उद्धव ठाकरे: उत्तर भारतीय मेळाव्यात ठाकरेंनी केलेल्या भाषणातील 7 मुद्दे

प्रत्येक भारतीयांच्या मनात आता एक प्रश्न आहे आणि त्याचं उत्तर त्यांना हवंय, की तुमचं हिंदुत्व नेमकं काय आहे? एकमेकांचा द्वेष करणे हेच हिंदुत्व आहे का असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं.

मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना प्रमुख (ठाकरे गट) उद्धव ठाकरे यांनी आज उत्तर भारतीय मेळाव्याला संबोधित केले.

"जर तुम्ही स्वतःला खरे हिंदू समजत असाल तर तुम्ही माझे आव्हान स्वीकारून दाखवा," असं उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना निवडणुका घेण्याचे आव्हान केले आहे.

"कोणतीही निवडणूक घ्या, महानगर पालिकेची निवडणूक असो, विधानसभा, लोकसभा काही पण असो. आम्ही तुम्हाला आव्हान देतो," असं ठाकरे म्हणाले.

भगतसिंह कोश्यारी यांच्याबाबत उद्धव ठाकरे म्हणाले, "आज भगतसिंह कोश्यारी आज परत जात आहेत. आलेलं पार्सल पुन्हा कुरिअरने जात आहे."

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपण सर्वांना भेटत आहोत हे नाकारण्याचे कारण नाही असे ते म्हणाले. 'मी ताकाला जाऊन भांडे लपवत नाही,' असे ठाकरे म्हणाले.

उद्धव ठाकरेंच्या भाषणातील7 मुद्दे

1. आपण एकमेकांना हिंदू मानतो तर, उत्तर भारतीय-मराठी असं वेगळं नको. मी तर म्हणेन की भारतीयांना आता उत्तर हवं हिंदुत्ववाद म्हणजे काय.

2. मी मुख्यमंत्री होतो त्यावेळी कोरोना काळात आम्ही मराठी, उत्तर भारतीय असा भेदाभेद केला नाही. रक्तदानात आपलं रक्त कोणाच्या शरीरात जात आहे हे पाहतो का आपण, ही माणुसकी आहे.

इतर वेळेला आमच्या शाखेत उत्तर भारतीय, मुस्लीम, मराठी सगळे येतात, पण निवडणुकीच्या वेळी काही लोक येऊन त्यांना फोडतात. हे फोडाफोडीचं राजकारण आहे.

3. ज्या दिशेने भाजपचे हिंदुत्व चालले आहे, त्यामुळे आपल्या देशाची बदनामी होत आहे. पुढच्या काळात आपल्याला शरमेने मान खाली घालावी लागेल. एकेकाळी आपण गर्व से कहो हम हिंदू है ही घोषणा दिली होती पण असं हिंदुत्व पाहून शरमेने मान खाली घालावी लागेल.

4. राष्ट्रीयत्व हेच हिंदुत्व आहे. हृदयात राम आणि हाताला काम हेच आमचं हिंदुत्व आहे.

5. आमची राजकीय मैत्री आम्ही निभावली. हिंदुत्वामुळे आम्ही एकत्र होतो. पण काय झालं. आता ते वर पोहचले तर आमची गरज त्यांना नाही. वाईट दिवस होते त्यावेळी माझ्या वडिलांनी तेव्हाच्या मुख्यमंत्र्यांना वाचवलं होतं. आता तेच पंतप्रधान झाले आणि आम्हाला विसरले.

6. आपण आता एकत्र आलो नाहीत तर आपण स्वकीयांकडूनच गुलाम होऊत. त्यामुळे आपण एकत्र यावंच लागेल.

7. हिम्मत असेल तर आताच निवडणुका घेऊन दाखवा. हिम्मत नाहीये पण स्वतःला हिंदूंचे नेते मानतात. हिंदू तोच असतो जो आव्हान देतो आणि आव्हान स्वीकारतो.

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मेळावे

आगामी महानगरपालिका निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे आता मैदानात उतरले आहेत. यापूर्वी जैन आणि गुजराती समाजाच्या कार्यक्रमांमध्ये उद्धव ठाकरे यांनी हजेरी लावली होती.

मुंबईत गोरेगाव येथे नाहर निकेतन याठिकाणी उद्धव ठाकरे यांनी उत्तर भारतीयांच्या एका मेळाव्याला हजेरी लावली. यावेळी खासदार संजय राऊत, प्रियंका चतुर्वेदी, माजी मंत्री सुभाष देसाई उपस्थित होते.

मुंबईत पश्चिम उपनगरात उत्तर भारतीय मतदारांची संख्या मोठी आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील मुंबईमध्ये कार्यक्रमांना हजेरी लावली आहे. पंतप्रधान मोदींनी मेट्रोचे उद्घाटन केले तसेच ते 10 फेब्रुवारी रोजी बोहरा समुदायाच्या कार्यक्रमाला देखील हजर होते.

मुंबई महानगर पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि शिवसेना (ठाकरे गट) यांच्यात मतदारांना आकर्षित करण्यासाठी रस्सीखेच दिसणार आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)