You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
काशी विश्वनाथाचं मंदिर वाचवण्यासाठी नागा साधूंनी जेव्हा औरंगजेबाशी लढले होते
- Author, जयदीप वसंत
- Role, बीबीसी गुजरातीसाठी
गुजरातमधील जुनागडमध्ये दरवर्षी महाशिवरात्रीच्या निमित्ताने भवनाथ यात्रा भरत असते. यादिवशी देशभरातून आणि आसपासच्या भागातून शिवभक्त या ठिकाणी येत असतात. पण या यात्रेचं मुख्य आकर्षण असतं नागा साधू.
अंगावर विभूती, चेहऱ्यावर आलेल्या केसांच्या लांबच लांब जटा या सगळ्यांमुळे हे साधू चटकन नजरेत भरतात. विशेष म्हणजे या यात्रेत हे साधू तलवारी, चक्र, धनुष्य, त्रिशूळ आणि भाले घेऊन मर्दानी खेळ दाखवत असतात.
कधीकाळी धर्मग्रंथांचं पालन करणाऱ्या या साधूंना तत्कालीन मुघल सम्राटाच्या विरोधात शस्त्र हातात घ्यावी लागली होती.
काशीविश्वनाथाच्या मंदिराचं संरक्षण करताना या साधूंनी औरंगजेबाच्या सैन्याविरुद्ध लढा दिला आणि बलिदान दिल्याचीही इतिहासात नोंद आहे.
आदि शंकराचार्य आणि आखाड्यांची स्थापना
इसवी सन 8 व्या ते 9 व्या शतकादरम्यान बौद्ध मठ आणि विहारांचा प्रभाव कमी व्हायला लागला होता. याच दरम्यान आदि शंकराचार्यांच्या काळात आखाडा व्यवस्था सुरू झाली.
आदि शंकराचार्यांनी बद्रीनाथ, द्वारका, जगन्नाथपुरी आणि रामेश्वरम या ठिकाणी मठांची स्थापना केली. याच सुमारास अरण्य, आश्रम, भारती, गिरीपर्वत, पुरी, भारती, सरस्वती, सागर, तीर्थ आणि वन या 10 पंथांमध्ये संन्यासी संघटन उभारण्यात आलं. या 10 संघटना असल्यामुळे त्यांना 'दशनामी' म्हणून ओळखलं जाऊ लागलं. हे संन्यासी ज्या संघटनेत असतात त्याचंच नाव हे आडनावाप्रमाणे वापरलं जायचं.
सुरुवातीचे आखाडे हे प्रामुख्याने शैव (शिव मानणारे) आणि वैष्णव (विष्णूला मानणारे वैरागी किंवा बैरागी) होते. नंतर त्यात उदासीनांचाही समावेश झाला. हे शीख आखाडे आहेत.
सध्या 13 आखाडे अस्तित्वात असून यातल्या साधूंची एकूण सदस्यसंख्या सुमारे पाच लाखांच्या आसपास आहे.
महामंडलेश्वर प्रत्येक आखाड्याचे सर्वोच्च प्रमुख असतात आणि तेच आखाड्याचं व्यवस्थापन बघतात. जदुनाथ सरकार 'दशनामीं'च्या इतिहासावर लिहिलेल्या त्यांच्या पुस्तकात (पान क्रमांक 92) म्हणतात की, पूर्वी महामंडलेश्वर 'परमहंस' म्हणून ओळखले जायचे.
एका आखाड्यात आठ रिंगण आणि 52 केंद्रे असतात. त्यांच्यावर मंडलेश्वर असतात. रिंगणाच्या आकारानुसार सदस्यसंख्या कमी-जास्त असू शकते. महंतांच्या नेतृत्वाखाली प्रत्येक केंद्रात धार्मिक उपक्रम राबवले जातात.
आखाड्यांच्या स्थापनेच्या सुरुवातीच्या शतकांमध्ये या महंतांचा प्रदेश हिंदू राजांच्या अधीन असायचा. त्यावेळचे राजे या संन्यासींचा सन्मान करायचे त्यांच्या गरजा भागवायचे.
