जाने भी दो यारों: सात लाखांपेक्षा कमी बजेटमध्ये बनलेला हा सिनेमा 40 वर्षांनंतर बनला आहे 'कल्ट' क्लासिक

जाने भी दो यारों

फोटो स्रोत, NFDC

    • Author, वंदना,
    • Role, टीव्ही एडिटर, बीबीसी इंडिया

ऐंशीच्या दशकात सिनेसृष्टीमध्ये नुकताच श्रीदेवीचा उदय झाला झाला होता. जितेंद्र आणि श्रीदेवीच्या चित्रपटांची क्रेझ होती. तोहफा चित्रपट तर प्रदर्शित होण्यापूर्वीच हिट समजला जात होता.

वेगवेगळ्या रंगांच्या माठांपासून तयार केलेल्या सेटवर डान्स करणाऱ्या श्रीदेवी आणि जितेंद्र यांचं, 'तोहफा... तोहफा' हे गाणं तेव्हापासून आजपर्यंत एवढी वर्ष मनोरंजक सिनेमासाठी आदर्श समजलं जात आहे.

पण तेव्हाची परिस्थिती पाहिली तर, एक नवे दिग्दर्शक कुंदन शाह यांचा 'जाने भी दो यारो' हा चित्रपटही 'तोहफा' चित्रपटाबरोबरच प्रदर्शित होणार होता.

एक तर कुंदन शाह यांना फारसं कोणी ओळखत नव्हतं. त्यात त्यांच्या चित्रपटातील स्टारकास्ट म्हणजे कलाकारांनाही फारसं कोणी ओळखत नव्हतं. नसिरुद्दीन शाह आणि काही प्रमाणात ओम पुरी हे याला अपवाद होते.

ऑक्टोबर महिन्यात कुंदन शाह यांची 75 वर्षे साजरा करताना मात्र, एका गोष्टीवर विश्वास ठेवणं कठीण जातं. ती म्हणजे सात लाखांपेक्षा कमी बजेट आणि अनोळखी कलाकारांना घेऊन तयार करण्यात आलेला 'जाने भी दो यारो' हा चित्रपट आजच्या काळात कल्ट सिनेमांच्या यादीत अग्रस्थानी आहे.

चित्रपटात काम करणाऱ्या जवळपास प्रत्येक कलाकारानं त्यानंतरच्या करिअरमध्ये त्यांच्या प्रतिभेनं यशाची शिखरं पादाक्रांत केली. मग नसिरुद्दीन शाह असतील किंवा ओम पुरी, सतीश कौशिक, सतीश शाह किंवा पंकज कपूर असतील.

तसं पाहायचं झाल्याच विनोदी चित्रपटांची भारतात कमतरता नाही. पण 1983 मध्ये प्रदर्शित झालेला 'जाने भी दो यारो' हा चित्रपट सामाजिक आणि राजकीय विडंबन करणाऱ्या काही मोजक्या चित्रपटांपैकी एक आहे.

'गांधी' चित्रपट सोडून सुरू केला 'जाने भी दो यारो'

हा चित्रपट बनण्यामागंही एक मोठा किस्सा आहे. 'जाने भी दो यारो' हा असा चित्रपट आहे ज्यात कोणीही नायक किंवा हिरो नाही. चित्रपटात केवळ खलनायक म्हणजे व्हिलन आणि त्याच्या छळानं त्रासलेली पात्रंच आहेत.

पुणे एफटीआयआयमधून बाहेर पडल्यानंतर कुंदन शाह यांना चित्रपट तयार करायचा होता. एफटीआयआयनंतर हैदराबादेत संघर्ष करणाऱ्या काही मित्रांनी कुंदन यांना त्यांच्या फोटो स्टुडिओबाबत काही विचित्र अनुभव सांगितले होते. त्यातूनच या कथेचा जन्म झाला होता.

