आईने गाजर खाताच स्मितहास्य, पण पालेभाजीला नापसंती; गर्भावस्थेपासूनच आपले खाण्याचे 'नखरे'

गाजर असलेल्या गोळ्या घेतल्यानंतर 20 मिनिटांनी अर्भकाने अशा प्रकारे हसल्यासारखी प्रतिक्रिया दिली.

फोटो स्रोत, Fetal and Neonatal Research Lab, Durham University

फोटो कॅप्शन, गाजराच्या चवीच्या गोळ्या घेतल्यानंतर 20 मिनिटांनी अर्भकाने अशा प्रकारे हसल्यासारखी प्रतिक्रिया दिली.
    • Author, आहमन खावजा
    • Role, बीबीसी न्यूज

तुम्हाला गाजर खायला आवडतं कां? किंवा एखाद्या पालेभाजीच्या चवीने तुमचं तोंड वेडंवाकडं होतं का? तर असा अनुभव होणारे तुम्ही एकटेच नाहीत.

केवळ तुमच्या-आमच्यासारखी माणसंच नव्हे तर गर्भातील भ्रूणसुद्धा अशा प्रकारे तोंड वेडंवाकडं करतो, असं एका संशोधनातून समोर आलं आहे.

आईने गाजर खाताच गर्भातील भ्रूणाचा चेहरा हसरा होतो. तर हेच भ्रूण कडवट चवीची पालेभाजी खाल्ल्यानंतर त्याला नापसंती दर्शवत असल्याचंही या प्रयोगातून दिसून आलं आहे.

युकेमधील डरहॅम युनिव्हर्सिटीच्या निओनॅतल रिसर्च लॅबने हे संशोधन केलं होतं. आई खात असलेल्या पदार्थांवर गर्भातील भ्रूण तात्काळ प्रतिक्रिया देत असल्याचं या प्रयोगातून सिद्ध झालं आहे.

या संशोधकांनी इंग्लंडमधील तब्बल 100 गरोदर महिला आणि त्यांच्या भ्रूणावर वरील प्रयोग केला होता.

शास्त्रज्ञांनी 35 महिलांना गाजराच्या चवीची पूड घातलेल्या कॅप्सूल गोळ्या दिल्या. तर इतर 35 महिलांना त्यांनी पालेभाजीच्या कडवट कोबीसदृश चवीची पूड असलेल्या कॅप्सूल गोळ्या दिल्या. इतर 30 महिलांना कोणत्याच प्रकारच्या गोळ्या देण्यात आल्या नाहीत. त्यांना या प्रयोगात केवळ अभ्यासासाठी सहभागी करून घेण्यात आलं होतं.

तात्काळ प्रतिक्रिया

संबंधित संशोधकांनी सायकोलॉजिकल सायन्स या जर्नलमध्ये आपला अहवाल प्रसिद्ध केला.

या अहवालानुसार, त्यांनी गरोदर महिलांना गोळ्या खाण्यासाठी दिल्या होत्या. त्याच्या 20 मिनिटांनंतर त्यांनी या महिलांच्या पोटाचं अल्ट्रासाऊंडमार्फत निरीक्षण केलं.

पालेभाजीच्या चवीच्या गोळीवर मात्र अर्भकाने तोंड वेंगाडल्याचं दिसतं.

फोटो स्रोत, Fetal and Neonatal Research Lab, Durham University

फोटो कॅप्शन, पालेभाजीच्या चवीच्या गोळीवर मात्र अर्भकाने तोंड वेंगाडल्याचं दिसतं.

यामध्ये गोड चवीची गोळी खालेल्या महिलांच्या पोटातील भ्रूण हसत असल्यांचं तर कडवट चवीची गोळी खाल्लेल्या महिलांच्या पोटातील भ्रूण तोंड वेडंवाकडं करत असल्याचं स्पष्टपणे दिसून आलं.

