ऐन दिवाळीत चक्रीवादळाचं संकट, हवामान खात्याकडून अलर्ट #5मोठ्याबातम्या

फोटो स्रोत, Getty Images
आज विविध वृत्तपत्र आणि वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा :
1. ऐन दिवाळीत चक्रीवादळाचं संकट, हवामान खात्याकडून अलर्ट
ऐन दिवाळीत देशावर चक्रीवादळाचं संकट घोंगावत आहे. बंगालच्या उपसागरात सीतरंग नावाचं चक्रीवादळ निर्माण झालंय. या वादळामुळे जोरदार वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे 12 राज्यांना हवामान खात्यानं यलो अलर्ट जाहीर केला आहे. ही बातमी झी 24 तासने दिली आहे.
ओडीशा, पश्चिम बंगालमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आहे. त्यामुळे आता नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात येतंय.
येत्या 25 ऑक्टोबरला हे वादळ पश्चिम बंगालच्या किनारपट्टीवर धडकणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय. यावेळी वाऱ्याचा वेग 100 ते 110 किलोमीटर प्रतितास एवढा असेल, असा अंदाज आहे. त्यामुळे प्रशासन देखील अलर्ट मोडवर आहे.
2. अमरावती : तीन महिन्यांत 235 शेतकऱ्यांच्या आत्महत्या
अतिवृष्टी आणि सततचा पाऊस यामुळे पश्चिम विदर्भातील पिके मातीमोल झाल्याने शेतकऱ्यांमध्ये निराशेचे वातावरण असून जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या तीन महिन्यांत अमरावती विभागातील 235 शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले.
ही बातमी लोकसत्ताने दिली आहे.
ल्प उत्पादनाचा प्रभाव शेतीच्या अर्थकारणावर जाणवणार असून नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत. सरकारी आकडेवारीनुसार, जानेवारी 2022 पासून आतापर्यंत अमरावती विभागात 788 शेतकरी आत्महत्यांची नोंद झाली आहे.
त्यापैकी जुलै महिन्यात 65, ऑगस्टमध्ये 107, तर सप्टेंबर महिन्यात 63 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. या तीन महिन्यांत सर्वाधिक 85 शेतकरी आत्महत्या या यवतमाळ जिल्ह्यातील आहेत. यंदा पावसाळय़ाच्या तीन महिन्यांमध्ये 235 शेतकऱ्यांनी टोकाचा निर्णय घेतला.
3. मुलाला खांबाला बांधून 3 तास मारहाण, मोबाइल चोरीचा संशय
उत्तर प्रदेशच्या आझमगड जिल्ह्यात चोरीच्या संशयावरून एका मुलाला खांबाला बांधून मारहाण केल्याची संतापजनक घटना उजेडात आली आहे. ही घटना आझमगडच्या बरदह भागातील हदिसा गावात घडली. स्थानिकांना मुलाने मोबाइल चोरल्याचा संशय होता.
ही बातमी दिव्य मराठीने दिली आहे.
वडिलांचा आरोप आहे की, जवळपास 3 तास हात-पाय बांधून मारहाण झाली. पाणी मागल्यावर त्याच्या तोंडात मिरची कोंबण्यात आली. गावातील लोकांनी मूकदर्शक बनून ही घटना पाहिली. पण, कुणीही त्याला सोडवण्याचा प्रयत्न केला नाही. या प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर जिल्हा पोलिस अधीक्षक अनुराग आर्य यांनी प्रभारी निरीक्षकांना फैलावर घेत गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले. या निर्दयी मारहाणीनंतर चिमुरड्याच्या कानातून रक्तही येत होते.
अधिकारी टी शैलेन्द्र लाल यांनी सांगितले की, पोलिसांना सोशल मीडियाच्या माध्यमातून या घटनेची माहिती मिळाली. या प्रकरणी विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी सुरेंद्रला अटक करण्यात आली. विशेषतः मुलाला मारहाण होताना मूकदर्शक बनलेल्या प्रत्यक्षदर्शींवरही कलम 120 ब अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
4. अमिताभ बच्चन यांना दुखापत, KBC च्या सेटवर घडली घटना
बॉलिवूडचे बिग बी अमिताभ बच्चन यांचा अपघात झाल्याचं समोर आलं आहे.. अमिताभ यांच्या पायाची नस कापली गेली, त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं. ही बातमी न्यूज 18 लोकमतने दिली आहे.
अमिताभ यांनी ब्लॉगवर अपघाताची माहिती शेअर केली आणि सांगितले की रक्त थांबवण्यासाठी काही टाकेही घातले आहेत.

फोटो स्रोत, Getty Images
रविवारी KBC च्या पुढच्या एपिसोडचे शूटिंग करत असताना त्यांचा अपघात झाला. अमिताभ यांचा पाय कापला गेला. अभिनेत्याच्या पायाच्या मागची नस कापली गेली. त्यामुळे खूप रक्तस्त्राव झाला होता. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. रक्तस्त्राव थांबवण्यासाठी डॉक्टरांना त्यांच्या पायाला टाके घालावे लागले. डॉक्टरांनी त्यांना सध्या विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे.
5. रवी राणांवर अदखलपात्र गुन्हा दाखल
आमदार बच्चू कडू यांच्याविरोधात मानहानीकारक वक्तव्य सोशल मीडियावर टाकल्यामुळे अमरावती पोलिसांनी रवी राणांवर अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे.

फोटो स्रोत, Facebook/Ravi Rana
ही बातमी लोकमतने दिली आहे.
'बच्चू कडू यांना काही सिद्धांत नाही, विचार नाही. ते दुसऱ्यांना दम देतात, गलिच्छ बोलतात. ते ज्या स्तरावर जातील त्या स्तरावर मलाही जाता येते' अशी प्रतिक्रिया राणा यांनी गुन्हा दाखल झाल्यानंतर दिली.
हेही वाचलंत का ?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