जाने भी दो यारों

फोटो स्रोत, NFDC

त्याचवेळी कुंदन शाह यांना रिचर्ड अॅटनबरो यांच्या 'गांधी' चित्रपटासाठी काम करण्याची ऑफर मिळाली होती. त्यासाठी त्यांना एक लाख रुपये मिळणार होते, आणि ती त्या काळी खूपच मोठी रक्कम होती.

पण कुंदन यांनी त्यांचे मित्र सईद मिर्झा यांच्या सल्ल्यावरून 'गांधी' चित्रपटाची संधी नाकारत त्यांच्या स्क्रिप्टवर काम करण्याचा निर्णय घेतला. 1 एप्रिल 1982 ला म्हणजे 'एप्रिल फूल'च्या दिवशी त्यांनी स्क्रिप्ट रजिस्टर केली होती.

सात लाखांपेक्षा कमी बजेट

या चित्रपटात सरकारी भ्रष्टाचारावर भाष्य करण्यात आलेलं आहे. पण तसं असलं तरी नॅशनल फिल्म डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (एनएफडीसी) नं या चित्रपटाला फायनान्स करण्याचा निर्णय घेतला.

पण ही रक्कम सात लाख रुपयांपेक्षाही कमी होती. त्यापैकी फक्त नसिरुद्दीन शाह यांनाच 15 हजार रुपये मिळाले होते. इतर सर्वांना तीन ते पाच हजारांदरम्यान पैसे मिळाले होते.

X पोस्टवरून पुढे जा, 1
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 1

दिल्लीतील एक नाट्यदिग्दर्शक रंजित कपूर यांनी चित्रपट लिहिण्याची जबाबदारी घेतली आणि त्यांच्या घरी राहणारे एक नवे कलाकार सतीश कौशिक यांनाही त्यांनी सोबत घेतलं.

पैशाची कमतरता होती. त्यामुळं या चित्रपटाच्या निर्मितीत कुंदन यांचे मित्र सुधीर मिश्रा, विधू विनोद चोप्रा आणि त्यांच्या दिवंगत पत्नी रेणू सलूजा हेदेखील सहभागी झाले.

तुम्ही जर हा चित्रपट पाहिला नसेल तर, हा दोन आदर्शवादी तरुण छायाचित्रकार (फोटोग्राफर ) रवी बासवानी (सुधीर) आणि नसिरुद्दीन शाह ( विनोद) यांची कथा आहे.

फोटो काढता-काढता त्यांना शहरातील सरकारी अधिकारी, बिल्डिंग माफिया (बिल्डर पंकज कपूर आणि दारुडा बिल्डर ओम पुरी) तसंच मीडिया (संपादक शोभा) यांनी मिळून केलेल्या भ्रष्टाचाराबाबत माहिती मिळते.

या प्रकरणातील मुख्य पुरावा असतो तो म्हणजे भ्रष्ट आयुक्त डिमेलो (सतीश शाह) यांचा मृतदेह. सगळे याच मृतदेहांचा शोध घेत असतात. तिथंच हा विनोदी प्रवास सुरू होतो.

X पोस्टवरून पुढे जा, 2
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 2

खरं म्हणजे, 'जाने भी दो यारो' चित्रपटात नसिरुद्दीन शाह यांचं नाव विनोद चोप्रा यांच्या नावावरून, तर रवी बासवानी यांचं नाव सुधीर मिश्रा यांच्या नावावरून ठेवण्यात आलं होतं. पुढच्या काळात ते दोघंही प्रसिद्ध दिग्दर्शक बनले.

समाज आणि राजकारणाचा विषय

'जाने भी दो यारो' चित्रपटात अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत विडंबन पाहायला मिळतं. कुठं छुप्या पद्धतीनं तर कुठं अगदी खुलेआम ते दिसतं. गमतीशीर बाब म्हणजे या विडंबनातून ताशेरे ओढताना कुंदन शाह यांनी सरकारी अधिकारी आणि बिल्डरांसोबत स्वतःलाही सोडलेलं नाही.

