You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
तुम्हाला 'पॅडवुमन' माया माहीत आहे का?
"मी वयाच्या 26 वर्षांपर्यंत कधीही सॅनेटरी पॅड वापरलं नाही. एकतर त्यासाठी माझ्याकडे पैसे नव्हते आणि त्याविषयी मला माहीतही नव्हते. यामुळे तब्येतीशी निगडीत अनेक समस्यांचा मला सामना करावा लागला," हा अनुभव आहे 'पॅडवुमन' नावानं ओळखल्या जाणाऱ्या माया विश्वकर्मा यांचा. त्या सध्या राहतात अमेरिकेतील कॅलिफॉर्निया शहरात आणि ओळखल्या जातात मध्य प्रदेशात.
माया जन्माने भारतीय आहेत आणि तरुण वयापर्यंत त्या मध्य प्रदेशमधील नरसिंहपूर जिल्ह्यात राहत होत्या. माया यांना परिसरातले लोक पॅडवुमन या नावानं ओळखतात. 9 फेब्रुवारीला रिलीज होणाऱ्या 'पॅडमॅन'शी त्यांचा काही संबध आहे का?
या प्रश्नावर माया म्हणतात, "मी मागील दोन वर्षांपासून मेन्स्ट्रुएशन हायजीन अर्थात पाळीदरम्यानची स्वच्छता या विषयावर काम करत आहे. सिनेमाशी माझं काही देणं-घेणं नाही. एक मात्र खरं आहे, मी माझ्या कामानिमित्त अरुणाचलम मुरूगनाथम यांना भेटले होते."
पाळीदरम्यान काय स्वच्छतेची काळजी कशी घ्यावी यासाठी जनजागृतीचं काम माया करतात. त्यांनी परवडणारे सॅनिटरी पॅड्स निर्माण करणारं तंत्रही विकसित केलं आहे. म्हणूनच त्या पॅडवुमन नावानं ओळखल्या जातात.
माया पुढं म्हणतात, त्यांचं काम सध्या सुरुवातीच्या टप्प्यात जरी असलं तरी पॅडमॅन मुळे नव्हे तर त्यांच्या जीवनातील अनुभवांपासून प्रेरणा घेऊन सुरू झालेलं आहे.
माया यांना आई-मुलगी, पती-पत्नी, महिला आणि पुरुष यांच्यातल्या संकोचाला वाट मोकळी करून द्यायची आहे.
काय म्हणतात आकडे?
अलीकडंच जाहीर झालेल्या 'नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हे'च्या रिपोर्टनुसार
- 15 ते 24 वर्षं वयाच्या मुलींमध्ये 42 टक्के मुली या सॅनिटरी पॅडचा वापर करतात.
- पीरियड्स दरम्यान 62 टक्के महिला कापडाचा वापर करतात.
- जवळपास 16 टक्के महिला या स्थानिक स्तरावर तयार करण्यात आलेले पॅड वापरतात.
माया स्वतः या देशातल्या अशा 62 टक्के महिलांमध्ये येत होत्या.
माया यांची प्रेरणा
माया म्हणतात, "पीरियड्सच्या दरम्यान 'मला कापड वापरायचं आहे', असं पहिल्यांदा माझ्या मामीने मला सांगितलं. पण कापड वापरल्यानं मला अनेक प्रकारची इन्फेक्शन झाली. दर चार-सहा महिन्यांनी पुन्हा बळावत असत."
दर वेळी बळावणाऱ्या इन्फेक्शनच्या मागे पीरियड्स दरम्यान वापरण्यात आलेलं कापड हे मुख्य कारण असल्याचं माया यांना दिल्लीतील एम्समध्ये शिक्षण घेत असताना कळलं.
त्यानंतर माया यांनी सॅनिटरी पॅड्स आणि त्याचा वापर तसंच काय करावं आणि काय करू नये याविषयी महिला आणि मुलींमध्ये जागरुकता निर्माण करण्याचा निश्चय केला.
दोन वर्षांपूर्वी माया नरसिंहपूरला परतल्या. त्यानंतर भारतात पॅड मॅन या नावानं प्रसिद्ध असलेल्या अरुणाचलम मुरगनाथम यांची त्यांनी भेट घेतली.
अरुणाचलम मुरूगनाथम हे पॅड्स तयार करण्यासाठी जे मशीन वापरतात त्यात हाताचं काम जरा जास्त असल्याचं माया यांनी बीबीसीला सांगितलं. माया यांना त्यापेक्षा चांगल्या आणि कमी मेहनत लागणाऱ्या मशीनची अपेक्षा होती.
माया यांनी याकरिता मग काही मित्रांकडून पैसे उधार घेतले. तसेच क्राऊड फंडिंगच्या माध्यमातून काही पैसे जमा केले.
त्यातून मशीन विकत घेतली गेली. आज दोन खोल्यांच्या घरात सॅनिटरी पॅड्स निर्मितीचं काम चालतं. दररोज 1000 पॅड्स या ठिकाणी तयार केले जातात.
स्वतःच्या कामाविषयी माहिती देताना माया म्हणतात, "आम्ही दोन प्रकारची पॅड्स तयार करतो. एक तर वुड पल्प आणि कापसाचा वापर करून आणि दुसरं पॉलीमर शीटचा वापर करून पॅड्स तयार केली जातात."
'पॅडमॅन' सारख्या सिनेमांद्वारे त्यांच्या कामाचा प्रचार आणि प्रसार होतो का?
या प्रश्नाच्या उत्तरात त्या म्हणतात, "हे खरं आहे की, अशा पद्धतीचे सिनेमे तरुणांमध्ये पीरियड्स आणि रजोनिवृत्ती यासारख्या महत्त्वाच्या विषयावर जनजागृती करतात. पण मी ज्या भागात काम करते तिथे ना वीज आहे ना सिनेमागृह. इंटरनेटही नाही."
माया सांगतात, "नरसिंहपूर सारख्या आदिवासी भागात जिथं मी काम करते, तिथं यासारख्या सिनेमांमुळं काम नाही होणार. या भागात प्रत्यक्ष फिरून काम करणाऱ्या पॅडमॅन आणि पॅडवुमनची गरज आहे."
पॅड मॅन सिनेमा रिलीज होण्याआधी पॅड वुमनची ओळख मिळाल्याबद्दल माया म्हणतात, "मला लोकांनी कुठल्या नावानं ओळखावं यानं मला फरक नाही पडतं. माझी इच्छा आहे की, लोकांनी पीरियड्स आणि पॅड्स याविषयी जाणून घ्यावं. त्याविषयी बोलावं. मगं ते पॅड वुमन या नावानं जाणून घेण्यास उत्सुक असतील तर यात वाईट काहीच नाही."
तुम्ही हे वाचलं का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)