गौतमी पाटीलची 'लावणी' वादात, पण मग खरी लावणी कशी असते?

फोटो स्रोत, Instagram
- Author, भूषण कोरगांवकर
- Role, बीबीसी मराठीसाठी
गेल्या काही महिन्यांपासून 'गौतमी पाटील' हे नाव सोशल मीडियावर अनेक प्रकारे गाजतंय. एकीकडे तिच्या नाचावर, त्यातल्या काही विशिष्ट हालचालींवर जोरदार हल्ला होतोय. दुसरीकडे तिला मिळणार्या सुपार्या आणि तिचे ऑनलाइन फॉलोअर्स यांची संख्या वाढतच चाललीये.
गौतमीसारख्या मुलींमुळे लावणी बदनाम होते, असा बर्याच जणांचा आरोप आहे. परंतु गौतमीने "मी लावणी करतच नाही," असं प्रामाणिक आणि स्मार्ट उत्तर दिलं आहे.
थोडी लावणी, थोडा मुजरा, थोडा आयटम नंबर, थोडं वेस्टर्न असं सगळं थोडंथोडं घेऊन तिने आणि तिच्यासारख्या काही मुलींनी स्वतःची एक स्टाइल बनवलीये. त्यांची बॉडी लँग्वेज, पोशाख यातून हे सहज दिसून येतं.
गौतमीच्या ज्या गाण्यावरच्या नाचामुळे हा वाद सुरू झाला ते गाणं हे काही लावणी नव्हे. तिची साडी नऊवार असल्यामुळे आणि गाणं मराठी असल्यामुळे ही लावणीच असा सगळ्यांचा गैरसमज झाला. समाज माध्यमांनी तिला 'लावणी सुपरस्टार' अशी उपाधी दिल्यामुळे हे आणखीन वाढलं.
पण जर गौतमी करते ती लावणी नाहीये, तर लावणी कशी असते? वर्षानुवर्षे मराठी तमाशापटांमधून समोर आली ती लावणी आहे की वेगवेगळ्या कार्यक्रमांमधून सादर केली जाते ती लावणी आहे? लावणीचा असा काही परंपरागत ढाचा-साचा आहे का? हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे.
त्याचबरोबर 'तिला घरी बसवा' ते 'तिला अजून नाचवा' या दोन टोकाच्या मतांना सामोरी जाणारी गौतमी काही पहिलीच कलाकार नाहीये. गौतमी सारख्या गरीब परिस्थितीतून वर आलेल्या मुलीवर असे आरोप करणं, तिला धमक्या देणं सोपं आहे.
त्यामुळे लावणी समजून घेतानाच एखाद्या कलाकारावर किंवा कुठल्याही कलेवर बंदी आणणं योग्य आहे का की त्यांच्याबद्दल आपलं बरं-वाईट मत स्पष्टपणे व्यक्त करून कलाकारांना आणि प्रेक्षकांना आरसा दाखवणं योग्य याचाही उहापोह व्हायला हवा.
लावणीच्या इतिहासात डोकावून पाहताना
प्रेक्षकांच्या नजरेत नजर घालून गाऊन, नाचून, अदा करून खेळली जाते ती लावणी.
असं नाचगाणं करणार्या कोल्हाटणींचा उल्लेख 13 व्या शतकातल्या संत साहित्यात सापडतो. पुढे मुघल सैनिकांसमोर केल्या जाणार्या तमाशाच्या आणि पेशवाईत बहरलेल्या लावणीच्या तर अनेक कित्येक नोंदी आहेत.
लावणीचे अनेक प्रकार आहेत. सर्व रसांतल्या, सर्व भावांतल्या लावण्या आहेत. तथापि शृंगार हा यातला सर्वांत वरचढ रस.

फोटो स्रोत, Getty Images
साधारण 1950 पर्यंत 'लावणी' हा कलाप्रकार काही ठराविक समाजातल्या बायकाच करत असत. डोंबारी, भातु कोल्हाटी, कळवात हे भटके, स्त्री-प्रधान समाज किंवा महार, मांगांसारखे त्या काळी अस्पृश्य मानले गेलेले समाज.
