अदानींच्या साम्राज्याला धक्का देणाऱ्या हिंडनबर्गची गोष्ट

गौतम अदानी आणि नेट अँडरसन

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, गौतम अदानी आणि नेट अँडरसन

24 जानेवारी 2023 रोजी अमेरिकेतील फॉरेन्सिक फायनान्शिअल कंपनी हिंडनबर्गचा अहवाल आला आणि भारतीय उद्योजक गौतम अदानी यांच्या कंपनीसंदर्भातील अनेक गोष्टी बदलल्या.

या अहवालात अदानी समुहाबद्दल 88 प्रश्न विचारले आहेत, अदानी समुहाने ते फेटाळले आहेत.

या अहवालानंतर शेअर बाजारातही पडझड दिसून आली. काही दिवसांपूर्वी गौतम अदानी जगातील सर्वात श्रीमंतांच्या यादीत तिसऱ्या नंबरवर होते, अहवालानंतर 10 दिवसांत ते पहिल्या 20 जणांच्या यादीतूनही बाहेर पडले आहेत. त्यांनी 20 हजार कोटींचा एफपीओ रद्द केला.

हा अहवाल प्रसिद्ध करणारी हिडनबर्ग संशोधन कंपनी काय आहे आणि त्यामागे असलेली व्यक्ती कोण याचा येथे आढावा घेऊ.

हिंडनबर्ग नाव कुठून आलं?

हिंडनबर्ग जगाच्या इतिहासातलं सर्वांत मोठं उडतं जहाज होतं. उडतं जहाज, म्हणजे शब्दशः उडतं जहाज.

तेवढं मोठं, तेवढंच आलिशान, त्यात प्रवास करणाऱ्यांसाठी वेगळ्या केबिन, साग्रसंगीत जेवणाचा डायनिंग हॉल... तात्पर्य पाण्यावर तरंगणारं आलिशान जहाज असायचं, तसं हवेत उडणारं जहाज.

हिंडेनबर्गने 1936 साली म्हणजे हा अपघात व्हायच्या आदल्या वर्षी युरोप ते अमेरिका अशा 10 फेऱ्या मारल्या होत्या.

1937 चं प्रवासी वेळापत्रक सुरू झालं तसं मार्च महिन्यात ते एअरशिप ब्राझीललाही जाऊन आलं. 3 मे 1937 ला हिंडनबर्ग फ्रँकफर्टहून निघालं आणि 6 मेला सकाळी ते अमेरिकेतल्या लेकहर्स्टला पोचणार होतं.

या उडत्या जहाजात एकूण 97 लोक होते. 36 प्रवासी आणि 61 कर्मचारी.

ही एअरशिप्स जमिनीवर पूर्णपणे उतरायची नाहीत. तर फ्लाईंग बेसवर असलेल्या मोठ्या मोठ्या उंच खांबावर बांधली जायची.

हवेतून हळूहळू वेग कमी करत एअरशिप्स त्या खांबापर्यंत यायची. अर्थात हे वाटतं तेवढं सोपं नव्हतं. बरोबर योग्य ठिकाणीच एअरशिपचा योग्य तो भाग आला पाहिजे, तरच हे लँडिंग शक्य होतं.

अचूक जागा शोधण्याच्या नादात हिंडनबर्ग हवेतल्या हवेत तीनदा फिरलं. पण शेवटी चौथ्यांदा ते योग्य ठिकाणी आलं. संध्याकाळचे साडेसात वाजले होते. लँडिंगची प्रक्रिया सुरू असतानाचा जमिनीवरच्या काही प्रत्यक्षदर्शींना वरच्या भागातून वायूगळती होतेय असं दिसलं.

काहींनी म्हटलं की त्यांना निळ्या रंगाची ज्वाला दिसली.

हिंडनबर्ग

फोटो स्रोत, BRITISHPATHE

फोटो कॅप्शन, हिंडनबर्ग

काही क्षणातच हिंडनबर्गने पेट घेतला, लाल-पिवळ्या रंगाच्या ज्वाळांचा लोट उठला. हिंडेनबर्गचा स्फोट झाला होता.

एअरशिपमध्ये असलेल्या 97 लोकांपैकी 35 आणि जमिनीवरची एक व्यक्ती अशा 36 लोकांची जीव गेला.

अनेकांनी पेटत्या एअरशिपमधून उड्या टाकून आपला जीव वाचवला. पण जे वाचले तेही गंभीररित्या भाजले होते.

37 सेकंदात हिंडनबर्गचा खेळ संपला होता.

शेअर बाजाराला धडा?

