गौतमी पाटीलची लावणी वादात का? कोण आहे गौतमी?

फोटो स्रोत, Instagram
लावणी कलाकार गौतमी पाटील म्हणजे सोशल मीडियावरील एक लोकप्रिय चेहरा. तिचे अनेक व्हीडिओ इन्स्टाग्राम रिल्स तसंच इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत असतात.
एकीकडे तिच्या घायाळ करणाऱ्या अदाकारीची चर्चा होत असते. तर तिच्या कार्यक्रमांवर बंदी घालण्याचीही काही लोकांनी मागणी केली होती.
दरम्यान, गौतमी पाटीलचा इंदापूरमधला एक कार्यक्रम रद्द झाल्याचीही बातमी आहे.
काही दिवसांपूर्वी गौतमी पाटील एका वेगळ्याच प्रकरणात चर्चेत आली आहे. ते म्हणजे एका व्यक्तीचं मृत्यू प्रकरण होय.
आता तुम्ही म्हणाल एका व्यक्तीच्या मृत्यू प्रकरणाशी एका लावणी कलाकाराचा कसा काय संबंध असेल. पण हे खरंय.
झालं असं की सांगलीत गौतमी पाटीलचा एक लावणी शो आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात गर्दी वाढून चेंगराचेंगरी झाली. खरं तर कार्यक्रमात प्रेक्षकांनी वेडे होऊन गर्दी करणे हे कोणत्याही कलाकारासाठी चांगलंच असतं. पण या गर्दीमुळे एका व्यक्तीचा जीव गेल्याने हे प्रकरण चिघळू लागलं होतं.
या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर गौतमी पाटीलने याबाबत दुःख व्यक्त केलं. पण भर कार्यक्रमात एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याने हे प्रकरण सध्या चांगलंच चर्चेत आलं.
नेमकं प्रकरण काय?
महाराष्ट्र टाईम्सच्या बातमीनुसार, सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातल्या बेडग या ठिकाणी 30 ऑक्टोबर रोजी गजराज मंडळाकडून गावातल्या नामवंत व्यक्तींच्या सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता.

फोटो स्रोत, Instagram
या निमित्ताने गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. हा कार्यक्रम बेडग येथील जिल्हा परिषद शाळेच्या पटांगणात आयोजित करण्यात आलं होतं.
पण गौतमी पाटीलला पाहण्यासाठी या कार्यक्रमात प्रचंड गर्दी जमली. उत्साहाच्या भरात अनेक प्रेक्षकांनी थेट शाळेच्या छतावर जाऊन लावणीच्या तालावर ठेका धरला.
दरम्यान, याच वेळी परिसरात एका व्यक्तीचा संशयास्पद मृत्यू झाल्याचा प्रकार आढळून आला. गर्दीत चेंगराचेंगरी होऊन त्याचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत होती.
पण मिरज ग्रामीण पोलिसांनी केलेल्या तपासात संबंधित व्यक्तीचा दारूच्या नशेत तोल जाऊन पडल्याने मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांनी याबाबतचं स्पष्टीकरण दिलं आहे.
शिवाय, गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमात लोकांनी शाळेच्या छतावर चढून नाचल्यामुळे कौलांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. हा प्रकार लक्षात आल्यानंतर वाद संताप व्यक्त केला जात होता. पण आयोजक गजराज मंडळाने शाळेच्या डागडुजीचं काम स्वखर्चाने सुरू केल्यानंतर हा वाद मिटला आहे.
बिकट परिस्थितीतून व्हायरल होण्यापर्यंतचा प्रवास
सांगली वाद तसंच एका गाण्याचं लॉँचिंग या पार्श्वभूमीवर गौतमी पाटीलने पुण्यात एक पत्रकार परिषद घेतली होती. या पत्रकार परिषदेत आपली भूमिका मांडतानाच आपला आजवरचा प्रवास कसा झाला याची माहितीही तिने दिली.
धुळ्याच्या शिंदखेडा गावात गौतमी पाटील हिचा जन्म झाला. गौतमीचा जन्म झाल्यानंतर काही दिवसांनी तिच्या वडिलांनी आईला सोडून दिलं. त्यामुळे ती आपल्या आजोळीच शिंदखेडा येथे लहानाची मोठी झाली.
गौतमी आठवीला असताना उदरनिर्वाहासाठी तिचं कुटुंब पुण्यात आलं. दरम्यान आई छोटी-मोठी कामं करून घर चालवायची.

