धर्मेंद, देवानंद, राज कुमार यांनी नाकारलेला 'जंजीर' अखेर अमिताभ यांना कसा मिळाला?

अमिताभ बच्चन

फोटो स्रोत, NIYOGI BOOKS

    • Author, रेहान फझल
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

चाळीसच्या दशकातील प्रसिद्ध अमेरिकन गायक आणि अभिनेता फ्रँक सिनात्राला फेमस करण्यासाठी त्याच्या प्रेस एजंट जॉर्ज इव्हान्सने जबरदस्त शक्कल लढवली होती.

त्याने बारा तरुण मुलींना पैसे दिले आणि फ्रँकचं गाणं सुरू झाल्याबरोबर 'ओ फ्रँकी, ओ फ्रँकी' ओरडायचं असं सांगितलं. ओरडून झाल्यावर बेशुद्ध पडायचं नाटकही या तरुण मुलींनी करायचं होतं.

या तरुणी बेशुद्ध पडल्यावर त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जायची तजवीज देखील इव्हान्सने केली होती. हा प्रसंग टिपण्यासाठी फोटोग्राफर सुद्धा बोलावले होते. या मुलींना या नाटकासाठी प्रत्येकी पाच डॉलर्स देण्यात आले होते. विशेष म्हणजे इव्हान्सने त्याच्या देखरेखीखाली तीन दिवस या प्रसंगाची रंगीत तालीम देखील करवून घेतली होती.

न्यूयॉर्कमधील पॅरामाउंट थिएटर ठरल्याप्रमाणे शो सुरू झाला. या शो साठी इव्हान्सने 12 मुलींना पैसे दिले होते, मात्र प्रत्यक्षात 30 मुली बेशुद्ध झाल्या होत्या.

अमिताभ बच्चन यांना हे सांगायचं होतं की, गर्दी भले ही एखादयाला हिरो बनवेल, एका टप्प्यावर नेईल पण त्यापलीकडे जाण्यासाठी त्याच्याकडे टॅलेंट असणंही आवश्यक आहे.

अमिताभ बच्चन यांना पुढं येण्यासाठी अशा गोष्टींचा आधार घ्यावा लागला नाही हे मात्र चांगलं झालं.फ्रँक सिनात्राची ही गोष्ट अमिताभ बच्चन यांना कोणीतरी सांगितली होती.

फ्रँक सिनात्रा

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, फ्रँक सिनात्रा

गोष्ट ऐकून बच्चन हसले आणि म्हणाले, "एखाद्या पकडून आणून हिरो तर बनवता येतं पण कॅमेरा सुरू झाल्यावर तो एकटाच राहतो. अभिनय तर त्यालाच करावा लागेल."

सुमित्रानंदन पंत यांनी ठेवलं नाव

अमिताभ यांचा जन्म 11 ऑक्टोबर 1942 रोजी अलाहाबाद शहरात झाला. ज्या दिवशी त्यांचा जन्म झाला त्याच दिवशी त्यांचं नाव देखील ठेवण्यात आलं.

त्याचं झालं असं होतं की, त्यावेळी देशाला स्वातंत्र्याचे वेध लागले होते. हे वातावरण लक्षात घेऊन बच्चन कुटुंबियांचे मित्र असलेले पंडित अमरनाथ झा यांनी मुलाचं नाव 'इन्कलाब' ठेवावं असं सुचवलं.

अमिताभ बच्चन यांच्या जीवनावर आधारित 'अमिताभ बच्चन द फॉरएव्हर स्टार' या पुस्तकाचे लेखक प्रदीप चंद्र सांगतात की, "ज्या दिवशी अमिताभ यांचा जन्म झाला, त्याच दिवशी सुप्रसिद्ध कवी सुमित्रानंदन पंत त्यांना नर्सिंग होममध्ये भेटायला आले. बाळाला पाहून ते म्हणाले की, 'बच्चन, बघ तो किती शांत आहे. अगदी ध्यानस्थ अमिताभसारखा.'

