You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
उद्धव ठाकरे: 'राहुल गांधी सावरकरांबद्दल जे बोलले त्याच्याशी आम्ही सहमत नाही'
आमच्या मनातील सावरकर प्रेमावर कोणताही प्रश्न उपस्थित होऊ शकत नाही, राहुल गांधी सावरकर यांच्याबाबत जे काही बोलले त्याच्याशी आम्ही सहमत नाही, असं स्पष्टीकरण माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिलं आहे.
आज शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या दहाव्या स्मृतिदिनानिमित्त चित्र आणि अर्कचित्रांचं प्रदर्शन आयोजित करण्यात आलं आहे. यादरम्यान आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. याप्रसंगी त्यांच्यासोबत शिवसेना खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत, माजी मंत्री सुभाष देसाई आणि दिवाकर रावते आदी नेते उपस्थित होते.
देवेंद्र फडणवीस यांनी हा मुद्दा उपस्थित केला, याबाबत मला आनंद वाटला. पण हे प्रश्न कोणी विचारावेत, असा सवाल ठाकरे यांनी केला.
सावरकर यांच्याबाबत आम्हाला प्रेम, आदर आहेच. त्यांनी ज्या स्वातंत्र्य लढ्यासाठी काम केलं ते स्वातंत्र्य आता धोक्यात आलंय. त्यांचं स्वातंत्र्य लढ्यात काय योगदान आहे हे त्यांनी पहावं आणि मग बोलावं, अशी टीका त्यांनी यावेळी केली.
उद्धव ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेतील मुद्दे -
- आज दहा वर्षं झाली. शिवसेना प्रमुख यांचे अनेक पैलू होते. त्यांचं स्मारक कसं होणार आहे याचं प्रेझेंटेशन आपण काही दिवसांपूर्वी पाहिलं.
- काही जणांचं शिवसेना प्रेम आता बाहेर आलं आहे. यात बाजारूपणा दिसता कामा नये. शिवसेना प्रमुखांच्या नावाचा बाजार कोणी मांडू नये.
- त्यांच्या नावाला साजेसं काम त्यांनी करावं एवढीच अपेक्षा आहे.
- काही जण सिनेमा काढतात स्वत:च त्यात दिसतात. तसं स्मारकाबाबत होऊ नये. त्यात कोणीही डोकावू नये.
- जिथे त्यांना देशाचाच ताबा हवाय तिथे स्मारकाचं काय?
5 नोव्हेंबरच्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे काय म्हणाले होते?
महाराष्ट्रात मध्यावधी निवडणुकांचा अंदाज वर्तवल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी 5 नोव्हेंबर रोजी एक पत्रकार परिषद घेतली. या परिषदेला उद्धव ठाकरेंसह आदित्य ठाकरे, सुभाष देसाईही उपस्थित होते
बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाबाबत माहिती देण्यासाठी उद्धव ठाकरेंनी ही पत्रकार परिषद घेतली आहे. तत्पूर्वी, सुभाष देसाईंनी सांगितलं की, या स्मारकाच्या पहिल्या टप्प्याचं काम 56 टक्के झालं आहे.
ज्ञानेश महाराव, सचिन परब आणि डॉ. संजय पाटील हे तिघेजण उद्धव ठाकरेंच्या मार्गदर्शनाखाली बाळासाहेब ठाकरे स्मारकाचा अभ्यासगट म्हणून काम करेल.
2023 च्या अखेरपर्यंत या स्मारकाचं काम पूर्ण करण्याचा निश्चय आहे, अशी माहिती सुभाष देसाईंनी सांगितलं.
उद्धव ठाकरेंच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे -
- येत्या 17 तारखेला बाळासाहेबांना जाऊन 10 वर्षे होतील. दरम्यानच्या काळात स्मारक कधी होतंय, हे विचारलं जात होतं.
- गेल्या दोन-चार वर्षात अनेक बैठका आम्ही घेतल्या. काही प्रसिद्ध व्यक्तींसोबत चर्चा केली. तंत्रज्ञान कोणतं असावं, माध्यमं कोणती असावी, मुद्दे कोणते असायला हवेत, यावर चर्चा केली.
- शिवसेनाप्रमुखांनी भाषणं केली ती, जनतेत जागृतीसाठी केली.
- अनेकजण पुतळा कुठे असेल, तर पुतळाच नसेल. पुतळा म्हणजे स्मारक नाही. हे नुसतं संग्रहालय नाही, नुसते फोटो आणून चिकटवले नाही, हे संग्रहालय म्हणजे स्फूर्तीस्थान असेल.
