You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
जगभरातल्या नेटविश्वात 'लुंगी' व्हायरल!
फॅशनविश्वात कोणती गोष्ट लोकप्रिय होईल हे सांगता येत नाही. दक्षिण भारतातल्या लुंगी या वस्त्रप्रकाराने इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे. लुंगी चर्चेत येण्याएवढं घडलंय तरी काय?
तुम्ही कुठल्याही समाजाचं प्रतिनिधित्व करत असलात किंवा कुठेही राहत असाल तरी लुंगी तुम्हाला ठाऊक असेलच. तुमचे वडील किंवा आजोबांनी लुंगी नेसलेली तुम्ही पाहिलीच असेल. मशीद किंवा पॅगोडा अशा धार्मिक स्थळांच्या ठिकाणी तुमचे पाय उघडे असतील तर तुम्हाला लुंगीच दिली जाते.
ल्युंगी, लोंगी किंवा सारोंग अशा वेगवेगळ्या नावांनी प्रचलित आणि कालौघात फॅशनविश्वात मागे पडलेली लुंगी आता अचानकच व्हायरल झाली आहे.
लुंगी म्हणजे कमरेखाली नेसायचं वस्त्र आहे. कमरेभोवती घट्ट गुंडाळून परिधान करायची लुंगी ट्यूबच्या आकाराप्रमाणे असते.
आरामदायी आणि मोकळंढाकळं वावरू इच्छिणाऱ्यांसाठी लुंगी हा उत्तम पर्याय आहे. मुख्यत्वे पुरुषांसाठी असलेली लुंगी दक्षिण भारत दक्षिण आणि आग्नेय आशिया, पूर्व आफ्रिका तसंच मध्यपूर्वेतील देशांमध्ये प्रसिद्ध वस्त्रप्रकार आहे.
उष्ण कटिबंधातील मंडळींकरता वजनाला हलकी, मऊसूत आणि सुटसुटीत अशी लुंगी उपयुक्त ठरते. पायघोळ असल्याने सार्वजनिक ठिकाणी वावरतानाही लुंगी उपयोगी ठरते. साधारणत: चौकटीचौकटीची नक्षी असलेली लुंगी लोकप्रिय आहे. मात्र लुंगीच्या कापडांमध्येही वैविध्य पाहायला मिळतं.
सर्वसामान्यांना परवडणाऱ्या दरात लुंगी उपलब्ध असते.
फॅशनविश्वातला झारा हा लोकप्रिय ब्रँड. झारा ब्रँडच्या कपड्यांनी बॉलीवूडपासून बड्या कॉर्पोरेट्सपर्यंत सगळ्यांना भुरळ घातली आहे.
झारा ब्रँडचे कपडे तसे महाग. सर्वसामान्यांच्या खिशाला चाट देणारे असतात. याच झारा ब्रँडने लुंगीसदृश ड्रेस बाजारात आणला आहे. या लुंगीस्टाइल ड्रेसने सध्या फॅशनविश्वात दणका उडवून दिला आहे.
झाराच्या अधिकृत वेबसाइटवर विक्रीस असलेला फ्लोविंग स्कर्ट थेट लुंगीसारखाच दिसतो. चौकड्यांच्या कापडात शिवलेल्या या स्कर्टला समोरच्या बाजूला स्लिट दिल्याने लुंगी लुक मिळाला आहे. पण स्कर्टसाठी वापरण्यात आलेल्या कापडामुळे झाराला ट्रोल करण्यात येत आहे.
भारतीय बाजारात तीनशे रुपयांपासून लुंगी मिळते. मात्र झारा लुंगीची किंमत जवळपास पाच हजार रुपये आहे. भारतीय लुंगीसारखी दिसत असूनही शेकडो पटींनी किंमत वाढवल्याने झाराला ट्रोल करण्यात येत आहे.
झारा ब्रँडनुसार हा 'चेक मिनी स्कर्ट' आहे. मात्र झाराचा स्कर्ट उर्फ लुंगी पॉलीस्टर आणि व्हिसकोसपासून तयार झाली आहे. सर्वसाधारणपणे लुंगी कॉटनची असते. झाराच्या स्कर्टरुपी लुंगीला ड्रायक्लीन करावं लागतं. सर्वसाधारण लुंगीसाठी अशा अटी नसतात.
झाराच्या लुंगीला झिप आहे. नेहमीच्या लुंगीला झिप नसते.
लुंगी आणि संस्कृती
झारासारख्या ग्लोबल ब्रँडच्या सूचीत लुंगीस्टाइल स्कर्ट पाहून आश्चर्यचकित झाल्याचं मत अनेक नेटिझन्सच्या प्रतिक्रियांतून व्यक्त होत आहे.
लुंगीस्टाइल स्कर्टची किंमत पाहून अनेकजण चक्रावून गेले आहेत. आपले आजोबा, बाबा यांच्याशी निगडीत लुंगी आता महिलांचं फॅशन स्टेटमेंट म्हणून अवतरल्यानं लोक आश्चर्यचकित होत आहेत.
लुंगीसारखं असूनही झाराने लुंगी शब्दाचा उल्लेख न केल्याने अनेकजण नाराज झाले आहेत. याव्यतिरिक्त या लुंगीसाठी वापरलेलं कापड, ड्रायक्लीनची अट यावरून सोशल मीडियात नेटिझन्सच्या प्रतिभेला बहार आला आहे.
एखाद्या संस्कृतीतील सर्वसामान्यांना परवडणाऱ्या वस्त्रप्रकारासारखी निर्मिती करून त्याला हजारो रुपयांमध्ये विकण्याच्या विपणन तंत्रावर काहींनी टीका केली आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)