चित्रपटाच्या सुरुवातीलाच नसिरुद्दीन शाह आणि रवी बासवानी जेव्हा त्यांच्या नव्या ब्युटी फोटो स्टुडिओचं उद्घाटन करतात तेव्हा एकही गिऱ्हाईक येत नाही. त्यावेळी नसीर म्हणतात की, "कुंदन शाहकडून तर अडीच हजार उसने घेतले आहे, ते कसे परत देणार?"

चित्रपटाबाबत आणखी एक खास बाब म्हणजे, यात अशी अनेक दृश्यं आहेत जी बिनकामाची वाटू शकतात. पण ज्या वेडेपणानं त्यात अभिनय करण्यात आलाय, त्यामुळं हा वेडेपणाही अत्यंत प्रभावी अशा सामाजिक विनोदी विडंबनानं स्वरुप घेतो.

सतीश शाहांचं मृतदेहाचं पात्र

चित्रपटात सतीश शाह ( कमिश्नर डिमेलो) हे बहुतांश वेळ एका मृतदेहाच्या रुपात दाखवले आहेत. शक्यतो कोणत्याही चित्रपटात अशा पात्राला फार महत्त्वं नसतं, पण दिग्दर्शक आणि एडिटर (संकलक) रेणू सलुजा यांच्या एडिटिंगमुळं हा मृतदेहदेखील अनेक विनोदांसाठी कारणीभूत ठरतो.

जाने भी दो यारों

फोटो स्रोत, NFDC

उदाहरण द्यायचं झाल्यास, एका दृश्यात रस्त्यावर चाकं असलेल्या एका शवपेटीत सतीश शाह यांचा मृतदेह असतो आणि त्यावर फुलांचा एक गोल हार किंवा पुष्पचक्र ठेवलेलं असतं. या शवपेटीला ओम पुरी यांच्या ऑस्टिन गाडीचा धक्का लागतो. त्यामुळं ते पुष्पचक्र सतीश शाह यांच्या हातात येतं आणि कारच्या स्टेअरिंगसारखं वाटू लागतं. मद्यधुंद अवस्थेतील बिल्डर ओम पुरी चाकं असलेल्या या शवपेटीला स्पोटर्स कार समजून ती दुरुस्त करू लागतो.

एडिटिंगदरम्यान ओमपुरी आणि सतीश शाह यांच्या क्लोज अपमध्ये अशा प्रकारे इंटरकटिंग करण्यात आलंय की, जणू खरंच त्या दोघांमध्ये काहीतरी चर्चा सुरू असावी.

कागदावर किंवा वाचताना हा सीन अगदी सर्वसाधारण असा वाटतो. पण पडद्यावर सतीश शाह आणि ओम पुरी यांचं भन्नाट कॉमिक टायमिंग पाहायला मिळतं. सतीश शाह यांना तेव्हा 'फायनेस्ट डेड बॉडी' असंही म्हटलं गेलं होतं.

महाभारताच्या सीनवर तयार होतात मीम

आजच्या काळात या चित्रपटाच्या लोकप्रियतेचा अंदाज यावरूनही येतो की, 'जाने भी दो यारो' च्या मीम्सची सोशल मीडियावर सगळीकडं धूम दिसते. त्यातही महाभारताच्या सीनशी संबंधित सर्वाधिक मीम्स आहेत.

महाभारताचं नाटक दाखवलेला क्लायमेक्स सीन या चित्रपटातील सर्वोत्तम भाग समजला जातो. त्यात प्रत्येक पात्राला डिमेलो (सतीश शाह) यांचा मृतदेह मिळवायचा असतो आणि तो नसीर तसंच रवी बासवानी यांच्याकडं असतो.

सीन असा आहे की, एकमेकांचा पाठलाग करताना ही सर्व पात्र एका नाटकात पोहोचतात आणि तिथं महाभारतात द्रौपदी चिरहरणचा सीन सुरू असतो.