अलाहाबाद विद्यापीठातील इतिहासाचे प्राध्यापक हेरंब चतुर्वेदी सांगतात, "सिकंदरच्या आक्रमणानंतर आखाडा परंपरा सुरू झाल्याचं मानलं जातं. सर जदुनाथ सरकार यांच्या 'दशनामी नागा संन्यासींचा इतिहास' या पुस्तकात याबद्दल बरीच माहिती सापडते."
साधूंना या आखाड्यात सहज प्रवेश मिळत नाही. त्यासाठी त्यांना कठोर परीक्षा द्यावी लागते. या साधूंना आखाड्यांमध्ये प्रवेश देण्यासाठी वेगवेगळ्या व्यवस्था असतात.
जवळपास सर्वच आखाड्यांमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी या साधूंना चार ते पाच वर्षे सेवा द्यावी लागते. त्यानंतर कुंभमेळ्यात त्यांना दीक्षा दिली जाते.
संन्याशांची सशस्त्र संघटना तयार झाली?
ख्रिश्चन पास्टर आणि मँचेस्टर विद्यापीठातील प्राध्यापक जॉन निकोल फरकुहार यांनी 'द फायटिंग असेटिक्स ऑफ इंडिया' नावाचा शोधनिबंध सादर केलाय. हा शोधनिबंध 'बुलेटिन ऑफ जॉन रायलँड' लायब्ररीने 1925 साली प्रकाशित केला होता.
या शोधनिबंधात फरकुहार यांनी सरस्वती संप्रदायातील एका साधूच्या 'श्रुती आणि स्मृती परंपरा'चा (पान क्रमांक 442-443) संदर्भ देत लिहिलंय की, 'अकबराच्या काळात फक्त ब्राह्मणच संन्यासी व्हायचे. बऱ्याचदा हे संन्यासी सकाळी सकाळी गंगेत स्नान करायला जायचे. त्यावेळी काही फकीर तिथे येऊन तपस्वींना मारायचे. त्यांच्यासाठी हा खेळच बनला होता. मूर्तिपूजक काफिरांची हत्या करणं या फकीरांना योग्य वाटायचं आणि विशेष म्हणजे स्थानिक मुस्लिम अधिकाऱ्यांनाही त्यांच्या या वागण्याबद्दल सहानुभूती वाटायची.'
याच काळात वाराणसीत मधुसूदन सरस्वती नावाचे एक संस्कृत पंडित होऊन गेले. त्यांनी बरीच पुस्तकं लिहिली. त्यावेळी अकबराने संन्यास्यांच्या मृत्युविषयी असा युक्तिवाद केला होता की, फकीरांनी जेव्हा या साधुंवर हल्ला केला तेव्हा ते नि:शस्त्र होते. त्यामुळे त्यांना शिक्षा करता येणार नाही.
त्यावेळी बिरबलाने मधुसूदन सरस्वती यांना पुढे येऊन या संन्यासांची संघटना बांधावी असा सल्ला दिला. शिवाय या संघटनांमध्ये ब्राह्मणेतरांची भरती करून त्यांना फकीरांप्रमाणे प्रशिक्षण देण्याची सूचना केली.
त्यानंतर मधुसूदन सरस्वती यांनी हजारोंची संघटना बांधली.
पण त्यापूर्वी 12 व्या आणि 13 व्या शतकात या संघटनेत केवळ ब्राह्मणांनाच प्रवेश दिला जायचा. त्यामुळे नवी भरती झालीच नाही, पण नंतर त्यांचा उपपंथात समावेश करण्यात आला.
फरकुहार यांच्या मते ही घटना इ.स. 1565 च्या आसपास घडली असावी. हे साधू भांग आणि मादक पेयांचं मोठ्या प्रमाणात सेवन करायचे.
पण 13 व्या किंवा 14 व्या शतकात रामानंदांनी या परंपरांपासून बाजूला जात या संघटनांमध्ये सर्व जातीच्या लोकांना स्थान दिल्याचे उल्लेख सापडतात.
