You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
Ind vs Pakistan : पाकिस्तान संघाला जेव्हा चेन्नईत स्टँडिंग ओव्हेशन मिळालं होतं...
- Author, पराग फाटक
- Role, बीबीसी मराठी
चेन्नईतल्या एम.चिदंबरम अर्थात चेपॉक स्टेडियमवर 1999 साली भारत-पाकिस्तान लढतीवेळी चाहत्यांनी कसं वागावं याचा नमुना सादर केला.
भारत-पाकिस्तान क्रिकेट सामना म्हणजे कट्टर द्वंद्व भारत-पाकिस्तान सामना म्हणजे मैदानावर खेळाडू एकमेकांना भिडणं. चाहत्यांमध्ये होणारी बाचाबाची. भारत-पाकिस्तान सामन्यात पराभव म्हणजे रोषाला आमंत्रण. भारत-पाकिस्तान सामना म्हणजे धर्मयुद्ध.
सख्खे शेजारी असलेल्या भारत आणि पाकिस्तान यांचा इतिहास लक्षात घेतला तर या दोन देशांच्या क्रिकेट संघांमधील सामन्याला इतकं कडवेपण का येतं हे स्पष्ट होतं. दोन देशांमधल्या दुरावलेल्या संबंधामुळे भारतीय संघ पाकिस्तानच्या दौऱ्यावर जात नाही आणि पाकिस्तानचा संघ भारतात येत नाही. फक्त आयसीसीच्या स्पर्धांमध्ये भारत-पाकिस्तानचे संघ आमनेसामने येतात.
ट्वेन्टी20 विश्वचषकाच्या निमित्ताने येत्या रविवारी 24 ऑक्टोबरला भारत-पाकिस्तान मुकाबला होणार आहे. प्रक्षेपणकर्ती कंपनी, आयसीसी यांना भरघोस महसूल आणि प्रेक्षकसंख्या मिळवून देणारा सामना असं या लढतीतून अपेक्षित आहे.
मात्र प्रत्येकवेळी भारत-पाकिस्तान सामना म्हणजे टिपेला पोहोचणाऱ्या घोषणा, त्वेषमय अंगार असं नसतं. पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमधील एका मुकाबल्यात खेळभावनेचं अनोखं प्रतीक बघायला मिळालं होतं.
वायटूकेपूर्व काळात म्हणजे 1999 साली पाकिस्तानचा संघ दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी भारत दौऱ्यावर होता. पाकिस्तानच्या संघाचं नेतृत्व वासिम अक्रमकडे होतं. संघात अक्रमसह वकार युनिस, साकलेन मुश्ताक, इंझमाम उल हक, सईद अन्वर, मोहम्मद युसुफ, सलीम मलिक, मोईन खान असे नावाजलेले खेळाडू होते.
पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र अनिल कुंबळेच्या फिरकीमुळे हा निर्णय भारताच्या पथ्यावर पडला. पाकिस्तानचा डाव 238 धावांतच आटोपला. मोईन खान (60) तर मोहम्मद युसुफ (53) यांनी अर्धशतकी खेळी केल्या. कुंबळेने 6 विकेट्स घेतल्या.
पाकिस्तानच्या आक्रमणासमोर भारतीय फलंदाज ढेपाळले आणि त्यांनी 254 धावांपर्यंतच मजल मारली. सौरव गांगुलीने 54 तर राहुल द्रविडने 53 धावांची खेळी केली. पाकिस्तानकडून साकलेन मुश्ताकने 5 तर शाहिद आफ्रिदीने 3 विकेट्स घेतल्या. भारतीय संघाला 16 धावांची नाममात्र आघाडी मिळाली.
युवा आणि तडाखेबंद फलंदाजीसाठी प्रसिद्ध शाहिद आफ्रिदीने दुसऱ्या डावात 141 धावांची मॅरेथॉन खेळी केली. आफ्रिदीने 21 चौकार आणि 3 षटकारांसह 141 धावांची खेळी केली. आफ्रिदीचं कसोटीतलं हे पहिलंवहिलं शतक होतं.
