You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
अजिंक्य रहाणेने यशस्वी जैस्वालला मैदानाबाहेर काढलं तेव्हा...
मैदानावर खेळाइतकंच तुम्ही कसं खेळता हेही महत्त्वाचं आहे हे दाखवून देत दुलीप ट्रॉफी फायनलच्या लढतीत वेस्ट झोनचा कर्णधार अजिंक्य रहाणेने अनोखा पायंडा पाडला. रहाणेने स्वत:च्या संघातील खेळाडू यशस्वी जैस्वालवर शिस्तभंगाची कारवाई करत मैदानाबाहेर काढलं.
कोयंबतूरचं एसएनआर कॉलेज ग्राऊंडचं मैदान. दुलीप ट्रॉफीचा अंतिम मुकाबला. वेस्ट झोन विरुद्ध साऊथ झोन असा मुकाबला. पाचव्या दिवशी सामना जिंकून जेतेपदावर कब्जा करण्यासाठी वेस्ट झोन आतूर.
द्विशतकी खेळी साकारत वेस्ट झोनला दमदार स्थिती गाठून देणाऱ्या यशस्वी जैस्वालला कर्णधार अजिंक्य रहाणेने खेळताना शिस्त महत्त्वाची हा धडा घालून दिला.
पाचव्या दिवसाचा खेळ सुरू झाला तेव्हा साऊथ झोनची स्थिती 154/6 अशी होती. जिंकण्यासाठीचं 529 धावांचं प्रचंड लक्ष्य. वेस्ट झोनला जिंकण्यासाठी चार विकेट्सची आवश्यकता.
वेस्ट झोनकडून तनुश कोटियन आणि शम्स मुलानी हे फिरकीपटू बॉलिंग करत होते. यावेळी युवा यशस्वी जैस्वाल फॉरवर्ड शॉर्ट लेगला फिल्डिंग करत होता.
फलंदाजांच्या अगदी जवळच फिल्डिंग करणाऱ्या यशस्वीने साऊथ झोनच्या फलंदाजांना उद्देशून काहीतरी बोलल्याचं स्पष्ट झालं. फलंदाजांनी यासंदर्भात अंपायर्सकडे तक्रार केली. अंपायर्सनी वेस्ट झोनचा कर्णधार अजिंक्य रहाणेशी चर्चा केली. रहाणेने यशस्वीला शांत राहण्याचा सल्ला दिला. त्याला समजावलं.
थोड्या वेळानंतर फलंदाज आणि यशस्वी यांच्यात बाचाबाची झाली. रहाणेने मध्यस्थी करत परिस्थिती नियंत्रणात आणली. त्याने यशस्वीच्या दंडाला धरून सुनावलं. शांतपणे फिल्डिंग करण्याचा सल्ला दिला. अंपायर्सनी रहाणे, दोन्ही फलंदाज यांच्याशी बातचीत केली.
प्रकरण निवळलं असं वाटत असतानाच रहाणेने यशस्वीला मैदानाबाहेर जाण्याची सूचना केली. कर्णधाराच्या आदेशानुसार यशस्वीने मैदान सोडलं. काही षटकं पॅव्हेलियनमध्ये काढल्यानंतर यशस्वी मैदानात परतला.
यावेळेस रहाणेने त्याला फॉरवर्ड शॉर्ट लेगऐवजी त्याला फिल्डिंगसाठी दूर उभं केलं.
खेळाडूपेक्षा खेळ मोठा आहे आणि मैदानावर खेळताना मर्यादेत राहून शेरेबाजी करावी हा वस्तुपाठ रहाणेने यशस्वीसमोर ठेवला.
वेस्ट झोनने पहिल्या डावात 270 धावा केल्या. हेत पटेलने सर्वाधिक 98 धावा केल्या. साऊथ झोनतर्फे साईकिशोरने 5 विकेट्स घेतल्या. प्रत्युत्तरादाखल खेळताना साऊथ झोनने 327 धावांची मजल मारत आघाडी घेतली. हनुमा विहारीने 118 धावांची शतकी खेळी केली. वेस्ट झोनतर्फे जयदेव उनाडकतने 4 तर अतित शेठने 3 विकेट्स घेतल्या.
वेस्ट झोनने दुसऱ्या डावात 585 धावांचा डोंगर उभारला. 20वर्षीय यशस्वीने 30 चौकार आणि 4 षटकारांसह 265 धावांची दिमाखदार खेळी साकारली. दुलीप ट्रॉफी फायनलमध्ये शतक झळकावणारा सगळ्यात कमी वयाच्या बॅट्समनच्या यादीत यशस्वी चौथ्या स्थानी आहे.