जाने भी दो यारों

फोटो स्रोत, Jane Bhi do yaro/Youtube

घाई-गडबडीत डिमेलोच्या मृतदेहाला साडी नेसवून द्रौपदी बनवलं जातं. नसिरूद्दीन यांना मृतदेह स्टेजवरून हटवायचा असतो. ते स्वतः दुर्योधन बनून स्टेजवर येतात आणि म्हणतात की, द्रौपदीसारख्या पतिव्रतेला पाहून मी चिरहरणची आयडियाच ड्रॉप केली आहे. त्यानंतर स्टेजवर एकच गोंधळ उडतो.

त्याचवेळी ओम पुरी भीम बनून तिथं पोहोचतात आणि म्हणतात, 'ओए धृतराष्ट्र के पुत्तर द्रौपदी को वापस कर, वो अब मेरे साथ जाएगी. द्रौपदी तेरे अकेले की नहीं है, हम सब शेअरहोल्डर हैं.'

त्यावर गोंधळलेल्या धृतराष्ट्राचा 'ये सब क्या हो रहा है' आणि युधिष्ठीराचा 'शांत गदाधारी भीम, शांत' असे डायलॉग असून, ते आता मीम्समुळं प्रचंड व्हायरल झालेत.

लेखकाच्या कल्पनाशक्तीचा अंदाज आणकी एका दृश्यात येतो. महाभारतातील प्रसंगाच्या या सगळ्या गोंधळात अचानक स्टेजवर अकबर आणि सलीमही येतात. त्यावर धृतराष्ट्राचं पात्र म्हणतं की,

'थिस इज टू मच. ये अकबर कहाँ से आ टपका'.

'हम उनकी याद में एक दिन के लिए इस शहर के सारे गटर बंद कर देंगे'

चित्रपटात देशात पसरलेला भ्रष्टाचार आणि लाल फितशाहीवर विडंबनाच्या माध्यमातून बोट ठेवण्यात आलंय. उदाहरणादाखल एका सीनमध्ये मुंबईचे आयुक्त गटारावर अभ्यास करण्यासाठी सरकारी खर्चानं अनेक महिन्यांसाठी अमेरिकेला जातात.

नंतर त्यांची हत्या होते आणि त्यांच्या शोकसभेत एक अधिकारी भाषणात म्हणतो की, "डिमेलो साहब कहा करते थे किसी देश की उन्नति की पहचान किसी चीज से होती है वो है गटर, हम उनकी याद में एक दिन के लिए इस शहर के सारे गटर बंद कर देंगे. इसलिए आप लोगों से प्रार्थना है कि आप पीने का पानी एक दिन पहले भर के रख लें."

पण यामागे कुंदन शाह यांच्याबरोबर घडलेल्या एका सत्य घटनेचा संदर्भ आहे. 'जाने भी दो यारो' सीरियसली फनी सीन्स 1983' नावाच्या पुस्तकात लेखक जय अर्जुन सिंह यांनी त्याबाबत उल्लेख केला आहे.

आमच्या इमारतीत गटारीचं पाणी लिक होऊन पिण्याच्या पाण्याच्या टाकीमध्ये येत होतं. मी त्यासाठी सरकारी कार्यालयात गेलो होतो. त्यावेळी अधिकारी मला म्हणाला होता की, 'मग काय झालं, अनेक लोक हेच पाणी पितात ना?'असा प्रसंग कुंदन शाह यांनी अर्जुन सिंह यांना सांगितला होता.

खरं म्हणजे गटार हे देशातील एका अपयशी यंत्रणेचं प्रतिक आहे. त्याचा वापर लेखकांनी अत्यंत हुशारीनं या चित्रपटात केलाय.

नसीर आणि ओम पुरींची जोडी

चित्रपट विनोदी असला तरी त्याद्वारे मांडलेले मुद्दे हे अत्यंत गंभीर आहेत. चित्रपट मनोरंजन तर करतोच, पण अनेक विडंबनांच्या माध्यमातून डोळ्यात अंजनही घालतो.