फोटो स्रोत, Instagram
या काळात गौतमीच्या आईचा PMT बसमधून पडून अपघात झाला. डोक्याला टाके पडल्यामुळे त्यांना आता कामावर जाणं शक्य नव्हतं. त्यामुळे गौतमीने घराचा भार खांद्यावर घेतला. घरच्या परिस्थितीने काम करणं भाग होतं.
गौतमी सुरुवातीपासून पुण्यातील विश्व कला नृत्य अकादमी येथे नृत्याचं प्रशिक्षण घेत होती. त्यामुळे नृत्य क्षेत्रातच काम करून गुजराण करण्यासाठी तिने प्रयत्न सुरू केले.
लावणीच्या क्षेत्रात पूर्वी आपल्या संपर्कातील कुणीच नव्हतं. सुरुवातीच्या काळात बॅक डान्सर म्हणून काम केलं. नंतर पुढे आघाडीची लावणी कलाकार म्हणून काम करण्याची संधी मिळत गेली.
सुरुवातीला महेंद्र बनसोडे यांनी गौतमीला अकलूज लावणी महोत्सवात पहिल्यांदा बॅक डान्सर म्हणून नृत्याची संधी दिली. पुढे संपर्क वाढत जाऊन नृत्याच्या विविध सुपाऱ्या मिळत गेल्या.
यानंतर सोशल मीडियावरही तिचे व्हीडिओ व्हायरल होऊ लागले. सध्याच्या घडीला गौतमी पाटीलचे इन्स्टाग्रामवर 3 लाख 40 हजारांवर फॉलोअर्स आहेत.
पुण्यात गौतमीचे शो नेहमी होत असतात. विशेषतः सांगली, कोल्हापूर भागात तिचा मोठा चाहता वर्ग तयार झाला आहे. आपल्या शोसोठी आगामी महिनाभराचं बुकींग पूर्ण झाल्याचं तिने पत्रकार परिषदेत सांगितलं.
लावणीला गालबोट लावण्याचा आरोप
एका सांस्कृतिक कार्यक्रमात अंगावर पाणी ओतून, हावभाव करून नाचताना गौतमीचा एक व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

फोटो स्रोत, Instagram
लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर ते बिग बॉस फेम लावणी कलाकार मेघा घाडगे यांनी गौतमीची चांगलीच कानउघाडणी केली होती. गौतमी पाटीलने त्यावेळी आपली चूक मान्य करून माफीही मागितली होती.
पत्रकार परिषदेत याविषयी बोलताना गौतमी म्हणाली, "माझ्याकडून चूक झाली होती. ती त्यावेळी मी मान्य केली होती. मी डान्स करत असताना त्या ओघात तसं कृत्य केलं होतं. पण माझ्यामुळे सगळ्यांचं मन दुखावल्याचं माझ्या लक्षात आलं. त्यामुळे मी तत्काळ माझी चूक मान्य करून सर्वांची माफी मागितली होती.
त्यानंतर मी एकही अश्लील नृत्य केलं नाही. त्यानंतरचे माझे सगळे डान्स चांगले आहेत, असं स्पष्टीकरण गौतमी पाटीलने दिलं.
सांगलीतील घटनेचं वाईट वाटलं
सांगलीच्या घटनेबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना याबाबत गौतमीने दुःख व्यक्त केलं होतं.
ती म्हणाली, "सांगलीची घटना घडल्यानंतर त्याबाबतची बातमी मी नंतर पाहिली. असं घडायला नको होतं. त्याचं मला खूप वाईट वाटलं. ते वयस्कर व्यक्ती होते. त्यांच्याबाबत असं होऊ शकेल, हे मला माहीत नव्हतं.
सांगलीच्या शोला खूप गर्दी होती. माझा शो नेहमी कसा चालतो त्यापद्धतीने तो सुरू होता. तिथे झाडही तोडण्यात आल्याचं नंतर लक्षात आलं. आम्हालाही त्याचा त्रास झाला. आम्हाला पब्लिकने काठी फेकून मारली.
सुरुवातीच्या काळात मी घुंगरू घालत नव्हते. साडीही योग्य पद्धतीने घालत नव्हते. पण सुरेखाताईंनी मला समजावून सांगितल्यानंतर मी सगळं व्यवस्थित करत आहे, असं स्पष्टीकरण गौतमी पाटीलने दिलं आहे.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