चित्रपटाच्या निमित्ताने तथाकथित उच्च मानल्या गेलेल्या जातींमधल्या बायकांचा लावणीमध्ये प्रवेश झाला. तुरळक प्रमाणात का होईना पण हिंदी चित्रपटांमधूनही लावणीचं दर्शन होऊ लागलं.
गाढवाचं लग्न, घाशीराम कोतवालसारख्या नाटकांतूनही अधूनमधून लावणी दिसत होती. तरीही लावणी हा काही उठसूट कुणीही करायचा प्रकार नव्हता. तसा तो बनायला एकविसावं शतक उजाडावं लागलं.
1990 नंतरची लावणी
1993 साली अकलूज शहरात जयसिंह मोहिते पाटील यांनी राज्यस्तरीय लावणी स्पर्धा आयोजित करायला सुरुवात केली. सगळीकडच्या कला केंद्रांमध्ये त्यामुळे एक चैतन्याचं वातावरण निर्माण झालं. फिल्मी लावण्या चालणार नाहीत, पारंपारिक वाद्यंचं वापरली पाहिजेत, लावणीचा सगळा पारंपारिक साज शृंगार केला पाहिजे अशा स्पर्धेच्या अटींमुळे जुन्या लावण्यांना एक नवी झळाळी मिळाली. मुली मेहनत घेऊन शिकू लागल्या.
'सुंदरा मनामध्ये भरली' हा कार्यक्रम घेऊन डॉ. मीना नेरूरकर अमेरिकेतून आल्या. यात अमेरिकेत राहणार्या मुली लावणी करत असल्यामुळे मध्यमवर्गीय, तथाकथित उच्चवर्णीय मराठी प्रेक्षकांनी तो उचलून धरला. कार्यक्रम छान बसवला असल्यामुळे त्याचं यश टिकून राहिलं.
डॉ. अशोक रानडे यांचा 'बैठकीची लावणी' हा संशोधनपर, शास्त्रोक्त कार्यक्रमही अभिजनांमध्ये आधीपासून लोकप्रिय होता. 1995-96च्या सुमारास महाराष्ट्र राज्य सरकारने मुंबईत एक मोठा लावणी महोत्सव भरवला. ज्यात या क्षेत्रातल्या अनेक नामवंत कलाकारांना आमंत्रण होतं. या महोत्सवातून लावणीची एक मोठी सुपरस्टार उदयाला आली ती म्हणजे सुरेखा पुणेकर.
नाचता नाचता बाई गाते, अदाकारी करते, गाणं थांबवून मध्येच बोलते, चेष्टा मस्करी करते या (कला केंद्रांमधून आणि फडावरुन सर्रास चालणार्या) गोष्टी मुंबईकरांसाठी नवीन होत्या. घरंदाज लावणीचा जाळ त्यांनी अनुभवला.
सुरेखाबाईंमधलं टॅलेंट हेरून माया जाधव यांनी त्यांच्यासोबत 'सोळा हजारात देखणी' हा कार्यक्रम सुरू केला. तो अफाट गाजला.
अशा धाटणीचे कार्यक्रम आधीही होत होते. पण 'सोळा हजारात'च्या अभूतपूर्व यशामुळे लावणीचे अनेक बॅनर्स निघाले. पारंपरिक आणि आधुनिक लावण्यांना अडीज तीन तासांच्या सुटसुटीत कार्यक्रमात बसवणारे हे सगळे कार्यक्रम.

फोटो स्रोत, Getty Images
नखशिखांत बाई बनून लावणी करणार्या पुरुष कलाकारांचा 'बिन बायकांचा तमाशा' हा अनिल वासुदेवन निर्मित कार्यक्रमही लोकप्रिय झाला.
लावणीच्या कार्यक्रमांचे खास महिला प्रेक्षकांसाठी प्रयोग होऊ लागले. पुण्याचं बालगंधर्व, मुंबईचं शिवाजी मंदिर, दामोदर हॉल अशा अनेक ठिकाणी मराठी नाटकाला बुकिंग नाही, पण लावणीचे कार्यक्रम हाऊसफुल्ल अशी परिस्थिती काही काळ होती.