ओम पुरी नसीरुद्दीन शाह

फोटो स्रोत, Getty Images

या चित्रपटात मसाला सिनेमासारखे बडे सितारे आणि बजेट नसलं तरी, तो अगदी कलात्मक चित्रपटांच्या यादीतीलाही नाही. यात उथळ किंवा खेचून केलेले किंवा शारीरिक व्यंग्यावरचे विनोद नाहीत. हेच याचित्रपटाचं वैशिष्ट्य आहे.

चित्रपटात एक दृश्य आहे, त्यात काहीही तर्क नाही. या दृश्यात नसिरुद्दीन शाह एक हेर बनून भ्रष्ट बिल्डरांच्या रूममध्ये जातात. त्याठिकाणी बिल्डर पंकज कपूर यांचा राइट हँड असलेले सतीश कौशिकही असतात.

नसीर त्यांना त्यांच्यासाठी एक सीक्रेट कॉल असून त्याचा कोड वर्ड 'अल्बर्ट पिंटो को गुस्सा क्यों आता है', हा अल्याचं सांगतात. ते नसीर यांच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या चित्रपटाचं नावही होतं.

त्यानंतर सतीश कौशिक आणि नसिरुद्दीन शाह एकाच खोलीत दोन लँडलाईन फोनद्वारे एकमेकांशी बोलत असतात. एक क्षण तर असा येतो की, त्यांचे फोन खाली पडतात आणि वायर एकमेकांत अडकतात. त्यानंतर दोघं पाठिला-पाठ लावून एकमेकांच्या फोननं एकमेकांशी बोलतात.

सतीश कौशिक यांना आरशात नसिरुद्दीन शाह दिसतात तरी त्यांचं बोलणं सुरुच राहतं. हा अत्यंत तर्कहीन असा सीन असला तरी त्यातून प्रचंड विनोदनिर्मिती झाल्याचं पाहायला मिळालं.

पण याबाबत पडद्यामागचाही एक किस्सा आहे. या दृश्यामुळं नसिरुद्दीन शाह नाराज झाले होते. नसिरुद्दीन मेथड अॅक्टर होते आणि ज्या संस्थेतून ते शिकले होते, तिथं अशा अभिनयाला महत्त्वं नव्हतं.

या चित्रपटापूर्वी नसिरुद्दीन शाह आर्ट सिनेमांचे स्टार बनले होते. तसंच ओम पुरींचा अर्धसत्यही प्रदर्शित होणार होता. त्यामुळं दोघांचा कॉमेडीशी संबंध नव्हता. मात्र, 'जाने भी दो यारो' मध्ये प्रथमच त्या दोघांचा असा अभिनय पाहायला मिळाला आणि त्यामुळंच दोघांनी, चित्रपट करण्यास होकार दिला होता. ओम पुरी यांना अगदी शेवटच्या टप्प्यात घेण्यात आलं होतं.

सरकारी संस्थेचा पैसा

या चित्रपटातील जवळपास सर्वच कलाकार त्यावेळी नवे होते आणि संघर्ष करत होते. पण त्या सर्वांनीच अत्यंत नैसर्गिक अभिनय केला. चित्रपटात एनएफडीसीनं पैसा गुंतवला होता. ही सरकारी संस्था होती आणि त्या संस्थेनं या चित्रपटाला परवानगी कशी दिली, याचं अनेकांनाच आश्चर्य वाटतं.

"एनएफडीसीनं चित्रपटासाठी 6.84 लाख रुपये दिले होते. समाजावर अत्यंत थेट आणि परखड भाष्य याद्वारे केलं असल्याचं त्यांच्या समितीला वाटलं. त्यांनी आमच्या कामात काहीही हस्तक्षेप केला नाही. उलट शुटिंग करण्यासाठी अत्यंत कठिण असलेल्या अनेक ठिकाणी आम्हाला शुटिंगची परवानगी दिली," असा उल्लेख 'जाने भी दो यारो-सीरियसली फनी सीन्स 1983' या पुस्तकात आहे.

