‘तेव्हा दिलीपकुमार आणि अमिताभ बच्चन एकमेकांसमोर असणे हीच एक बातमी होती’

फोटो स्रोत, Puneet Kumar
- Author, वंदना
- Role, टीव्ही एडिटर, बीबीसी इंडिया
अमिताभ बच्चन आणि दिलीपकुमार
चित्रपटातील तुरुंगातील एक दृश्य - हत्येचा आरोप असलेला एक कैदी आहे आणि एक पोलीस अधिकारी तुरुंगात त्याच्याशी बोलायला आला आहे.
पोलीस अधिकारी - विजय ये मत भूलो कि मैं यहाँ तुम्हारे बाप की हैसियत से नहीं, पुलिस ऑफ़िसर की हैसियत से बात कर रहा हूँ.
विजय- कौन-सी नई बात है. आपने मुझसे हमेशा एक पुलिस ऑफ़िसर की हैसियत से ही बात की है.
पोलीस अधिकारी - देखो विजय अगर तुम्हें मुझसे कोई गिला है कोई शिकायत है, वो ग़लत है, सही है, वो अपनी जगह है. लेकिन यहाँ तुम्हें भूल जाना चाहिए कि तुम मेरे बेटे हो.
पोलिसांची प्रतिष्ठा आणि मर्यादा समजावून देणारा एक बाप आणि तुरुंगात निष्पाप मुलाच्या डोळ्यात दिसणारा कडवटपणा, त्या दोघांमध्ये किती अंतर आहे, हे दाखविण्यासठी पुरेसे आहेत.
जेव्हा 1 ऑक्टोबर 1982 रोजी दिग्दर्शक रमेश सिप्पी यांचा 'शक्ती' हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि यात पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिलीपकुमार आणि त्यांच्या मुलाच्या भूमिकेत अमिताभ बच्चन यांना लोकांना पाहिले तेव्हा त्याची प्रचंड चर्चा झाली होती.
या काळात 'जंजीर', 'शोले' आणि 'दीवार'सारख्या दमदार चित्रपटांनंतर अमिताभ बच्चन सुपरस्टार पदावर पोहोचले होते तर दिलीपकुमार आपल्या कारकिर्दीच्या सेकंड इनिंग्जमध्ये प्रभावी व्यक्तिरेखेच्या शोधात होते. अशातच दिलीपकुमार आणि अमिताभ बच्चन एकमेकांसमोर असणे हीच एक बातमी होती.

कलाकार - दिलीपकुमार, अमिताभ बच्चन, राखी, स्मिता पाटिल
अमिताभ और दिलीपकुमार प्रथमच एकत्र
सर्वोत्तम अभिनेत्याचा पुरस्कार - दिलीपकुमार

दिलीपकुमार विरुद्ध अमिताभ बच्चन
'शक्ती' ही बाप-मुलाची गोष्ट आहे. त्या दोघांमध्ये गैरसमज, संवादाचा अभाव आणि परस्परांमध्ये इतके अंतर निर्माण झाले आहे की, त्यामुळे संपूर्ण परिवाराची शोकांतिका झाली आहे.

फोटो स्रोत, STRDEL/Getty Images
विजयच्या (अमिताभ) लहानपणी घडलेल्या एका घटनेमुळे हे अंतर तयार झाले आहे. पोलीस अधिकारी अश्विनी कुमार (दिलीपकुमार), त्यांची पत्नी शीतल (राखी) आणि मुलगा विजय (अमिताभ बच्चन) यांच्यासोबत सुखी संसारात रमले आहेत.
एकदा जेके (अमरीश पुरी) नावाच्या स्मगलरचे गुंड विजयचे अपहरण करतात आणि अश्विनी कुमारला अट घालतात की, त्यांच्या साथीदाराला तुरुंगातून सोडून देण्यात यावे. तसे न केल्यास विजयला ठार मारण्यात येईल.