पुढे 2010 साली 'नटरंग' सिनेमा आला. अजय-अतुलच्या बहारदार संगीताने जादू केली आणि लावणी देशभरात पोहोचली.
रिअॅलिटी शोजचं पेव फुटलेलंचं होतं. त्यात लावणीने प्रवेश केला. कोरियोग्राफर्सनी लावणीतल्या ढोबळ स्टेप्स पाहून घेतल्या आणि त्याला नव्या जमान्याचा सुपरफास्ट कवायती 'टच' दिला.
मराठी चॅनल्सवर 'सबकुछ लावणी' अशा प्रकारचे शो निघाले. हिंदी आणि दाक्षिणात्य चॅनल्सवरही काही काही स्पर्धक लावणी करू लागले.
टिकटॉक, फेसबूक, यूट्यूब आणि इंस्टाग्राममुळे तर आता लावणी घराघरात पोचलीये. तरुण मुली, मुलं, वयस्क माणसं, लहान मुलं-मुली,सर्व जाती-धर्माचे लोक आता लावणी करू आणि पाहू लागलेत.
त्यांच्या सादरीकरणात एक प्रकारचा जोश आहे. कसरत, कवायती, उड्या, केस झटकणं आहे. लावणीतलं वैविध्य मागे पडून आता ती एकसाची दिसू लागलीये.
एकेकाळचा अंगांग भिजवून टाकणारा धीट शृंगार आता अर्ध्या मिनिटात संपणार्या चकचकीत रीलसारखी गोष्ट बनलाय. हे जरी असलं तरी एकप्रकारे लावणी आता खर्या अर्थाने 'लोककला' झालीये.
गौतमी पाटील ही याचंच पुढचं पाऊल आहे.
स्त्री-प्रधान कला
पारंपारिकरित्या लावणी कलेचा उपभोक्ता हा प्रामुख्याने पुरुष राहिला आहे. लावणी लिहिणारेही पुरुष आणि ज्यांच्या रंजनासाठी त्या लिहिल्या गेल्या तेही पुरुष.
तरीही त्यात स्त्रियांच्या इच्छा, अपेक्षा उघडपणे मांडल्या आहेत. अशा कित्येक प्रसिद्धीच्या प्रकाशझोतात न आलेल्या अंधारातल्या लावण्या आहेत की ज्यातला शृंगार हा थेट सेक्सच्या विषयाला हात घालणारा आहे.

फोटो स्रोत, Getty Images
या लावण्या लिहिल्या गेल्या त्या निव्वळ पुरुषरंजनासाठीच. त्यात स्त्रियांना एक व्यासपीठ देण्याचा किंवा त्यांच्या दबलेल्या भावनांच्या अभिव्यक्तीचा काहीच हेतू नव्हता.
परंतु पुरुषांनी लिहिलेले हे शब्द जेव्हा एक स्त्री गाते तेव्हा ती त्यात स्वतःची अशी काही भर घालते की ते तिचेच होऊन जातात. एखाद्या कसलेल्या कलाकाराची लावणी ज्यांनी अनुभवली आहे त्यांना हे समजू शकेल.
लावणी खेळली जात असते तेव्हा त्या क्षणांपुरती तरी ती कलावंतीण त्या मंचाची अनभिषिक्त सम्राज्ञी असते. ती स्वतः नाचत असली तरी एका अर्थी स्वतःच्या तालावर ती सगळ्यांना नाचवत असते.
सगळे तिच्या वलयामुळे भारावून गेलेले असतात, तिच्या कटाक्षासाठी आतुर झालेले असतात, तिच्या नजरेच्या बाणांनी घायाळ झालेले असतात. ही ताकद या कलेत आहे.