एनएफडीसी

फोटो स्रोत, @NFDCINDIA

चित्रपटात घडणारा बहुतांश वेडेपणा हा स्क्रिप्टमध्येच लिहिलेला आहे. पण त्यात सेटवरही बऱ्याच गोष्टी जोडल्या गेल्या. उदाहरण म्हणजे महाभारताच्या दृश्यात जेव्हा ओम पुरी अचानक कपडे बदलून भीम बनून स्टेजवर येतात तेव्हा त्यांचा काळा चष्मा त्यांच्या डोळ्यावर तसाच असतो.

हे स्क्रिप्टमध्ये नव्हतं, तर ओम पुरी यांनी अॅड केलं होतं. ओम पुरींचा पंजाबी लेहजादेखील त्यांच्या सल्ल्यानंच ठेवला होता. पण कुंदन शाह यांना ते फारसं आवडलं नव्हतं. पैशांची कमतरता असल्यानं शुटिंगदरम्यान वेगळीच 'कॉमेडी' होत होती, त्याचेही अनेक किस्से प्रसिद्ध आहेत.

X पोस्टवरून पुढे जा, 3
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 3

एका दृश्यात अनेक महिला बुरखा परिधान करून मजलिसमध्ये जात असल्याचं दाखवलं आहे. या दृश्यात चित्रपटातील सर्व पात्रांनी एकमेकांपासून लपण्यासाठी बुरखा परिधान केल्याचं दाखवलंय. पण लक्षपूर्वक पाहिलं तर सर्व महिलांनी काळ्या रंगाऐवजी वेगवेगळ्या रंगाचे बुरखे परिधान केलेले दिसतात.

त्याचं कारण म्हणजे, या सीनसाठी अनेक एक्स्ट्रा आर्टिस्टची गरज होती. पण पैसे नसल्यामुळं युनिटमधील लोकांनाच बुरखा परिधान करून उभं केलं होतं. त्यानंतर सिनेमॅटोग्राफर बिनोद प्रधान शूट करत होते. पण त्यांना मदतीची गरज पडली की ते असिस्टंटला गर्दीतून बोलवायचे. शोधायला अडचण होत असल्यानं, सगळ्यांना वेगवेगळ्या रंगाचे बुरखे दिले होते.

चित्रपटात सगळीकडं गोंधळच गोंधळ सुरू असल्यामुळं दर्शकांना यातही फारसं काही गैर वाटत नाही.

चित्रपटात तरुण पवन मल्होत्रा यांनी प्रोडक्शन असिस्टंटचं काम केलं होतं. नंतर ते प्रसिद्ध अभिनेते बनले. एका दृश्यात कुंदन शाह यांना दोन कबुतरं हवी होती. पवन यांनी व्यवस्था केली पण ती जागा दूर होती आणि त्यांच्याकडे पिंजरे किंवा टॅक्सीही नव्हती. त्यामुळं त्यांनी पिशवीत कबुतरं ठेवून आणली होती, त्याचाही उल्लेख पुस्तकात आहे. शिवाय चित्रपटात जो कॅमेरा दाखवण्यात आलाय, तोही नसीर यांचा स्वतःचा होता आणि शूटिंगदरम्यान तो हरवला होता.

चित्रपटात मासिकाच्या संपादकाचं काम केलं होतं, मराठी अभिनेत्री भक्ती बर्वे यांनी. ही भूमिका आधी अपर्णा सेन यांना ऑफर करण्यात आली होती. चित्रपटाची कथा ऐकताना त्या झोपल्या होत्या आणि त्यांनी भूमिकेसाठी नकार दिला होता, असा किस्सा याबाबत प्रसिद्ध आहे.

भक्ती बर्वे मराठी नाट्यक्षेत्रातील मोठं नाव होत्या. शफी ईनामदार त्यांचे पती होते. भक्ती सुरुवातीच्या काळात बॉम्बे दूरदर्शनच्या प्रसिद्ध वृत्तनिवेदिका होत्या. 1996 मध्ये शफी ईनामदार यांच्या मृत्यूनंतर पाच वर्षांनी एका अपघातात 52 वर्षांच्या भक्ती यांचंही निधनही झालं होतं.