घाबरलेला मुलगा फोनवरून आपल्या वडिलांना मदतीची याचना करतो. पण कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी अश्विनीकुमार म्हणतात, की ते कैद्याला सोडून देणार नाहीत. खरे तर फोन टॅप केल्यानंतर अश्विनीकुमार त्या जागी पोहोचतात आणि या दरम्यान विजयसुद्धा तिथून पळून जातो. त्याच्या पळून जाण्यासाठी तिथलाच एक गुंड त्याची मदत करतो.
लहानपणी घडलेली ही घटना विजयच्या मनात ठसून राहते आणि तो आपल्या वडिलांपासून दूर राहू लागतो आणि जसजसा मोठा होत जातो तसतसं बाप-मुलामधील अंतर वाढतच जातं.
अमिताभ नव्हे राज बब्बरला मिळणार होती भूमिका
'शक्ती'मधील व्यक्तिरेखा कशा प्रकारे निवडल्या गेल्या, याचीही एक रोचक गोष्ट आहे. डीसीपीच्या भक्कम व्यक्तिरेखेसाठी दिलीपकुमार यांचेच नाव होते. पण दिलीपकुमारची भूमिका तरुण नायकाच्या तुलनेने अधिक सशक्त असल्यामुळे कुणाचा अहंकार दुखावला जाऊ नये यासाठी नव्या नायकाचा शोध सुरू होता.
2015 मध्ये फिल्मफेअरला दिलेल्या मुलाखतीत रमेश सिप्पी म्हणाले होते, "आम्ही एका नव्या नायकाची ऑडिशन घेतली होती, पण ती इटेन्सिटी कुठूण आणणार? दरम्यान, आम्ही अशा प्रकारच्या व्यक्तिरेखेसाठी अभिनेत्याच्या शोधात आहोत, हे अमिताभना समजले.
तेव्हा त्यांनी विचारले की, मला का नाही विचारणा केली. मी अमिताभना स्पष्ट सांगितले की, तुमची भूमिका साधी आहे. यात काहीही लार्जर दॅन लाइफ नाही. पण त्यांना दिलीपकुमार यांच्यासमवेत काम करण्याची कल्पना प्रचंड आवडली. त्यांना स्वतःवर विश्वास होता. राखी यांना अमिताभच्या आईच्या भूमिकेसाठी मात्र समजवावे लागले. मी त्यांना म्हणालो की, दिलीपकुमार यांच्यासमवेत काम करण्याची संधी पुन्हा मिळणं कठीण आहे."
ही भूमिका खरंतर सुरुवातील राज बब्बरना दिली होती. पण दिलीपकुमार यांच्यासमवेत काम करण्याची संधी मिळाली अमिताभ बच्चनना.
'शक्ती' या चित्रपटाच्या आठवणींना उजाळा देताना चित्रपट समीक्षक रामचंद्रन म्हणाले, "हा चित्रपट 1977मध्ये लाँच झाला होता. जेव्हा अमिताभ बच्चन चॉपरमधून उतरतात आणि दिलीपकुमार यांना भेटतात, ते दृश्य होतं. पण रमेश सिप्पी यांना आधी शान पूर्ण करायचा होता. म्हणून 'शक्ती' तात्पुरता बाजूला ठेवून दिला. त्या वेळी नीतू कपूर नायिका होती. पण चित्रपट थांबला. त्यानंतर 'शक्ती'मध्ये स्मिता पाटील यांची वर्णी लागली. कारण तोपर्यंत नीतू कपूर यांनी चित्रपटात काम करणं थांबवलं होतं."
ते सांगतात, "एक किस्सा असाही आहे की, अमिताभ बच्चन दिलीपकुमारच्या भावाच्या भूमिकेत असावे, असे दिलीपकुमारना वाटत होतं. पण सलीम-जावेद यांनी अमिताभ मुलगाच असला पाहिजे असा आग्रह धरला. अमिताभला गोळी मारल्यानंतर दिलीपकुमार जेव्हा शांतपणे उभे राहतात, तेव्हा ती शांतता बरंच काही सांगून जाते. खूपच उत्तम दृश्य आहे ते. ते दृश्य ड्रामॅटिक होण्याची शक्यता होती. पण दिलीपकुमार यांनी ते दृश्य उत्तमरित्या साकारलं."
