You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
अमेरिका : उत्तर कोरियाशी चर्चा होणार तर अण्वस्त्रांवरच होणार!
उत्तर कोरियाशी आपण जी काही चर्चा करू त्यात अण्वस्त्रांचा मुद्दा हा अंतिम असेल, असं अमेरिकेने म्हटलं आहे.
दक्षिण कोरियाने म्हटलं होतं की प्याँगचँगमध्ये विंटर ऑलिंपिक्सच्या समारोपाप्रसंगी उत्तर कोरियानं संकेत दिले होते की ते अमेरिकेसोबत चर्चेसाठी तयार आहे.
पण चर्चेसाठी आम्ही कुठल्याही अटी स्वीकारणार नाही, असं उत्तर कोरियाने याआधीच म्हटलं होतं.
"प्याँगयँगच्या संदेशाकडं आमचं लक्ष आहे. ते जर खरंच चर्चा करायला तयार असतील तर अण्वस्त्रमुक्तीच्या दिशेने ही पहिली पावलं असतील," असं अमेरिकेनं म्हटलं आहे.
रविवारी विंटर ऑलिंपिक्स संपण्यापूर्वी अमेरिकेचे प्रतिनिधी दक्षिण कोरियाच्या राष्ट्राध्यक्षांना भेटले तेव्हा अमेरिकेशी बोलण्याची उत्तर कोरियाची इच्छा असल्याची बातमी समोर आली.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांची कन्या इवांका यासुद्धा या महोत्सवात उपस्थित होत्या. पण त्यांनी कुणाही उत्तर कोरियनशी बोलणं अपेक्षित नाही. विशेष म्हणजे ऑलिंपिक स्टेडियममध्ये त्या कोरियाचे मुख्य राजदूत जनरल किम याँग-चोल यांच्यापासून काही फूट अंतरावरच बसल्या होत्या.
उत्तर कोरियाचे संदेश
अमेरिकेशी चर्चा करण्यास उत्तर कोरिया 'फार इच्छुक' होता, असं दक्षिण कोरियाचे अध्यक्ष मून जेए-इन यांच्या कार्यालयानं म्हटलं आहे. त्यांनी असंही सांगितलं की एकाच वेळी दोन्ही कोरियन देशांमध्ये चर्चा व्हावी आणि अमेरिकेबरोबरचे उत्तर कोरियाचे संबध सुधारावेत, यावर प्याँगयँगने सहमती दर्शविली होती.
वाशिंग्टनने लादलेले नवे निर्बंध हे युद्धाची कृती असल्याचं तीव्र निवेदन उत्तर कोरियाने केल्यानंतरच्या काही तासांनीच दक्षिण कोरियाच्या राष्ट्राध्यक्षांनी हे रहस्योद्घाटन केलं.
ऑलिंपिकदरम्यान दोन्ही कोरियांनी दाखवलेल्या सहकार्याबद्दल उत्तर कोरियाच्या विदेश मंत्रालयानं कौतुक केलं. पण त्याच्या "अमेरिकेने मोठ्या प्रमाणावर लादलेल्या नवीन निर्बंधांनी कोरियन द्वीपकल्पाला युद्धाच्या छायेत आणलं आहे," असं म्हटलं होतं.
1950-53च्या युद्धानंतर कोरियन द्वीपकल्पाचं विभाजन झालं आणि तेव्हापासून दोघांमध्ये कधीही शांतता करार होऊ शकलेला नाही.
पण स्योलशी जवळीक वाढवून उत्तर कोरिया दक्षिण कोरिया आणि अमेरिकेच्या वाढत्या संबंधांमध्ये अडथळा निर्माण करत असल्याचं मानलं जात आहे.
पण तज्ज्ञांनी इशारा दिला आहे की विंटर ऑलिम्पिक्समधल्या नवीन घडामोडींमुळे या भागातला तणाव थांबणार नाही, विशेषतः गेल्यावर्षी उत्तर कोरियाने घेतलेल्या आण्विक आणि मिसाईल चाचण्यांनंतर.
यावेळेस तरी यश मिळेल का?
उत्तर कोरिया आणि अमेरिकेत अद्यापही चर्चा होऊ शकते, कारण त्यांचे प्रतिनिधिमंडळ अजूनही शहरात आहेत, असे सल्ले सध्या दक्षिण कोरियाच्या मीडियामध्ये येत आहेत.
येत्या दोन दिवसांत बैठक होऊ शकते का, असं बीबीसीच्या लॉरा बिकर यांनी प्याँगचँगमध्ये दक्षिण कोरियाच्या अधिकाऱ्यांना विचारलं असता त्यांनी "बघूया" असं उत्तर दिलं.
उत्तर कोरिया आणि अमेरिकेतल्या घडामोडी हाताळणारे जनरल किम चो कँग-इल यांच्यासह आठ जणांची टीम उत्तर कोरियाने सीमेपलीकडे पाठवली आहे.
दरम्यान, अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे कोरियन विशेषज्ञ अलिसन हुकर हे अमेरिकेच्या शिष्टमंडळात सहभागी आहे. ते 2014 साली जनरल किम यांना भेटले होते जेव्हा उत्तर कोरियाने दोन अमेरिकन बंदींची सुटका केली होती.
अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष माईक पेन्स हे उत्तर कोरियाचे राष्ट्राध्यक्ष किम जाँग-उन यांच्या बहीण किम यो-जाँग यांना ऑलिंपिक सुरू होण्याच्याआधी भेटणार होते. पण अमेरिकेच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, उत्तर कोरियाने ही बैठक रद्द केली. उत्तर कोरियाने यावर काहीही उत्तर दिलं नाही.
तुम्ही हे वाचलं का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)