अल्लाउद्दीन खिलजीच्या 2 हिंदू राण्या ज्यांच्याबद्दल फारशी माहिती नाही

    • Author, दिलनवाज पाशा
    • Role, बीबीसी हिंदी प्रतिनिधी

अल्लाउद्दीन खिलजीच्या क्रूरतेच्या कथा खूप प्रसिद्ध आहेत. यातलीच एक कथा चित्तौडचा राजा रावल रतन सिंह आणि राणी पद्मावती यांच्याशी संबंधित आहे.

आता अल्लाउद्दीन खिलजीचा उल्लेख आला की त्याच्या लग्नांचा आणि प्रेमप्रकरणांचा देखील उल्लेख येतो. मात्र आतापर्यंत त्याच्या दोन हिंदू पत्नींचा उल्लेख कुठेच करण्यात आलेला नाही. आता हिंदू हा शब्द प्रचलित असला तरी त्याकाळी हा शब्द आजच्यासारखा प्रचलित नव्हता.

1296 मध्ये दिल्लीची सत्ता हाती घेतलेल्या खिलजीच्या आयुष्याशी संबंधित नोंदी पाहिल्यास समजतं की, त्याला चार पत्नी होत्या. यातली एक पत्नी एका राजपूत राजाची पत्नी होती आणि दुसरी यादव राजाची मुलगी होती.

1316 पर्यंत दिल्लीच्या सुलतानपदी राहिलेल्या अलाउद्दीन खिलजीने त्याच्या कारकीर्दीत अनेक छोट्या राजपूत संस्थानांवर हल्ले केले. आणि त्यांना एकतर आपल्या राज्यात सामील केलं नाहीतर त्याच्या अधिनस्त बनवलं.

गुजरातच्या राजपूत राजाची पत्नी कमला देवी

1299 मध्ये खिलजीच्या सैन्याने गुजरातवर हल्ला चढवला. या हल्ल्यात गुजरातचा वाघेला राजपूत राजा कर्ण वाघेलाचा दारुण पराभव झाला. या कर्ण वाघेलाला कर्णदेव आणि राय कर्ण म्हणूनही ओळखलं जायचं.

या पराभवात कर्णाने त्याचं साम्राज्य आणि संपत्ती तर गमावलीच पण सोबत पत्नी देखील गमावली. या तुर्कांनी गुजरात जिंकल्यावर वाघेला घराण्याची सत्ता संपुष्टात आली आणि गुजरातच्या इतिहासात एक नवा अध्याय जोडला गेला.

खिलजीने युद्धात हरलेल्या कर्णाच्या पत्नीबरोबर म्हणजेच कमला देवीबरोबर लग्न केलं. गुजरातचे प्रसिद्ध इतिहासकार मकरंद मेहता सांगतात, "खिलजीने कमला देवीशी लग्न केल्याचा पुरावा अस्तित्वात आहे."

मकरंद मेहता पुढे सांगतात, "1455 ते 1456 या कालावधीत पद्मनाभ यांनी कान्हणदे नामक प्रबंध लिहिला होता. हा प्रबंध ऐतिहासिक तथ्यांवर आधारित…

मेहता सांगतात की, "पद्मनाभ यांनी त्यांच्या पुस्तकात हिंदू किंवा मुस्लिम असे शब्द वापरले नाहीत. उलट त्यांनी ब्राह्मण, बनिया, मोची, मंगोल, पठाण या जातींचा उल्लेख केला."

"खिलजीने या युद्धात राजपूतांचा पराभव केला आणि गुजरातमधील शहरं, मंदिरं लुटली. पण युद्धात जरी पराभूत झालो तरी आम्हीच विजयी आहोत अशी प्रस्थापितांची इच्छा असायची. त्यामुळेच 19व्या शतकातील लेखकांनी असं म्हटलंय की, अल्लाउद्दीन खिलजी लष्करी युद्धात भले ही जिंकला असेल पण सांस्कृतिकदृष्ट्या आपणच सर्वश्रेष्ठ आहोत."

जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील इतिहासाचे प्राध्यापक नजफ हैदर सांगतात, "गुजरात जिंकल्यानंतर खिलजीने कर्णाच्या पत्नीशी विवाह केल्याच्या कथा खऱ्या आहेत."

मध्ययुगीन काळात युद्धात पराभूत झालेल्या राजाची संपत्ती आणि राण्या विजयी राजाच्या ताब्यात यायच्या का? यावर प्राध्यापक हैदर सांगतात, "युद्धात पराभूत राजाची संपत्ती, दागिने, हत्ती, युद्धात वापरले जाणारे घोडे आणि स्त्रिया विजयी राजाची मालमत्ता बनत. त्यामुळे या संपत्तीचं काय करायचं हे युद्धात जिंकलेला राजाच ठरवतो."ते सांगतात, "बऱ्याचदा खजिना लुटला जायचा, युद्धातील प्राणी, श्रीमंतांमध्ये वाटले जायचे. पण सुलतानशाहीच्या काळात हरम किंवा राजकन्या सोबत नेल्याची उदाहरणं सापडत नाहीत. फक्त खिलजीच्या लग्नाचा संदर्भ सापडतो."प्राध्यापक हैदर सांगतात "पराभूत राजाच्या पत्नीने जिंकलेल्या राजाकडे जाणं सोपी गोष्ट नव्हती. खिलजीने कमला देवीशी लग्न केल्याची कथा स्वतःमध्येच एक उदाहरण आहे. पराभूत झालेल्या राजांच्या बाकीच्या राण्यांसोबत असं घडल्याचं दिसत नाही."