औरंगजेब, फर्मान आणि काशी...
ही व्यवस्था जवळपास शतकभर सुरू होती. पण औरंगजेब गादीवर आल्यानंतर यामध्ये अडचणी वाढल्या आणि सैन्यासोबत साधूंचे सतत वाद होत राहिले.
अखेर 1659 मध्ये औरंगजेबाने वाराणसीच्या अधिकाऱ्यांच्या नावे फर्मान जारी केलं. त्यानुसार हिंदूंना अनावश्यक त्रास न देण्याचा फर्मान काढलं.
इतिहासकार जदुनाथ सरकार यांच्या 'अ हिस्टरी दशनमी नागा संन्यासी' या पुस्तकात वरील संदर्भ सापडतात. यासोबत त्यांनी दशनमी आणि सुलतानाच्या सैन्यासोबत झालेल्या युध्दाचे वर्णन केले आहे.
'बॅटल ऑफ ज्ञानवापी' या मथळ्याखाली काही उल्लेख आले आहेत.
संवत 1721 (इ. स. 1664) मध्ये त्यांनी सुलतानाशी युद्ध केलं आणि विजय मिळवला. ही लढाई सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत चालली. या युद्धातले साधू 'दशनामी वीर' म्हणून प्रस्थापित झाले. त्यांनी या युद्धात मिर्झा अली, तुरंग खान आणि अब्दुल अली यांचा पराभव करत विश्वनाथगडाच्या प्रतिष्ठेचं रक्षण केलं .
कालगणनेच्या आधारे हा सुलतान औरंगजेब असल्याचं इतिहासकार जदुनाथ सरकार यांचं मत आहे. 'अ शॉर्ट हिस्ट्री ऑफ औरंगजेब' या त्यांच्या पुस्तकात (पान क्रमांक 155-156) ते लिहितात, "9 एप्रिल 1669 रोजी काफिरांची सर्व मंदिरं, गुरुकुल पाडण्याचे आदेश सुलतानाने जारी केले. यात सोमनाथचं मंदिर, काशी विश्वनाथ मंदिर आणि मथुरेचं केशवराय मंदिर उध्वस्त करण्यात आलं."
शिवाजी महाराजांमुळे काशीवर राग?
वाराणसीच्या जहागीरदारांनी 1666 मध्ये छत्रपती शिवाजी महराजांना आग्र्याहून रायगडाकडे पळून जायला मदत केली होती. असं म्हटलं जातं की, शिवाजी महाराजांना मदत केल्यामुळे काशी विश्वनाथ मंदिर पाडण्यात आलं.
वाराणसीच्या राजा जयसिंगने शिवाजी महाराजांना आग्र्याहून पळून जायला मदत केली होती. त्यांच्या नातवाने म्हणजेच राजा मानसिंगने त्याच्या कारकिर्दीत या ठिकाणी एक शिवमंदिर बांधलं. इथल्या काही ब्राह्मणांनी इस्लामी शिक्षणात ढवळाढवळ केली.
मीनाक्षी जैन त्यांच्या 'फ्लाइट ऑफ डेटीज अँड रिबर्थ ऑफ टेंपल्स' या पुस्तकात उध्वस्त झालेल्या मंदिराचा काही भाग मशिदीची मागील भिंत म्हणून वापरण्यात आल्याचं सांगतात. तिच्या स्थानावरून तिला पुढे 'ज्ञानवापी मशीद' म्हणून ओळखलं जाऊ लागल्याचं त्या म्हणतात.
याच पुस्तकात पुढे लिहिलंय की, (पृष्ठ क्र. 112-113) बनारस हे त्यावेळचं राजेशाही शहर नव्हतं. छत्रपती शिवाजी महाराजांना मदत केल्यामुळे बनारसचे मुख्य मंदिर नष्ट करण्यात आल्याचं काही विद्वानांनी नमूद केलंय. पण इतर मंदिर उध्वस्त का झाली याचं कोणतंही स्पष्टीकरण मिळत नाही.