चित्रपटाबाबत संमिश्र प्रतिक्रिया

सुमारे 40 वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाकडं आज कसं पाहिलं जातं? याबाबत गेल्यावर्षी दिग्दर्शक सुधीर मिश्रा यांनी ट्विटरवर प्रश्न विचारला होता. 'हा चित्रपट आज प्रदर्शित झाला असता तर समीक्षकांनी किती स्टार दिले असते?' असं त्यांनी विचारलं होतं.

दिव्या दत्ता यांच्यासह चित्रपटाच्या अनेक फॅन्सनी चित्रपटाला पाचपैकी सहा स्टार दिले. पण प्रत्येकालाच हा चित्रपट तसा वाटतो असं नाही.

"काळाच्या कसोटीवर हा चित्रपट टिकेल असं मला वाटत नाही. हा एखाद्या शाळेच्या स्किटसारखा वाटतो. मी हा चित्रपट दुसऱ्यांदा पाहण्याचा प्रयत्न केला आणि 10 मिनिटामध्येच कंटाळा आला. अॅक्टिंग ओव्हर द टॉप आहे, तर लिखाण साधारण आणि ड्राफ्ट कच्चा आहे," अशी प्रतिक्रिया निर्माते, दिग्दर्शक मुनीष भारद्वाज यांनी सुधीर मिश्रा यांच्या प्रश्नावर दिली होती.

X पोस्टवरून पुढे जा, 4
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 4

बजेट कमी असल्याचा परिणाम चित्रपटाच्या निर्मितीवर दिसून येतो हे खरं आहे. काही ठिकाणी कंटिन्युटी दिसत नाही, तर महाभारताचं एक दृश्यही अंधुक दिसतं. त्याचा निगेटिव्ह प्रकाशात एक्सपोज झाला आणि त्यामुळं फॉग डस्ट जमा झाला. पण पुन्हा शूट करण्यासाठी पैसेच नव्हते.

असं असलं तरी, ज्याप्रकारचा विनोद आणि विडंबनाद्वारे प्रहार या चित्रपटातून केला आणि क्रिएटिव लिबर्टी (स्वातंत्र्य) घेण्यात आलं, ते आजच्या काळात शक्य आहे का? असा प्रश्न लेखक सिद्धार्थ भाटिया यांनी 'द वायर' मधील लेखात उपस्थित केलाय.

ज्येष्ठ पत्रकार रामचंद्रन श्रीनिवासन यांच्याशी बीबीसीनं याबाबत चर्चा केली. "आजची राजकीय परिस्थिती पाहता, जाने भी दो यारो सारखं विडंबन करण्यापूर्वी निर्माते, दिग्दर्शक अनेकदा विचार करतील. अॅमेझॉननंही एक सटायर तयार केलं आहे, पण ते प्रदर्शिक करत नाहीत. कारण देशात तशी परिस्थिती नाही. जाने भी दो यारो चित्रपटात राजकीय अँगल होता, तरीही हा चित्रपट आला तेव्हा परिस्थिती वेगळी होती. चित्रपटात सतीश शाह यांचं दृश्य आहे, त्यात ते द्रौपदी बनले आहेत. आजच्या काळात या दृश्याला किती विरोध होईल, याचा विचार तुम्ही करू शकता. कारण अनेक लोक सध्या केवळ विरोध करायला बसले आहे. त्यामुळं अशाप्रकारचा चित्रपट पुन्हा तयार होणं शक्य नाही," असं ते म्हणाले.

हा चित्रपट पुन्हा तयार होऊ शकत नाही, यासाठी रामचंद्रन श्रीनिवासन यांनी आणखी एक कारण सांगितलं. ते म्हणजे या चित्रपटात असलेले प्रतिभावान कलाकार. नसिरुद्दीन शाह यांच्यापासून ते सुधीर मिश्रापर्यंत पडद्यावर आणि पडद्यामागं एकापेक्षा एक गुणी लोकांनी काम केलंय. सर्वांनी मिळून चित्रपट तयार केला. आजच्या काळात एवढ्या प्रतिभेचे लोक एकत्र घेऊन काम करणं कठिण आहे. कारण आजच्या काळात ते परवडणारं नाही.

