You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
अल्लाउद्दीन खिलजी आणि त्याचा गुलाम मलिक कफूरचं नेमकं नातं काय होतं?
- Author, भरत शर्मा
- Role, बीबीसी प्रतिनिधी, नवी दिल्ली
चित्रीकरणादरम्यान 'करणी सेने'ने केलेली तोडफोड, त्यानंतर चित्रपटाचा आलेला फर्स्टलूक, मग ट्रेलर यामुळे संजय लीला भन्साळी यांचा 'पद्मावत' हा सिनेमा रिलीज होण्याआधीच गाजला होता
अलाउद्दीन खिलजी आणि चित्तोडची राणी पद्मावती यांच्यावर आधारित या सिनेमाचं कथानक होतं.
'पद्मावत' या सिनेमात रणवीर सिंगने अल्लाउद्दीन खिलजीची भूमिका केली होती. अल्लाउद्दीनचा गुलाम असलेल्या मलिक काफूरच्या भूमिकेत जिम सरभ होता.
मलिक काफूर कोण होता आणि खिलजीसोबत त्याचं नात काय होतं, त्याची कथा इतकी लक्षवेधी का आहे, हे समजून घेण्यासाठी आपल्याला इतिहासाची पानं धुंडाळावी लागतात.
दिल्लीचे सुलतान असलेल्या अलाउद्दीन खिलजीचा गुलाम होता मलिक काफूर.
गुलाम ते सैन्यप्रमुख
इतिहासात अशी नोंद आहे की, खिलजीचा सैन्यप्रमुख नुसरत खान यांने गुजरातवर हल्ला केला होता. त्यावेळी त्याने काफूरला पकडून गुलाम बनवलं.
त्यानंतर काफूरने सातत्यानं प्रगती केली. खिलजीचा सैन्यप्रमुख म्हणून काफूरने मंगोलियन हल्लखोरांना पराभूत केलं आणि खिलजीचा ध्वज दक्षिण भारतावर फडकवला.
याशिवाय विविध पुस्तकांत खिलजी आणि काफूर यांच्यातील 'खास' नात्याचा उल्लेख आहे.
आर. वनिता आणि एस. किडवई यांनी संपादित केलेल्या 'सेम-सेक्स लव इन इंडिया : रीडिंग्स इन इंडियन लिटरेचर' या पुस्तकात असं म्हटलं आहे की, मलिक काफूर अलाउद्दीन खिलजीच्या सैन्यात सहभागी झाला आणि त्याला 'हजारदिनारी' (एक हजार रुपयांत विकला जाणारा) म्हटलं गेलं.
या पुस्तकानुसार खिलजीने काफूरला 'मलिक नायब' म्हणून नेमलं होत.
सुलतान मोहंमद इब्न तुघलकचे सहकारी म्हणून काम करणाऱ्या बरानी यांनी खिलजीच्या शेवटच्या दिवसांचा संदर्भ देत लिहिलं आहे की, "त्या चार-पाच वर्षांत सुलतानची स्मरणशक्ती सारखी हरपत होती. ते मलिक नायबच्या प्रेमात बुडाले होते. त्यानं सरकार आणि नोकरांची सगळी जबाबदारी मलिक नायबच्या हातात दिली होती."
एका गुलामाने इतक्या वेगाने प्रगती केली, त्यामागे कारण काय होतं? काफूर बायसेक्शुअल होता का? खरोखरच खिलजी आणि काफूर यांच्यात शारीरिक संबंध होते का? हे जाणून घेण्यासाठी बीबीसीने इतिहासकारांशी चर्चा केली.
मुघलकाळावर विशेष अभ्यास करणारे नामवंत इतिहासकार हरबंस मुखिया यांच्या मते त्या काळात गुलामांनी शक्तिशाली होण ही फार आश्चर्याची बाब नव्हती.
ते म्हणाले, "काफूर गुलाम होता, पण त्याकाळात गुलामांचे संदर्भ आजच्या काळासारखे नव्हते."
गुलाम असणं काही वाईट का नव्हतं?
मुखिया म्हणतात, ''बादशहाचं गुलाम असणं सन्मानाचं होतं. हे फारच मोठं स्थान होतं. त्या काळातील दरबारी लोक स्वतःला बंदा-ए-दरगाह, म्हणजेच दर्ग्याचे गुलाम म्हणायचे. इथं दर्ग्याचा अर्थ दरबार असा आहे.''
