स्वदिच्छा सानेचा मृतदेह फेकण्यासाठी टायर ट्यूबचा वापर? #5मोठ्याबातम्या

आज सकाळी वेगवेगळी वृत्तपत्रं आणि वेबसाईट यांच्यावर प्रकाशित झालेल्या बातम्याचा थोडक्यात आढावा.

1. स्वदिच्छा सानेचा मृतदेह फेकण्यासाठी टायर ट्यूबचा वापर? संशयिताच्या घरात सापडले...

मुंबईतील एमबीबीएसची विद्यार्थिनी स्वदिच्छा सानेच्या हत्येच्या प्रकरणात नवनवी माहिती समोर येत आहे.

या तपासात प्रमुख संशयित मिट्टू सिंग याच्या घरात एक टायर ट्यूब सापडली असून त्यावर रक्ताचे डाग आढळले आहेत. स्वदिच्छाचा मृतदेह खोल पाण्यात फेकण्यासाठी त्याने याचा वापर केल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. पोलीस आता साने कुटुबींयांच्या रक्ताचे नमुने आणि ट्युबवर सापडलेले रक्ताचे नमुने याची पडताळणी करणार आहे. जर ते जुळले तर मिट्टू सिंग विरोधात मोठा पुरावा पोलिसांना मिळेल. मिट्टू सिंग सध्या आर्थर रोड तुरुंगात आहे. ही बातमी इंडियन एक्सप्रेसने दिली आहे.

सिंग आणि साने यांच्यातील वादात स्वदिच्छा वांद्रे बँडस्टँड येथील एका दगडावर पडली आणि तिच्या डोक्याला मार लागला. त्यानंतर सिंगने लाईफ जॅकेट आणि टायर ट्यूबचा वापर करुन तिला खोल पाण्यात नेऊन टाकलं. त्यानंतर तो ट्यूब घेऊन घटनास्थळावरुन पळून गेला असं सूत्रांनी सांगितलं आहे.

2. मुख्यमंत्रिपद सोडणं मोठी चूक- अजित पवारांनी व्यक्त केली खदखद

माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या मनातला आजवरचा मोठा सल एका मुलाखतीत बोलून दाखवला आहे. 2004 साली मुख्यमंत्रिपदावर पाणी सोडणं ही सर्वात मोठी चूक होती अशी कबुली अजित पवार यांनी दिली आहे. इतकंच नव्हे तर मुख्यमंत्रिपद घेतलं असतं, तर सत्तेत आम्हीच राहिलो असतो, असंही अजित पवार लोकमतला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हणाले आहेत.

2004 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरला होता. राष्ट्रवादीला 71, काँग्रेसला 69, शिवसेनेला 62 आणि भाजपला 56 जागा मिळाल्या होत्या. तरीही राष्ट्रवादीने मुख्यमंत्रीपद नाकारलं आणि काँग्रेसचा मुख्यमंत्री झाला, याबदल्यात राष्ट्रवादीला महत्त्वाची खाती मिळाली. ही बातमी न्यूज 18 लोकमतने दिली आहे.

3. बोललेले शब्द मागे घ्यायला मी काही चंद्रकांत पाटील नाही- सुषमा अंधारे

महापुरुषांबद्दल केलेल्या वक्तव्याबद्दल सुषमा अंधारे यांनी पुन्हा एकदा नवं वक्तव्य केलं आहे. पुण्यातील एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी भाजपावर टीका केली आणि आपली बाजू मांडली.

अंधारे म्हणाल्या, "मोदींजींच्या कॅम्पनिंगमध्ये 3 टप्पे आहेत डॅमेज, होप आणि अॅक्शन. नेहरुंवर बोलून देखील मोदींना ते डॅमेज करता येत नाहीत. महापुरुषांवर बोलणं म्हणजे जीभ घसरली, चुकून बोललो असं नाही. हे लोक ठरवून डॅमेज करत आहेत. जाणीवपूर्वक हे लोक महापुरुषांना डॅमेज करत आहेत.

एकनाथ शिंदेना उभा करण्यासाठी त्यांनी उद्धव ठाकरे यांना डॅमेज केलं. संजय राऊत यांनी डॅमेज केलं की हा माणूस शिवसेना संपवणार आहे, असा प्रचार सुरु होतो. अनिल देशमुखांनाही त्यांनी डॅमेज केलं आहे. हे लोक महापुरुषांना ठरवून डॅमेज करत आहेत, त्यांना हेडगेवार आणि गोळवलकर यांना स्थापित करायचं आहे. मी माझ्या प्रत्येक शब्दावर आणि वाक्यावर ठाम असते बोललेला शब्द मागे घ्यायला मी काही चंद्रकांत पाटील नाही"

ही बातमी सकाळने दिली आहे.

4. वाहतूक नियमन करताना पोलिसाचा मृत्यू

पुण्यातील सेनापती बापट जंक्शन येथे एका वाहतूक पोलीस उपनिरीक्षकांचा मृत्यू झाला आहे. सुनील मोरे असं यांचं नाव असून ते 57 वर्षांचे होते. शुक्रवार 3 फेब्रुवारी रोजी वाहतूक नियमन करत असताना त्यांचा डावा हात दुखू लागला. त्यानंतर ते थेट जमिनीवर कोसळले. त्यांना रुग्णालयात नेले असताना त्यांचा मृत्यू झाल्याचं लक्षात आलं.

"मोरे यांना खात्यांतर्गत नुकतीच पदोन्नती मिळाली होती. मोरे कर्तव्यनिष्ठ अधिकारी होते", असे चतु:शृंगी वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक (वाहतूक) बी. डी. कोळी यांनी सांगितले. ही बातमी महाराष्ट्र टाइम्सने दिली आहे.

5. न्यायाधीशांच्या नियुक्तीबद्दल सर्वोच्च न्यायालय म्हणाले...

सर्वोच्च न्यायालय आणि केंद्र सरकार यांच्यातील न्यायाधीशांच्या नियुक्तीवरुन तयार झालेला वाद अजूनही सुरूच आहे.

न्यायमूर्ती संजय किशन कौल आणि अभय ओक यांच्या खंडपीठासमोर कॉलेजियमने पाठवलेल्या नावांबद्दल सुरू असलेल्या प्रकरणाची सुनावणी झाली. त्यावर कॉलेजियमने पाठवलेल्या 5 नावांना कधीपर्यंत मंजुरी मिळेल असा प्रश्न न्यायालयाने महान्यायवाद्यांना विचारला. यावर महान्यायवादी एन. व्यंकटरामाणी यांनी या नावांना लवकरच मंजुरी मिळेल पण किती वेळ याबद्दल विचारू नका असे उत्तर दिले.

त्यावर कौल यांनी, कठोर निर्णय घेण्यास भाग पाडू नका. 10 दिवसांचा वेळ देत आहोत. आम्हाला चांगली बातमी मिळेल अशी अपेक्षा आहे असं महान्यायवाद्यांना सांगितलं. ही बातमी लोकसत्ताने दिली आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)