अमिताभ बच्चन

फोटो स्रोत, AMARYLLIS

पंत यांनी उच्चारलेला 'अमिताभ' हा शब्द तेजी बच्चन यांनी मनातल्या मनात घोळवला आणि म्हणाल्या हे तर सुंदर नाव आहे.

सरतेशेवटी हरिवंश आणि तेजी या दोघांनीही आपल्या मुलाचं नाव अमिताभ ठेवण्याचा निर्णय घेतला.

घरी त्यांना अमित म्हणून हाक मारली जायची, पण तेजी बच्चन मात्र त्यांना 'मुन्ना' म्हणायच्या. अमिताभ यांचा धाकटा भाऊ अजिताभ यांना घरी 'बंटी' म्हटलं जायचं.

किरोडीमल कॉलेजच्या ड्रामा सोसायटीतून अभिनयाची सुरुवात

नैनितालच्या शेरवुड स्कूलमध्ये प्राथमिक शिक्षण घेतल्यानंतर अमिताभ बच्चन यांनी दिल्लीच्या किरोडीमल कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. तिथे त्यांना नाटकांमध्ये काम करण्याची भरपूर संधी मिळाली.

कॉलेजच्या ड्रामा सोसायटीचे प्रमुख फ्रँक ठाकूरदास हे अमिताभ यांच्या आवाजाने प्रभावित झाले होते. त्याकाळी प्रताप शर्मा हे थिएटरमध्ये गाजलेलं नाव होतं. एका नाटकात त्यांच्या भावाची मुख्य भूमिकेसाठी निवड झाली. पण ऐनवेळी त्याने वैयक्तिक कारण देत नाटकात काम करण्यास नकार दिला.

आता अशावेळी मुख्य भूमिका कोणाला द्यायची, असा पेच ठाकूरदास यांच्यासमोर उभा राहिला. यावर मी ही भूमिका करतो अशी ऑफर अमिताभ बच्चन यांनी दिली. ठाकूरदास यांनी देखील होकार दिला. संधीचा पुरेपूर फायदा घेत अमिताभ यांनी दमदार अभिनय करत प्रेक्षकांची मनं जिंकली.

किरोडीमल कॉलेज

फोटो स्रोत, KIRORI MAL COLLEGE

त्यानंतर मिरांडा हाऊसमध्ये होणाऱ्या 'रेप ऑफ द बेल्ट' या नाटकातही अमिताभ यांनी काम केलं.

त्यावेळी मुंबईच्या थिएटर विश्वात नाव कमावलेल्या डॉली ठकोर मिरांडा हाऊसमध्ये शिकायला होत्या. त्या सांगतात, "त्या काळात अमिताभ शांतपणे कोपऱ्यात बसून असायचे. ते खूप लाजाळू होते. त्यांचा धाकटा भाऊ अजिताभ त्यांच्यापेक्षा देखणा होता."

बीए पास झाल्यानंतर अमिताभ यांनी कोलकात्याच्या ट्युबार्ड्स अँड कंपनीत नोकरी सुरू केली. दोन वर्ष काम केल्यानंतर त्यांनी 'ब्लॅकर अँड कंपनी'मध्ये काम सुरू केलं. त्या कंपनीत बच्चन यांचा पगार तर वाढलाच शिवाय ऑफिसला ये-जा करण्यासाठी मॉरिस मायनर कारही देण्यात आली.

फिल्मफेअर-माधुरी टॅलेंट कॉन्टेस्ट

अमिताभ यांना अभिनयाची आवड असल्याचं त्यांच्या धाकट्या भावाला एव्हाना समजलं होतं. त्यामुळे अजिताभने अमिताभचा एक फोटो 'फिल्मफेअर-माधुरी टॅलेंट कॉन्टेस्ट'साठी पाठवला.

