हार्दिक पंड्या : जिथे स्ट्रेचरवरून बाहेर जावं लागलं तेच मैदान गाजवलं

मैदान होतं- दुबई इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम. वर्ष होतं 2018. तारीख होती 19 सप्टेंबर. निमित्त होतं आशिया कप स्पर्धेचं.

भारत-पाकिस्तान आमनेसामने. बॉलिंग करता करता हार्दिक पंड्या दुखापतग्रस्त झाला. मैदानावर कोसळलेला हार्दिक उपचारानंतर पुन्हा बॉलिंग करेल असं वाटत होतं. पण तसं झालं नाही. पाठीचं दुखणं होतं. भारतीय संघातल्या सगळ्यात फिट खेळाडूंपैकी एक असलेल्या हार्दिकला स्ट्रेचरवरून मैदानाबाहेर न्यावं लागलं. त्या सामन्यात हार्दिकच्या गोलंदाजीचं पृथ्थकरण होतं 4.5-0-24-0

4 वर्षानंतर त्याच मैदानावर हार्दिक पंड्याने प्रचंड उकाड्यात आपल्या फिटनेस आणि गुणकौशल्याच्या बळावर भारतीय संघाला दिमाखदार विजय मिळवून दिला. आशिया चषकातील भारतीय संघाच्या सलामीच्या लढतीत हार्दिकने 33 धावा केल्या आणि 3 विकेट्सही पटकावल्या.

उसळत्या चेंडूंचा शिताफीने उपयोग करत हार्दिकने पाकिस्तानच्या फलंदाजांना जेरीस आणलं. हार्दिकने मोहम्मद रिझवान, इफ्तिकार अहमद आणि खुशदील शाह यांना माघारी धाडलं.

छोट्या पण आव्हानात्मक लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाने रोहित शर्मा, के. एल. राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव यांना ठराविक अंतरात गमावलं.

हार्दिकने रवींद्र जडेजाच्या साथीने महत्त्वपूर्ण भागीदारी केली. धावगतीचं आव्हान वाढत असताना हार्दिकने 17 चेंडूत नाबाद 33 धावांची खेळी करत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.

"गोलंदाजी करताना परिस्थितीचा अंदाज घेऊन खेळणं आणि अस्त्रं परजणं आवश्यक असतं. उसळते चेंडू टाकणे ही माझी ताकद आहे. मी त्याचाच वापर केला. फलंदाजांने चूक करावी अशा पद्धतीने योग्य टप्प्यावर गोलंदाजी करणे माझं काम आहे. मी तेच केलं", असं हार्दिकने मॅन ऑफ दन मॅच पुरस्कारानंतर बोलताना सांगितलं.

या 4 वर्षात हार्दिक 33 ट्ववेन्टी20 आणि 25 वनडे एवढेच सामने खेळला. पाठीच्या दुखण्यामुळे हार्दिकला प्रदीर्घ काळ मैदानापासून दूर राहावं लागलं.

या कठीण कालखंडात वैयक्तिक प्रशिक्षक, विशेषज्ञ प्रशिक्षक, ट्रेनर ,बीसीसीआयचं वैद्यकीय पथक या सगळ्यांच्या समन्वयातून हार्दिकने फिट होण्यासाठी अपार मेहनत घेतली.

गेल्या वर्षी ट्वेन्टी20 विश्वचषकादरम्यान हार्दिकला पाकिस्तानविरुद्ध गोलंदाजी करता आली नव्हती. त्यावेळी हार्दिकवर जोरदार टीका झाली होती.

आयपीएल स्पर्धेत मुंबई इंडियन्स संघाने हार्दिकला संघात रिटेन केलं नाही. गोलंदाजी, फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण अशा तिन्ही आघाड्यांवर चांगली कामगिरी करत संघाला संतुलन मिळवून देणारा हार्दिक मुंबईकडेच राहील असा होरा होता मात्र मुंबई इंडियन्स संघाने रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, कायरेन पोलार्ड आणि जसप्रीत बुमराह यांना रिटेन केलं.

आयपीएलमधील नवीन संघ गुजरात टायटन्स संघाने हार्दिकच्या खेळावर आणि त्याहीपलीकडे जाऊन नेतृत्वगुणांवर विश्वास ठेवला. हार्दिकने संघव्यवस्थापनाचा विश्वास सार्थ ठरवत पदार्पणातच संघाला जेतेपद मिळवून दिलं.

हार्दिकने सर्वस्वी नव्या संघाची मोट बांधत नेतृत्वगुणांचीही झलक सादर केली. हार्दिकने स्पर्धेत 487 धावा केल्या तर 8 विकेट्स पटकावल्या.

ऑक्टोबर महिन्यात ऑस्ट्रेलियात होणार असलेल्या ट्वेन्टी20 विश्वचषकासाठी हार्दिक संघात असणं भारतीय संघासाठी अतिशय महत्त्वाचं आहे. हार्दिकचा उत्तम फॉर्म आणि फिटेनस प्रतिस्पर्धी संघांसाठी डोकेदुखी ठरू शकतो.

माजी खेळाडूंनीही हार्दिकच्या खेळाचं कौतुक केलं. अटीतटीचा सामना. "दोन्ही संघांमधला फरक हार्दिक पंड्या होता", अशा शब्दात फिरकीपटू अमित मिश्राने शाबासकी दिली आहे.

"जबरदस्त खेळ. 'हार्दिक पंड्या सब कुछ करेगा.' भुवी, जडेजा आणि कोहली यांची उत्तम साथ. अनेक दिवसांनंतर भारत-पाकिस्तान सामना पाहिला. मजा आली", असं माजी सलामीवर वीरेंद्र सेहवागने म्हटलं आहे.

"भारतीय संघाचा दिमाखदार विजय. हार्दिक पंड्याने गोलंदाजी आणि फलंदाजीत शानदार खेळ केला. त्याला संघातील बाकी सहकाऱ्यांची उत्तम साथ लाभली", असं माजी वेगवान गोलंदाज वेंकटेश प्रसाद यांनी म्हटलं आहे.

"दडपणाच्या स्थितीत हार्दिकची महत्त्वपूर्ण खेळी, जडेजा आणि विराटची उत्तम साथ- भारतीय संघाचा शानदार विजय", असं मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने म्हटलं आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)