- शिवसेनाप्रमुखांनी आयुष्यभर जे कार्य केलं, तेच कार्य हे संग्रहालय पुढे करणार आहे.
- अनेकजणांनी बाळासाहेबांचे दौरे कव्हर केलेत. मध्यंतरी काही संपादकांशी बोललो. त्यांच्याकडूनही बरंच सहकार्य मिळालं. त्या काळातले फोटो, बातम्या आहेत. मोर्चे, सीमा आंदोलन, दसरा मेळाव्यातील भाषणं इत्यादी उपलब्ध आहेत.
- मार्मिकचे बरेचसे अंक उपलब्ध झाले आहेत. बाकीचे अंक उपलब्ध करण्याचा प्रयत्न सुरू आहेत.
- आम्ही सगळेजण शिवसेनाप्रमुख कार्टून्स काढत असताना पाहत पाहत मोठे झाले. गुरुवारी छापून आलं की जनतेमध्ये जायचं. तो कालखंड भारावलेला होता. त्यातील काही कार्टून अजून आहेत.
- या स्मारकात शिवसेनेचे मुख्यमंत्री असतील, तोतयागिरी करून मुख्यमंत्री बनलेले नसतील.
शिवसैनिकांनो, तयार राहा, राज्यात मध्यावधी निवडणुकांची शक्यता - उद्धव ठाकरे
"शिवसैनिकांनो, तयारीला लागा, राज्यात मध्यावधी निवडणुका होण्याची शक्यता आहे," असा आदेश शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला.
मुंबईतील दादरमधील शिवसेना भवनात उद्धव ठाकरेंनी राज्याभरातील संपर्कप्रमुखांसोबत बैठक घेतली. या बैठकीत बोलताना उद्धव ठाकरेंनी मध्यवधी निवडणुकांचा अंदाज वर्तवत, तयारीला लागण्याचे आदेश दिले.
शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनीही याबाबत बोलताना म्हटलं की, "राज्याला सव्वादोन लाखांचे प्रकल्प दिले. उद्धव ठाकरेंचं म्हणणं हेच आहे की, राज्यात मध्यावधी निवडणुका लागण्याचे संकेत आहेत. त्यामुळे त्यांनी शिवसैनिकांना तयार रहाण्याचे आदेश दिले आहेत.
"राज्यातील राजकीय परिस्थिती अस्थिर आहे. पंतप्रधान मोठ्या घोषणा करत आहेत. शिवसैनिकांनी तयार राहायला हवं. आपल्याला प्रत्येक घरात पोहोचायचं आहे. लोकांपर्यंत जायचं आहे असं उद्धव ठाकरे शिवसेना नेत्यांना संबोधित करताना म्हणाले."
या बैठकीची माहिती शिवसेनेच्या प्रवक्त्या मनिषा कायंदे यांनी दिली.
मनिषा कायंदेंच्या माहितीनुसार, शिवसेनेची आज सेना भवनात संपर्कप्रमुखांची बैठक पार पडली. स्वत: उद्धव ठाकरेंनी ही बैठक घेतली.
"गुजरातची निवडणूक जाहीर झाली. महाराष्ट्रातून तिथे चार प्रकल्प गेले. पंतप्रधानांनी राज्यात काही प्रकल्पांची घोषणा केलीय. यामुळेच असं वाटतंय की, राज्यात मध्यावधी निवडणुका होतील. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांना तयार रहाण्याचे आदेश दिले आहेत," असं कायंदेंनी सांगितलं.
तसंच, कार्यकर्त्यांच्या बैठका घ्या आणि तयारीला लागा असे आदेश उद्धव ठाकरेंनी दिल्याचेही कायंदेंनी सांगितलं.
"शिवसैनिकांना कार्यकर्ते यांना संपर्क अभियान राबवण्यास सांगण्यात आलंय," अशी माहितीही यावेळी कायंदेंनी दिली.
हे वाचलंत का?
- कॉम्रेड कृष्णा देसाई हत्या प्रकरण, ज्यामुळे शिवसेनेचा पहिला आमदार विधानसभेवर निवडून गेला
- उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची मुस्लिमांबद्दलची भूमिका बदलत आहे का?
- उद्धव ठाकरे - एकनाथ शिंदे दसरा मेळावा : गर्दी जमली होती की जमवली होती?
- उद्धव ठाकरेंचा टोला, '40 डोक्यांच्या रावणामुळे शिवसेनेचा धनुष्यबाण गोठवलं गेलं'
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)