वसंतराव नाईकः शिवसेना आणि काँग्रेस आतापर्यंत या 5 प्रसंगी एकत्र आले होते

    • Author, नामदेव अंजना
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

काँग्रेस-शिवसेना यांचं आजवरचं नातं जरा वेगळं राहिलं आहे. शिवसेना हा पक्ष स्थापनेपासूनच काँग्रेसचा विरोधक राहिला असला तरी गेल्या पन्नास वर्षांच्या काळात अनेकदा असे प्रसंग आले, ज्यावेळी शिवसेना आणि काँग्रेस यांच्यात जवळीक साधली गेली.

एक नजर अशाच काही प्रसंगांवर.

1) जेव्हा शिवसेनेला 'वसंतसेना' म्हणायचे

महाराष्ट्रात साठच्या दशकात कामगारांचा संप, 'मुंबई बंद'ची हाक यामधून केवळ गिरणीच नव्हे; तर सर्व कामगारांची एकजूट झाल्याने डाव्या पक्षांची ताकद वाढत होती. जॉर्ज फर्नांडिस यांचा दबदबा वाढत चालला होता. ही काँग्रेसपुढील डोकेदुखी होती अन् त्यावर उताराही सापडला. तो म्हणजे, शिवसेनेचा उदय.

बाळासाहेब ठाकरे यांनी 1966 मध्ये मुंबईत शिवसेनेची स्थापना केली. शिवसेना डाव्या पक्षांना शह देईल म्हणून काँग्रेसही शिवसेनेला खतपाणी घालत असल्याचा त्यावेळी आरोप झाला. वसंतराव नाईक उघडपणे शिवसेनेची पाठराखण करत आहेत, अशी टीका करत शिवसेनेला 'वसंतसेना' म्हटलं गेलं.

पत्रकार सुजाता आनंदन सांगतात की, "त्याकाळी विनोदानं शिवसेनेला वसंत सेना म्हटलं जायचं. महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्याशी असलेल्या जवळीकीमुळं सेनेला हे टोपण नाव मिळालं होतं."

'सत्तासंघर्ष' या पुस्तकात ज्येष्ठ राजकीय विश्लेषक सुहास पळशीकर सांगतात, "काँग्रेसच्या विविध गटांकडून वा नेत्यांकडून वेळोवेळी शिवसेनेला प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष पाठिंबा मिळाला. अगदी सुरुवातीच्या काळात रामराव आदिक आणि बाळासाहेब देसाई यांची शिवसेनेला सहानुभूती मिळाली. वसंतराव नाईक यांच्याशी सख्य असल्यामुळे शिवसेनेला एका टप्प्यावर 'वसंतसेना' असेही म्हटले जाई."

2) बाळासाहेब ठाकरेंचा आणीबाणीला पाठिंबा

सर्व विरोधकांना डावलून तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी लादलेल्या आणीबाणीचं बाळासाहेब ठाकरेंनी समर्थन केलं होतं. 1978 मध्ये जनता सरकारनं जेव्हा इंदिरा गांधींना अटक केली, तेव्हा त्याविरोधात शिवसेनेनं बंदही पुकारला होता.

महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांनी आणीबाणीच्या समर्थनासाठी त्यांना भाग पाडलं होतं, असं सुजाता आनंदन यांनी म्हटलं.

आनंदन सांगतात, "चव्हाण यांनी निरोप पाठवून ठाकरेंसमोर दोनच पर्याय ठेवले होते - एक म्हणजे, अन्य विरोधकांप्रमाणे अटकेसाठी तयार राहणं किंवा आपल्या ठेवणीतले कपडे घालून दूरदर्शनच्या स्टुडिओत जायचं आणि आणीबाणीचं समर्थन करायचं.

"हा निर्णय घेण्यासाठी त्यांना अर्ध्या तासाचा वेळ दिला होता. सरकार या प्रश्नावर गंभीर आहे, याची ठाकरेंना जाणीव होती. कारण शंकरराव चव्हाणांनी निरोप पाठवतानाच पोलिसांचा एक ताफाही ठाकरेंच्या घरी पाठवला होता. आपल्या सहकाऱ्यांसोबत विचार-विमर्श केल्यानंतर ठाकरे अवघ्या पंधरा मिनिटांत दूरदर्शन स्टुडिओत जाण्यासाठी बाहेर आले."

