सत्यजीत तांबे: AB फॉर्म म्हणजे काय? निवडणुकीत AB फॉर्मला इतकं महत्त्व का असतं?

- Author, हर्षल आकुडे
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
महाराष्ट्रात नुकतेच विधान परिषदेच्या शिक्षक-पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीत नाशिक पदवीधर मतदारसंघातून विजय मिळवलेल्या सत्यजित तांबे यांची चर्चा सर्वाधिक पाहायला मिळाली.
माजी मंत्री आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांचे भाचे असलेल्या सत्यजित यांनी विजय मिळवल्यानंतर काँग्रेसचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले.
"मला मुद्दामहून चुकीचा एबी फॉर्म देण्यात आला, शिवाय मी स्वतःहून बंडखोरी केली, असं भासवण्यात आलं," असा आरोप सत्यजित तांबे यांनी केला आहे. काँग्रेस पक्षाच्या प्रवक्त्यांनी मात्र हे आरोप चुकीचं असल्याचं म्हटलं आहे.
पण, कोणतीही निवडणूक लागली की एबी फॉर्मचा विषय नेहमी चर्चेत येतो. एखाद्या उमेदवाराने एबी फॉर्म पळवला, फाडला इथपासून ते चुकीचा भरल्याने उमेदवारी रद्द झाली, अशा बातम्या सतत आपल्या कानावर येत असतात. तसंच, एबी फॉर्म मिळवण्यासाठी हाणामारीच्या घटनाही अनेक ठिकाणी घडल्याचा इतिहास आहे.
पण कोणत्याही उमेदवाराच्या उमेदवारीचा कणा असलेला एबी फॉर्म नेमका असतो तरी काय? शिवाय, या फॉर्मला निवडणुकीच्या राजकारणात इतकं महत्त्व का असतं, याची आपण माहिती घेऊ -
महत्त्वपूर्ण कागदपत्रांपैकी एक
राजकीय पक्षांच्या तिकिटावर निवडणूक लढवण्याची इच्छा असलेल्या उमेदवारांना विविध कागदपत्रे आणि फॉर्म निवडणूक अधिकाऱ्यांसमोर सादर करणे आवश्यक आहे.

निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार, या कागदपत्रांमध्ये नागरिकत्व, वय आणि आरक्षित मतदारसंघातून निवडणूक लढवत असल्यास जात प्रमाणपत्र, फौजदारी खटल्यांसंदर्भातील प्रतिज्ञापत्र, उमेदवार आणि त्याच्या कुटुंबीयांच्या नावावर असलेली मालमत्ताविषयक प्रतिज्ञापत्र यांचा त्यामध्ये प्रामुख्याने समावेश होतो.

फोटो स्रोत, Getty Images
पण, त्यातही संबंधित उमेदवाराला एखाद्या राजकीय पक्षाकडून निवडणूक लढवायची असल्यास सर्वांत महत्वाची कागदपत्रे म्हणजे AB फॉर्म होय. या फॉर्मचा उल्लेख AB फॉर्म असा एकत्रितपणे होत असला तरी ही दोन्ही वेगवेगळे परंतु एकत्रितपणे वापरली जाणारे अर्ज आहेत.
या फॉर्ममधून संबंधित उमेदवार ज्या पक्षाकडून निवडणूक लढवू इच्छित आहे, त्याची मान्यता, निवडणूक चिन्ह, मतदारसंघ आणि पक्षाच्या अधिकृत उमेदवाराचे नाव यांची माहिती निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे देण्यात येते.
A फॉर्म म्हणजे काय?
A फॉर्म हा मान्यताप्राप्त राजकीय पक्षांमार्फत मुख्य निवडणूक अधिकारी (केंद्रीय किंवा राज्य) आणि संबंधित मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी यांच्यामध्ये केला जाणारा अधिकृत पत्राचा नमुना आहे.
यामार्फत संबंधित निवडणुकीकरिता पक्षाने निवडलेल्या उमेदवारांची नावे कळवण्याचा अधिकार कोणत्या पदाधिकाऱ्यांकडे दिले आहेत, हे निवडणूक अधिकाऱ्यांना कळवण्यात येतं.