चित्रपटाच्या अखेरीस प्रचंड प्रयत्न करून दोघं आदर्शवादी फोटोग्राफर म्हणजे नसिरुद्दीन शाह आणि रवी बासवानी सगळे पुरावे गोळा करून पोलिसांना देतात. आपला गौरव होईल अशी स्वप्नं ते पाहत असतात. शेजारीच त्यांना 'सत्यमेव जयते' चा बोर्डही दिसतो.

पण नंतर सगळे भ्रष्ट लोक एकत्र येतात आणि अखेरच्या दृश्यात नसिरुद्दीन आणि बासवानी कैद्यांच्या वेशात रस्त्यावरून जाताना दिसतात. लोकांवर त्याचा काहीही परिणाम होत नसतो आणि दोघांचं आवडीचं गाणं, 'हम होंगे कामयाब' सुरू असतं, त्यानंतर दोघं सगळं काही संपलं असा (मान कापल्याचा) इशारा करतात.

राज कपूर यांनी नंतर हा चित्रपट पाहिला तेव्हा त्यांना चित्रपटाचा शेवट आवडला नसल्याचा उल्लेख केला होता. अनेक लोकांना हा चित्रपट विनोदी असला तरी निराशावादी किंवा नकारात्मक वाटला. तर अनेक लोकांना दोन्ही तरुणांनी अखेरपर्यंत सत्याची साथ किंवा आदर्शवाद सोडला नाही, म्हणून चित्रपट आवडला होता.

प्रदर्शनानंतर हा चित्रपट हिट ठरला असं नाही, पण नंतर या चित्रपटानं कल्ट क्लासिकचं स्थान मिळवलं.

"चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर फ्लॉप ठरला होता. पण नंतर टीव्ही आणि इतर माध्यमांवर तो एवढ्या वेळा पाहिला गेला की, कल्ट चित्रपट ठरला. कल्ट चित्रपट अनेकदा सुरुवातीला फ्लॉप होतात, पण नंतर लोकांच्या मनात स्थान मिळतात. 'मेरा नाम जोकर' ही तसाच होता. अनेकदा असं होतं की, जे चित्रपट नवा मार्ग तयार करत असतात ते स्वतः थकतात. पण नंतर त्या मार्गाचा अवलंब करणारे हिट होतात. 'जाने भी दो यारो' चं वैशिष्ट्य म्हणजे यात साधेपणा आणि दैनंदिन जीवनातील पात्रं होती," असं पत्रकार रामचंद्रन श्रीनिवासन म्हणतात.

या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आणि रवी बासवानी यांना फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. विधु विनोद चोप्रा 'परिंदा' सारखा चित्रपट तयार करून, पुढच्या काळात मोठे दिग्दर्शक बनले. सुधीर मिश्रा यांनी 'धारावी' आणि 'हजारों ख्वाहिशें ऐसी' चित्रपट बनवले.

पवन मल्होत्रा, सतीश कौशिक, पंकज कपूर आणि नीना गुप्ता यांच्या अभिनयाची ताकदीही जगानं नंतर पाहिली. या चित्रपटातून अनुपम खेर यांचंही पदार्पण होणार होतं. डिस्को किलरच्या पात्राच्या रुपानं ते लोकांना भेटणार होता. सर्वांनाच ते पात्र आवडलं होतं, पण एडिटिंगमध्ये ते पात्र गाळण्यात आलं.

रंजित कपूर यांनी चित्रपटासाठी एक गाणं लिहिलं होतं. त्या गाण्याचा चित्रपटात समावेश करण्यात आला नाही. मात्र, त्या गाण्याचेच काही शब्द चोरून चित्रपटाचं नाव ठेवलं, 'जाने भी दो यारो'. हे वाक्य पुढच्या काळात 'जुमला' बनलं.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)