प्रदीप चंद्र सांगतात, "हा कॉन्टेस्ट जिंकणाऱ्याला 2500 रुपये आणि हिंदी चित्रपटात काम करण्याची संधी मिळणार होती. पण अमिताभ यांची निवड झालीच नाही. या स्पर्धेत संजय आणि फिरोज खान यांचा भाऊ समीर खान जिंकला."

"यापूर्वी धर्मेंद्र आणि राजेश खन्ना यांनी ही स्पर्धा जिंकली होती. आपल्या भारदस्त आवाजाने लोकांचं मन जिंकणाऱ्या अमिताभ बच्चन यांना ऑल इंडिया रेडिओच्या स्वर परीक्षेत सुद्धा फेल करण्यात आलं होतं."

अमिताभ आपले धाकटे बंधू अजिताभ यांच्यासोबत

फोटो स्रोत, NIYOGI BOOKS

फोटो कॅप्शन, अमिताभ आपले धाकटे बंधू अजिताभ यांच्यासोबत

पण सुनील दत्त आणि नर्गिस दत्त यांच्यामुळे अमिताभ यांना हिंदी सिनेसृष्टीत चान्स मिळाला. याचं कारण सुनील दत्त, नर्गिस दत्त आणि तेजी बच्चन यांच्यात मित्रत्वाचे संबंध होते.

पण त्याआधीही तेजी बच्चन यांनी अमिताभसाठी प्रयत्न केले होते. 1968 मध्ये त्यांनी प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक सावन कुमार टाक यांची दिल्लीत भेट घेऊन आपल्या मुलासाठी शब्द टाकला होता.

त्या दरम्यान टाक हे मिर्झा गालिबवर चित्रपट बनवण्याच्या विचारात होते. आणि त्यांनी अमिताभला मिर्झा गालिबची भूमिका द्यायचं ठरवलं. पण अमिताभ खूप उंच आहे आणि गालिब उंचीला कमी होते. त्यामुळे तो या भूमिकेत फिट बसणार नाही, असं काहींच म्हणणं पडलं.

बऱ्याच चित्रपट निर्मात्यांनी डावललं

सुनील दत्त यांच्या शिफारशीमुळे प्रसिद्ध दिग्दर्शक बीआर चोप्रा, अमिताभची स्क्रीन टेस्ट घ्यायला तयार झाले. या स्क्रीन टेस्ट मध्ये अमिताभ यांना एक डायलॉग देण्यात आला होता. तो डायलॉग असा होता की, 'तुम जब भी मुझे यूँ देखती हो मैं सब भूल जाता हूँ, क्या हूँ कहाँ हूँ कुछ समझ में नहीं आता.'

अमिताभ यांनी स्क्रीन टेस्ट तर दिली पण त्यानंतर बीआर चोप्रा यांचा साधा फोनही आला नाही. मात्र 'जंजीर' चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर त्यांनी अमिताभ यांना त्यांच्या 'जमीर' चित्रपटासाठी साइन केलं.

आपल्या स्ट्रगलच्या काळात अमिताभ यांनी प्रसिद्ध चित्रपट निर्माते ताराचंद बडजात्यांची सुद्धा भेट घेतली होती. पण त्यांच्याकडे देखील कोणतं काम मिळालं नाही.

RAJSHRI FILMS

फोटो स्रोत, RAJSHRI FILMS

फोटो कॅप्शन, RAJSHRI FILMS

बडजात्या म्हणाले, "तू खूपच उंच आहेस. तू तुझ्या वडिलांसारखा चांगला कवी होऊ शकतोस."

पुढे जाऊन याच बडजात्यांनी अमिताभ बच्चनला त्यांच्या 'सौदागर' चित्रपटात लीड रोलसाठी साईन केलं. एवढंच नाही तर ताराचंद यांचा नातू सूरज बडजात्यांनीने त्याच्या हल्लीच रिलीज झालेल्या 'उंचाईं' या चित्रपटात अमिताभ बच्चन यांना मुख्य भूमिका देऊ केली होती.

