विराट कोहलीच्या खेळीनंतर अनुष्काने शेअर केली भावनिक पोस्ट, म्हटलं...

विराट कोहलीचं हात पसरून विकेटच्या दुसऱ्या बाजूला धावत जाणं, मैदानावर बसून जमिनीच्या दिशेने पंच मारणं, भरलेल्या डोळ्यांनी आकाशाकडे पाहणं आणि कर्णधार रोहित शर्माने त्याला खांद्यावर उचलून घेऊन आपला आनंद जाहीर करणं...आजच्या मॅचची ही क्षणचित्रं...कधीही न विसरता येण्यासारखी...

मॅचनंतर स्वतः विराट कोहलीनं म्हटलं की, ही माझ्या आयुष्यातली सर्वांत सुंदर रात्र आहे.

2007 च्या वर्ल्ड कपमध्ये सहा सिक्सर ठोकत क्रिकेट फॅन्सच्या आठवणीत कायमची जागा बनवलेल्या युवराज सिंगने म्हटलं, "किंग कोहली इज बॅक" ॉ

युवराज सिंगने विराट कोहलीच्या खराब कामगिरीवर टीका करणाऱ्यांनाही प्रत्युत्तर दिलं होतं. या टीकाकारांपैकी काहींनी भारताच्या ट्वेंटी-20 टीममध्ये विराट कोहलीच्या समावेशावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.

सचिन तेंडुलकरनेही विराटच्या खेळीचं कौतुक करताना म्हटलं, "विराट, निःसंशयपणे ही तुझ्या आयुष्यातली सर्वांत सुंदर खेळी होती. तुला खेळताना पाहणं हा एक विलक्षण अनुभव होता."

अनेकांनी विराट कोहलीच्या डोळ्यांत उभ्या राहिलेल्या अश्रूंवरही आश्चर्य व्यक्त केलं.

कमेंटेटर हर्षा भोगले यांनी ट्विटरवर लिहिलं, "मी इतक्या वर्षांपासून विराटला पाहतोय. मी कधीच त्यांच्या डोळ्यांत अश्रू पाहिले नव्हते. हे कधीच विसरता येणार नाही."

अनुष्काची भावनिक पोस्ट

ऑस्ट्रेलियातील मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर रविवारी (23 ऑक्टोबर) जमलेल्या 90 हजारहून अधिक प्रेक्षक तसंच टीव्हीच्या माध्यमातून भारत आणि पाकिस्तानदरम्यानचा सामना पाहणाऱ्या कोट्यवधी लोकही विराट कोहलीची बॅटिंग आणि त्यानं सेलिब्रेट केलेला विजयाचा क्षण विसरू शकणार नाहीत.

यामध्ये विराट कोहलीची पत्नी आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांचाही समावेश आहे. अनुष्काने सोशल मीडियावर एका पोस्टमध्ये लिहिलं आहे, "सुंदर, खूपच सुंदर. आज तुम्ही लोकांच्या आयुष्यात इतका आनंद घेऊन आला आहात...तोसुद्धा दिवाळीच्या एक दिवस आधी!"

तिनं पुढं म्हटलं आहे की, "तू अतिशय भारी माणूस आहेस. मी आताच माझ्या आयुष्यातली सर्वांत सुंदर मॅच पाहिली. आपली आई का नाचतीये, ओरडतीये हे कळण्याइतकी आपली मुलगी अजून मोठी झाली नाहीये. पण एक दिवस तिला नक्की कळेल की, आपले वडील त्या रात्री त्यांच्या आयुष्यातील एक सुंदर इनिंग खेळले होते...तेही त्यांच्या आयुष्यातील एका कठीण टप्प्यानंतर.

मला तुझा अभिमान आहे. तुझ्यातली ऊर्जा संसर्गजन्य आहे. आयुष्यातील सगळ्या चढउतारात कायम तुझ्यावर प्रेम करत राहीन."

विराट कोहलीची खेळी

  • कोहलीने पाकिस्तानविरुद्ध 53 चेंडूंमध्ये 82 धावा केल्या.
  • त्याने एकून सहा चौकार आणि चार षट्कार लगावले. त्यामध्ये दोन षट्कार 19 व्या षटकात हॅरिस रौफच्या ओव्हरमध्ये लगावले.
  • कोहलीने हार्दिक पांड्यासोबत पाचव्या विकेटसाठी 113 धावा केल्या.
  • भारताला विजय मिळवून देणारा विराट 'मॅन ऑफ द मॅच' म्हणून निवडला गेला.

भारताचा थरारक विजय

पाकिस्ताननं प्रथम फलंदाजी करत 159 धावांचं आव्हान भारतासमोर ठेवलं होतं. हे आव्हान भारताला सहज पार करणं शक्य असतानाही, शेवटच्या षटकापर्यंत सामना रंगतदार बनला.