सर्फराझ खानने नाबाद 127 धावांची खेळी केली. श्रेयस अय्यर (71) आणि हेत पटेल (51) यांनी अर्धशतक केलं.
साऊथ झोनला विजयासाठी 529 धावांचं लक्ष्य मिळालं. वेस्ट झोनच्या शिस्तबद्ध गोलंदाजीसमोर साऊथ झोनचा डाव 234 धावातच आटोपला. सलामीवीर रोहन कन्नूमल 93 तर रवी तेजाने 53 धावांची खेळी केली. वेस्ट झोनकडून शम्स मुलानीने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या.
कोण आहे यशस्वी जैस्वाल?
उत्तर प्रदेशातल्या भदोहीचा हा मुलगा. मुंबईत येऊन मैदानावरच्या तंबूत राहून, पाणीपुरी विकून परिस्थितीशी संघर्ष करत धावांच्या राशी ओततोय.
2015 मध्ये मुंबईतल्या प्रसिद्ध गाईल्स शिल्ड स्पर्धेत यशस्वीने नाबाद 319 धावांची खेळी केली. याच सामन्यात त्याने 13 विकेट्सही घेतल्या.
2019मध्ये विजय हजारे स्पर्धेत झारखंडविरुद्ध यशस्वीने 154 चेंडूत 203 धावांची आक्रमक खेळी साकारली. 17व्या वर्षी द्विशतक झळकावत स्पर्धेतला सगळ्यात कमी वयाचा द्विशतकवीर ठरला.
2020 मध्ये झालेल्या आयसीसी U19 स्पर्धेत यशस्वीने सर्वाधिक धावा (400) केल्या होत्या. यशस्वीला मॅन ऑफ द सीरिज पुरस्काराने गौरवण्यात आलं. याच वर्षी आयपीएल स्पर्धेत राजस्थान रॉयल्सने यशस्वीला ताफ्यात समाविष्ट केलं. 2022 मध्ये राजस्थानने 4 कोटी रुपयांच्या मानधनासह यशस्वीला संघात रिटेन केलं.
प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये केवळ 13 डावात यशस्वीने 1000 धावांचा टप्पा पार केला आहे. यशस्वीने अमोल मुझुमदार आणि रुसी मोदी यांच्या विक्रमाची बरोबरी केली. यशस्वीने अवघ्या 7 सामन्यात 91च्या सरासरीने खेळताना हा महत्त्वपूर्ण टप्पा ओलांडला आहे.
रणजी करंडक स्पर्धेत उपांत्यपूर्व, उपांत्य फेरीत यशस्वीने शतक झळकावण्याची किमया केली आहे. दुलीप ट्रॉफीच्या उपांत्यपूर्व फेरीतही यशस्वीने द्विशतकी खेळी केली होती.
धोनीला केला होता नमस्कार
2020 आयपीएल हंगामात यशस्वीने धोनीला हात जोडून नमस्कार केला होता. तो नमस्कार सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यादरम्यान लढत होती. मॅचपूर्वी टॉससाठी चेन्नईचा कॅप्टन धोनी आणि राजस्थानचा कॅप्टन स्टीव्हन स्मिथ पिचपर्यंत गेले. टॉस झाला आणि दोन्ही कॅप्टन्स परतू लागले. धोनीला पाहून प्रत्येकजण हाय फाईव्ह देऊ लागला. न्यू नॉर्मलनुसार हातांच्या मुठी पंचसारख्या करून नमस्कार चमत्कार होतात.
धोनी समोर आल्यावर यशस्वीच्या चेहऱ्यावर आनंद होताच पण मोठ्या प्लेयरला भेटल्याचं समाधान त्याच्या डोळ्यात दिसत होतं. सगळे हाय फाईव्ह देत होते. धोनीला पाहून यशस्वीने गुरुजींना करतात तसा रीतसर हात जोडून नमस्कार केला, धोनीने नीट पाहिलं आणि छानसं स्माईल दिलं. धोनी चाळिशीत आलाय. यशस्वी विशीत आहे.
धोनीने करिअरमध्ये असंख्य युवा खेळाडूंनी संधी दिलेय, त्यांच्या कठीण काळात ठामपणे मागे उभा राहिलाय, खेळत असताना सल्ला दिलाय. असे असंख्य यशस्वी धोनीने पाहिलेत. यशस्वीसाठी ही सुरुवात आहे. या टप्प्यावरून हरवून जाणारेही खूप आहेत. मोठ्ठा पल्ला गाठायचाय पण अजूनतरी त्याचे पाय जमिनीवर आहेत. तो स्थित्यंतराचा क्षण होता.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)