कॅटलोनियाच्या संसद अधिवेशनाला न्यायालयाची स्थगिती

कॅटालोनिया जनमत

फोटो स्रोत, EPA

येत्या सोमवारी होत असलेल्या कॅटलन संसदेचं अधिवेशन स्पेनच्या न्यायालयानं स्थगित केलं आहे. कॅटलोनियाच्या स्वातंत्र्याला बळ मिळू नये, या उद्देशाने न्यायालयाने हे आदेश दिले आहेत.

स्वातंत्र्याच्या मागणीचे असे कोणतेही प्रयत्न घटनेचे उल्लंघन करणारे आहेत, असं स्पॅनिश न्यायालयानं म्हटलं आहे.

तत्पूर्वी पंतप्रधान मारियानो राहोय यांनी गेल्या रविवारी कॅटलोनियातील वादग्रस्त मतदानानंतर कॅटलोनियातील प्रांतिक सरकारनं स्वातंत्र्याची घोषणा करू नये, असा इशाराही दिला आहे.

तर कॅटलोनियाचे नेते कार्ल्स प्युइकडेमाँट यांनी पुढील आठवड्यात होत असलेल्या अधिवेशनात ते स्वातंत्र्याची घोषणा करतील असं सूचित केलं होतं.

सोशॅलिस्ट पार्टीचा विरोध

न्यायालयानं हा निर्णय देताना कॅटलोनियाच्या सोशॅलिस्ट पार्टीची बाजू उचलून धरली आहे.

न्यायालयानं म्हटलं आहे की, स्वातंत्र्याची घोषणा करण्यासाठी प्रांतिक संसदेच्या अधिवशेनाला परवानगी देणं म्हणजे सोशॅलिस्ट पार्टीच्या खासदारांच्या हक्कांवर गदा आणण्यासारखं आहे.

कॅटालोनिया जनमत

फोटो स्रोत, Chris McGrath/Getty Images

फोटो कॅप्शन, कॅटालोनियात रविवारी झालेल्या जनमत चाचणीत अनियमित असल्याच्या तक्रारी होत्या

रविवारी झालेलं जनमत होऊच नये, यासाठी न्यालायानं दिलेला निर्णय कॅटलोनियाच्या नेत्यांनी झुगारला होता. स्पेनच्या सरकारनं हे जनमत बेकायदेशीर ठरवत, त्याला न्यायालयात आव्हान दिलं होतं.

रविवारी झालेल्या जनमतात 22 लाख नागरिकांनी भाग घेतला होता, त्यातील 90 टक्के लोकांनी स्वातंत्र्यासाठी मतदान केल्याचा दावा जनमत आयोजित करणाऱ्यांनी केला होता.

पण अंतिम निकाल जाहीर करण्यात आलेला नसून, जनमतात अनियमितता असल्याचे दावेही झाले आहेत.

स्पेनच्या न्यायालयाच्या आदेशांची अंमलबजावणी करणाच्या प्रयत्नात असलेल्या पोलिसांनी मतपेट्या जप्त करण्याचा आणि मतदारांना पांगवण्याचा प्रयत्न केल्यामुळे हिंसक घटनाही घडल्या होत्या.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)