गौतम अदानी यांच्या समूहाबद्दल अहवाल देणाऱ्या कंपनीचं नाव या हिंडनबर्ग घटनेवरुन घेतलंय.

कंपनी म्हणते, या घटनेनुसार आम्हीही शेअर बाजारातील भ्रष्टाचार आणि अनियमितातंवर नजर ठेवतो, त्यांचं सत्य बाहेर आणणं आमचा उद्देश आहे.

हिंडनबर्ग घटनेत लोकांचं नुकसान झालं होतं. तसं नुकसान शेअर बाजारात होऊ नये यासाठी लोकांना वाचवण्याचं आपण काम करतो असं कंपनीचं म्हणणं आहे.

नेट अँडरसन

फोटो स्रोत, The Washington Post/Getty

फोटो कॅप्शन, नेट अँडरसन

कोणताही अहवाल करण्यासाठी ही कंपनी काही मार्गांचा वापर करते.

गुंतवणुकीचा निर्णय देण्यासाठी विश्लेषणाचा आधार घेते

तपासणीसाठी संशोधन करतात

सुत्रांद्वारे मिळालेल्या गुप्त माहितीवर संशोधन होतं,

असे तीन मार्ग कंपनीने संकेतस्थळावर सांगितले आहेत.

हिंडनबर्ग स्वतःबद्दल काय म्हणतं?

हिंडनबर्गकडे गुंतवणुकीचा काही दशकांचा अनुभव आहे असं कंपनी सांगते.

हिंडनबर्ग रिसर्च

फोटो स्रोत, NurPhoto

फोटो कॅप्शन, हिंडनबर्ग रिसर्च

आपल्या कंपनीच्या अहवालांमुळे आणि दुसऱ्या कामांमुळे याआधीही अनेक कंपन्यांचे शेअर्स कोसळले आहेत.

अदानी कंपनीच्या आधी हिंडनबर्गचा संबंध टक कंपनी निकोलाशी आला होता. ते प्रकरण न्यायालयापर्यंत गेलं होतं आणि तिच्या संस्थापकांना दोषी धरण्यात आलं होतं.

ब्लूमबर्गच्या अहवालानुसार हिंडनबर्गने 2020 नंतर 30 कंपन्यांचा अहवाल जाहीर केला, तशा अहवालांनंतर त्या त्या कंपन्यांचे शेअर्स सरासरी 15 टक्क्यांपर्यंत घसरले आहेत.

2020 पर्यंतचे अहवाल हिंडनबर्गने संकेतस्थळावर दिले आहेत.

कंपनी तपास कधी करते?

  • लेखा परीक्षणातील अनियमितता असेल तर
  • महत्त्वाच्या पदांवर टअयोग्य' व्यक्ती असेल तर
  • अघोषित देवाणघेवाण व्यवहार झाले असल्यास
  • कोणत्याही प्रकारचे बेकायदेशीर व्यवहार, अनैतिक व्यापार झाल्यास

हिंडनबर्गमागे कोण आहे?

या कंपनीचे प्रमुख नेट अँडरसन आहेत. त्यांनी 2017 साली ही कंपनी स्थापन केली. त्यांनी कनेक्टिकट विद्यापीठात आंतरराष्ट्रीय व्यापाराचा अभ्यास केला असून त्यांनी फॅक्ट सेट रिसर्च सिस्टम नावाची डेटा कंपनीत अँडरसन यांनी इन्व्हेस्टमेंट मॅनेजमेंट कंपन्यांबरोबर काम केलं होतं.

रॉयटर्सच्या बातमीनुसार त्यांनी इस्रायलमध्ये काही काळ रुग्णवाहिका चालवली होती.

नेट अँडरसन

फोटो स्रोत, The Washington Post/Getty

फोटो कॅप्शन, नेट अँडरसन

लोक तणावात कसं काम करतात हे आपण रुग्णवाहिका चालवताना अनुभवल्याचं अँडरसन लिंक्डीन प्रोफाइलवर लिहितात. त्यांना वैद्यक कामाचा 400 तासांचा अनुभव आहे असं ते सांगतात.

आपले रोल मॉडेल अमेरिकन अकाउंटंट हॅरी मार्कोपोलोस असल्याचे ते म्हणतात.

हॅरी यांनी 2008 साली बेनॉर्ड मॅडॉफ पॉन्झी स्कीममधील भ्रष्टाचाराची माहिती उघड केली होती.

हॅरी यांच्यावर नेटफ्लिक्सवर द मॉन्स्टर ऑफ वॉल स्ट्रीट ही मालिका प्रसिद्ध झाली होती.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)