ख्वाजा अहमद अब्बास यांनी दिला पहिला ब्रेक

प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक ख्वाजा अहमद अब्बास यांच्यामुळेच बच्चन यांना हिंदी फिल्म इंडस्ट्रीमध्ये पहिला ब्रेक मिळाला.

टीनू आनंद यांची मैत्रीण नीना सिंगजवळ अमिताभचे काही फोटो होते. ते फोटो अब्बास साहेबांना दाखव अशी विनंती तिने टीनू आनंद यांना केली.

प्रदीप चंद्रा सांगतात, "फोटो बघून अब्बास साहेबांनी अमिताभ यांना बोलावणं पाठवलं. त्यावेळी बच्चन कलकत्त्यात होते. निरोप पोहोचल्यावर ते खास अब्बास यांना भेटण्यासाठी आले."

अमिताभला ब्रेक देणारे ख्वाजा अहमद अब्बास

फोटो स्रोत, KHWAJA AHMAD ABBAS MEMORIAL TRUST

फोटो कॅप्शन, अमिताभला ब्रेक देणारे ख्वाजा अहमद अब्बास

"भेट झाल्यानंतर अमिताभ तिथून निघून गेले. त्यावेळी अब्बास टीनूला म्हणाले की, ते अमिताभला फक्त 5000 रुपये देतील. आणि चित्रपटाला महिना लागेल की वर्ष सांगता येत नाही. टीनू यांनी घडलेला प्रकार अजिताभ यांच्या कानावर घातला, पण ते फारसे खूश झाले नाहीत. अमिताभ यांच्या दोन महिन्यांच्या पगाराएवढी ती रक्कम होती."

ख्वाजा अहमद अब्बास यांची भाची सय्यदा हमीद यांनी बीबीसीशी बोलताना या प्रसंगाचा उल्लेख केला होता.

सय्यदा यांनी सांगितलं होतं की, "अब्बास यांनी त्यांचे सचिव अब्दुल रहमान यांना बोलवून अमिताभ यांचे काँट्रॅक्ट डिटेल्स सांगितले. त्यांनी पुन्हा एकदा अमिताभ यांना त्यांचं पूर्ण नाव आणि पत्ता विचारला. यावेळी अमिताभ यांनी त्यांचं नाव सांगितलं व वडिलांचं नाव बिचकत बिचकत सांगितलं."

यावर अब्बास ओरडले आणि थांबण्याचा इशारा केला. ते म्हणाले, "जोपर्यंत तुझ्या वडिलांची परवानगी मिळत नाही तोपर्यंत तुला या काँट्रॅकवर सह्या करता येणार नाहीत. ते माझ्या ओळखीतले असून सोव्हिएत लँड नेहरू अवॉर्ड कमिटीमध्ये ते माझे सहकारी होते. तुला आणखीन दोन दिवस वाट पाहावी लागेल."

अशा प्रकारे ख्वाजा अहमद अब्बास यांनी काँट्रॅक्ट न करता हरिवंशराय बच्चन यांना तार केली आणि विचारलं की, "तुमचा मुलगा अभिनेता बनतोय, याला तुमची काही हरकत नाही ना?"

आणि या सगळ्यानंतर 15 फेब्रुवारी 1969 रोजी अमिताभ यांच्या पदरी 'सात हिंदुस्तानी' हा पहिला चित्रपट पडला.

अब्बास यांनी घेतली उर्दूची टेस्ट

या चित्रपटात टीनू आनंद देखील काम करणार होते. पण ऐनवेळी सत्यजित राय यांनी त्यांना आपल्याकडे बोलवून घेतलं. त्यामुळे टिनू आनंदचा रोल अमिताभ बच्चन यांच्या पदरात पडला. आणि त्याआधी अमिताभ यांना जो रोल ऑफर झाला होता तो मेहमूदचे भाऊ अन्वर अली यांना देण्यात आला.