आणीबाणी लादणाऱ्या इंदिरा गांधी काँग्रेसच्या नेत्या होत्या. त्यामुळं आणीबाणीच्या निमित्तानंही काँग्रेस-शिवसेना हा धागा भारताच्या राजकीय इतिहासात जुळला होता.

3) मुंबई महापौरपदासाठी मुरली देवरांना पाठिंबा

1977 साली काँग्रेसचे नेते मुरली देवरा हे मुंबईचे महापौर झाले. विशेष म्हणजे, मुरली देवरा यांना महापौर बनवण्यासाठी शिवसेनेनं जाहीर पाठिंबा दिला होता. मुरली देवरा नंतर लोकसभेत निवडून गेले आणि केंद्रीय मंत्रिपदही त्यांनी भूषवलं.

मुरली देवरा यांचं सर्वपक्षीयांशी असलेले चांगले संबंध हे जरी शिवसेनेच्या पाठिंब्यामागचं कारण असलं, तरी मुरली देवरांच्या महापौरपदानिमित्त शिवसेना आणि कांग्रेसने जवळीक साधली होती, हे निश्चित.

4) काँग्रेस नेत्या प्रतिभा पाटील यांना राष्ट्रपतिपदासाठी समर्थन

काँग्रेस नेते हुसैन दलवाई यांनी राज्यात शिवसेनेला पाठिंबा देण्यासाठी जे पत्र काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना लिहिलंय, त्या त्यांनी या प्रसंगाची आठवण करून दिलीय. जेव्हा काँग्रेसने प्रतिभा पाटील आणि प्रणव मुखर्जी यांची नावं राष्ट्रपतिपदासाठी पुढे केली होती, तेव्हा शिवसेनेने काँग्रेसच्या या उमेदवारांना पाठिंबा दिला होता, असं दलवाई म्हणाले आहेत.

2007 साली राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी काँग्रेसप्रणित UPAकडून प्रतिभा पाटील तर भाजपप्रणित NDAकडून भैरोसिंह शेखावत उमेदवार होते. त्यावेळी मराठी व्यक्ती राष्ट्रपतिपदावर विराजमान व्हावी, असं म्हणत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी प्रतिभा पाटील यांना पाठिंबा दिला होता.

भाजपच्या दिग्गज नेत्यांनी बाळासाहेबांचं मन वळवण्याचा प्रयत्न केला, मात्र ते आपल्या भूमिकेवर ठाम राहिले.

5) NDAच्या उमेदवाराला नाकारून प्रणव मुखर्जींना पाठिंबा

2012 साली राष्ट्रपतिपदाची निवडणूक असताना, शिवसेनेची मतं निर्णायक ठरणार होती. काँग्रेसप्रणित UPAचे उमेदवार प्रणव मुखर्जी हे होते. विशेष म्हणजे, यावेळीही भाजपप्रणित NDAने पी. ए. संगमा यांना राष्ट्रपतिपदासाठी निवडणुकीत पाठिंबा दिला होता.

त्यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे प्रणव मुखर्जी यांना घेऊनच थेट 'मातोश्री'वर गेले आणि बाळासाहेबांचा पाठिंबा मिळवला. आणि NDAच्या निर्णयापासून वेगळे राहत शिवसेना त्यांच्या पाठीशी उभी राहिली, ज्यांना बाळासाहेब प्रेमाने 'प्रणवबाबू' म्हणायचे.

या निवडणुकीच्या काही दिवासांपूर्वीच संगमा यांनी शरद पवारांशी फारकत घेऊन राष्ट्रवादीतून बाहेर जाण्याचा निर्णय घेतला होता.

ज्येष्ठ पत्रकार भारतकुमार राऊत सांगतात की बॅरिस्टर अंतुले हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना त्यांच्या पाठिंब्यावर शिवसेनेचे तीन आमदार विधानपरिषदेवर निवडून गेले होते. भारतकुमार राऊत हे महाराष्ट्र टाइम्सचे माजी संपादक आणि शिवसेनेचे माजी खासदार होते.

"काँग्रेस आणि शिवसेनेनं ठरवलं असतं तर दोन्ही पक्ष एकत्र येऊ शकले असते. कारण हे दोन्ही पक्ष वैचारिकरीत्या वेगवेगळे असले तरी प्रॅक्टिकली ते एकत्रित आले असते," असं मतही भारतकुमार राऊतांनी व्यक्त केलं.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)