जेव्हा अमिताभ यांना दिलीपकुमार यांची स्वाक्षरी मिळाली नव्हती
अमिताभ बच्चन यांना दिलीपकुमार यांच्याविषयी नेमक्या काय भावना आहेत त्या त्यांनी आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून मांडल्या आहेत.
ते लिहितात, "मी लहान असताना एका रेस्टॉरंटमध्ये आम्हाला दिलीपकुमार दिसले. मी अत्यंत धीर करून त्यांची स्वाक्षरी घेण्याचं ठरवलं. मी खूप उत्साहाने थरथरत होतो. पण माझ्याकडे स्वाक्षरी घेण्यासाठी वही नव्हती. मी धावत गेलो आणि स्वाक्षरीची वही घेऊन आलो. ते तिथेच होते हे पाहून मी सुटकेचा निश्वास सोडला. ते गप्पांमध्ये रंगून गेले होते. मी त्यांना काहीतरी सांगितलं आणि वही पुढे केली. त्यांनी काहीच प्रतिक्रिया दिली नव्हती. त्यांनी माझ्याकडे किंवा त्या वहीकडे पाहिलं नव्हतं. थोड्या वेळाने ते निघून गेले. मी स्वाक्षरीची वही हातात घेऊन उभा होतो. पण ती स्वाक्षरी महत्त्वाची नव्हती. महत्त्वाचे होतं त्यांचे तिथे असणं."
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 1
'शक्ती' या चित्रपटाची धाटणी शोलेपेक्षा एकदम वेगळी आहे. 'शक्ती'मध्ये ना मनोरंजक पंचलाइन आहे, ना विनोद, ना रोमान्स आणि तसे संवादही नाहीत.
'शक्ती'मध्ये एका बाजूला एक पोलीस अधिका दिलीपकुमार आहेत. त्यांना कर्तव्यापुढे बाकी सर्व गोष्टी गौण वाटतात. त्यांचा एक संवाद आहे, 'अब फ़र्ज़ निभाने की आदत-सी हो गई है. इस सबमें बेटा कब पीछे छूट जाता है उसे ख़ुद भी पता भी नहीं चलता.' (आता कर्तव्याचं पालन करण्याची सवय होऊन गेली आहे. या सगळ्यांत मुलगा कधी मागे राहून जातो हे त्याला स्वतःलाही कळत नाही.)
दुसरीकडे मुलगा विजय म्हणजे अमिताभ बच्चन यांच्या मनाला झालेली जखम आणि वडिलांविरुद्ध बंडखोरी हेच त्याच्या आयुष्याचं ध्येय आहे. तो शब्दांनी काहीच बोलत नाही, पण मौनातून सर्व भावना व्यक्त करतो. ही अमिताभची या भूमिकेतील खासीयत आहे.
एक दिवस असाही येतो, जेव्हा स्मगलर गँगमध्ये सामील झाल्यानंतर मुलासमोर पोलिसाच्या वर्दीतील बाप समोर येऊन उभा ठाकतो आणि त्या दोघांच्यामध्ये कायद्याची साखळी आहे. कायद्याच्या कर्तव्यापुढे बापाला बाकी काहीच दिसत नाही आणि हीच भावना त्या दोघांमध्ये दरी निर्माण करते.
सलीम जावेदची उत्तम पटकथा
एक प्रेक्षक म्हणून, या चित्रपटातील कोणत्या पात्राचं वागणं योग्य आहे आणि कोणाचं चूक हे तुम्हाला निश्चित ठरवता येत नाही. किंबहुना, या दोघांपैकी कुणीतरी चुकतं आहे का, हेही ठरवता येत नाही. बरोबर आणि चूक यांच्यातील ही सीमारेषा आहे, त्यावर या चित्रपटाचे कथानक बांधण्यात आलं आहे. दोन व्यक्तींच्या नात्यातील संघर्ष दाखवणारं हे कथानक इतकं उत्कृष्ट आहे की, चित्रपटाच्या शेवट काय होईल हे सुरुवातीलाच समजूनही तुम्ही शेवटपर्यंत खिळून राहता.