सामाजिक प्रतिष्ठा आणि लावणी
संत साहित्यातले कोल्हाटणींच्या नाचगाण्याचे त्रोटक उल्लेख पाहता त्या काळात लावणीकडे कुणी 'चार घटकांच्या करमणुकी'हून अधिक गांभीर्याने पाहत होतं असं वाटत नाही.
पेशवाईत म्हणजे लावणी कलाकारांच्या ऐन भरभराटीच्या काळातही त्यांचं सामाजिक स्थान उंचावलं होतं असं म्हणता येत नाही. 'जाती'वरुन पत ठरवायच्या आपल्या पद्धतीला हे अनुसरूनच होतं.

फोटो स्रोत, Getty Images
इतक्या वर्षांनंतर आज लावणीला थोडीफार प्रतिष्ठा मिळाली आहे. परंतु पूर्ण वेळ लावणी (आणि डीजे, ऑर्केस्ट्रा, वगैरे तत्सम ठिकाणी) नाचणार्या स्त्रियांच्या बाबतीत तसं म्हणता येत नाही.
आजही त्यांना सिने-नाट्य-टीव्ही-अभिनेत्री किंवा इतर शास्त्रीय नृत्य व्यावसायिकांएवढी प्रतिष्ठा नाही. याचं मुख्य कारण त्यांचा इतिहास आणि लावणीतला उघड शृंगार.
हे फार दुर्दैवी आहे. कारण शृंगार हा या कलेचा अविभाज्य भाग आहे. हा एक खेळ आहे. त्यात फ्लर्टिंग आहे, आव्हान आहे, मस्ती आहे, धमाल आहे.
हा सगळा भाग भारतातल्या इतर कलाप्रकारांमध्येही होता. परंतु या कलांचं शुद्धीकरण झालं. त्यातला उघड शृंगार, मोकळेपणा जाऊन त्याला एक चौकट दिली गेली, कडक नियम बनवले गेले.
आज भरतनाट्यम, कथक, ओडिसी, कुचिपुडी या सर्व कलांना शास्त्रीय नृत्य म्हणून मान आहे, प्रतिष्ठा आहे. लावणीच्या बाबतीत हे घडलं नाही.
कुणी तिच्या शुद्धीकरणाचे, नियमावलीचे, तिला शास्त्रीय दर्जा देण्याचे प्रयत्न केले नाहीत. याचा एक फायदा असा की त्यामुळे लावणीतला मूळ शृंगार, मोकळेपणा, रांगडेपणा अबाधित राहिला.
परंतु याच कारणामुळे लावणीला कुठलाही कलात्मक दर्जा आणि त्या अनुषंगाने येणारी प्रतिष्ठा लाभलेली नाही.
उत्तेजक नाचावरची ब्रिटिशकालीन बंदी
आधी म्हटल्याप्रकारे भारतातल्या सर्व कलांमध्ये कमी अधिक प्रमाणात एक प्रकारचा मोकळेपणा होता, शृंगार होता.
बाई नाचते, गाते आणि पुरुष पागल होतात ही भारतभूमीत सहज मानली जाणारी गोष्ट त्या काळच्या कर्मठ ब्रिटिश सरकारला अनेक वर्षांपासून सलत होती.

फोटो स्रोत, Getty Images
आपले अधिकारीही या बायांपाठी वेडे झाले तर त्यांची कार्यक्षमता कमी होईल. शिवाय अशा गोष्टींत रमणं हे आपल्या ख्रिश्चन धर्माविरूद्ध आहे. अशा अनेक कारणांमुळे सरकारने 1890 साली नाचगाण्यावर बंदी आणली.
दक्षिण भारतातली देवदासी प्रथाही कायदा करून बंद केली गेली. यात भारतीय समाज सुधारकांचाही त्यांना पाठिंबा होता. किंबहुना नाचावरची बंदी ही देवदासीच्या जाचक प्रथेला पुढे करून शिताफीने घेण्यात आली. लावणी-तमाशा मात्र यातून सुटला.
काही अभ्यासकांच्या मते त्यांनी आपल्या सदरीकरणात तातडीने बदल केले, नाचाचं प्रमाण कमी केलं, गाण्यावर-बतावणी-वगनाट्यावर भर दिला, म्हणून हे झालं.