ते म्हणतात, "गुलाम शब्द उच्चारताच गरीब आणि पिचलेले लोक, अशी प्रतिमा डोळ्यांसमोर येते. पण तशी परिस्थिती नव्हती. गियासुद्दीन बलबन हा सुद्धा एकेकाळी गुलाम होता पण नंतर राजा झाला. गुलाम असणं त्याकाळात कमीपणाचं नव्हतं."
ते म्हणाले, "काफूर गुलाम होता आणि त्यानं प्रगती केली, त्याचं आश्चर्य वाटतं नाही. काफूर बादशहा झाला नाही पण बलबन बादशहा झाला. बादशहाचा गुलाम असण्याचा अर्थ असा होतो की बादशहा या माणसाला फार जवळून निरखू पारखू शकतो."
इतिहासकारांच्या मते गुलामांचा सर्वांत महत्त्वाचा गुण म्हणजे ते लढवय्ये हवेत आणि विश्वासू हवेत. काफूरमध्ये हे दोन्ही गुण होते. खिलजीसाठी काफूर अत्यंत महत्त्वाचा होता कारण त्याने सुलतानसाठी दक्षिणेत अनेक युद्ध जिंकली होती.
काफूर ट्रान्सजेंडर होता का, याबद्दल कुठे काही वाचनात येतं का, या प्रश्नांचे उत्तर देताना मुखिया म्हणाले की तसं कुठं वाचनात येत नाही.
खिलजी आणि काफूर यांच्यात शरीरसंबंध होते का, या प्रश्नाचे उत्तर देताना ते म्हणाले, "दोघांत शरीरसंबंध असल्याची चर्चा होते. पण यापेक्षा जास्त चर्चा ही खिलजीचा मुलगा मुबारक खिलजी आणि खुसरो खान यांच्यातील संबंधांची होते. खुसरो खान काही काळासाठी बादशहा होता. अमीर खुसरोने याचा उल्लेख केला आहे."
"काफूर ट्रान्सजेंडर नव्हता आणि त्याचं खिलजीसोबत तसे संबंध नव्हते," असं मुखिया म्हणाले.
नातं होतं पण रोमँटिक नव्हतं?
दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील मुघलकालीन इतिहासकार प्राध्यापक नजफ हैदर म्हणतात की सुल्तानच्या काळातील भाष्यकार असलेले जियाद्दीन बरनीने खिलजी आणि काफूर यांच्या संबंधाबद्दल सविस्तर लिहिलं आहे. तरीसुद्धा काफूर आणि खिलजी यांच्यातील तशा प्रकारच्या नात्यांचा काही उल्लेख त्यांनी केलेला नाही.
ते म्हणतात, दोघांमध्ये घनिष्ठ संबंध होते पण ते रोमँटिक संबंध नव्हते.
पण हैदर यांच्यामते काफूर ट्रान्सजेंडर होता. ते म्हणतात, "काफूर ट्रान्सजेंडर होता, हे सत्य आहे. या लोकांच्या नावातूनच या तथ्याची ओळख होते."
काफूर ट्रान्सजेंडर होता का?
हैदार यांच्या मते, ''त्याकाळात काफूर हे नाव ट्रान्सजेंडरसाठी होतं. कार्स्ट्रेशन करून ज्यांना ट्रान्सजेंडर होते त्यांच्या 3 श्रेणी होत्या. त्यात्या श्रेणीनुसार त्यांना ही नावं दिली जात असत.''
ते म्हणतात इतिहासामधील कितीतरी कथांना रोमांसचा जोडण्यात आला आहे. रजिया सुलतानच्या बाबतीतही हे पाहायला मिळतं.
हैदर म्हणतात की, त्या काळात गुलाम विकत घेतले जात होते आणि त्यांना प्रशिक्षण देऊन लष्करी कमांडर बनवलं जात असे. यात विश्वास महत्त्वाचा होता आणि काफूर विश्वासू होता.
काहींचं मत वेगळं
भंवर लाल द्विवेदी यांनी 'इव्होल्यूशन ऑफ एज्युकेशनल थॉट्स इन इंडिया' मध्ये खिलजी आणि काफूर यांच्या नात्यावर सविस्तर लिहिलं आहे.
ते लिहितात, "के. एम. अशरफ सांगतात की सुलतान अलाउद्दीन खिलजी आणि मलिक काफूर तसेच खिलजीचा मुलगा मुबारक शहा आणि खुसरो खान यांच्यात शारीरिक संबंध होते."
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)