विशेषतः दिलीपकुमार आणि अमिताभ बच्चन या दृश्यांमध्ये समोरासमोर आहेत, ती दृश्यं तर एकदम उठून आली आहेत. संपूर्ण चित्रपटात बाप आणि मुलातील संघर्ष ज्या प्रकारे संवादांमधून व्यक्त केला आहे, ते अत्यंत परिणामकारक झालं आहे. त्यांच्यातील मौनसुद्धा तितकंच प्रभावी आहे.
चित्रपट समीक्षक रामचंद्रन श्रीनिवासन म्हणतात, "त्या काळात प्रेक्षकांना चित्रपटगृहांपर्यंत खेचून आणण्यात सलीम जावेद यांच्या पटकथांचा मोठा वाटा होता. त्यांच्या कल्पकतेने अनेक कलाकारांचे आणि चित्रपटकर्त्यांचे नशीब पालटलं आहे. 'अँग्री यंग मॅन' ही त्यांचीच देणगी आहे. अँग्री यंग मॅनच्या प्रतिमेला सलीम जावेद यांनी या चित्रपटातून अजून पुढे नेलं. पटकथा इतकी सशक्त आहे की, वाटतं, सलीम-जावेदची कथा नसती तर हा चित्रपट यशस्वी झालाच नसता. शहरी पार्श्वभूमीवरच केलेला रमेश सिप्पीचा शान हा चित्रपट 'शक्ती'एवढा यशस्वी झाला नव्हता. रमेश सिप्पी यांनी 'शक्ती' केला कारण त्याची पटकथा उत्तम होती.
या चित्रपटातील एक दृश्य खूपच खास आहे. राखी म्हणजेच अमिताभ यांची आई आणि दिलीपकुमार यांच्या पत्नीचा मृत्यू होतो. त्यावेळी अमिताभ तुरुंगात असतात आणि त्यांचे वडील दिलीपकुमार यांनीच त्यांना अटक कलेली असते.
आईच्या अंत्यदर्शनासाठी विजय काही वेळासाठी येतो. तेव्हा फरशीवर बसलेल्या आणि आतून कोसळलेल्या बापाला पाहतो. विजय आपल्या बापाजवळ जमिनीवर बसून राहतो. दोघांमध्ये काहीच संवाद होत नाही.
विजय हळुवारपणे आपला हात बापाच्या खांद्यावर ठेवतो. ज्या कॅमेरा अँगलने हे दृश्य चित्रीत केले आहे, दोघांची नजरानजरही होते. जेव्हा एकाची नजर वर होते तेव्हा दुसऱ्याची खाली असते. कोणीच काहीच बोलत नाही. तरीही दोघे परस्परांना सगळं सांगून जातात. दुःख आणि मृत्यूच्या त्या क्षणी काही वेळ दोघेही एक झाले आहेत. या दृश्याला पाहताना खरंच वाटतं की आपण दोन कसलेल्या कलाकारांना पाहत आहोत.
अमिताभ तालीम करताना दिलीपकुमार सर्वांवर ओरडले होते
दिलीपकुमार यांच्यासमवेत काम करण्याच्या अनुभवाबद्दल अमिताभ यांनी आपल्या ब्लॉगवर लिहिलं होतं, "शक्ती'मध्ये मला दिलीपकुमार यांच्यासमवेत काम करण्याची पहिल्यांदा संधी मिळाली. ते माझा आदर्श होत. चित्रपटाच्या शेवटी माझ्या मृत्यूचं दृश्य होतं. ते मुंबई विमानतळाच्या आत चित्रीत केलं होतं. त्यावेळ त्याला सहार विमानतळ म्हणत असत.