त्याचवेळी इतर 30 महिलांच्या पोटातील भ्रूणांचंही निरीक्षण करण्यात आलं. त्यावेळी, या भ्रूणांच्या चेहऱ्यावर कोणत्याच प्रकारचे हावभाव दिसले नाहीत, हे विशेष.

आपल्या खाण्यापिण्याच्या सवयी या आपण गर्भावस्थेत असल्यापासूनच निश्चित होतात, असा निष्कर्ष यापूर्वी केलेल्या अभ्यासामध्ये नोंदवण्यात आला होता.

यामध्ये गर्भपिशवीत भ्रूणाच्या आजूबाजूला असलेल्या पाण्याला (अमनॉईटिक फ्ल्युड) वेगवेगळी चव असू शकते. आईच्या आहारानुसार ही चव निश्चित होते, असं या अभ्यासात म्हटलेलं आहे.

पण, भ्रूणाचा वेगवेगळ्या चवींना कसा प्रतिसाद आहे, हे पाहणारा डरहॅम युनिव्हर्सिटीचा हा पहिलाच प्रयोग आहे.

भ्रूण अन्नाची चव घेण्यास कधी सुरू करतं?

या संशोधनात सहभागी असलेल्या नादजा रिसलँड म्हणतात, "आईच्या आहारामार्फत भ्रूणाला कशा प्रकारचं पोषण मिळतं, ते नंतर त्याच्या सुयोग्य विकासासाठी महत्त्वाचं असतं, हे आपल्याला आधीच्या प्रयोगांमधून समजलेलं आहे. पण हे नेमकं कधी सुरू होतं, हे आपल्याला माहिती नाही.

"भ्रूण 14 आठवड्यांचं असतानापासूनच त्याला साखर आवडायला लागते. आमच्या प्रयोगात आम्ही 32 ते 36 आठवड्यांच्या भ्रूणाला पावडर कॅप्सूल दिले. कारण त्यांचे हावभाव टिपणं अधिक सोपं आहे."

गाजर खाल्ल्यावर हसणारं बाळ पालेभाजी खाल्ल्यावर मात्र तोंड वाकडं करताना दिसलं

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, गाजर खाल्ल्यावर हसणारं बाळ पालेभाजी खाल्ल्यावर मात्र तोंड वाकडं करताना दिसलं

"आम्ही हा प्रयोग करत राहणार आहोत. या दरम्यान जन्मणाऱ्या मुलांची माहिती रेकॉर्ड करण्यात येईल. त्यांना जन्मानंतर हिरव्या पालेभाज्या खाण्याची सवय व्हावी, यासाठी त्याचा उपयोग होऊ शकेल."

हा प्रयोग आपल्याला मुलांच्या चवीच्या आवडीनिवडीबाबत काय दर्शवतो?

या प्रश्नाचं उत्तर देताना रिसलँड म्हणतात, "आपली चव घेण्याची क्षमता खूपच आधी विकसित होते, हे या प्रयोगातून दिसतं. म्हणजे भ्रूणाने एखाद्या चवीचा अनुभव गर्भावस्थेतच घेतला असेल, तर भविष्यात त्या चवीचा आहार खाण्यास त्याला वेगळं वाटणार नाही."

'कडू चव आणि विषाशी नातं'

बऱ्याचदा असं असतं की विषारी फळं ही कडू असतात. या गोष्टीकडे रिसलँड लक्ष वेधतात. त्या म्हणतात की कडू चवीला गर्भातील बाळांनी तोंड वाकडं करण्याचं हे देखील एक कारण असू शकतं.

आपण कटू चवीचा संबंध धोक्याशी जोडतो आणि त्याप्रमाणे प्रतिक्रिया देतो. पण सर्वच कडू पदार्थ हे विषारी नसतात त्यामुळे आपल्याला हे समजून घ्यावं लागतं की चांगलं काय आहे आणि वाईट काय आहे. काही कडू गोष्टी आरोग्यदायी असतात त्यामुळे ही सुद्धा गोष्ट मुलांना शिकवावी लागतात.

