हवा शुद्ध करण्यासाठी मुंबईत बसणार शुद्धीकरण यंत्र; महानगरपालिकेचा 52 हजार 553 कोटींचा अर्थसंकल्प सादर

मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प

फोटो स्रोत, Hindustan Times

फोटो कॅप्शन, मुंबई
    • Author, प्राजक्ता पोळ
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

मुंबई महापालिकेचा 52 हजार 553 कोटींचा अर्थसंकल्प आज मांडण्यात आला. महापालिकेच्या आजवरच्या इतिहासातला हा सर्वात मोठा अर्थसंकल्प आहे. 2022-23 साली 45,949 कोटींचा अर्थसंकल्प मांडण्यात आला होता.

मुंबई महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदा भांडवली खर्च हा महसूल खर्चापेक्षा अधिक आहे. रस्ते, पर्जन्य जलवाहिन्या, पूल, सागरी किनारा रस्ता प्रकल्प, गोरेगाव मुलुंड लिंक रोड, मलनि:सारण प्रक्रीया केंद्र, पाणी पुरवठा प्रकल्प अश्या बर्‍याच भांडवली प्रकल्पांवरील खर्च महापालिकेने तयार केलेल्या निधीतून करण्यात येणार आहे.

मालमत्ता करामध्ये 2200 कोटींची घट झालेली आहे. 500 चौ. फूट पेक्षा कमी चटईक्षेत्र असलेल्या सदनिकांना मालमत्ता करातून देण्यात आलेली सूट आणि दुसरे महापालिका अधिनियम 1888 च्या कलम 154 नुसार मालमत्ता कर मधील सुधारणा 2020-21 पासून लागू होती पण 2021-22 मध्ये कोरोना महासाथीत सुधारणेची अंमलबजावणी पुढे ढकलली.)

स्वच्छ हवेसाठी उपाययोजना करण्यात येणार आहेत. बांधकामाच्या ठिकाणी धूळ कमी करण्यासाठी बांधकाम व्यवसायिकांना मार्गदर्शक तत्वे, रस्त्यावरील धूळ कमी करण्यासाठी ई-स्वीपरचा वापर, धुळीस अटकाव करण्यासाठी स्पिंकलर, वायू शुध्दीकरण युनिटस्, महापालिकेच्या ताफ्याचे ई वाहन ताफ्यात रूपांतर करणार, बेस्टसाठी 3000 इलेक्ट्रिक बसेस खरेदी, जुन्या पेट्रोल, डिझेल गाड्यांचे सीएनजीमध्ये रूपांतर, कचरा जाळण्यावर बंदी, कचर्‍याचे बायोमायनिंग, 1 लाख झाडे लावणार, वायू गुणवत्ता देखरेख केंद्रांची उभारणी या उपाययोजना करण्यात येणार आहेत.