त्याचं दिवसांत अमिताभ आणि ऋषी कपूर यांची भेट झाली.

अमिताभ बच्चन

फोटो स्रोत, AMARYLLIS

या भेटीचा उल्लेख ऋषी कपूर यांनी त्यांच्या 'खुल्लमखुल्ला' या आत्मचरित्रात केलाय. त्यांनी लिहिलंय की, "टिनू आनंद माझा मित्र असल्याने माझं त्याच्या घरी येणंजाणं असायचं. एकदा मी त्याच्या घरी गेलो असताना मला एक सडपातळ व्यक्ती जमिनीवर मांडी घालून बसलेला आढळला. हा व्यक्ती ख्वाजा अहमद अब्बास यांनी दिलेली टेस्ट सोडवत होता."

"खरं तर अमिताभ यांनी उर्दूची टेस्ट द्यावी अशी अब्बास यांची इच्छा होती. कारण चित्रपटातील बरेचसे डायलॉग उर्दूमध्ये होते. अमिताभ यांनीही याविषयी सांगितलं की, 'त्यावेळी मला उर्दू अजिबात येत नव्हतं. मी पहिल्यांदाच जायका हा उर्दू शब्द ऐकला होता ज्याचा अर्थ स्वाद असा होता."

दारूपासून चार हात लांब

'सात हिंदुस्तानी' या पहिल्याच चित्रपटासाठी अमिताभ यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.

प्रदीप चंद्रा त्यांच्या पुस्तकात लिहितात, "अब्बास साहेब कमी बजेटचे चित्रपट बनवायचे. जेव्हा ते खुश असायचे तेव्हा आपल्या सोबतच्या व्यक्तीच्या हातावर 50 रुपये ठेऊन आनंद साजरा करायला सांगायचे."

आणि हे 50 रुपये बच्चन यांना मिळाले. पैसे मिळताच बच्चन, जलाल आगा आणि अन्वर अली या तीन मित्रांनी ती संध्याकाळ संस्मरणीय बनवायचं ठरवलं. तिघेही भरपूर प्यायले.

अमिताभ बच्चन

फोटो स्रोत, AMARYLLIS

दुसऱ्या दिवशी अन्वर अली यांनी बच्चन यांना सल्ला देताना म्हटलं की, जोपर्यंत तुझं इंडस्ट्रीत नाव होत नाही तोपर्यंत दारूला हात लावू नको. अमिताभ यांनी त्याचवेळी दारू सोडण्याचा निर्णय घेतला.

विशेष म्हणजे हा निर्णय त्यांनी आजतागायत पाळला होता. पण धाकट्या भावाच्या म्हणजे अजिताभच्या लग्नात त्यांनी दारूचे दोन घोट घेतले होते.

मृणाल सेन यांनी व्हॉईस ओव्हरचं काम दिलं

त्या काळात प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक मृणाल सेन यांनी अमिताभ बच्चन यांना व्हॉईस ओव्हरचं काम दिलं होतं.

सेन एकदा अब्बास यांच्या घरी आले होते. त्यावेळी ते त्यांच्या 'भुवन शोम' चित्रपटाला आवाज देईल अशा एका चांगल्या नरेटरच्या शोधात होते.

ही गोष्ट ऐकताच अमिताभ यांनी मृणाल सेन यांना बंगाली भाषा येत असल्याचं सांगितलं. मृणाल यांनी सुद्धा त्यांचा आवाज ऐकला. त्यांना आवाज आवडला पण बंगाली बोलण्याचा टोन काही आवडला नाही.

भुवन शोमचे दिग्दर्शक मृणाल सेन

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, भुवन शोमचे दिग्दर्शक मृणाल सेन

पण त्यांनी त्यांच्या हिंदी चित्रपटाच्या नरेशनसाठी बच्चन यांची निवड केली. या कामासाठी सेन यांनी बच्चन यांना 300 रुपये दिले.