आम्हाला खास परवानगी मिळाली होती. जेव्हा मी मृत्यूच्या दृश्याची तालीम करत होतो. तेव्हा सेटवरील माणसांचा खूप आवाज होता. त्या वेळी खरंतर दिलीपकुमार तालीम करत नव्हते. पण तो गोंधळ ऐकून ते अचानक ओरडले आणि सगळ्यांना गप्प बसायला सांगितले.
ते म्हणाले, कुणी अभिनेता तालीम करत असेल तर त्याचं महत्त्व समजून घेतलं पाहिजे आणि त्याच्या त्या क्षणांचा आदर केला पाहिजे. दिलीपकुमारसारख्या दिग्गज अभिनेत्याने दुसऱ्या कलाकारासाठी असा प्रकारे वागणे, त्यांची महानता दर्शवते."
चित्रपट पाहताना, या दोघांमध्ये संवाद झाला पाहिजे, असं प्रेक्षकांना सारखे वाटत राहतं. दिलीपकुमार यांचं पात्र अशा प्रकारे उभं राहतं की, हा असा माणूस आहे, ज्याला भावना व्यक्त करता येत नाहीत. तो तर नर्सला हेही सांगू शकत नाही की, आत जी बाई बाळंत झाली आहे ती त्याची पत्नी आहे.
दुसरीकडे अमिताभसारखा एक तरुण आहे, ज्याने आपल्या सगळ्या जखमा आणि राग आतल्या आत दाबून ठेवला आहे, जो पुढे जाऊन बंडखोरीच्या रुपात बाहेर येतो.
डोळ्यांनी अभिनय करणारा अमिताभ
सामान्यपणे चित्रपटांमध्ये अमिताभची एन्ट्री दणदणीत असते. पण 'शक्ती'मध्ये मात्र ते एका पत्र्याच्या डब्याला लाथ मारत भटकत आहेत, अशी त्यांची एंट्री आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 2
या कथानकानुसार 'शक्ती'च्या पटकथेमध्ये रोमांचकतेला वावच नव्हता. बच्चन यांच्या पात्राला जे म्हणायचं आहे, ते त्यांचं मौन व्यक्त करतं किंवा काही संवाद जे त्यांच्यातील राग दर्शवतात.
उदाहरणार्थ विजय आपल्या बापाला म्हणतो, "नफ़रत है मुझे दुनिया के उस हर क़ानून से जिसे मेरा बाप मानता है. आज से मैं अपना क़ानून ख़ुद बनाऊंगा. ज़िंदगी में जो कुछ भी देखा उसके बाद ये नाम... बेटा, किसी गंदी गाली की तरह लगता है."
स्मिता पाटिल यांचा व्यावसायिक चित्रपट
'शक्ती'मध्ये स्मिता पाटील यांची भूमिका छोटीशी आहे. अमिताभ यांच्या प्रेयसीची भूमिका त्यांनी केली आहे. त्यांची व्यक्तीरेखाही तत्कालीन स्त्री प्रतिमेला छेद देणारी होती. ही मुलगी काम करते, तिचे स्वतःचं घर आहे.

फोटो स्रोत, MR Productions
जेव्हा ती विजयला पहिल्यांदा भेटते तेव्हा ती पुढाकार घेते. त्याला घरी कॉफीसाठी निमंत्रित करते. विजय बेघर होतो तेव्हा लोकांचा विचार न करता त्याला ती आपल्या घरात राहायला जागा देते. त्यानंतर विजयसोबत ती 'लिव्ह-इन'मध्ये राहते.
'शक्ती'च्या आधी अमिताभसोबत स्मिता पाटील यांचा नमक हलाल प्रदर्शित झाला होता. कलात्मक चित्रपटांसोबत व्यावसायिक चित्रपटांमध्येही त्या ठसा उमटवत होत्या. 'शक्ती'मध्ये दिलीपकुमार यांना धीर देणाऱ्या स्मिता पाटीलच असतात.
अमिताभ बच्चन आणि दिलीपकुमार यांच्यातील स्पर्धा
दिलीपकुमार आणि अमिताभ बच्चन या दोघांमधील अभिनयस्पर्धा हेच या चित्रपटाचे प्रमुख आकर्षण होतं.
