विक्रम वेधा, दृश्यम 2 : बॉलिवूडमध्ये दाक्षिणात्य चित्रपटांच्या रिमेकचं युग आता संपुष्टात आलंय का?

फोटो स्रोत, Hrithik Roshan/Instagram
- Author, झोया मतीन
- Role, बीबीसी प्रतिनिधी
हिंदी चित्रपट बनवणारं बॉलीवूड अनेकदा भारतातील इतर चित्रपट इंडस्ट्रीकडे वळलेलं दिसून येतं. यात विशेषत: दक्षिणेकडे रीलिज झालेल्या आणि हिट ठरलेल्या चित्रपटांचा रिमेक बॉलीवूड करतं. पण स्ट्रीमिंग सेवा आणि 'पॅन-इंडिया' ब्लॉकबस्टरचा उदय या 'रिमेक कल्चर'वर कसा परिणाम करेल?
दाक्षिणात्य हिट चित्रपट विक्रम वेधाचा बॉलीवूड रिमेक नुकताच प्रदर्शित झाला. मूळ तमिळ भाषेच्या दिग्दर्शकांनीच हिंदी भाषेतील चित्रपट दिग्दर्शित केला.
या वर्षी जगभरातून एक अब्ज रुपयांपेक्षा जास्त कमाई करणार्या काही मोजक्या बॉलीवूड चित्रपटांपैकी हा चित्रपटदेखील आहे. असं असलं तरी हा चित्रपट अजूनही 100 कोटींचा गल्ला जमवण्यासाठी धडपडत असल्याचं काही रिपोर्टमध्ये म्हटलं आहे.
पण विक्रम वेधाच्या रिलीजच्या आसपास इंटरनेटवर वेगळी चर्चा सुरू झाली होती. बॉलीवूड नवीन कथा आणि कल्पना समोर आणण्यास असमर्थ आहे आणि हिंदी चित्रपट इंडस्ट्री आता स्क्रिप्टसाठी दक्षिणेवर जास्त अवलंबून राहत आहे, अशी ही चर्चा होती.
जगभरातील चित्रपट उद्योगांमध्ये नवीन प्रेक्षकांसाठा यशस्वी चित्रपटांचा रिमेक करण्याचा ट्रेंड तसा नवीन नाहीये. या वर्षीच्या ऑस्करमधील 10 सर्वोत्कृष्ट चित्रपटांपैकी चार हे नामांकित चित्रपटांचे रिमेक होते. यातील अंतिम विजेता कोडाची हा 2014 च्या एका फ्रेंच चित्रपटाचा रिमेक होता.
बॉलीवूडलाही रिमेक आवडतात. 2000 ते 2019 दरम्यान प्रत्येक तीन यशस्वी चित्रपटांपैकी एक चित्रपट हा एकतर रिमेक होता किंवा त्या मालिकेचा भाग होता किंवा दोन्ही होता, असं मिंट वृत्तपत्राच्या विश्लेषणातून समोर आलं आहे. बॉलीवूडमधील बड्या नायकांनी जसं सलमान खान, अक्षय कुमार यांनी दाक्षिणात्य चित्रपटांच्या हिट रिमेकमध्ये काम केलं आहे.
पण कोरोना साथीनंतर चित्रपट उद्योग मंदीतून जात असताना ही गोष्ट रिमेक ट्रेंडसाठी धोक्याची ठरू शकते, असं चित्रपट अभ्यासकांचं म्हणणं आहे. कोरोनामुळे नेटफ्लिक्स आणि अॅमेझॉन प्राईम व्हीडिओसारख्या स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मच्या सदस्य संख्येत कमालीची वाढ झाली. यामुळे इतर भाषांमधील चित्रपट पाहण्यासाठी इच्छुक असलेल्या लोकांसाठी बिगर हिंदी चित्रपटांचं विश्व खुलं झालं.