तर काहींच्या मते या क्षेत्रात 'देवदासी' किंवा देवाच्या नावे मुली सोडणे हा प्रकार नसल्यामुळे ब्रिटिशांचं त्यांच्याकडे लक्ष गेलं नाही. कदाचित अशा सर्वच कारणांमुळे हे घडलं असावं.
आपल्या सरकारने आणलेली तमाशावरची बंदी
तेव्हा निसटता आलं तरी स्वतंत्र भारतात मात्र बंदीची वेळ आली.
तमाशामधून लोकांचं रंजन व्हायचं तसंच प्रबोधनही. व्यसनाधीनता, अंधश्रद्धा, हुंड्याचे तोटे, शिक्षणाचं महत्त्व, इंग्रजांची अन्याय्य वागणूक अशा कित्येक विषयांवर वग लिहिले जात असत.
स्वातंत्र्य मिळाल्यावरही तमाशातला हा चिमटे काढून अंजन घालण्याचा बाज चालूच होता. त्याला खीळ पडली ती मोरारजी देसाईंच्या काळात - 1954 मध्ये.
महाराष्ट्र राज्य निर्मितीच्या अगोदरचा हा काळ. त्या काळात राष्ट्र सेवा दल, तसेच इतर संस्थाची 'कला पथकं' किंवा 'मेळे' जोरात सुरु होते. त्यांच्या कार्यक्रमांतून अन्यायाला वाचा फोडणं, सरकारच्या चुका दाखवून देणं हे प्रकार चालत.
तमाशाच्या वाट्याला न जाणाऱ्या पांढरपेशा लोकांमध्येही ती फार लोकप्रिय होती. सरकारला ती डोईजड ठरत चालली होती.
तमाशातला रांगडेपणा, बिनधास्तपणा, कमरेखालचे विनोद, ग्राम्य भाषा आणि या सगळ्यांतून सरकारला प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष मिळणाऱ्या कोपरखळ्या - हे सारंही सरकारच्या पचनी पडत नव्हतं. हे दोन्ही बंद करण्यासाठी काही तरी निमित्त सरकारला हवं होतं.

फोटो स्रोत, Getty Images
ज्या घरांमधून मुलींनी नाचगाणं करायची परंपरा नाही, अशा घरातल्या मुली, प्रामुख्याने कला पथकांमधून काम करत होत्या. (त्यांना 'चांगल्या' घरांतल्या असं म्हटलं जात असे, अजूनही जातं). या मुलींना, त्यांच्या या नवीन कामामुळे, मवाली मुलांकडून त्रास होण्याच्या काही तक्रारी पोलिसांकडे केल्या गेल्या.
हे निमित्त पुढे करून सरकारने कला पथकं आणि तमाशा दोन्हींवर बंदी घातली. तमाशा अश्लील ठरवला गेला आणि कला पथकं असुरक्षित. या बंदीमुळे खरं आर्थिक नुकसान झालं ते तमाशाचं आणि त्यातल्या गरीब कलाकारांचं.
तमाशावर कित्येकांची पोटं अवलंबून होती. रोजीरोटीच बंद झाल्यावर सगळे कलाकार एकत्र आले. पुण्याच्या आर्यभूषण तमाशा थिएटरचे मालक अहमदशेठ तांबे यांनी पुढाकार घेऊन एक समिती स्थापन केली.
त्यांनी सरकारकडे तमाशा ही कशी इथल्या मातीतली लोककला आहे आणि त्यावर किती लोकांची पोटं अवलंबून आहेत यासंबंधी एक निवेदन सादर केलं.
बरीच चर्चा, वादविवाद झाले. सरकारतर्फेही एक समिती स्थापन केली गेली आणि शेवटी तमाशावरची बंदी उठली.