अर्थसंकल्पातील महत्त्वाच्या नोंदी-

  • सुरू असलेल्या प्रकल्पांमध्ये अडथळा येऊ नये म्हणून internal temporary transfer मधून निधी उभा केला जाईल. (51147 कोटींच्या मुदत ठेवींमधून तो उभा केला जाण्याची शक्यता आहे.)
  • मुंबईचे सौंदर्य वाढवण्यासाठी 1729 कोटींची विकास कामे हाती घेतली आहेत.
  • दहिसर टोल नाका, मुलुंड चेकनाका, मानखुर्द, कलानगर जंक्शन, हाजीअली जंक्शन या 5 ठिकाणी हवा शुद्धिकरण यंत्रं बसवली जाणार.
  • बेस्ट उपक्रमास 2022-23 मध्ये 1382 कोटी रूपये देण्यात आले होते. 2023-24 मध्ये बेस्ट उपक्रमासाठी 800 कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
  • 31 मार्च 2023 पर्यंत 18 अतिरिक्त पॉलीक्लिनिक, डायग्नॉस्टिकक सेंटर्स आणि 131 हिंदूहदयसम्राट बाळासाहेब ठाकरे दवाखाना सुरू करण्याचे नियोजिले आहे.
  • एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार उच्च रक्तदाब, मधुमेह, आणि इतर असंसर्गजन्य रोगांना तोंड देण्यासाठी 'आरोग्यम् कुटुंबम्' हा कार्यक्रम हाती घेतला आहे.
  • आगामी शैक्षणिक वर्षांपासून, इलेक्ट्रॉनिक्स, कृत्रिम बुद्धिमत्ता (artificial intelligence), फॅशन डिझायनिंग, कोडींग, रोबोटिक्स, tourism & hospitality, हे अभ्यासक्रम राबवले जातील. 249 माध्यमिक शाळांमध्ये हे प्रशिक्षण देण्याचे प्रस्तावित आहे.
  • 9 मीटर पेक्षा जास्त रूंदीच्या सर्व प्रमुख रस्त्यांसाठी फूटपाथ केले जातील. जेथे सुस्थितीत फूटपाथ नाहीत ते सुलभ केले जातील.
  • मुंबईच्या खालावत चाललेल्या हवेच्या गुणवत्तेला रस्त्यांवरची बांधकामाची धूळ, वाहतूक कोंडी, उद्योग, ऊर्जा क्षेत्र, कचरा जाळणे हे चार घटक कारणीभूत आहेत. मुंबईतली ही परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी मुंबई स्वच्छ हवा उपक्रमाअंतर्गत सात योजनांची घोषणा करण्यात येत आहे.
  • 31 मार्च 2023 पर्यंत 18 अतिरिक्त पॉलीक्लिनिक, डायग्नॉस्टीक सेंटर्स आणि 131 हिंदूहदयसम्राट बाळासाहेब ठाकरे दवाखाना सुरू करण्याचे नियोजिले आहे.
  • एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार उच्च रक्तदाब, मधुमेह, आणि इतर असंसर्गजन्य रोगांना तोंड देण्यासाठी 'आरोग्यम् कुटुंबम्' हा कार्यक्रम हाती घेतला आहे.
  • आगामी शैक्षणिक वर्षांपासून, इलेक्ट्रॉनिक्स, कृत्रिम बुद्धिमत्ता (artificial intelligence), फॅशन डिझायनिंग, कोडींग, रोबोटिक्स, tourism & hospitality, हे अभ्यासक्रम राबवले जातील. 249 माध्यमिक शाळांमध्ये हे प्रशिक्षण देण्याचे प्रस्तावित आहे.
  • 9 मीटर पेक्षा जास्त रूंदीच्या सर्व प्रमुख रस्त्यांसाठी फूटपाथ केले जातील. जेथे सुस्थितीत फूटपाथ नाहीत ते सुलभ केले जातील.
  • मुंबईच्या खालावत चाललेल्या हवेच्या गुणवत्तेला रस्त्यांवरची बांधकामाची धूळ, वाहतूक कोंडी, उद्योग, ऊर्जा क्षेत्र, कचरा जाळणे हे चार घटक कारणीभूत आहेत. मुंबईतली ही परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी मुंबई स्वच्छ हवा उपक्रमाअंतर्गत सात योजनांची घोषणा करण्यात येत आहे.

सकाळी 10.30 वाजता मुंबई महापालिका अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे शिक्षण खात्याचा अर्थसंकल्प इक्बाल सिंग चहल यांच्याकडे सुपुर्द केला. त्यानंतर अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांनी मुंबईचा अर्थसंकल्प प्रशासक चहल यांना सादर केला. त्यानंतर चहल यांच्याकडून तो मांडला गेला

साधारणपणे महापालिका आयुक्त हे महापौर आणि स्थायी समिती अध्यक्षांकडे अर्थसंकल्प सुपुर्द करतात. स्थायी समिती अध्यक्षांकडून तो मांडला जातो.

पण यावेळी मुंबई महापालिकेची मुदत ही 7 मार्च 2022 ला संपली आहे. तेव्हापासून मुंबई महापालिका आयुक्त इकबाल सिंग चहल हे प्रशासक म्हणून काम पाहात आहेत.

त्यामुळे हा अर्थसंकल्प इकबाल सिंग चहल यांच्याकडून मांडला गेला. मुंबई महापालिकेच्या इतिहासात दुसर्‍यांदा हा अर्थसंकल्प प्रशासकीय अधिकार्‍यांकडून मांडला गेला.

मुंबई महापालिकेने मागवल्या सूचना

2023-24 च्या अर्थसंकल्पात लोकसहभाग असावा यासाठी प्रशासनाकडून मुंबईकरांना काय हवं? याच्या सूचना पाठवण्यासाठी आवाहन केलं होतं. 28 जानेवारीपर्यंत या सूचना पाठवण्याची मुदत होती.

