You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
जेव्हा रायगडावर मेघडंबरी बसवण्याची परवानगी नाकारण्यात आली होती...
- Author, संकेत सबनीस
- Role, बीबीसी मराठी
अभिनेते रितेश देशमुख, दिग्दर्शक रवी जाधव आणि निवृत्त अधिकारी विश्वास पाटील यांनी रायगडावरच्या मेघडंबरीत बसून फोटो काढल्यामुळे नव्या वादाला तोंड फुटलं आहे. मेघडंबरीच्या आत आणि शिवाजी महाराजांच्या पुतळ्याकडे पाठ करून बसल्यामुळे अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. मेघडंबरीचं पावित्र्य भंग पावल्याची टीका काहींनी सोशल मीडियावर केली.
पण आता चर्चेत आलेल्या मेघडंबरीचा इतिहास अनेकांना माहीत नसतो. गेल्या दशकांत मेघडंबरीत याहून गंभीर घटना घडल्याचं जाणकार सांगतात. त्याविषयी आपण जाणून घेणार आहोत, पण आधी या वादाला सुरुवात कुठून झाली ते पाहूया.
रितेश देशमुख हे शिवाजी महाराजांवर 'छत्रपती शिवाजी' नावाचा सिनेमा करत आहेत. या सिनेमाची चर्चा सुरू असतानाच ते रायगडावर गेले आणि त्यांनी मेघडंबरीतला फोटो ट्वीट केला. त्यानंतर शिवप्रेमींनी त्याला आक्षेप घेतला. मेघडंबरीत जाण्याची कुणालाही परवानगी नसताना हे वर कसे चढले, असा प्रश्न अनेकांनी विचारला.
या वादावर पडदा टाकण्यासाठी रितेशने अखेर या प्रकरणी माफी मागितली : "ती छायाचित्रं घेताना किंवा तिथे बसताना आमच्या मनात कोणालाही दुखावण्याचा हेतू नव्हता. मात्र आमच्या या कृत्यामुळे कोणीही दुखावलं गेलं असेल तर त्याची आम्ही अंतःकरणपूर्वक माफी मागतो."
रितेशने माफी मागितल्यानंतरही भाजप खासदार संभाजीराजे भोसले यांनी झाला प्रकार "निंदनीय" असल्याचं म्हटलं आणि मेघडंबरीविषयी कडक नियम करणार असल्याचं ट्वीट केलं.
मेघडंबरी हा 'दिवाण-ए-आम'
रायगड म्हणजचे मेघडंबरी असं समीकरण शिवभक्तांच्या मनात पक्कं आहे. पण ही मेघडंबरी रायगडावर आधीपासून नव्हती. ती केवळ 33 वर्षांपूर्वी अस्तित्वात आली, असं जाणकार सांगतात.
राजयगडाचे ज्येष्ठ अभ्यासक आणि पुरातत्त्वज्ञ गोपाळ चांदोरकर सांगतात, "1985मध्ये तेव्हाचे राष्ट्रपती ग्यानी झैलसिंग यांनी या मेघडंबरीचं अनावरण केलं. तेव्हा त्यात पुतळा नव्हता, तो नंतर बसवण्यात आला. त्यावेळी या मेघडंबरीवर असलेली झालर, शिक्के या गोष्टी नंतर लोकांनी काढून नेल्या. शिवाजी महाराजांचं सिंहासन त्या जागी होतं, म्हणून ती जागा मेघडंबरी बसवण्यासाठी निवडण्यात आली असावी."
