‘अंडरवॉटर फोटोग्राफर ऑफ द इअर 2018’चं विजेतं छायाचित्र

जर्मन फोटोग्राफर टोबीअस फ्रेडरिक यांनी दुसऱ्या महायुद्धादरम्यान बुडालेल्या जहाजावरील लष्करी वाहनांच काढलेलं छायाचित्र हे 'अंडरवॉटर फोटोग्राफर ऑफ द इअर 2018'चं विजेतं छायाचित्र ठरलं आहे.

इजिप्तमधल्या रस मोहम्मद किनाऱ्यालगत फ्रेडरिक यांनी हे छायाचित्र घेतलं होतं. जगभरातून 5000 छायाचित्रकारांनी पाठवलेल्या पाण्याखालील छायाचित्रांमधून त्यांच्या या छायाचित्राची निवड झाली आहे.

"काही वर्षांपूर्वी असं छायाचित्र घेण्याची कल्पना मला सुचली होती. पण एकाच छायाचित्रात संपूर्ण दृष्य सामावणं अशक्य आहे. कारण रॅकमध्ये अगदी थोडीशी जागा असल्यानं एकाच फ्रेममध्ये छायाचित्र घेता येत नाही. अनेक छायाचित्रं घ्यायची आणि ती एकत्र जोडून पॅनारोमा छायाचित्र तयार करायचं असा पर्याय मी त्यावर काढला," फ्रेडरिक म्हणाले.

स्पर्धेचे निरीक्षक पीटर रोलँड्स म्हणाले, "हा एक विलक्षण असा शॉट आहे. जो शक्य तितक्या मोठ्या प्रमाणात बघितला पाहिजे. अशा छायाचित्रासाठी कलात्मक कौशल्य लागतं आणि त्यासाठी छायाचित्रणाची प्रतिभा प्राप्त असावी लागते."

ग्रँट थॉमस यांनी 'ब्रिटीश अंडरवॉटर फोटोग्राफर ऑफ द इअर' हा पुरस्कार पटकावला. स्कॉटलंडच्या लोश लोहमंड तलावात त्यांनी राजहंसाच्या जोड्याचं छायाचित्र घेतलं होतं.

लव्ह बर्ड्स असं टायटल त्याला देण्यात आलं. अनेक तास पाण्यात प्रतीक्षा करण्याचं फळ थॉमस यांना मिळालं. "राजहंस अन्नाचा शोध घेत होते. परफेक्ट क्षणसाठी मला फक्त संयमानं प्रतीक्षा करायची होती," अशी प्रतिक्रिया थॉमस यांनी दिला आहे.

11 श्रेणींमध्ये ही स्पर्धा घेण्यात आली. मॅक्रो, वाईड अँगल, हावभाव यासह फोटोग्राफरचं निरीक्षण असे निकष त्याला लावले गेले होते. शिवाय ब्रिटीश छायाचित्रकारांसाठी तीन आणखी श्रेणी होत्या.

तुम्ही हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)