फोटो स्रोत, Getty Images
चित्रपट व्यापार विश्लेषक कोमल नाहटा सांगतात, "दक्षिण भारतीय चित्रपट इतक्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहेत की बॉलीवूडचे रिमेक आता रिलेव्हंट राहिले नाहीत."
अनेक दाक्षिणात्य चित्रपट निर्माते आता त्यांच्या महत्त्वाकांक्षा वाढवत आहेत. चित्रपटांचं देशव्यापी प्रमोशन करून तसंच चित्रपटगृहांमध्ये हिंदी-डब केलेल्या आवृत्त्या एकाच वेळी रिलीज करून मोठ्या प्रेक्षकांना लक्ष्य करत आहेत.
यावर्षीचे आतापर्यंतचे दोन सर्वांत मोठे हिट चिपत्रट केजीएफ चाप्टर -2 आणि आणि आरआरआर हे मूळतः कन्नड आणि तेलुगुमध्ये बनवले गेले होते. पण त्यांच्या डब केलेल्या आवृत्त्यांनी उत्तर भारतात चांगला व्यवसाय केला.
स्ट्रीमिंग सेवांनीही इतर भाषांमध्ये सबटायटलिंग आणि डबिंग करण्याकडे अधिक लक्ष देण्यास सुरुवात केली आहे. आरआरआरची हिंदी-भाषेतील आवृत्ती मे महिन्यात नेटफ्लिक्सवर रिलीज झाली होती. ही आवृत्ती नेटफ्लिक्सवर पुढचे काही दिवस सर्वाधिक पाहिली गेली.
"चित्रपटांच्या युगात जिथं डब केलेल्या सर्व आवृत्त्या मूळ चित्रपटासोबत एकाच वेळी प्रदर्शित केल्या जातात, तिथं रिमेकचा प्रश्नच उद्भवत नाही. कारण प्रेक्षकांना सर्व काही ओरिजिनल मिळत आहे," नाहटा सांगतात.

फोटो स्रोत, RRR/Instagram
व्यापार निरीक्षक असंही म्हणतात की, आता काय काम करू शकतं, हे शोधण्यासाठी बॉलीवूड धडपडत आहे, तर दक्षिणेकडील चित्रपट उद्योग नवीन कल्पना आणि तरुण कलाकारांना समोर आणत आहेत.
मोठे हिट चित्रपट ज्यात नायक हा मोठ्या मोहिमेवर असतो. अशा कथांमध्ये अतिशयोक्तीचा स्पष्ट घटक देखील असतो. मग यात कॉमेडी, रोमँटिकपणा आणि बर्याच अॅक्शनसह सीनचा समावेश होते. हे असे चित्रपट विशेषत: बॉलीवूडमध्ये रिमेक केले जाऊ शकतात.
पण बॉलीवूडमध्ये रमलेल्या प्रेक्षकांसाठी इतरही बरेच पर्याय आहेत. जसं की कन्नड कॉलेजमधील तरुणांसाठीचा रोमान्स किरिक पार्टी ते हायपरलोकल मल्याळम सुपरहिरो चित्रपट मिनल मुरली.
नाहटा सांगतात की, "बॉलीवूड चित्रपट निर्माते केवळ सर्जनशील कारणांसाठीच नव्हे, तर व्यावहारिक कारणांसाठी देखील दाक्षिणात्य चित्रपटांकडे वळतात. पूर्णपणे नवीन कल्पनांसह प्रयोग करायचं म्हटलं तर निर्मात्यांना काळजी वाटते. कारण चित्रपट बनवणं हे एक महागडं काम असतं."