मेघडंबरीच्या जागेबद्दल ते सांगतात की "मुळात सध्या ज्या जागेत ही मेघडंबरी आहे, ती 'दिवाण-ए-आम'ची जागा आहे. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा नगारखान्यातून आत प्रवेश केल्यावर डावीकडे 'दिवाण-ए-खास'मध्ये झाला होता. याबाबतचं सविस्तर वर्णन गागाभट्टांच्या पोथीत करण्यात आलं आहे. त्यामुळे सध्याच्या मेघडंबरीच्या जागेत महाराजांचा राज्याभिषेक झालेला नाही. तर त्यादिवशी केवळ लोकांना दर्शन देण्यासाठी ते बसले होते. जुन्या सिंहासनाच्या चार खांबांचे अवशेषही आजही तिथे आहेत."
रितेश, रवी जाधव आणि विश्वास पाटील यांनी मेघडंबरीत फोटो काढल्याबद्दल ते म्हणतात, "मेघडंबरीजवळ येणारे पर्यटक अनेक गोष्टी करतात. यांनी तर आज फोटो काढला. मात्र मी अनेकांना तिथे सिगरेट ओढतानाही मी पाहिलं आहे. मी म्हातारा असल्यानं प्रत्येकाला हटकू शकत नाही. पण येणारे लोक याहीपेक्षा चुकीच्या गोष्टी मेघडंबरीजवळ करतात. त्यांना अडवण्यासाठी इथे कुणीही नसतं."
'मेघडंबरीसाठी जागा नाकारली होती'
इतिहासकार पांडुरंग बलकवडे सांगतात, "राज्य सरकारने ही मेघडंबरी रायगडावर बसवली. सुरुवातीला पुरातत्त्व खात्यानं ही मेघडंबरी बसवण्यासाठीची परवानगी नाकारली होती. अखेर 10-12 वर्षं थांबल्यानंतर त्यांनी ही मेघडंबरी बसवण्याची परवानगी दिली."
मेघडंबरी बसवण्यामागचं कारण देताना बलकवडे सांगतात, "मेघडंबरीच्या जागी असलेल्या चौथऱ्यावर पूर्वी सिंहासन होतं. त्याची नोंद सगळ्यांना असावी यादृष्टीनं राज्य सरकारनं इथे मेघडंबरी बसवली. या मेघडंबरीत काही वर्षांपूर्वी छत्रपती संभाजी यांनी शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला."
पुढे ते सांगतात की "शिवाजी महाराजांबद्दल प्रत्येकाच्या मनात आदराची भावना असते. त्यामुळे कोणाच्या कधी भावना दुखावल्या जातील हे सांगता येत नाही. रितेश देशमुख आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हा फोटो काढताना त्यांच्या मनात अनादराची भावना असेलच. परंतु, प्रत्येकानंच मेघडंबरी किंवा शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ जाताना आदरानं वागलं पाहिजे. तसंच, नकळत अवमान होणार नाही याचीही काळजी घेतली पाहिजे."
तलवार चोरीला गेली होती...
2009 साली कोल्हापूरच्या छत्रपती संभाजी राजेंच्या पुढाकाराने मेघडंबरीत शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा बसवण्यात आला. हा पुतळा मेघडंबरीत असावा की असू नये यावरूनही तेव्हा वाद झाला होता. काही शिवप्रेमींसह पुरातत्त्व विभागानेही हा पुतळा बसण्याला विरोध केला होता. अखेर तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बैठकीत हा पुतळा कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.
पुढे 2016 साली या पुतळ्याच्या तलवारीचा काही भाग चोरीला गेला. त्यानंतर काही तासांतच कोल्हापूरमध्ये तलावारीचा हा भाग बनवण्यात आला आणि दुसऱ्या दिवशी पहाटे तो बसवण्यात आला. तसंच, मेघडंबरीत CCTV कॅमेरेही बसवण्यात आले.
रायगडाची जबाबदारी केंद्रीय पुरातत्त्व विभागाच्या मुंबई सर्कलकडे आहे. रायगडाकडे केंद्र सरकार दुर्लक्ष करत असल्यामुळे त्याची जबाबदारी राज्य सरकारकडे द्यावी, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी जानेवारी 2016मध्ये केली होती.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)