प्राध्यापक हैदर इथं आणखीन एका महत्वाच्या गोष्टीचा उल्लेख करतात. ते सांगतात, "अलाउद्दीन खिलजीच्या हरममध्ये राहणाऱ्या कमला देवीने तिची मुलगी देवल देवीला आणण्याचा आग्रह धरला होता. पुढे जेव्हा मलिक काफूरच्या नेतृत्वाखाली दख्खनच्या देवगिरीवर हल्ला करण्यात आला त्यावेळी येताना देवल देवीला दिल्लीला आणण्यात आलं."

हैदर स्पष्ट करतात, "खिलजीचा मुलगा खिज्र खानने नंतर देवल देवीशी लग्न केलं. अमीर खुसरोने देवल देवीच्या नावे एक कविता लिहिली आहे. यात देवल आणि खिज्र खान यांच्या प्रेमाचं तपशीलवार वर्णन करण्यात आलंय. खुसरोच्या या कवितेला आशिकाही म्हटलं जातं."

याच देवल देवीच्या कथेवर नंदकिशोर मेहता यांनी 1866 मध्ये 'कर्ण घेलो' नावाची कादंबरी लिहिली. या लोकप्रिय कादंबरीला गुजराती भाषेतील पहिली कादंबरी मानलं जातं.

यादवांची राजकुमारी झत्यपली देवी आणि खिलजीचा विवाह

खिलजी कडाचा गव्हर्नर असताना त्याने 1296 मध्ये दख्खनमधील देवगिरी (आता दौलताबाद, महाराष्ट्र) येथील यादव राजा रामदेववर हल्ला केला होता. खिलजीने आक्रमण केलं तेव्हा राजा रामदेवाचं सैन्य त्याच्या मुलासह दुसऱ्या मोहिमेत व्यस्त होतं. त्यामुळे खिलजीसोबत युद्ध करण्यासाठी त्यांच्याकडे सैन्य नव्हतं.

शेवटी राजा रामदेवाने अल्लाउद्दीनसमोर शरणगती पत्करली. खिलजीला राजा रामदेवकडून अमाप संपत्ती आणि हत्ती, घोडे मिळाले. शिवाय राजा रामदेवाने त्याच्या मुलीचा विवाह देखील खिलजीसोबत लावून दिला.

प्राध्यापक हैदर सांगतात की, "तत्कालीन इतिहासकार झियाउद्दीन बरनीने त्याच्या 'तारीख-ए-फिरोजशाही' पुस्तकात या घटनेचा केलाय."

हैदर पुढे सांगतात की, "बरनीने रामदेवकडून मिळालेल्या संपत्तीचा आणि मुलीच्या विवाहाचा उल्लेख केलाय, पण मुलीच्या नावाचा उल्लेख यात आढळत नाही."

"चौदाव्या शतकातील इतिहासकार अब्दुल्ला मलिक इसामी यांच्या फ़ुतुह-उस-सलातीन मध्ये खिलजीच्या आणि रामदेवाची कन्या झत्यपलीच्या विवाहाचा उल्लेख आढळतो."

प्राध्यापक हैदर सांगतात, "बरनी आणि इसामी यांनी दिलेली वर्णनं ऐतिहासिक आणि विश्वासार्ह आहेत."

बरनीने लिहिलंय की, खिलजीच्या मृत्यूनंतर मलिक काफूरने शिहाबुद्दीन उमरला सुलतान बनवलं. शिहाबुद्दीन झत्यपलीचा मुलगा होता. शिहाबुद्दीन मलिक काफूरच्या हातातलं बाहुलं होता. त्यामुळे मलिक काफूर पडद्याआडून सत्ता चालवत होता.

हैदर यांच्या म्हणण्यानुसार, रामदेव खिलजीच्या अधीन होते आणि त्याच्या दख्खनमधील मोहिमांना पाठिंबा द्यायचे. मात्र खिलजीच्या मृत्यूनंतर देवगिरीने सुलतानशाही विरोधात बंड पुकारलं."

विवाहाचा उद्देश राजकीय नव्हता

हैदर यांना वाटतं की, खिलजीने राजपूत राणी कमला देवी आणि यादव राजकन्या झत्यपली देवी यांच्याशी केलेले विवाह केवळ राजकीय उद्देशाने केलेले नव्हते तर त्यामागे त्याचा वैयक्तिक फायदा होता.

खरं तर आपल्या सासऱ्याची म्हणजेच जलालुद्दीन खिलजीची हत्या करून खिलजी दिल्लीच्या सत्तेवर आला होता. याचा परिणाम त्याची पहिली पत्नी मलिका-ए-जहाँ (जलालुद्दीन खिलजीची मुलगी) सोबतच्या नात्यावरही झाला होता. मलिका-ए-जहाँ सत्तेत हस्तक्षेप करायची पण इतर राण्यांच्या बाबतीत तसं नव्हतं.

आज कमला देवी किंवा झत्यपली देवी यांच्याबद्दल फारसं बोललं जात नाही.

का?

या प्रश्नावर हैदर सांगतात, "कारण त्यांची पात्रं आजच्या वातावरणात फिट बसण्यासारखी नाहीत."

हैदर सांगतात, "आपल्याला मध्ययुगीन भारत पाहायचा असेल तर आजच्या चष्म्यातून बघून उपयोग नाही. त्या काळातील संवेदनशीलता वेगळी होती, आजची संवेदनशीलता वेगळी आहे. आज ज्या गोष्टी आपण स्वीकारुच शकत नाही, त्या गोष्टी त्या काळात अगदी सामान्य होत्या."

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)