मराठवाडा पाऊस : 'आता पिक नाही तर फक्त घर आणि जीव वाचण्याची अपेक्षा'

- Author, श्रीकांत बंगाळे
- Role, बीबीसी मराठी
"आता पिकांच्या नुकसानीचा विषयच नाही राहिला. पीकं सगळी केव्हाच संपली. आता फक्त घर व्यवस्थित राहावं, शेतातील माती शिल्लक राहावी आणि आमचा जीव वाचाला पाहिजे."
आज सकाळीच मला जालना जिल्ह्यातल्या घनसावंगी तालुक्यातल्या बानेगावचे शेतकरी सिद्धेश्वर जंगले यांचा मेसेज आला.
फोन करतो म्हटलं तर त्यांनी तिकडून व्हीडिओ कॉल केला आणि रात्री झालेल्या पावसानं कसं नुकसान केलंय ते दाखवायला लागले.
पावसाबद्दल विचारल्यावर ते म्हणाले, "सोमवारी रात्री 9 ते 1 भयंकर पाऊस होता. रात्री घरं हादरत होती. इतक्या वीजा कडकत होत्या. वाऱ्याचा आवाज होता. आतापर्यंतची सगळ्यात मोठी ढगफुटी आम्ही पाहिली."
सिद्धेश्वर यांनी 5 एकरावर सोयाबीन, दीड एकरावर ऊस आणि 7 एकरावर कपाशीचं लागवड केली होती.
मराठवाड्यात गेल्या आठवड्यात अतिवृष्टी झाली होती. यामुळे सिद्धेश्वर यांच्या शेतपिकांचं मोठं नुकसान झालं होतं. पण, सोमवारी रात्री आणि मंगळवारी सकाळी जो पाऊस झाला, त्यामुळे तर त्यांच्या उरल्यासुरल्या अपेक्षाही संपल्या आहेत.

ते सांगतात, "आजपर्यंत आमच्या भागात 5 वेळा ढगफुटी झाली. पहिल्या ढगफुटीच्या वेळीच खूप नुकसान झालं होतं. त्यानंतर गेल्या आठवड्यात जो पाऊस झाला त्यानं तर कापूस, सोयाबीन अख्खीच्या अख्खी पाण्यात गेली. आता 20 टक्के उसाची अपेक्षा राहिली होती, रात्री हा असा पाऊस झाला. त्यामुळे आमचा ऊस पुन्हा आडवा झालाय."
सोमवारी रात्री झालेल्या पावसानं सिद्धेश्वर यांचं घर, गोठा आणि कांदा चाळ पाण्यात गेलीय.
ते सांगतात, "आज आमची कांदा चाळ सगळी पाण्यात आहे. 10 ते 12 टन कांदा होता तिच्यात. सगळा वाहून गेला आहे. सगळ्या पिकांचं धरून 9 ते 10 लाखांचं नुकसान आहे आमचं."

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 5 दिवसांपूर्वी प्रशासनाला नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. पण, अद्याप गावातील पंचनामे न झाल्याचं सिद्धेश्वर सांगतात.
सरकारकडून काय अपेक्षा आहेत असं विचारल्यावर ते म्हणतात, "अपेक्षा तर खूप आहेत. आमचं इतकं नुकसान झालंय की सरकारनं पंचनाम्याच्या भानगडीत पडू नये. सरसकट ओला दुष्काळ जाहीर करून आम्हाला मदत द्यायला हवी. कारण आता वर्षभर आमच्या हाती काही लागणार नाहीये. सरकारनं मदत केली तर निदान आमचे जगण्याचे प्रश्न सुटतील."
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)









