भाजपात आलो ही माझी अडचण -नारायण राणे #5मोठ्या बातम्या

फोटो स्रोत, Ani
आज विविध वृत्तपत्र आणि वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा -
1. भाजपात आलो ही माझी अडचण - नारायण राणे
भाजपमध्ये सहनशील आणि शांत विचारसरणीचे लोक आहेत. त्यामुळे आपणंही तसं दाखवायला पाहिजे म्हणून मी शांत आहे, भाजपात आलो ही माझी अडचण आहे, पण याचा कुणी फायदा घेऊ नका, असं वक्तव्य केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केलं.
आंगणेवाडी यात्रेच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सिंधुदुर्ग येथे एक कार्यक्रम पार पडला. यावेळी नारायण राणे यांनी आपल्या भाषणात उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली.
यावेळी ते म्हणाले, "शिवसेना खरी वाढली ती कोकणातून. आम्ही शिवसेनेसाठी कष्ट केले आहेत. उद्धव ठाकरेंनी कोकणासाठी काहीही केलं नाही. त्यांनी साधी अंगणवाडीही कोकणात बांधली नाही. उलट कोकणात येणाऱ्या प्रत्येक प्रकल्पाला मात्र विरोध केला." ही बातमी ई-सकाळने दिली.
2. 'जगताप कुटुंबाला न्याय, पण टिळकांवर अन्याय,' हिंदू महासंघाची टीका
कसबा पेठ आणि चिंचवड पोटनिवडणुकीसाठी भाजपने उमेदवारांची घोषणा केली आहे. मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे ही पोटनिवडणूक होत आहे.
या निवडणुकीसाठी भाजपने चिंचवडमधून लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना तर कसबा पेठ मधून हेमंत रासने यांना उमेदवारी दिली आहे. कसब्याच्या उमेदवारीवरून हिंदू महासंघाने थेट भाजपलाच सुनावलं आहे.

फोटो स्रोत, facebook
'जगताप कुटुंबाला न्याय आणि टिळक कुटुंबावर अन्याय करण्यात आला आहे. आधी मेधा कुलकर्णी, नंतर देवेंद्र फडणवीस आणि आता टिळक कुटुंबाला संधी नाकारणं म्हणजे भाजपला काही जातींची फक्त मतं हवी असतात.
त्या जाती नको असतात. पक्षाचं काम करणं हे जेव्हा हेटाळणीचं असायचं. लोक चिडवायचे तेव्हा ज्यांनी पक्ष वाढवला त्यांनाच खड्ड्यात ढकललं जात आहे,' असा आरोप हिंदू महासंघाच्या आनंद दवे यांनी केला आहे. ही बातमी न्यूज 18 लोकमतने दिली.
3. आदित्य ठाकरेंनी ठाण्यातून निवडणूक लढवावी - मोहित कंबोज
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजीनामा देऊन वरळीतून निवडणूक लढवावी, असं आव्हान शिवसेना युवा नेते आदित्य ठाकरे यांनी दिलं होतं. त्याला भाजप नेते मोहित कंबोज यांनी उत्तर दिलं आहे.

फोटो स्रोत, facebook
आदित्य ठाकरे हे 2019 ची वरळीतील निवडणूक सचिन अहीर यांच्यामुळे जिंकले होते. त्यामुळे त्यांना इतकाच स्वतःवर विश्वास असेल तर त्यांनी राजीनामा देऊन एकनाथ शिंदेंविरोधात निवडणूक लढवावी, असं कंबोज म्हणाले.
आदित्य ठाकरेंचा एकतर्फी विजय दाखवण्यासाठीच सचिन अहीर यांना निवडणुकीआधी शिवसेनेत आणलं गेलं, असंही ते म्हणाले. ही बातमी लोकमतने दिली.
4. पठाणने नेमके कमावले किती? शाहरुखने दिलं उत्तर
शाहरुख खान व दीपिका पदुकोणचा 'पठाण' चित्रपट दहा दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला. अजूनही हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई करत आहे.
दहा दिवसांत या चित्रपटाने जगभरात ७२५ कोटी रुपये कमाई केली आहे. तर देशभरात हा चित्रपट ४०० कोटी रुपयांचा टप्पा गाठण्याच्या मार्गावर आहे. चित्रपटाला मिळत असलेलं यश पाहता शाहरुखही अगदी भारावून गेला आहे.

फोटो स्रोत, yrf
'पठाण'च्या यशानंतर शाहरुखने #AskSRK ट्विटर सेशन घेतलं. या सेशनद्वारे चाहत्यांनी त्याला अनेक प्रश्न विचारले. या प्रश्नांची शाहरुखने अगदी दिलखुलासपणे उत्तरं दिली. शिवाय 'पठाण'ची रेकॉर्डब्रेक कमाई पाहून शाहरुख खूश असल्याचंही यावेळी दिसून आलं. त्याला चाहत्यांनी 'पठाण'साठी शुभेच्छाही दिल्या.
यावेळी पठाण चित्रपटाची खरी कमाई किती आहे, असा प्रश्न एका चाहत्याने शाहरुखला विचारला. यावेळी शाहरुखने अगदी त्याच्या स्टाइलने उत्तर दिलं. तो म्हणाला, "5 हजार कोटींचं प्रेम, 3 हजार कोटींची प्रशंसा, 3 हजार 250 कोटींची प्रशंसा, 2 बिलियन हास्य आणि अजूनही मोजत आहे." ही बातमी लोकसत्ताने दिली.
5. अदानींपाठोपाठ पतंजलीचेही शेअर गडगडले
योगगुरू रामदेव यांच्या पतंजली फूड्सच्या सूचिबद्ध गुंतवणुकदारांचे मोठे नुकसान झाले. गेल्या आठवड्यापासून पतंजली फूड्सच्या शेअर्सची किंमत सातत्याने घसरत असून कंपनीच्या गुंतवणूकदारांचे 7 हजार कोटी रुपयांहून अधिक नुकसान झाले, अशी बातमी लोकमतने दिली आहे.
बातमीनुसार, आठवड्याच्या कामकाजाच्या अखेरच्या दिवशी पतंजली फूड्सचे शेअर्स लोअर सर्किटवर आले आणि 903.35 रुपयांपर्यंत घसरले. तथापि, व्यापाराच्या शेवटी, शेअरची किंमत 906.80 रुपयांवर आली. यापूर्वीच्या तुलनेत यामध्ये 4.63 टक्क्यांची घसरण झाली. त्याच वेळी कंपनीचे मार्केट कॅप 32 हजार 825 कोटी रुपये झाले. ही बातमी लोकमतने दिली.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