मात्र, अखेरीस भारतानं पाकिस्तानवर विजय मिळवला.

विराट कोहलीने 82 धावांची धडाकेबाज खेळी केली,तर त्याला हार्दिक पंड्यानं 40 धावा करत संयमी साथ दिली.

शेवटच्या षटकात दिनेश कार्तिक बाद झाल्यानंतर आर. अश्विन मैदानात आला आणि त्यानं विजयी फटका मारत भारताच्या विजयाची नोंद केली.

त्यापूर्वी भारताच्या गोलंदाजांसमोर पाकिस्तानच्या फलंदाजांची दाणादण उडाल्याचे चित्र दिसून आलं होतं. 20 ओव्हरमध्ये 8 विकेट्स देत 159 धावांपर्यंत पाकिस्तानला पोहोचता आलं होतं.

भारत आणि पाकिस्तान संघात कोण कोण खेळाडू होते?

भारतीय संघ - रोहित शर्मा (कर्णधार), दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), के. एल. राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंह.

राखीव- हर्षल पटेल, ऋषभ पंत, युझवेंद्र चहल, दीपक हुडा

पाकिस्तान संघ -बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), शान मसूद, मोहम्मद नवाज. हैदर अली, इफ्तिखार अहमद, आसिफ अली, नसीम शाह, हारिस रौफ, शाहीन आफ्रिदी.

राखीव- खुशदिल शाह, मोहम्मद हसनैन, मोहम्मद वसीम ज्युनियर, फखर जमान.

दरम्यान दिवसभरात मध्येच पावसाचं आगमन होऊ शकतं अशी शक्यता वर्तवण्यात आली होती. एका क्षणी हा सामना वॉशआऊट होणार अशी चिन्हं होती. मात्र नंतर सूर्याचे आगमन झाल्याने चिंता मिटली.

पण मेलबर्नमध्ये शुक्रवारी रात्रीपासूनच थोड्या-थोड्या विश्रांतीने पाऊस होत होता. शनिवारी सकाळीही हेच चित्र दिसून आलं होतं.

पावसाच्या हलक्या सरी सुरू असतानाच दोन्ही संघांनी आपला सराव केला.

दोन्ही संघ मजबूत

टी-20 क्रिकेटच्या आंतरराष्ट्रीय रँकिंगमध्ये भारतीय संघ सध्या पहिल्या स्थानावर आहे. पण महत्त्वाच्या सामन्यात आपली कामगिरी उंचावण्यात भारतीय संघाला गेल्या काही वर्षांत अपयश आल्याचं दिसून येतं.

भारताचे दोन नियमित खेळाडू रविंद्र जडेजा आणि जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे यंदाच्या विश्वचषक स्पर्धेत संघाचा भाग नसतील. पण बुमराह बाहेर झाल्याने त्याच्याऐवजी मोहम्मद शमीचा संघात समावेश करण्यात आला.

यंदाच्या वर्षी भारताने एकूण 32 टी-20 सामने खेळले. त्यापैकी 23 सामन्यात भारताला विजय मिळाला तर 8 सामन्यात संघाला पराभवाचं तोंड पाहावं लागलं.

ट्वेन्टी20 विश्वचषकात भारत-पाकिस्तान सहा वेळा आमनेसामने आले आहेत. यापैकी 5मध्ये भारताने विजय मिळवला आहे तर गेल्या वर्षी झालेल्या विश्वचषकात भारताला पराभवाला सामोरं जावं लागलं होतं.

दुसरीकडे पाकिस्तानचा विचार केल्यास बाबर आझमच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानचा संघ मजबूत दिसून येतो. गेल्या तीन वर्षांत त्याच्या नेतृत्वात पाकिस्तान संघाची जय-पराजयाची आकडेवारी 36-18 अशी आहे.

ऑस्ट्रेलियाच्या भूमिवर दोन्ही संघ गेल्या वेळी 2015 मध्ये आमनेसामने आले होते. त्यावेळी अॅडलेडच्या मैदानावर एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेतील सामन्यात भारतीय संघाने शानदार विजय मिळवला होता.

त्यावेळी विराट कोहलीच्या 107 धावांच्या बळावर भारताने 300 धावांचा डोंगर उभा केला. पण या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तान 76 धावांनी मागे राहिला होता.

टी-20 ची आकडेवारी पाहिल्यास यंदाच्या वर्षी भारत-पाकिस्तान संघ दोनवेळा आमनेसामने आले होते. गेल्या महिन्यात झालेल्या आशिया कप स्पर्धेतील पहिल्या टी-20 सामन्यात भारताने विजय मिळवला होता. मात्र दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानने भारताला पराभवाचा झटका दिला होता.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)