फोटो स्रोत, Kabir Singh/Instagram
दिग्दर्शक एखाद्या मूळ भाषेतील हिट चित्रपटाचा हिंदी भाषिक प्रेक्षकांसाठी रिमेक करून पैसे मिळवण्याची आशा बाळगून असतो.
नाहटा सांगतात, "अर्थातच रिमेक चालेलच याची काही खात्री देता येत नाही. पण हा एक सूत्रबद्ध प्रयोग आणि अगोदर चाचणी केलेला फॉर्म्युला असल्यामुळे, चित्रपट निर्मात्यांना वाटतं की तो चित्र हिंदीतही काम करेल."
पण हे सूत्र आता थोडे ढिले वाटत आहे. यंदा जर्सी आणि बच्चन पांडे या दक्षिणेकडील चित्रपटांचे दोन बॉलिवूड रिमेक बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरले आहेत. इतर दोन, गुड लक जेरी आणि कठपुथली जे थेट स्ट्रीमिंग सेवांवर रिलीज झाले, त्यांना अनुक्रमे सरासरी आणि वाईट रिव्ह्यू मिळालेत.
चित्रपट समीक्षक भारद्वाज रंजन म्हणतात की, "काही वर्षांपूर्वीपर्यंत रिमेक बनवणं किंवा पाहणं ही एक रोमांचकारी संधी होती. कारण ती इतर भाषांमधील चित्रपट आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी एक विंडो उपलब्ध करून देत होती. पण आता मूळ कथेत पुन्हा काहीतरी शोधण्याचे खरे कारण असल्याशिवाय क्वचितच कुणी एखाद्या जाणीवपूर्वक चित्रपटाचा रिमेक बनवेल."
"विक्रम वेधाचंच उदाहरण घेतलं तर अनेकांनी आधीच मूळ चित्रपट यूट्यूब आणि स्ट्रीमिंग चॅनेलवर पाहिला होता," ते सांगतात.

फोटो स्रोत, Getty Images
या चित्रपटाचा हिंदी रिमेक मूळ तमिळ चित्रपटाशी मिळताजुळता आहे. पण हिंदी रिमेकमध्ये काही खास गोष्टींची निवड केली आहे. जसं की हृतिक रोशन आणि सैफ अली खान यांच्या निवडीचा यात समावेश आहे.
"पण जी माणसं ही चित्रपट त्याच्या कथेसाठी पाहत आहेत, त्यांच्यासाठी हे सगळं मूळ चित्रपटासारखंच आहे. त्यामुळे मग लोक आधीच पाहिलेल्या गोष्टीवर पैसे का खर्च करतील?", रंजन नमूद करतात.
हिंदी भाषिक प्रेक्षक दाक्षिणात्य स्टार्सचे चित्रपट अधिक पाहत आहेत, हे दक्षिण भारतीय चित्रपटांची त्यांच्या क्षेत्राबाहेरील लोकप्रियता दाखवून देते.
कन्नड स्टार यश, तेलगू स्टार अल्लू अर्जुन आणि इतर जण आता त्यांच्या राज्याबाहेर ओळखले जाणारे चेहरे झाले आहेत.
चित्रपट समीक्षक अनुपमा चोप्रा यांना मात्र वाटतं की, "यातील काही चिंता पूर्णत: खऱ्या नाहीत आणि बॉलीवूडच्या प्रेक्षकांना अजूनही ब्लॉकबस्टर रिमेक आवडतात. समस्या रिमेकमध्ये नाही, तर चित्रपट निर्माता मूळ चित्रपटासोबत काय करतो त्याच्याशी निगडित आहे."
"दिग्दर्शकांना त्यात त्यांचा स्वत:चा दृष्टिकोन आणण्याची गरज आहे. तसंच नवनवीन शोध लावण्याचीही आवश्यकता आहे. हा फक्त एखादा कॉपी-पेस्टचा जॉब नाही," असं त्या म्हणतात.
बॉलीवूडमध्ये अजूनही योग्य ते मिळवण्याच्या भरपूर संधी आहेत. दक्षिणेकडील बऱ्याच चित्रपटांच्या रिमेकवर सध्या काम सुरू आहे. ज्यात एक तमिळ हिट सूरराई पोट्टरूचा समावेश आहे. हा चित्रपटसध्या अमेझॉन प्राइम व्हिडिओवर उपलब्ध आहे. तर मल्याळम थ्रिलरचा रिमेक दृश्यम-2 नोव्हेंबरमध्ये रिलीज होणार आहे.
"ओटीटी प्लॅटफॉर्ममुळे चित्रपट लोकांपर्यंत पोहचणारच नाही असं नाही. जर एखादा चित्रपट चांगला असेल तर नो नक्कीच लोकांपर्यंत पोहचेल. फक्त परिस्थिती अशी आहे की बहुतांश चित्रपट असे नाहीत," चोप्रा पुढे सांगतात.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