उदा. एका दृश्यात समुद्रकिनारी बाप-मुलगा यांची भेट होते आणि गुन्हेगारी विश्वात गेलेल्या आपल्या मुलाला अश्विनीकुमार म्हणतात, "विजय मैं आज एक बाप की हैसियत से समझा रहा हूँ. कल पुलिस अफ़सर की हैसियत से मैं तुम्हारे साथ कोई रियायत नहीं कर सकूँगा न हमदर्दी. अगली बार तुम बाप से मिलोगे या पुलिस अफ़सर से इसका फ़ैसला तुम्हे ख़ुद करना है."
याला उत्तर देताना विजय (अमिताभ) म्हणतो, "इसका फ़ैसला तो आप कई बरस पहले बचपन में ही कर चुके हैं जब मैं उन बदमाशों के अड्डे में क़ैद था. मैंने फ़ोन पर अपने बाप से बात की थी और दूसरी तरफ़ से एक पुलिस अफ़सर की आवाज़ सुनाई दी. आज भी आपकी आवाज़ से एक पुलिस अफ़सर के लहजे की बू आ रही है."
संपूर्ण चित्रपटभर जणू दोघांची जुगलबंदी सुरू आहे, असंच वाटत राहतं.
मुंबई विमानतळावर चित्रीत झाला क्लायमॅक्स
चित्रपटाचा क्लायमॅक्स अश्विनीकुमारने उच्चारलेल्या शब्दांना खरं करणारा वाटतो. कायद्यापासून पळणाऱ्या मुलाला पकडताना पोलिसाची वर्दी घातलेला बाप कसलाही मुलाहिजा न बाळगता आपल्या मुलाला गोळी घालतो.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 3
वडिलांच्या मिठीत प्राण सोडणारा मुलगा आपल्या संपूर्ण आयुष्यात पहिल्यांदा म्हणतो की, बापाविषयी असलेलं प्रेम आपल्या मनातून काढण्याचा प्रयत्न त्याने आयुष्यभर केला, पण तो कायम प्रेमच करत राहिला. जेव्हा अश्विनीकुमार म्हणतात की, "मीसुद्धा तुझ्यावर प्रेम करतो, तेव्हा विजय म्हणतो, मग डॅड, कधी सांगितलं का नाही."
या संपूर्ण गोष्टीचा क्लायमॅक्स आणि तात्पर्य या एकाच संवादात लपलेलं आहे. 'कभी कहा क्यूँ नहीं.'
दिलीपकुमार यांना सर्वोत्तम अभिनेत्याचा पुरस्कार
दिलीपकुमार आणि अमिताभ बच्चन यांच्यापैकी या चित्रपटात कोण वरचढ ठरले याची चर्चा खूप झाली.
चित्रपट पत्रकार रामचंद्रन श्रीनिवासन यांच्यानुसार, "शक्ती'मध्ये अमिताभ बच्चन आणि दिलीपकुमार या दोघांनीही उत्तम अभिनय केला आहे. त्या काळात अमिताभ एक प्रकारे 'वन स्टॉप एंटरटेनर' होते.
अनेकांनी रमेश सिप्पी यांना सल्ला दिला होता की, 'शक्ती'मध्ये त्यांनी विनोदी प्रकारातील दृश्यंही घालावी. रमेश सिप्पी यांनाही वाटलं की, चित्रपट खूपच गंभीर आहे. पण या चित्रपटात सर्वोत्तम अभिनयाची आवश्यकता होती.
रमेश सिप्पी यांना कोणत्याही प्रकारची तडजोड केली नाही. त्यामुळेच सर्वांचं काम उत्तम झालं.
या चित्रपटात अमिताभ यांनी साकारलेल्या व्यक्तिरेखेचा मृत्यू होतो, हे ऐकून अमिताभना आनंदच झाला असेल, असं मला वाटतं. कारण ज्या चित्रपटात त्यांनी साकारलेल्या पात्राचा मृत्यू होतो, तो चित्रपट हिट होत असे."