काही जैन नोंदींमध्ये असं म्हटलंय की, बनारसमध्ये शिक्षण घेण्यासाठी दूरदूरवरून विद्यार्थी यायचे. इथे विद्यार्थ्यांना चुकीचं शिक्षण दिलं जातं असं बादशहाला समजल्यावर त्याने ते थांबवून इस्लामची स्थापना करण्याचे आदेश दिले.
सध्या याबाबत न्यायालयात खटला दाखल करण्यात आला असून, वाराणसी न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे.
कच्छच्या राणीची कथित घटना
प्रसिद्ध इतिहासकार डॉ. विश्वंभरनाथ पांडे त्यांच्या "इंडियन कल्चर मुघल हेरिटेज: औरंगजेब के फर्मन" या पुस्तकात (पान क्रमांक 119-120). काही कथित घटनांचा उल्लेख करतात.
यासाठी त्यांनी काँग्रेस नेते पट्टाभी सीतारामय्या यांच्या 'फेदर्स अँड स्टोन्स' या पुस्तकाचा हवाला दिला.
डॉ. पांडे लिहितात, "एकदा औरंगजेब बनारसजवळच्या प्रदेशातून जात होता. त्यावेळी त्याचे सर्व हिंदू दरबारी गंगास्नान आणि विश्वनाथ दर्शनासाठी आपल्या कुटुंबासह काशीला आले होते."
"विश्वनाथाच्या दर्शनानंतर लोक बाहेर आले. पण इकडे कच्छच्या राजाची एक राणी बेपत्ता होती. राणीची शोधाशोध सुरू झाली तेव्हा राणी मंदिराच्या गर्भगृहाच्या खालच्या भागात विवस्त्र आणि भेदरलेल्या अवस्थेत सापडली."
पुस्तकात पुढे म्हटलंय की, "ही घटना जेव्हा औरंगजेबाच्या कानावर पडली तेव्हा तो संतप्त झाला. हे कृत्य पांड्यांचं आहे असं समजताच त्याने तात्काळ मंदिर पाडण्याचे आदेश दिले. औरंगजेबाचं म्हणणं होतं की, ज्या मंदिरात लूटमार आणि बलात्कार होत असतात ते देवाचं मंदिर नक्कीच असू शकत नाही."
विश्वंभर पांडे पुढे लिहितात की, औरंगजेबाच्या आदेशाची तातडीने अंमलबजावणी करण्यात आली. जेव्हा राणीला या गोष्टीविषयी समजलं तेव्हा तिने औरंगजेबाला निरोप पाठवला की या घटनेत मंदिराची चूक नसून हे दुष्कर्म पांड्यांनी केलं आहे.
ते पुढे लिहितात, "मंदिराची पुनर्बांधणी व्हावी अशी इच्छा राणीने व्यक्त केली. औरंगजेबाला त्याच्या धार्मिक मान्यतांमुळे नवं मंदिर बांधणे शक्य नव्हतं. म्हणून त्याने मंदिराच्या जागी मशीद बांधून राणीची इच्छा पूर्ण केली."
प्राध्यापक राजीव द्विवेदी यांच्यासह अनेक इतिहासकार या घटनेशी सहमत आहेत.
मात्र पट्टाभी सीतारामय्या त्यांच्या पुस्तकात केलेल्या उल्लेखाप्रमाणे, "ही घटना एका दुर्मिळ हस्तलिखितावर लिहिली गेली होती. हे हस्तलिखित लखनौच्या एका प्रसिद्ध मुल्लाने वाचलं आणि ही घटना आपल्या मित्राला सांगितली. पण पुढे ही कथा न लिहिताच त्याचा मित्र मरण पावला."
सध्याचं मंदिर 1735 मध्ये इंदूरच्या महाराणी अहिल्याबाई होळकर यांनी मराठा काळात बांधलं आहे. इथल्या मोकळ्या जागेत अहिल्याबाईंचा पुतळाही ठेवण्यात आला आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)