जवागल श्रीनाथ, वेंकटेश प्रसाद, अनिल कुंबळे आणि सुनील जोशी या चांगल्या आक्रमणाला सामोरं जात आफ्रिदीने हे शतक झळकावलं होतं. इंझमाम उल हकने 51 धावा करत त्याला चांगली साथ दिली. पाकिस्तानने 286 धावा केल्या आणि भारतापुढे 271 धावांचं लक्ष्य ठेवलं. भारतातर्फे वेंकटेश प्रसादने 6 विकेट्स पटकावल्या.
चौथ्या डावात 271 धावा करणं हे आव्हानात्मक लक्ष्य असलं तरी भारतीय संघ जिंकण्याचा दावेदार होता. संघाचा आधारस्तंभ असलेल्या सचिन तेंडुलकरने अफलातून शतकी खेळी साकारली. सहकारी फलंदाज एकामागोमाग एक बाद होत असताना सचिनने विलक्षण तंत्रशुद्धतेसह चेन्नईच्या उकाड्यात मोठी खेळी केली.
या खेळीदरम्यान सचिनची पाठदुखी बळावली होती. त्याला क्रॅम्प्सचाही त्रास जाणवत होता. मात्र या कशानेही त्याची एकाग्रता भंग झाली नाही.
सचिनला यष्टीरक्षक फलंदाज नयन मोंगियाची साथ मिळाली. मोंगियाने 52 धावांची खेळी केली. सातत्याने विकेट्स पडत असल्या तरी सचिन भारताला जिंकून देणार असंच चित्र होतं. 254 धावसंख्येवर सचिन बाद झाला. साकलेन मुश्ताकच्या गोलंदाजीवर वासिम अक्रमने त्याचा झेल टिपला.
सचिन बाद झाला त्यावेळी भारतीय संघाला जिंकण्यासाठी 17 धावांची आवश्यकता होती आणि 254/7 अशी स्थिती होती. पुढच्या 15 मिनिटात पाकिस्तानने अनिल कुंबळे, सुनील जोशी आणि जवागल श्रीनाथ यांना माघारी धाडत थरारक विजयाची नोंद केली.
भारताचा डाव 258 धावात गडगडला आणि पाकिस्तानने अवघ्या 12 धावांनी कसोटी जिंकली. या विजयासह पाकिस्तानने दोन सामन्यांच्या मालिकेत 1-0 आघाडी घेतली.
'दुसरा' या नावाची शैली विकसित करणाऱ्या साकलेन मुश्ताकने दुसऱ्या डावातही 5 विकेट्स घेतल्या. साकलेनने सचिनसह मोहम्मद अझरुद्दीन, सौरव गांगुली, सुनील जोशी, जवागल श्रीनाथ यांना तंबूत धाडलं. साकलेनने सामन्यात 10 विकेट्स घेण्याचाही पराक्रम केला. झुंजार शतकासाठी सचिनला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आलं.
हातातोंडाशी आलेला विजय पाकिस्तानने हिरावून घेतला मात्र त्यांनी चांगला खेळ केला याचं भान ठेवत चेन्नईच्या प्रेक्षकांनी पाकिस्तानला मानवंदना दिली.
पाकिस्तानच्या त्या संघाचे कर्णधार वासिम अक्रम यांनी 'लेसन्स लर्न्ट विथ द ग्रेट्स' या पॉडकास्टमध्ये शेन वॉटसनबरोबर बोलताना या सामन्याचा उल्लेख केला. दहा वर्षांनंतर आम्ही भारताच्या दौऱ्यावर गेलो होतो. प्रेक्षकांमध्ये शांतता असेल तर आपण आपलं काम चोख करत आहोत असं मी सहकाऱ्यांना सांगितलं.
साकलेन मुश्ताकने अफलातून गोलंदाजी केली. त्याने 'दुसरा' प्रकार शोधून काढला. आम्ही चांगले खेळलो याची नोंद घेत चेन्नईच्या चाहत्यांनी आम्हाला मानवंदना दिली. तो दौरा माझा आवडता होता असं अक्रम म्हणाले.