फोटो स्रोत, Eci
हे पत्र संबंधित पक्षाचे अध्यक्ष किंवा सचिव यांच्याकडूनच पाठवण्यात आलेलं असावं. त्यावर स्वाक्षरी आणि पक्षाचे शिक्का मारलेला असावा.

शिवाय, संबंधित पदाधिकाऱ्यांच्या सह्यांचे नमुनेही यामध्ये देणं अनिवार्य असतं. A फॉर्म हा अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत दुपारी 3 वाजेपर्यंत पोहोचवणं गरजेचं असतं.
B फॉर्म म्हणजे काय?
वरील A फॉर्ममध्ये आपण पाहिलं की पक्षाचे अध्यक्ष किंवा सचिव हे संबंधित निवडणुकीसाठी त्या-त्या मतदारसंघासाठी जबाबदार असलेल्या पदाधिकाऱ्यांची नावे निवडणूक अधिकाऱ्यांना कळवतात.
त्यानुसार, राजकीय पक्षाच्या अध्यक्ष किंवा सचिवाने नेमलेल्या पदाधिकाऱ्याकडून संबंधित मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्याला पाठवण्यात येणाऱ्या पत्राचा नमुना म्हणजेच B फॉर्म.

फोटो स्रोत, Eci
या पत्रात पक्षाच्या अधिकृत उमेदवाराच्या नावाची माहिती निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना देण्यात येते. याच उमेदवाराला आपल्या पक्षाचं चिन्ह मिळावं, अशी शिफारस यामध्ये करण्यात आलेली असते.
B फॉर्ममध्ये मतदारसंघाचं नाव, उमेदवाराचं पूर्ण नाव आणि पत्ता दिलेला असतो. शिवाय, संबंधित अधिकृत उमेदवाराचा अर्ज छाननीदरम्यान काही कारणांमुळे नामंजूर करण्यात आला. तर त्याच्याऐवजी पक्षाची अधिकृत उमेदवारी कुणाला मिळावी अशा पर्यायी उमेदवाराची सगळी माहितीसुद्धा या फॉर्ममध्ये असते.

ज्यांना आपल्या राजकीय पक्षाची अधिकृत उमेदवारी देण्यात आली आहे, ते आपल्या पक्षाचे सदस्य आहेत आणि त्यांचे नाव पक्षाच्या यादीमध्ये नोंदवण्यात आलेलं आहे, हेसुद्धा B फॉर्मच्या माध्यमातून प्रमाणित करण्यात येतं.
एकाच प्रकारचा अर्ज पण नावातील फरक
केंद्रीय निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार, लोकसभा-विधानसभा-महापालिका निवडणुकांसाठी या फॉर्मला AB फॉर्म संबोधण्यात येतं.

फोटो स्रोत, Eci
मात्र, राज्यसभा आणि विधान परिषदेच्या निवडणुकांसाठी त्याला AA आणि BB फॉर्म असं संबोधण्यात येतं.

फोटो स्रोत, Eci
या दोन्ही नमुन्यांमधील आशयामध्ये बहुतांश साम्यच आहे. मात्र, राज्यसभा-विधान परिषद निवडणुकांमध्ये चिन्हवाटपाच्या संदर्भात थोडासा फरक आढळून येतो.
AB फॉर्म भरल्यानंतर पुढील प्रक्रिया काय असते?
सर्वसाधारणपणे, कोणत्याही निवडणुकीसाठी उमेदवार आपलं नामनिर्देशनपत्र दाखल करताना AB फॉर्म सोबत जोडूनच ते दाखल करतात.
पण कधी-कधी AB फॉर्म प्राप्त होण्यास विलंब होणार असल्यास उमेदवार इतर आवश्यक माहिती आणि कागदपत्रांसह आपला नामनिर्देशनपत्र दाखल करतात.

अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत दुपारी 3 वाजेपर्यंत AB फॉर्म आपल्या नामनिर्देशनपत्राला जोडण्याची मुदत असते.
ही मुदत संपल्यानंतर अर्जदारांनी दाखल केलेल्या अर्जांची छाननी होते. छाननीच्या दिवशी नामनिर्देशन पत्रातील संपूर्ण माहितीची पडताळणी केली जाते. तसंच संबंधित अर्जदाराने कोणत्या राजकीय पक्षाचा AB फॉर्म जोडला आहे किंवा नाही, हेसुद्धा तपासलं जातं.
ही माहिती जुळत असल्यास संबंधित अर्जदार हा त्या निवडणुकीतील संबंधित राजकीय पक्षाचा उमेदवार म्हणून ग्राह्य धरला जातो.
काही प्रकरणांमध्ये उमेदवार हे पक्षाच्या नावाने नामनिर्देशनपत्र दाखल करतात. मात्र, नियोजित वेळेत त्यांचा AB फॉर्म निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना प्राप्त न झाल्यास तो उमेदवार हा अपक्ष उमेदवार म्हणून ओळखला जातो.
अर्थात, अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज पात्र ठरणं, हे नामनिर्देशनातील माहिती आणि इतर सर्व कागदपत्रांसंदर्भात निकषांची पूर्तता या गोष्टींवरच अवलंबून असतं.
सत्यजित तांबेंनी काल (4 फेब्रुवारी) घेतलेल्या पत्रकार परिषदेत म्हटलं, "आम्ही ते फॉर्म भरण्यासाठी जेव्हा लिफाफे उघडले, तेव्हा लक्षात आलं की, हे एबी फॉर्म चुकीचे आहेत. एक फॉर्म औरंगाबादचा होता, तर दुसरा नागपूर पदवीधरचा होता. त्यानंतर दिलेल्या B फॉर्मवर सत्यजित तांबेंचे वडील सुधीर तांबे यांचं नाव होतं. शिवाय, पर्यायी उमेदवाराच्या रकान्यात Nil असं लिहिण्यात आलेलं होतं.
सत्यजित पुढे म्हणाले, "मी अपक्ष अर्ज दाखल केला असं माध्यमांमध्ये पसरवण्यात आलं. मात्र माध्यमांनी त्या बातमीची शहानिशा केली नाही. मी काँग्रेसकडूनच अर्ज केला होता. फक्त त्याला काँग्रेसचा AB फॉर्म जोडण्यात न आल्यामुळे माझा अर्ज अपक्ष म्हणून रुपांतरित ठरला, हे लक्षात घ्या."
काही वेळा राजकीय पक्ष एकाच मतदारसंघात एकापेक्षा जास्त उमेदवारांना B फॉर्म देतात. अधिकृत उमेदवाराचा अर्जच बाद होण्याची नामुष्की टाळण्यासाठी राजकीय पक्ष अशा प्रकारचं पाऊल उचलतात.
पण, अशा वेळी हे प्रकरण गुंतागुंतीचं होतं. अशा स्थितीत निवडणूक निर्णय अधिकारी त्या पक्षाच्या नावाने ते सगळे अर्ज प्राथमिकरित्या पात्र म्हणून घोषित करतात.
मात्र, अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी 3 वाजेपर्यंत इतर उमेदवारांना अर्ज मागे घ्यावा लागतो. अखेरीस, पक्षाने ठरवलेला उमेदवार रिंगणात कायम राहतो.
काही प्रकरणांमध्ये असंही दिसून आलं आहे की पक्षांतर्गत वादामुळे एकापेक्षा जास्त उमेदवार हे एकाच मतदारसंघात एकाच पक्षाच्या नावाने दाखल केलेला अर्ज शेवटपर्यंत कायम ठेवतात. अशा स्थितीत संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी हे कायद्यानुसार अधिकृत उमेदवारीसंदर्भात अंतिम निर्णय देतात.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)