'भुवन शोम' जेव्हा रिलीज झाला तेव्हा त्याच्या क्रेडिट लिस्टमध्ये अमिताभ यांचं देखील नाव होतं. भारतीय सिनेसृष्टीत हा चित्रपट मैलाचा दगड ठरला. या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपट, दिग्दर्शक आणि अभिनेता या कॅटेगरीत तीन राष्ट्रीय पुरस्कार मिळाले.

आनंदच्या भूमिकेने सर्वांचं लक्ष वेधलं

'सात हिंदुस्तानी'नंतर अमिताभ बच्चन यांनी 10 चित्रपट केले. हे दहाच्या दहा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सपाटून आपटले.

1971 मध्ये त्यांचा 'परवाना' हा चित्रपट आला होता. यात नवीन निश्चल हिरोच्या भूमिकेत तर अमिताभ बच्चन निगेटिव्ह रोलमध्ये होते.

याच दरम्यान सुनील दत्त 'रेश्मा और शेरा' नावाचा चित्रपट करत होते. यात त्यांनी बच्चन यांना संधी दिली. पण हा रोल एक मुक्या माणसाचा होता.

हरिवंशराय बच्चन त्यांच्या आत्मचरित्रात लिहितात, "अमिताभच्या अभिनय कौशल्याची हीच खरी परीक्षा होती. कारण त्याला एकही शब्द न उच्चारता आपल्या भावना प्रेक्षकांपर्यंत पोहोचवायच्या होत्या".

असंच एकदा अमिताभ बच्चन आणि ख्वाजा अहमद अब्बास हृषिकेश मुखर्जींना त्यांच्या घरी भेटायला गेले होते. त्यावेळी मुखर्जी त्यांच्या 'आनंद' चित्रपटासाठी अभिनेत्याच्या शोधात होते.

वडील हरिवंशराय बच्चन यांच्यासोबत

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, वडील हरिवंशराय बच्चन यांच्यासोबत

अमिताभ बच्चन यांना पाहताच त्यांना आपल्या चित्रपटाचा 'बाबू मोशाय' भेटल्याची जाणीव झाली.

याआधी या रोलसाठी प्रसिद्ध बंगाली अभिनेते उत्तम कुमार यांची निवड करण्यात आली होती. पण नंतर मुखर्जी यांनी एका मुलाखतीत सांगितलं की, "अमिताभचा आवाज आणि डोळ्यांमध्ये असणारी गंभीरता यामुळे मी त्याची निवड केली. मला हे सांगताना अजिबात दुःख होत नाहीये की, या चित्रपटात राजेश खन्नापेक्षा अमिताभ उजवा ठरला होता."

अमिताभ आणि जया यांच्यात वाढलेली जवळीक

एवढे चित्रपट करून देखील अमिताभ आत्तापर्यंत एकही हिट चित्रपट देऊ शकले नव्हते. याच दरम्यान जया भादुरी आणि अमिताभ यांच्यात जवळीक वाढू लागली होती. दोघेही एकमेकांना पसंत करू लागले होते.

1971 मध्ये अमिताभ आणि जयाला घेऊन हृषीकेश मुखर्जी 'गुड्डी' चित्रपट बनवणार होते. पण अखेरच्या क्षणी त्यांनी निर्णय बदलला आणि दोघेही दुखावले.

पण पुढच्याच वर्षी एकत्र काम करण्याची संधी चालून आली.

जया भादुरी-अमिताभ

फोटो स्रोत, AMARYLLIS

बीआर इशारा 'एक नजर' नावाचा चित्रपट करत होते, यात त्यांनी अमिताभ आणि जया यांना संधी दिली.

या चित्रपटात अमिताभ आणि जयाला घ्या असं धर्मेंद्र यांचे सचिव दीनानाथ शास्त्री यांनी बीआर इशारा यांना सांगितलं होतं. मात्र चित्रपटाची स्क्रिप्ट ऐकून जया चित्रपटात काम करण्यास नकार देईल असं इशारा यांना वाटत होतं आणि तसं घडावं अशी त्यांची इच्छाही होती. पण जया आणि अमिताभने चित्रपटात काम करण्यास होकार दिला आणि इशारांच्या इराद्यांवर पाणी फेरलं.