फोटो स्रोत, MR Productions
फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात दिलीपकुमार यांनी डीसीपी अश्विनी कुमार या व्यक्तिरेखेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. अमिताभ बच्चन यांना फक्त नामांकन होतं.
त्या वेळी इंडिया टूडे नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या या चित्रपटाच्या समीक्षणात म्हटलं होतं, "एक असा चित्रपट ज्याचं निर्मिती मूल्य उच्च आहे, नावाजलेले कलाकार आहेत, बजेट भरपूर आहे, ज्यात कलात्कम सिनेमाचा दिखावा नाही, असा चित्रपट मुंबई सिनेजगतात वारंवार होत नाही.
'शक्ती'मध्ये ही सर्व वैशिष्ट्यं आहेत. 1950 मध्ये बाप-मुलाची अशा प्रकारची गोष्ट संग्राम नावाच्या चित्रपटात आली होती. त्यानंतर 1974 मध्ये तेलुगू चित्रपट थंगापटक्कम हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. ज्यात शिवाजी गणेशन यांनी मुलाची व्यक्तिरेखा साकारली होती.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 4
'शक्ती'च्या काही वर्षांपूर्वी रमेश सिप्पी यांनी शोले नावाचा इतिहास रचला होता. त्यानंतर त्यांनी बच्चन यांना घेऊन केलेला शान फार चालला नव्हता. 'शक्ती' हे सिप्पींसाठीही एक प्रकारे 'शक्ती'परीक्षण होतं.
अर्थात, दोन्ही चित्रपटांची गोष्ट आणि परिस्थिती एकदम वेगळी आहे. पण एक चित्रपट म्हणून 'शक्ती'मध्ये मदर इंडियाचा अंश दिसून येतो.
मदर इंडियामध्ये नर्गिसचे आपल्या मुलावर प्रेम असते, मात्र जेव्हा तोच मुलगा मर्यादा ओलांडतो तेव्हा त्याला गोळी घालण्यास ती कचरत नाही. गोळी घातल्यानंतर ती मुलाला आपल्या मिठीत घेते. 'शक्ती'मध्येही दिलीपकुमार अशाच प्रकारे व्यक्त होतात.
फक्त एकदाच मोठ्या पडद्यावर एकत्र
'शक्ती'ला 1983 चे एकूण चार फिल्मफेअर पुरस्कार मिळाले होते. मुशिर-रियाज यांच्या जोडीला सर्वोत्तम चित्रपटाचा, सलीम-जावेद यांना सर्वोत्कृष्ट पटकथेचा आणि पी. हरिकिशन यांना सर्वोत्तम ध्वनीसंयोजनाचा पुरस्कार मिळाला होता.
या चित्रपटाबद्दल अजून एक रंजक माहिती हीसुद्ध आहे की, यात सतीश शहा यांची एक छोटीशी भूमिका आहे. तेव्हा त्यांना कोणी ओळखतही नव्हतं. याच्याच एका वर्षानंतर 'जाने भी दो यारो' हा चित्रपट प्रदर्शित झाला होता.
1982 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'शक्ती'मध्ये छोट्याशा भूमिकेत अनिल कपूरही दिसतात. त्यांनी दिलीपकुमारच्या नातवाची भूमिका केली होती. त्या वेळी अनिल कपूर छोट्या भूमिका करत असत.
पण 'शक्ती'च्या एका वर्षानंतर वो सात दिन चित्रपट प्रदर्शित झाला आणि ते एक नायक म्हणून प्रस्थापित झाले. 1983 मध्ये मशालमध्ये आणि 1983 मध्ये कर्मा चित्रपटात त्यांना दिलीपकुमार यांच्यासमवेत काम करण्याची संधी मिळाली.
दिलीपकुमार आणि अमिताभ बच्चन या दोघांना मोठ्या पडद्यावर एकत्र आणणारा 'शक्ती' हा एकमेव चित्रपट होता.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