सचिन-मोंगिया यांची भागीदारी सुरू असताना चेन्नईचे प्रेक्षक जल्लोष करत होते. मोंगिया आणि नंतर सचिन बाद झाल्यानंतर प्रेक्षकांमध्ये शांतता पसरली. पाकिस्तानने सामना जिंकल्यानंतर मैदानाला फेरी मारली त्यावेळी चेन्नईच्या दर्दी प्रेक्षकांनी कोतेपणा न करता पाकिस्तानच्या खेळाडूंचं मनापासून कौतुक केलं.
आयपीएल स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्स संघाच्या वाटचालीत चेन्नईचा मोलाचा वाटा आहे. कर्णधार महेंद्रसिंग धोनीसह चेन्नई संघाच्या खेळाडूंनी वेळोवेळी चेन्नईच्या जाणकार चाहत्यांबद्दल भरभरून सांगितलं आहे.
चेन्नईत सामना पाहायला येणारे प्रेक्षक अभ्यासू असतात. त्यांना खेळाची उत्तम समज असते. चेन्नई जिंकावं असं त्यांना वाटत असतं त्यासाठी ते चेन्नईच्या खेळाडूंचा उत्साह वाढवतात. पण प्रतिस्पर्धी संघाने चांगला खेळ केला तर मनापासून त्याची प्रशंसा करतात असं महेंद्रसिंग धोनीने सांगितलं आहे.
खेळात हारजीत होत असते पण त्याहीपेक्षा खेळभावना महत्त्वाची असते याचा प्रत्यय चेन्नईच्या प्रेक्षकांनी नेहमीच घडवला आहे.
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे माजी प्रमुख आणि तत्कालीन संघाचे व्यवस्थापक शहरयार खान यांनी 'अ ब्रिज ऑफ पीस' या पुस्तकात चेन्नईच्या प्रेक्षकांचा उल्लेख केला आहे. भारतीय संघाला पाठिंबा देण्यासाठी चाहते हजारोंच्या संख्येने जमले होते. पण आम्ही जिंकलो. त्यांना निराश वाटणं साहजिक होतं. पण त्यांनी आमच्या चांगल्या खेळाचं कौतुक करत सकारात्मकतेचं प्रतीक सादर केलं.
भारत-पाकिस्तान या दोन देशांदरम्यान त्याआधी काय घडलंय हे बाजूला ठेऊन मैदानावरच्या आमच्या चांगल्या कामगिरीला त्यांनी दाद दिली. त्यांचं वर्तन हा खेळाचा विजय होता असं शहरयार खान यांनी म्हटलं आहे.
पार्श्वभूमी
ही मालिका सुरू होण्यापूर्वी शिवसेनेच्या समर्थकांनी पहिल्या कसोटीचं केंद्र असलेल्या दिल्लीतील फिरोझशाह कोटला मैदानाची खेळपट्टी खणली. त्यावेळी महाराष्ट्रात शिवसेना-भाजप युतीचं सरकार होतं. काही दिवसांनंतर बीसीसीआयच्या मुंबईस्थित कार्यालयाची तोडफोड करण्यात आली.
शिवसेनेचा भारत-पाकिस्तान मालिकेला विरोध होता. फिरोझशाह कोटलाची खेळपट्टी खराब झाल्याने पहिली कसोटी चेन्नईत आयोजित करण्यात आली.
चेन्नईतही विरोध होऊ शकतो हे लक्षात घेऊन अभूतपूर्व पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. कसोटी सुरू होण्याच्या काही दिवस आधी 40 वर्षीय रिक्षावाल्याने पाकिस्तानविरुद्धच्या मालिकेला विरोध म्हणून जाळून घेतल्याचं वृत्त प्रसिद्ध झालं होतं.
सामन्यासाठी येणाऱ्या गाड्यांना पोलिसांकडून स्टिकर देण्यात आले होते. सामन्याच्या पूर्वसंध्येपर्यंत पत्रकारांना प्रवेश नाकारण्यात आला होता. एवढं सगळं असूनही चेन्नईच्या प्रेक्षकांचा उत्साह तसूभरही कमी झाला नाही.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)