'एक थी सुधा, एक था चंदर' नावाच्या चित्रपटासाठी देखील ता दोघांना साईन करण्यात आलं. हा चित्रपट प्रसिद्ध हिंदी लेखक डॉ. धरमवीर भारती यांच्या 'गुनाहों का देवता' या कादंबरीवर आधारित होता. मात्र आर्थिक अडचणींमुळे हा चित्रपट अर्धवट राहिला.

सलग 12 चित्रपट फ्लॉप

भले ही अमिताभ यांचे सुरुवातीचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपटत असतील पण त्यांच्या अभिनयाने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं.

प्रदीप चंद्र सांगतात, "अमिताभ यांच्याकडे टॅलेंट नसतं तर त्यांना एकामागून एक असे 12 चित्रपट मिळालेच नसते. तिसऱ्याच चित्रपटानंतर त्यांना आपला बोजा बिस्तरा बांधावा लागला असता."

त्यांच्यासोबत काम करणाऱ्या सहकलाकारांनी त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला होता. त्यांच्यासोबत 'परवाना'मध्ये काम करणाऱ्या ओम प्रकाश यांनी सुद्धा त्यांच्या अभिनयाचं कौतुक केलं होतं.

अमिताभ बच्चन

फोटो स्रोत, FACEBOOK

फोटो कॅप्शन, अमिताभ बच्चन

फेमस व्हिलन प्रेम चोप्रा यांनी बच्चन यांच्यासोबत सलग 27 चित्रपटांमध्ये काम केलंय. त्यांनी देखील बच्चन साहेबांच्या अभिनयाचं कौतुक केलंय. पण हिट चित्रपट न दिल्यामुळे त्यांना बऱ्याच चित्रपटातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला.

1972 मध्ये आलेल्या 'अपने पराए' साठी त्यांना साईन करण्यात आलं. कुंदन कुमार चित्रपटाचे डायरेक्टर होते. चित्रपट अर्धा अधिक शूट झाला आणि बच्चन यांना चित्रपटातून बाहेर काढण्यात आलं. त्याऐवजी संजय खान यांना घेण्यात आलं. चित्रपटाचं नाव बदलून 'दुनिया का मेला' करण्यात आलं.

जावेद अख्तर यांच्यामुळे 'जंजीर' मिळाला

त्यावेळी प्रकाश मेहरा 'जंजीर' नावाचा चित्रपट बनवत होते. त्यावेळी धर्मेंद्र, राज कुमार आणि देवानंद यांना लीड रोल देण्याचा विचार होता. मात्र या तिघांनीही या ना त्या कारणाने हा चित्रपट नाकारला.

प्रदीप चंद्रा सांगतात की "त्यावेळी जावेद अख्तर यांना कुठून तरी बच्चन यांचा फोन नंबर मिळाला. त्यांनी फोन करून स्क्रिप्ट ऐकवायची आहे असं सांगितलं. त्यावेळी अमिताभ यांच्या हातात फारशी अशी कामं नव्हती. त्यामुळे त्यांनी अख्तर यांना बोलावून घेतलं. त्याकाळात बच्चन मंगल या त्यांच्या बंगल्यात राहत होते, अख्तर टॅक्सीने त्यांच्या घरी पोहोचले."

"स्क्रिप्ट ऐकल्यानंतर अमिताभ यांनी जावेद अख्तर यांना विचारलं की, ही भूमिका वठवण्याची क्षमता माझ्यात आहे का? यावर जावेद म्हणाले, या भूमिकेला तुमच्या व्यतिरिक्त दुसरा कोणताच व्यक्ती न्याय देऊ शकत नाही."