असं असलं तरी त्या म्हणतात काही खाल्ल्यावर प्रौढ लोक जशी प्रतिक्रिया देतात तशीच प्रतिक्रिया गर्भातील बाळ देतं असं त्या फोटोंवरुन दिसत असलं तरी जन्म न झालेल्या बाळाला भावना आणि आवड-निवड असते असं सांगणं कठीण आहे.

Foetus in womb

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, याआधीही झालेल्या संशोधनात खाण्यापिण्याच्या आवडी जन्माआधीच सुरू होतात असं दिसलं होतं.

चेहऱ्यावर नाखुशी आणि स्मितहास्य अल्ट्रासाउंडमध्ये दिसत आहेत पण कदाचित त्या कडू स्वादाला स्नायूंच्या हालचालीतील मिळालेली प्रतिक्रिया असू शकते.

पण त्यांनी हे देखील स्पष्ट केलं की पोटातलं बाळ हे हावभाव दाखवत असतं.

इतर शास्त्रज्ञांना काय वाटतं?

अमेरिकेतील नॉर्थवेस्टर्न युनिव्हर्सिटीतील वैद्यकशास्त्राचे प्राध्यापक डॉ. रॉबिनसन हे या संशोधनात सहभागी नव्हते.

त्यांनी एनबीसीला सांगितलं की अल्ट्रासाउंड प्रतिमांवरून कुणी हे ठरवू नये की गर्भातील बाळांना आनंद किंवा दुःख या भावना असतात आणि त्या ते व्यक्त करतात.

डॉ. ज्युली मेनेला, फिलाडेल्फियातील मोनेल केमिकल सेन्सेस सेंटरमध्ये संशोधक आहेत. त्या देखील या प्रकल्पाचा भाग नव्हत्या पण त्या या विषयातील तज्ज्ञ आहे.

त्यांनी गार्डियनला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं की या अभ्यासामुळे जुन्या संशोधनावर शिक्कामोर्तब झालं आहे. एका संशोधनानुसार असं समजतं की अर्भकांना आपल्या आईच्या खाण्या पिण्यासंबंधातील गोष्टींचं ज्ञान हे अॅमिनॉटिक फ्लुएडच्या माध्यमातून होतं.

व्हर्जिनियातील कॉलेज ऑफ विल्यम अॅंड मेरीच्या प्राध्यापिका कॅथरिन फोर्स्टेल यांनी या संशोधनाचे स्वागत केले आहे.

या संशोधनाचं नेतृत्व ज्यांनी केलं ते बेयझा उस्तुन सांगतात की अशी अनेक संशोधनं आहेत की ज्यातून हे समोर आलंय की गर्भातील बाळांना चव आणि गंधाचे ज्ञान होते. पण याची पडताळणी ही जन्मानंतर झाली आहे. पण हे पहिले संशोधन आहे ज्यात बाळाची जन्माआधीची प्रतिक्रिया नोंदवण्यात आली आहे.

या संशोधनाचा उपयोग देखील त्यांनी सांगितला. या संशोधनामुळे बाळाला काय आवडते काय आवडत नाही याची माहिती तर होऊच शकते पण बाळाचा जन्म झाल्यावर बऱ्याचदा एखादा पदार्थ आवडतच नाही असं ते मूल म्हणतं. पण जर तो पदार्थ त्या बाळाच्या पोषणासाठी आवश्यक असेल आणि जन्माआधीपासूनच बाळाला ते आवडत नाही अशी माहिती पालकांकडे असेल तर पालक त्या पदार्थाची सवय बाळाला लावू शकतात. जेणेकरून त्या बाळाचे व्यवस्थित पोषण होईल असं उस्तुन सांगतात.

म्हणजे थोडक्यात एखादा पदार्थ मला बिल्कुलच खायचा नाही म्हणून लहान मुलं जे आकांडतांडव करतात आणि त्यांच्या पालकांना त्रस्त करून सोडतात तशी परिस्थिती ओढवणार नाही.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)