मोदींनी देशातल्या महिलांच्या सुरक्षेसाठी काही पावलं उचलली नाहीत," अशी टीका या वेळी उपस्थित असलेल्या महिलांनी केली.

"लाखो भारतीयांप्रमाणे मी देखील आज दुःखी आहे. भारतीय महिलांसोबत होणारी वाईट वर्तणूक सहन केली जाणार नाही. न्याय मिळावा म्हणून माझ्याबरोबर शांततापूर्ण कॅंडल मार्चमध्ये सहभागी व्हा," असं भावनिक आवाहन राहुल गांधी यांनी ट्विटरवर केल्यानंतर या मोर्चात लोकांनी सहभाग घेतला होता.

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)