जावेद अख्तर-अमिताभ

फोटो स्रोत, NIYOGI BOOKS

फोटो कॅप्शन, जावेद अख्तर-अमिताभ

चित्रपट येऊन गेल्यानंतर बऱ्याच वर्षांनी अमिताभ बच्चन यांनी जावेद अख्तर यांना विचारलं की, "प्रकाश मेहरांनी चित्रपटात कास्ट करावं म्हणून तुम्ही काय सांगितलं होतं?

यावर जावेद म्हणाले, 'मी 'बॉम्बे टू गोवा' पाहिला होता. दोघांमध्ये एक फाईटचा सीन होता. फाईटच्या सुरुवातीला तुम्ही च्युइंगगम चघळत होता. समोरच्याने ठोसा मारल्यानंतर खाली पडल्यावरही तुम्ही च्युइंगम चघळत होता. हा सीन पाहून मी ठरवलं की, जंजीर चित्रपटात तुमच्या व्यतिरिक्त दुसऱ्या कोणालाही कास्ट करणार नाही."

जावेद अख्तर प्रकाश मेहरांसोबत रूपतारा स्टुडिओमध्ये पोहोचले. त्याच स्टुडिओमध्ये अमिताभ, जितेंद्र आणि हेमा मालिनी यांच्या 'गहरी चाल' चित्रपटाचं शूटिंग सुरू होतं. आणि त्याच ठिकाणी अमिताभ यांनी त्यांच्या कारकिर्दीतील 13 वा चित्रपट साइन केला.

एवढंच नाही तर या चित्रपटात त्यांच्या होणाऱ्या पत्नीला म्हणजेच जया भादुरी यांना हिरोईन म्हणून साईन करण्यात आलं.

जंजीर मिळाला नसता तर? असा प्रश्न एकदा अमिताभ यांना विचारण्यात आला होता.

त्यावर अमिताभ म्हणाले, "माझ्याकडे दुसरे कोणते ऑप्शन्स नव्हते. त्यावेळी मला कोणी साधे रोल सुद्धा ऑफर करत नव्हतं. आणि जंजीर हा एकमेव चित्रपट माझ्या हातात होता."

अंग्री यंग मॅनची एन्ट्री

1973 मध्ये रिलीज झालेला 'जंजीर' सुपरडुपर हिट ठरला. फिल्मफेअर अवॉर्ड्सच्या नऊ कॅटेगरीमध्ये या चित्रपटाला नामांकन मिळालं होतं. त्यावेळी प्राण यांच्यावर चित्रित केलेलं 'यारी है इमान मेरा' हे गाणं त्यावर्षातलं हिट गाणं ठरलं होतं.

जंजीरमध्ये अमिताभ बच्चन आणि जया बच्चन

फोटो स्रोत, AMARYLLIS

फोटो कॅप्शन, जंजीरमध्ये अमिताभ बच्चन आणि जया बच्चन

या चित्रपटाने एका साध्या हिरोला सुपरस्टार बनवलं होतं. इथून त्यांना 'अँग्री यंग मॅन' अशी ओळख मिळाली आणि बच्चन नॅशनल क्रेझ बनले.

मात्र अमिताभ बच्चन यांच्या मते, त्यांची अँग्री यंग मॅनची इमेज हृषीकेश मुखर्जी यांच्या 'नमकहराम' चित्रपटाच्या वेळीच तयार झाली होती.

हृषीकेश मुखर्जी यांचं म्हणणं होतं की, 'आनंद चित्रपटावेळीच त्यांनी अमिताभ बच्चन यांचा ऑन-स्क्रीन प्रेझेन्स अनुभवला होता.'

ते एकदा म्हणाले होते की, "मला अंदाज आलाच होता की, त्यांचे डोळे आणि त्यांचा आवाज यांत भूमिका सशक्त बनवण्याची क्षमता आहे. त्यामुळेच मी त्यांना 'नमकहराम' मध्ये अँग्री यंग मॅनची भूमिका देऊ केली होती."

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)