या सूचनांमध्ये ज्या महत्वाच्या सूचना असतील त्यांचा अर्थसंकल्पात समावेश केला जाणार असल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे.

मुंबई महापालिकेला अर्थसंकल्प

या सूचनांमध्ये वयोवृद्ध, समाजसेवक, महिला, बांधकाम व्यवसायिक, शैक्षणिक संस्था अश्या असंख्य लोकांनी सूचना पाठवल्या आहेत.

त्यामध्ये रस्त्यांचा दर्जा, खड्डे, रेन वॉटर हार्वेस्टिंग आणि फेरिवाल्यांबाबात सूचना करण्यात आल्या आहेत. तसंच वृध्दाश्रम आणि डे केअर सेंटर बांधण्याची मागणी महापालिकेकडे करण्यात आली आहे.

काय मिळणं अपेक्षित?

महापालिकेकडून या अर्थसंकल्पात पायाभूत सुविधांच्या विकासावर अधिक भर दिला जाण्याची शक्यता आहे. याच महिन्यात महापालिकेकडून रस्त्यांचे 'काँक्रीटीकरण' करण्यासाठी 6000 कोटींच्या 'वर्क ऑर्डर' काढण्यात आल्या आहेत.

त्याचबरोबर आरोग्य सुविधांसाठी भरीव तरतूद करण्याची शक्यता आहे. कोस्टल रोडचं काम हे 70% पूर्ण झाले आहे. अजूनही काही प्रकल्प हाती घेतले जाण्याची शक्यता आहे.

त्याचबरोबर महिला बचत गट सक्षमीकरण, महापालिका शाळांमध्ये 'स्कील डेव्हलपमेंट', महापालिका रूग्णालयांचं सक्षमीकरण यासाठी तरतूद केली जाण्याची शक्यता आहे.

या अर्थसंकल्पासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाकिला आयुक्त इक्बाल सिंग चहल यांना काही सूचना दिल्या आहेत.

त्यात त्यांनी मुंबईतलं वाढतं वायू प्रदूषण पाहाता दिल्ली, गुडगाव, लखनऊप्रमाणे मुंबईत 'एअर प्युरिफायर टॉवर' उभारण्याची सूचना केली आहे.

मुंबई महापालिकेला अर्थसंकल्प

तसचं मुंबईकरांच्या आरोग्याची काळजी घेण्यासंदर्भात विशेष उपाययोजना मुख्यमंत्र्यांनी सुचवल्या आहेत.

मुंबईतील सुमारे 27 टक्के नागरिक मधुमेह आणि उच्च रक्तदाबाच्या विकारांनी ग्रस्त आहेत. महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या माध्यमातून त्यांची घरोघरी जाऊन तपासणी करावी त्यांचा डेटा तयार करावा, असं सूचवण्यात आलं आहे.

त्याचबरोबर मुंबई महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये बाह्यरुग्ण विभागात मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असते. त्यामुळे येणारा ताण कमी करण्याकरिता बाह्ययंत्रणांची मदत घेतानाच खिडक्यांची संख्या वाढवावी. तसेच एमआरआय, सिटीस्कॅन आणि डायलिसिस केंद्रांची संख्या वाढवा, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे.

महापालिकेच्या प्रत्येक शाळेत नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी कौशल्य विकास केंद्र सुरू करा आणि मुंबई पब्लिक स्कूलची मागणी पाहता त्यांची संख्या वाढवावी, असंही मुख्यमंत्र्यांना सांगितलं आहे.

मुंबई महानगराच्या सुशोभीकरणासोबतच दळणवळण, पायाभूत सुविधा, गर्दी आणि वाहतुकीचं नियंत्रण याबाबतीत सामान्य मुंबईकरांना दिलासा देण्याचा प्रयत्न या अर्थसंकल्पातून होऊ शकतो. त्याचबरोबर महिला बचत गटांना सक्षम करण्यासाठी मुंबई महापालिकेच्या माध्यमातून अर्थसंकल्पात तरतूद केली जाऊ शकते.