आता अनेक जण गौतमी पाटीलच्या कार्यक्रमांवरही बंदी घालण्याची मागणी करत आहेत. पण जेव्हा एखाद्या गोष्टीवर बंदी घातली जाते तेव्हा दोन गोष्टी संभवतात- एक म्हणजे ज्यावर बंदी येऊ घातलीये ती गोष्ट काही काळ प्रचंड लोकप्रिय होते आणि ती कुठल्याही मार्गाने पाहायची झुंबड उडते.
आणि दुसरं म्हणजे बंदी हे फार खतरनाक हत्यार आहे. दिसताना एखाद्या छोट्याशा छिन्नीसारखं दिसलं तरी प्रत्यक्षात ते एखाद्या मोठ्या बुलडोझरसारखं असतं. ज्याच्यावर बंदी घातली तीच गोष्ट नाही तर तिच्या आसपासच्या सर्व गोष्टींचा, किंबहुना जे समोर येईल त्याचा ते खतमा करत सुटतं.

फोटो स्रोत, Instagram
त्यामुळे गौतमीच्या आविर्भावांबद्दल काही आक्षेप असतील, तर त्यावर टीका करणं योग्य आहे. मात्र, त्याबरोबर हा विचारही करायला हवा की, एका मुलीच्या एका हालचालीने संपून जाण्याइतकी लावणी ही कला लेचीपेची नाही.
संगीतज्ञ डॉ. अशोक रानडे यांच्या मते लावणी कधीच एका साच्यात अडकून बसत नाही. काळानुरूप ती स्वतःत हळूहळू बदल करत असते, आणि म्हणूनच ती इतकी शतकं टिकून राहिली आहे आणि यापुढेही राहील.
'श्लील-अश्लील' यांची सीमारेषा फारच धूसर असते. ज्यांना फक्त शास्त्रीय नृत्य पाहायची सवय आहे, त्यांना लावणी अश्लील वाटू शकते. ज्यांना खानदानी लावणी पहायची सवय आहे त्यांना सिनेमामधले कमी कपड्यातले आयटम नंबर्स अश्लील वाटू शकतात. आणि हे सगळं आवडीने पाहणार्या व्यक्तीला परदेशी स्ट्रिप क्लब मधले डान्स.
त्यामुळे एखाद्या कलाकाराला 'तू आता घरी बस' हे म्हणायचा अधिकार खरं तर फक्त आणि फक्त पब्लिकलाच आहे.
हल्लीच एका कार्यक्रमात प्रसिद्ध कवी गुलजार म्हणाले, "मी काय किंवा जावेद अख्तर काय, आमचं काम आहे लिहिणं. आम्ही 'मोरा गोरा अंग लाई ले' पण लिहू शकतो आणि 'दिल मे मेरे है दर्द-ए-डिस्को' सुद्धा. तुम्ही जे मागाल ते आम्ही लिहिणार. तुम्हाला काय आवडतं?"
एकाप्रकारे स्वतःच्या कामाच्या गुणवत्तेची जबाबदारी त्यांनी प्रेक्षकांवरच टाकली आहे. आणि हे कटू वाटलं तरी एक व्यावसायिक सत्य आहे. सिनेमा, टीव्ही, लावणी, तमाशा, ऑर्केस्ट्रा शो, सोशल मीडिया ही सगळी लोकाभिमुख माध्यमं आहेत.
लोकांच्या पैशावर आणि पसंतीवर ती अवलंबून आहेत. लोकांना जे आवडतं ते टिकतं आणि जितकं आवडतं तितकंच टिकतं.
(लेखक, लावणी अभ्यासक, अनुवादक, गीतकार आणि निर्माता म्हणून कार्यरत आहेत. 'संगीत बारी' हे त्यांचे लावणी व लावणी कलाकारांच्या आयुष्यावरील पुस्तक राजहंस प्रकाशनातर्फे प्रकाशित झाले आहे. लेखक गेल्या २० वर्षांपासून लावणी आणि संगीत बारी या विषयावर काम करत आहेत. लावणीची वर्कशॉप्स, लावणी आणि संगीतबारीवर व्याख्यानं, लावणी के रंग, लव्ह अँड लावणी इत्यादी इतरही उपक्रम सुरू असतात.)

हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)