लोकप्रतिनिधींची मतमतांतरे

वर्षानुवर्षं मुंबई महापालिकेत शिवसेनेचं वर्चस्व राहिलं आहे. जिजामाता उद्यानामधील पेंग्विनचा प्रयोग असो किंवा महापालिका शाळांमध्ये सीबीएससी बोर्ड आणणं असो. आदित्य ठाकरे यांच्या अनेक कल्पना अंमलात आणल्या गेल्या. त्यासाठी अर्थसंकल्पात तरतूद केली जात होती. पण हा अर्थसंकल्प प्रशासक मांडणार आहेत. लोकप्रतिनिधींचा यात सहभाग नाही. त्यामुळे लोकप्रतिनिधींची या अर्थसंकल्पाबाबत वेगवेगळी मतमतांतरं आहेत.

शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी याबाबत महापालिका आयुक्तांना पत्र लिहिलं आहे.

नगरसेवक, महापौर, समिती प्रमुखांच्या अनुपस्थितीत आयुक्तांनी कोणतेही नवीन प्रकल्प हाती घेऊ नयेत अशी मागणी त्यांनी या पत्रात आयुक्तांकडे केली आहे.

पालिकेचा निधी नवीन प्रकल्पांवर खर्च करणे नैतिकदृष्ट्या चुकीचे ठरेल, असं ठाकरे यांनी म्हटलं आहे.

किशोरी पेडणेकर

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, किशोरी पेडणेकर

मुंबई महापालिकेच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर सांगतात, "आम्ही आजवर मुंबईतल्या सामान्य माणसांचा विचार करून अर्थसंकल्प मांडत होतो. आता वेगवेगळ्या विभागातील पैसेही रस्ते आणि इन्फ्रास्ट्रक्चरकडे वळवले जात आहेत. हे योग्य नाही. लोकांवर जितका कमी भार येईल आणि चांगल्या सुविधा मिळतील असा अर्थसंकल्प असला पाहीजे."

माजी विरोधी पक्षनेते रवी राजा अर्थसंकल्पाताबाबत बोलताना म्हणतात, "आरोग्य आणि शिक्षण यासारख्या गोष्टींवर भर देणं गरजेचं आहे. फक्त रस्ते, पूल अश्याच कामांवर भर देऊन आम्ही खूप काही केलं हे दाखवून नाही चालणार.

जर खरा विकास करायचा असेल तर आरोग्याच्या सुविधा, शैक्षणिक सुविधांवर काम करणं गरजेचं आहे जर आपण मागचा अर्थसंकल्प बघितला तर या सुविधांसाठी असलेल्या पैश्यांच्या रकमेतून खूप कमी पैसे खर्च करण्यात आले आहेत. त्यामुळे या अर्थसंकल्पात जरी रस्ते, कोस्टलसारखे प्रकल्प दाखवले तरी ते प्रकल्प 3-4 वर्षं चालतात. पण इतर विभागातील पैसे हे वर्षभरासाठीच असतात. ते वेळोवेळी खर्च करणं गरजेच आहे."

भाजपने मात्र शिवसेनेने याआधी अर्थसंकल्पात केलेल्या तरतूदीबाबत शंका व्यक्त केली आहे. तरतूद करून पैसे खर्च केले गेले नसल्याचा आरोप भाजपने केला आहे.

भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे सांगतात, "अर्थसंकल्पात ज्या तरतूदी केल्या जातात, त्या वापरल्या जात नाहीत. जर कोस्टल रोडचं उदाहरण घेतलं तर कोस्टल रोडसाठी अनेक तरतूदी याआधीच्या अर्थसंकल्पात केल्या गेल्या. पण त्याची अंमलबजावणी केली गेली नाही. पैसे खर्च केले पाहीजेत. त्याचबरोबर पाणी, मल:निसारण, आरोग्य, शिक्षण या विभागात अधिक काम केलं पाहीजे. नवनवीन टेक्नोलॉजीचा वापर केला पाहीजे अशी आमची अपेक्षा आहे."

या सर्व अपेक्षा आणि प्रत्यक्षातल्या समस्या पाहाता मुंबईच्या आरोग्य यंत्रणेवरचा ताण कमी करणे, वातावरण बदल आणि प्रदूषण, पर्यटन, स्वच्छता यावर ठोस उपाययोजना करणं गरजेच आहे.

ISWOTY

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)